सुरगाठ

डॉ. वैशाली देशमुख
सोमवार, 13 डिसेंबर 2021

किशोर काथा

(उत्तरार्ध)

डॉक्टर विनीतशी स्वतंत्रपणे बोलल्या. त्याच्याशी त्या अगदी मोठ्या माणसाशी बोलल्यासारखं बोलत होत्या. विनीत त्याच्या मनाविरुद्ध आलाय हे त्याच्या देहबोलीवरून स्पष्ट दिसून येत होतं. पण त्याला अपेक्षित असलेले प्रश्न डॉक्टरांनी त्याला विचारलेच नाहीत, उलट गप्पाच मारल्या.

“आई, तुझ्या समाधानासाठी येतोय मी आज डॉक्टरांकडे. आणि तेसुद्धा आमचं बोलणं आमच्यातच राहील याची त्यांनी खात्री दिलीय म्हणून. पण परत माझ्या मागे लागू नकोस.” विनीतनं निशाला निर्वाणीचा इशारा दिला. “तू ये तर खरा, तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत मला.” विनीत यायला तयार झालेला पाहूनच निशानं सुटकेचा निःश्वास सोडला.

डॉक्टर विनीतशी स्वतंत्रपणे बोलल्या. त्याच्याशी त्या अगदी मोठ्या माणसाशी बोलल्यासारखं बोलत होत्या. विनीत त्याच्या मनाविरुद्ध आलाय हे त्याच्या देहबोलीवरून स्पष्ट दिसून येत होतं. पण त्याला अपेक्षित असलेले प्रश्न डॉक्टरांनी त्याला विचारलेच नाहीत - ‘काय होतंय? काय प्रॉब्लेम आहे?’ असं काहीच नाही. उलट त्याचं रुटीन, शाळा, मित्र-मैत्रिणी, त्याला काय आवडतं, त्याचे छंद, असंच ते दोघं बोलत होते. अधूनमधून डॉक्टर त्यांच्या डायरीत नोंदी करत होत्या. “माझ्या रेफरन्ससाठी.” विनीतच्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे पाहून त्यांनी हसून स्पष्टीकरण दिलं. विनीत म्हणाला, “एक विचारू? आपल्या या बोलण्याचा फायदा काय? नुसत्या गप्पा तर मारतोय आपण.” “विनीत, या नुसत्या रॅंडम गप्पा वाटल्या तरी खरंतर ही एक खूप अभ्यासपूर्वक तयार केलेली प्रश्नावली होती. त्यातून तुझ्याविषयी, तुझ्या भोवतालाविषयी आवश्यक ती सांगोपांग माहिती मिळाली. तुझ्या शरीरात अनेक बदल होतायत, हो ना? त्याचबरोबर तुझ्या मेंदूतही खूप घडामोडी घडतायत.” डॉक्टरांच्या टेबलावर मानवी मेंदूची प्रतिकृती होती. तिच्याकडे बोट करून त्या म्हणाल्या, “हा आपला मेंदू फार इन्टरेस्टिंग असतो हं, विनीत! लहानपणापासून तो वाढत असतो खरा, पण किशोरवयात त्या विकासाला चांगलाच वेग येतो. त्यातही मधला मेंदू, म्हणजे ज्यात भावना असतात तो; पूर्ण उत्साहानं काम करत असतो. त्यामुळे तुझ्या लक्षात आलं असेल की तुझ्या भावना खूप तीव्र, टोकाच्या असतात. आणि काही कळायच्या आत त्या मनाचा ताबा घेतात. म्हणजे राग आला की अक्षरशः संतापानं आंधळं व्हायला होतं, दुसरा कुठलाही विचार धडपणे करता येत नाही. फक्त रागच नव्हे, तर अगदी आनंदसुद्धा अतिरेकी व्यक्त करतात मुलं. बघ ना- भन्नाट गाडी चालवतात, ‘चीअर्स’ म्हणून मद्याचे प्याले रिचवतात, ड्रग्सच्या वलयात हरवून जातात, बेभान होऊन रस्त्यावर नाचतात, मुलींची छेडसुद्धा काढतात. खरंतर या भावनांचा लगाम खेचायची सोय आपल्या मेंदूत करून ठेवलेली असते. ती असते प्रीफ्रॉन्टल कॉर्टेक्स नावाच्या मेंदूच्या पुढच्या भागात, या इथे. मेख अशी आहे की हा भाग जऽऽऽरा उशिरा विकसित होतो, साधारण सोळा-सतरा वर्षांच्या नंतर.” विनीत मन लावून ऐकत होता, “म्हणजे? तोपर्यंत ब्रेक-फेल?” डॉक्टर म्हणाल्या, “परफेक्ट उपमा दिलीस अगदी. आता ‘ब्रेक-फेल’ म्हणजे गाडी हळूहळू चालवायला लागणार ना! म्हणून मग काळजी घ्यायला लागते, की राग असो, आनंद असो, उत्साह असो की निराशा असो; जेव्हा केव्हा या भावना तीव्र असतील; तेव्हा पटकन कुठलीही कृती करायची नाही. जिभेशी आलेले कडुजार शब्द गिळून टाकायचे, शिवशिवणारे हात गुंडाळून ठेवायचे, आवाजाचा व्हॉल्युम कमी करायचा. या सगळ्या उर्मी जरा ताब्यात ठेवायच्या. कारण अशा वेळी आपण बुद्धीनं नव्हे तर भावनांच्या आहारी जाऊन कृती करत असतो. पटतंय का तुला हे?” विनीतच्या डोक्यात चक्रं फिरताना दिसत होती. “हो, हे पटतंय मला. पण जमायचं कसं हे?” सुरुवातीला हातचं राखून बोलणारा विनीत हळूहळू मोकळा झाला होता. डॉक्टरांनी उत्तर दिलं, “सोपं नाहीये, पण शक्य आहे. नीट विचार केला आणि प्रॅक्टिस केली तर आणखीनच.”

