कुबेरांसाठी अवकाशही ठेंगणे

गोपाळ कुलकर्णी
सोमवार, 2 ऑगस्ट 2021

कव्हर स्टोरी

अवघं जग कोरोना संसर्गाच्या महासाथीला सामोरं जात असताना अवकाश पर्यटनाचं नवं दालन खुलं झालंय. विज्ञानाच्या किमयेनं साकारलेलं नवतंत्रज्ञान आणि जगभरातील निवडक धनकुबेरांनी त्यासाठी खुल्या केलेल्या स्वतःच्या तिजोऱ्या यामुळं अवकाश मोहिमांना अधिक वेग येईल असं मानलं जातं.

आदिम काळापासून माणूस डोक्यावरच्या आकाशाकडं मोठ्या उत्सुकतेनं पाहत आलाय. दिवसा भेटणारा सूर्य असो की रात्रीच्या चंद्रतारका.. या अमर्याद पोकळीतील असंख्य ग्रहगोल अन्‌ नक्षत्रांनी त्याला नेहमीच भूरळ घातली. या अनंत अंतराळानं माणसाला खूप काही दिलंय. ‘चरैवती, चरैवती’चा घोष करणाऱ्या माणसाला दिशा दिली, विश्‍वाच्या पसाऱ्याकडे पाहण्याची दृष्टी दिली, त्या पसाऱ्यातल्या त्याच्या कणभर अस्तित्वाची जाणीव करून दिली. ब्रह्मांडाची गुपितं उलगडण्याचा प्रयत्न करणारं खगोलविज्ञान माणसाच्या डोक्यात भरण्याचं कामदेखील डोईवरच्या आकाशानंच केलं. जे त्याच्या आयुष्यात घडलं आणि जे घडणार होतं, सगळं काही तो त्या आकाशातच रहाणाऱ्या ‘त्या’वर सोपवून मोकळा झाला. कादंबरी असो की कविता अथवा नाट्य; भावनांची शाई लेखणीत ओततच त्यानं आकाशाच्या अमर्याद कागदावर आपलं जीवनलालित्य उतरवलं. माणसाच्या कित्येक पिढ्या पृथ्वीवर नांदल्या अन्‌ कालौघात लुप्तही झाल्या, कित्येक अजस्र जीव या धरेवर आले अन्‌ काळाच्या उदरात गडप झाले. माणसाच्या पिढ्यांगणिक खूप काही बदलत राहिलं, पण अढळ राहिलं ते डोक्यावरचं आकाश. आकाश अमर असतं तसं अंतराळ अमर्याद अंतहीन. 

नील आर्मस्ट्राँगनं पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवलं त्याला २० जुलै रोजी बरोबर ५२ वर्षं पूर्ण झाली. २० जुलै १९६९... खरंतर याच दिवसापासून माणसाला अवकाश भरारीची स्वप्नं सत्यातही उतरू शकतात याची खात्री पटली. या चांद्रविजयाचं वर्णन करताना नीलनं हे माणसासाठी एक छोटं पाऊल असलं तरीसुद्धा समग्र मानवजातीसाठी ती एक मोठी झेप असल्याचं म्हटलं होतं. आता हीच झेप एक मोठी भरारी ठरू पाहतेय. देशोदेशीच्या अवकाश संशोधन संस्थांनी सूर्य आणि आकाशगंगांचा वेध घेत थेट महाकाय कृष्णविवरांचा तळ ढवळायला सुरुवात केली आहे. ‘लार्ज हॅड्रॉन कोलायडर’च्या माध्यमातून विश्‍वाच्या निर्मितीस कारणीभूत ठरलेले ‘देवकण’ही शोधून काढण्यात आले. कदाचित उद्या एलियन्स सापडतीलही.. कदाचित मंगळावर पाणी सापडल्यानं माणूस तिथंही आपला संसार थाटेल. विज्ञानाच्या जगात जे आज अशक्य वाटतं ते उद्याचं सत्य असतं. 

