निरगाठ

डॉ. वैशाली देशमुख
सोमवार, 29 नोव्हेंबर 2021

किशोर काथा

(पूर्वार्ध)

विनीतच्या वागण्यानं निशा आणि भूषण हैराण झाले होते. त्यांनीच डॉक्टरांकडे जायचं ठरवलं. मुलांच्या वागणुकीबाबत विफल होऊन पालकांनी टीन-क्लिनिकमध्ये येणं डॉक्टरांसाठी काही नवीन नव्हतं. 

घरात एक नकोशी शांतता पसरली होती. निशा मुकाट्यानं काही न बोलता आपली कामं उरकत होती. आधीच लाल झालेलं नाक अधून मधून रुमालाला पुसत होती. भूषण त्याच्या जुन्या फाइल्स काढून बसला होता. आज रविवार. ते दोघं सकाळी टेकडीवर जायचे. पण आज दोघांचंही कुठेच लक्ष लागत नव्हतं. “तुला चहा देऊ का रे?” निशानं विचारलं. “नको.” एरवी चहाप्रिय असणाऱ्या भूषणचं संक्षिप्त उत्तर. 

विनीत त्याच्या खोलीत होता. बाहेरच्या परिस्थितीचा अंदाज घेत होता. काल रात्रीचा प्रसंग आठवून त्याला जरा स्वत:ची लाजच वाटत होती. ‘जरा जास्तीच आरडाओरडा केला आपण काल. पण काय करणार? रागच इतका आला होता! एकतर यांना माझ्याशी कसं बोलावं समजत नाही. चिडून तरी बोलतात, नाहीतर इमोशनल तरी होतात. मी आता मोठा झालोय हे लक्षातच घेत नाहीत. मग होतात भांडणं. यात माझी काय चूक? पडले या चाचणीत कमी मार्क्स, तर एवढं चिडायला काय झालं? सांगितलं ना पुढच्यावेळी करीन अभ्यास म्हणून! पण नाही, यांचा विश्वासच नाही. म्हणे आपण डॉक्टरांकडे जाऊया. काहीही काय? मला काय वेडा समजतात का? पण किती जोरात बोललो आपण! कंट्रोल होत नाही आवाज, फुटलाय ना नुकताच! आईचा चेहरा किती पडला होता! डोळ्यांत पाणी आलं होतं तिच्या.’ विनीतच्या मनात उलटसुलट विचार चालू होते. आपल्याला नक्की काय होतंय, काय बरोबर, काय चूक, आपण काय करायला हवंय; काही कळेनासं झालं होतं त्याला.  

काम करता करता निशाच्या डोक्यातही विचारांचा भुंगा भुणभुणत होताच. वेळच्या वेळी अभ्यास न करणं, अभ्यासाच्या नावाखाली सारखं मोबाईल घेऊन बसणं, सतत पुढचे वायदे करणं, वाद घालणं आणि वर उद्धटासारखं बोलणं, अशा विनीतच्या वागण्यानं निशा आणि भूषण हैराण झाले होते. विनीतशी कसं वागावं हेच त्यांना समजेनासं झालं होतं. तिच्या अगदी जवळच्या मैत्रिणीशी, तृप्तीशी ती न राहवून बोलली शेवटी याबद्दल. तिनं तिला एका डॉक्टरांचं नाव सुचवलं. निशा म्हणाली, “अगं एवढं काही नाही, मला फक्त समजत नाहीये माझं काय चुकतंय विनीतच्या बाबतीत. फारच चिडचिड करतो गं. डॉक्टरांकडे जाऊन काय करू? या वागण्याला काही औषध नाही इतकं कळतं मला.” पण तृप्ती म्हणाली, “हे बघ, औषधं-गोळ्यांसाठीच डॉक्टरकडे जायचं असतं का? लहानपणी नाही का आपण ‘जेवत नाही, हट्टी आहे, ऐकत नाही’ अशा गोष्टी मुलांच्या डॉक्टरांना विचारायचो, ते काय औषधांसाठी का? मी सुचवलेल्या या डॉक्टर टीनएजर्सना आणि त्यांच्या पालकांना गाइड करतात. वेळच्या वेळी मदत घेतली की आपला आणि मुलांचा, दोघांचाही त्रास कमी होतो गं.” शेवटी निशाला ते पटलं. पुढचा टप्पा भूषणला पटवायचा होता. तो जरा आढेवेढे घेतच तयार झाला. मग दोघं मिळून काल रात्री विनीतशी बोलायला गेले, तर हेऽऽऽ एवढं रामायण झालं. हल्ली साध्या साध्या, किरकोळ मुद्द्यांवरून सुरू झालेल्या संभाषणाचासुद्धा असाच शेवट व्हायचा.  