“आणि आईबाबा मला उचकवतात, त्याचं काय? नीट वागायची सगळी जबाबदारी फक्त माझीच?” इथे विनीतचा सूर जरा चढा लागला. डॉक्टरांनी मान हलवली. त्या त्याची मतं, विचार, शंका अगदी गंभीरपणे, नीट मनापासून ऐकून घेत होत्या. “कोणत्याही संभाषणात दोन किंवा त्याहून अधिक व्यक्ती असतात हे बरोबर आहे तुझं. प्रश्न असा आहे की त्यांनी काय, कसं वागावं, हे तुला कंट्रोल करता येणार आहे का? हं, पण तुझ्या स्वतःच्या वागण्याचा रिमोट कंट्रोल मात्र तुझ्या हातात असू शकतो. तो इतरांच्या हातात असलेला चालेल तुला?” “म्हणजे?” “म्हणजे तुला कधी, किती राग येणार; आनंद होणार की दुःख होणार, हे तू ठरवणार; की ते आईबाबांच्या बोलण्यावर अवलंबून असणार? तुझ्या वागण्याची जबाबदारी तू घे, त्यांच्या वागण्याची जबाबदारी त्यांना घेऊ दे, काय?” विनीतनं सुस्कारा सोडला, “बरोबर आहे तुमचं. मी मोठा झालोय आता, हे जमू शकेल मला. पण कसं?” आपली डायरी मिटून ठेवत डॉक्टर म्हणाल्या, “याचं एका वाक्यात उत्तर देणं अवघड आहे. आणि मी उत्तर देण्यापेक्षा याविषयी तू विचार केलास तर अधिक बरं. अर्थात हा विचार करता येण्यासाठी तुझ्यात होणाऱ्या या सगळ्या बदलांविषयी तुला व्यवस्थित माहिती असायला हवी. ती मी देईन. तीन-चार वेळा भेटूया. म्हणजे नीट बोलून होईल.” विनीत म्हणाला, “हो, मला बऱ्याच शंकाही विचारायच्या आहेत, चालेल ना?” “अगदी निःसंकोचपणे, खुशाल विचार तू.” बेल दाबून डॉक्टरनी निशाला आत बोलावलं.

“पुढची अपॉइंटमेंट कधीची घेऊ, डॉक्टर?” जातानाचा विनीतचा हा प्रश्न ऐकून डॉक्टर गालातल्या गालात हसल्या. निशाचे डोळे मात्र आश्चर्यानं बटाट्याएवढे झाले होते.

संबंधित बातम्या