अवघं जग कोरोना संसर्गाच्या महासाथीला सामोरं जात असताना अवकाश पर्यटनाचं नवं दालन खुलं झालंय. विज्ञानाच्या किमयेनं साकारलेलं नवतंत्रज्ञान आणि जगभरातील निवडक धनकुबेरांनी त्यासाठी खुल्या केलेल्या स्वतःच्या तिजोऱ्या यामुळं अवकाश मोहिमांना अधिक वेग येईल असं मानलं जातंय. ‘व्हर्जिन ग्रुप’चे रिचर्ड ब्रॅन्सन (११ जुलै २०२१) यांच्यापाठोपाठ अॅमेझॉनच्या जेफ बेझोस (२० जुलै २०२१) यांची अवकाश सैर नव्या युगाची नांदी आहे. ब्रॅन्सन, बेझोस यांच्याप्रमाणेच ‘टेस्ला’चे एलॉन मस्कही याचसाठी आकाशाकडं डोळे लावून बसले असून त्यासाठी त्यांनी ‘स्पेसएक्स’ला सज्ज ठेवलंय. पहिल्याच प्रयत्नात अपयश हाती आल्यानंतरही मस्क यांनी अवकाशभरारीचा हट्ट सोडलेला नाही. 

प्रारंभ रशियातून, बहरली अमेरिकेत 
अवकाश पर्यटन हे सध्या जरी अमेरिकेत बहरत असलं तरीसुद्धा त्याचा लाँचिंग पॅड रशियन आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही. २००१ ते २००९ या काळात आठ यानांच्या माध्यमातून सातजणांनी अवकाशात भरारी घेतली. रशियाच्या ‘मिशन सोयुझ’नं मानवी महत्त्वाकांक्षेला नवे पंख दिले. अमेरिकेची स्पेस ॲडव्हेंचर ही कंपनी, रशियाची रॉसकॉसमॉस आणि आरएससी एनर्जिया यांचा भक्कम आधार या मोहिमांना मिळाला. ‘स्पेस ॲडव्हेंचर’ची स्थापनादेखील अमेरिकी उद्योजक एरिक. सी. अँडरसन यांनी केली. अवकाश पर्यटकांना शून्य गुरुत्वाकर्षणस्थितीत राहण्याचं आणि ‘स्पेसवॉक’चं आमिष या कंपनीकडून दाखविण्यात आलं होतं. पहिले अवकाश पर्यटक होण्याचा मान अमेरिकेच्या डेनिस टिटो (२००१) यांना मिळाला खरा, पण तेही रशियाच्या ‘सोयुझ’मधूनच अवकाश स्थानकावर पोचले होते. अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’चं अवकाश पर्यटनाचं स्वप्न जुनंच आहे. नासानं २०२० नंतर नियमित अवकाश पर्यटन सुरू करण्याचं नियोजन केलं होतं, तशी अधिकृत घोषणाही करण्यात आली होती पण निधी कमी पडल्यानं त्याला ब्रेक लागला. अवकाशाला हात लावण्याची किंमत अब्जावधी डॉलर्स आहे. एकट्या अवकाश संशोधन संस्था त्यासाठी एवढा मोठा निधी  उभारू शकत नाहीत. मस्क, ब्रॅन्सन आणि बेझोस यांच्यासारख्या कुबेरांनी नेमकी हीच बाब हेरत या मोहिमांसाठी डॉलर ओतायला सुरुवात केली. अमेरिकेतील आणखी अकरा स्टार्टअप या क्षेत्रात येण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील स्पर्धा आणखी तीव्र होईल. 

निधीसाठी मोठा वेळ 
या अवकाश मोहिमांसाठी एवढा अवाढव्य निधी उभारण्यासाठी या कंपन्यांनादेखील दोन दशकांचा काळ लागला. बेझोस यांच्या ‘ब्लू ओरिजीन’ची स्थापना २००० साली झाली, त्यानंतर अवघ्या दोन वर्षांतच ‘स्पेसएक्स’ उभी राहिली आणि आणखी दोन वर्षांनी ‘व्हर्जिन गॅलेक्टिक’ साकार झाली. खरंतर या कंपन्यांना जन्म देणाऱ्या मालकांना अन्य व्यवसायांतून जबर नफा कमावता आल्यानं त्यांना अवकाश पर्यटनाची स्वप्नं पडू लागली. बेझोस यांनी अवकाशभरारीनंतर ॲमेझॉनचे कर्मचारी आणि असंख्य ग्राहकांचे आभार मानले आहेत. कारण त्यांनी दिलेल्या पैशांमुळेच हे शक्य झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. या स्पेसरेसवर स्वतःचं एकहाती वर्चस्व निर्माण करण्याची या धनकुबेरांची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही, त्यामुळे जेफ बेझोस यांच्यासारखा उद्योजक अवकाशात ॲम्युझमेंट पार्क आणि वसाहती उभारण्याची स्वप्नं पाहू शकतो.