“मी काय म्हणते भूषण, आपणच जाऊन यायचं का डॉक्टरांकडे? कधी कधी मला वाटतं, विनीत म्हणतो ते खरंच आहे, मदतीची गरज त्याला नव्हे, आपल्याला आहे. तू तुझ्या कामात असतोस, पण छोट्या छोट्या गोष्टींना तोंड मला द्यायला लागतं. इतकं हताश आणि असहाय्य वाटतं माहितेय?” डोकं जरा स्थिरस्थावर झाल्यावर रात्री निशानं विषय काढलाच. हातातल्या पुस्तकातून डोकं वर काढून भूषण म्हणाला, “अगं तुझीपण कमाल आहे. ऐकून का घेतेस त्याचं? तिथल्या तिथे झापायचं त्याला. ते सोडून मुळूमुळू रडत काय बसतेस? हे डॉक्टरांचं तू म्हणते आहेस खरं, पण मला नाही वाटत त्याचा काही उपयोग होईल.” निशानं हताशपणे मान हलवली, “तुला दुसरा काही उपाय सुचतोय का? नाही ना? मग जाऊया आपण. मी शनिवारची अपॉइंटमेंट घेते.”

मुलांच्या वागणुकीबाबत विफल होऊन पालकांनी टीन-क्लिनिकमध्ये येणं डॉक्टरांसाठी काही नवीन नव्हतं. त्यांच्या शांत केबिनमध्ये बसल्यावर निशा आणि भूषण जरा रिलॅक्स झाले. पहिला जवळजवळ अर्धा तास डॉक्टर फक्त ऐकत होत्या. ‘बोलताना संगतवार नाही बोललं तरी चालेल; सुचेल-आठवेल तसं सांगा,’ अशी मुभा त्यांनी सुरुवातीलाच दिली होती. समोर टिश्यूपेपरचा बॉक्सही ठेवला होता. दोघंही आळीपाळीनं बोलायला लागले. मधेच निशानं एक प्रसंग सांगितला तेव्हा भूषणनं तिच्याकडे चमकून पहिलं. त्या वेळेस तिनं असा विचार केला असेल, असं त्याला वाटलंच नव्हतं आणि किरकोळ वाटणारे एक-दोन प्रसंग भूषणला इतके खोलवर लागले होते, हे निशाला नव्यानं कळलं.

 हा सर्व वेळ डॉक्टर एखाद-दुसरं वाक्य सोडलं तर काही बोलल्या नव्हत्या. टिश्यूपेपरनं डोळे टिपत निशा म्हणाली, “आठवलं तेवढं सांगून झालं मॅडम. पण अजूनही कितीतरी गोष्टी सांगायच्या राहिल्यात असं वाटतंय,” समोरच्या डायरीत लिहिता लिहिता डॉक्टर हसून म्हणाल्या, “खरंय. आठवेल हळूहळू. आठवले की लिहून ठेवा मुद्दे.” भूषण म्हणाला, “तुम्ही सांगा आम्हाला जरा, आमचं काय चुकतंय?” 

डॉक्टरनी टेबलावरच्या बाटलीतलं घोटभर पाणी प्यायलं. “आपलं खूप चुकलंय, आपण वाईट पालक आहोत, असे विचार आधी डोक्यातून काढून टाकूया का? विनीतला त्रास व्हावा, त्याचं वाईट व्हावं म्हणून यातली एकतरी गोष्ट तुम्ही केली होती का?” दोघांनीही एकाच वेळी नकारार्थी माना हलवल्या. “आता काय करायचं याचा विचार करू या. आपल्याला एखाद्या ठिकाणी पोचायचं असेल आणि आपण विरुद्ध दिशेला चाललोय असं लक्षात आलं तर आपण काय करतो? आपण रस्ता बदलतो, त्यात करेक्शन करतो. त्याच रस्त्यावरून जात राहिलो तर कधीच पोचणार नाही आपण. आणि प्रत्येकाचं मुक्कामाचं ठिकाण वेगळं असल्यामुळे त्यांचे रस्तेही निराळे असणार, म्हणजे आपला रस्ता आपणच शोधायला हवा, नाही का? आपला स्वभाव, आपलं मूल, कुटुंब, परिस्थिती या सगळ्याचा त्यामध्ये विचार व्हायला हवा. आपल्या चर्चेतून आपण हा आपला युनिक रस्ता शोधायचा प्रयत्न करणार आहोत, त्यात माझा रोल फक्त वाटाड्याचा असेल.  

विनीत आता पौगंडावस्थेच्या एका अडनिड्या वळणावर पोचलाय. तुम्हीही आयुष्याच्या मधल्या टप्प्यात प्रवेश करताय. आत्तापर्यंत हमखास लागू पडणाऱ्या क्लृप्त्या बदलायची आता वेळ आलीय. आणि मला खात्री आहे की आज सविस्तर बोलल्यामुळे तुम्हाला स्वतःलाच काही उपाय सुचायला सुरुवातही झाली असेल. खरं सांगू का, तुमच्याइतकाच विनीतही गोंधळलेला असणार. त्याला घेऊन या पुढच्यावेळी. त्याच्या मनातले कोणतेही प्रश्न तो मला विचारू शकतो म्हणावं. पण हो, तुम्हाला सांगणार नाहीये मी ते!” तिघंही खळखळून हसले. जातानाचं निशाच्या डोळ्यातलं 
पाणी त्या हसण्यामुळे होतं... 

संबंधित बातम्या