या स्पर्धेमध्ये भारत कोठे आहे? 
सध्या जरी अवकाश पर्यटन हे भारतासाठी दिवास्वप्नासारखं वाटत असलं तरीसुद्धा त्याकडं पूर्णपणे दुर्लक्षही करता येणार नाही. संशोधक ज्या सुपरसॉनिक प्रवासाची स्वप्नं पाहात आहेत ते यातूनच साकार होऊ शकतं. हे सगळं ‘इस्रो’ स्वतःच्या बळावर करू शकत नाही हे उघड सत्य आहे. त्यासाठी संशोधन संस्थांना खासगी उद्योगांची मदत घेणं अपरिहार्य आहे. भारताचं आकाश खासगी कंपन्यांसाठी मागील वर्षी खुलं झालं असलं तरीसुद्धा यात अद्यापतरी म्हणावी तशी भरीव गुंतवणूक झाल्याचे दिसून येत नाही. 

भारतीयांची अशीही मोहोर 
जेफ बेझोस यांनी ज्या ‘न्यू शेफर्ड’ या रॉकेटमधून अवकाशात भरारी घेतली त्या रॉकेटची निर्मिती करणाऱ्या टीममध्ये मुंबई जवळच्या कल्याणमधल्या संजल गावंडे (वय ३०) यांचाही समावेश होता. ‘टीम बेझोस’मध्ये त्या सिस्टिम इंजिनिअर आहेत. मुंबई विद्यापीठातून अभियांत्रिकी शाखेची पदवी घेतल्यानंतर त्यांनी मिशिगन विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची मास्टर डिग्री घेतली. संजल यांचे वडील मुंबई महापालिकेत नोकरीला होते. एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात जन्मलेल्या या मुलीचं हे यश खरोखरच कौतुकास्पद म्हणावं लागेल. रिचर्ड ब्रॅन्सन यांच्या ‘व्हर्जिन गॅलेक्टिक’च्या यानामधून भारतीय अमेरिकी वंशाच्या सिरीशा बंडालाने अवकाशात झेप घेतली. तिचा जन्म आंध्रप्रदेशातील पण ती मोठी झाली अमेरिकेच्या ह्युस्टनमध्ये. सिरीशाने पर्ड्यू विद्यापीठातून एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर २०१५मध्ये ब्रॅन्सन यांच्यासोबत काम करायला सुरुवात केली होती. विज्ञानाचा अभ्यास करतानाच तिने जॉर्जटाऊन विद्यापीठातून व्यवस्थापनशाखेचेदेखील धडे गिरवले. या दोघींच्या निमित्ताने व्यावसायिक अवकाश मोहिमांवर भारताचा ठसा उमटला आहे. 

तरच आसुरी स्पर्धा टळेल 
तसं पाहता अवकाश कुणी एक व्यक्ती, संस्था अथवा देशाची मक्तेदारी असू शकत नाही. किंबहुना ती असूही नये पण जो ‘बळी तो कानपिळी’ या न्यायानं या धनकुबेरांनी ही सगळी सूत्रे आपल्या हाती घ्यायला सुरुवात केली आहे. अर्थात यात नवं काही नसलं तरीसुद्धा ते विज्ञानाच्या प्रसारास मारक ठरणारं आहे, असं काही तज्ज्ञांना वाटतं. अमेरिकेतील अंतराळवीर आणि अभ्यासिका ख्रिस्ता मॅकऑलिफ यांनी हा धोका नेमकेपणानं ओळखला होता. म्हणूनच त्या ‘अवकाश सगळ्यांच्या मालकीचं आहे’, असं धाडसानं सांगू शकल्या. केवळ विज्ञान, गणित आणि अवकाश संशोधनात काम करणारी मूठभर मंडळी त्यावर हक्क सांगू शकत नाहीत, त्यावर सगळ्यांचा हक्क असतो असं त्याचं म्हणणं होतं. विज्ञान कथालेखक रॉबर्ट हेनलेईन यांनीही छोट्या मनाची माणसं तारे कधीच जिंकू शकत नाही, त्यासाठी माणसालादेखील अंतराळासारखं विशाल व्हावं लागेल असं म्हटलं होतं. रॉबर्ट यांचं हे सूचक वक्तव्य अंतराळ स्पर्धेत उतरू पाहणाऱ्या नवउद्योजकांनी लक्षात घ्यायला हवं. तसं झालं तरच या क्षेत्रातील आसुरी स्पर्धा टाळता येऊ शकेल. 

प्रदूषणाची विचार हवा 
अवकाश पर्यटनातील बड्या उद्योजकांच्या आगमनामुळे अनेक फायदे होणार आहेत. पायाभूत सुविधांचा वेगानं विकास झाल्यानं संशोधनाला चालना तर मिळेलच, पण त्याचबरोबर नव्या दमाचे युवा संशोधक, अभियंते या क्षेत्राकडे वळू लागतील. संशोधनाचा वेग वाढल्यानं अवकाश मोहिमांचा खर्चदेखील कमी होईल, असं अनेकांना वाटतं. पण या रेसमुळे वाढणाऱ्या प्रदूषणाकडंदेखील दुर्लक्ष करता येणार नाही. या प्रदूषणाची तीव्रता नेमकी किती असेल हे नियमितपणे मोहिमा सुरू झाल्यानंतरच लक्षात येईल. काही संशोधकांच्या मते आधीच संकटात असलेल्या ओझोनच्या थराला यामुळे आणखी धोका निर्माण होऊ शकतो. केवळ ‘व्हर्जिन गॅलेक्टिक’च्या यानाचा विचार केला, तर त्यात सिंथेटिक रबराचा इंधनासारखा वापर होतो. पुढे नायट्रस ऑक्साईडच्या साहाय्याने ते जाळलं जातं. हा शक्तिशाली हरित वायू आहे. यांच्या ज्वलनामुळं पृथ्वीच्या वरच्या वातावरणात मोठ्या प्रमाणावर कार्बन सोडला जाईल. ओझोनच्या थरावर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी भीती काहींना वाटते. 
दरवर्षी चारशे अवकाश मोहिमा करण्याचा रिचर्ड ब्रॅन्सन यांचा विचार आहे, अशा स्थितीत यामुळं नेमकं किती प्रदूषण होईल याचा फक्त अंदाज व्यक्त केलेला बरा. जेफ बेझोस यांच्या ‘ब्लू ओरिजीन’नं मात्र आमच्या मोहिमा तुलनेनं अधिक ‘स्वच्छ’ असल्याचा दावा केला आहे. कारण यात इंधन म्हणून द्रवरूप हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा वापर करण्यात येतो. पण यासाठीदेखील मोठ्या प्रमाणावर विद्युत ऊर्जेचा वापर होत असल्यानं या कंपनीलाही पूर्णपणे स्वच्छ ठरवता येणार नाही, असं काही संशोधकांचं म्हणणं आहे. याआधी ‘स्पेसएक्स’च्या रॉकेटच्या उड्डाणावर संशोधकांनी नेमके अशाच प्रकारचे आक्षेप घेतले होते. एकीकडे हवामान बदलाची समस्या तीव्र झाली असताना आपल्याला श्रीमंतांचं हे अवकाश पर्यटन कोणत्याच स्थितीमध्ये परवडणारं नाही, असा सूरदेखील काही अभ्यासकांनी आळवला आहे. निसर्गाचा सध्याचा लहरी अवतार पाहिला तर आपल्याला त्याकडंही 
पूर्णपणे दुर्लक्ष करता येणार नाही. 

भरारी प्रत्येकाची 
करमान लाईन ही अवकाशासाठीची सीमा मानली जाते. समुद्रसपाटीपासून तिची उंची शंभर किलोमीटरपर्यंत आहे. अमेरिकेच्या दृष्टीनं याचा कटऑफ पॉइंट ८० किलोमीटर एवढा आहे. रिचर्ड ब्रॅन्सन यांच्या ‘व्हर्जिन गॅलेक्टिक’च्या ‘व्हीएसएस युनिटी’ या यानानं ८६ किलोमीटरपर्यंत झेप घेतली, तर ‘ब्लू ओरिजीन’चं न्यू शेफर्ड १०७ किलोमीटर उंचीवर पोचलं होते. या दोघांचा अवकाशातील कालावधी दहा मिनिटं एवढा होता. आता ‘स्पेसएक्स’नं ३०० किलोमीटरचा पल्ला गाठण्याचा निर्धार केला आहे.
 

संबंधित बातम्या