व्यायाम, आहार, झोप आवश्‍यक

डॉ. धनश्री भिडे 
सोमवार, 15 जुलै 2019

आरोग्य विशेष
 

त्वचारोग शास्त्र व त्वचाविकार याविषयी अनेक समज-गैरसमज आढळून येतात. त्वचेचा आजार एकदा झाला, की कधीच बरा होत नाही असा सर्वसामान्य ग्रह असतो. त्वचाविकार तज्ज्ञ हेच केसांच्या व नखांच्या समस्यांवर उपचार करू शकतात, याविषयीसुद्धा रुग्णांच्या मनात संभ्रम असतो. त्वचेचे काही विकार जरी चिवट व दीर्घ मुदतीचे असले, तरी त्याची तीव्रता कमी करण्यासाठी काळजी घेऊन आपले रोजचे जीवनमान आपण सामान्य पद्धतीने जगू शकतो. आता वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडत आहे. त्वचारोग शास्त्र हेदेखील याला अपवाद नाही. आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा तो टाळण्यासाठी नवीन नवीन संशोधन सुरू असून, काही प्रमाणात त्यात यश येत आहे. स्त्रीरोगशास्त्र, कर्करोगासारखे आजार या क्षेत्रांत प्रीव्हेंटिव्ह मेडिसीनचे अतिशय महत्त्व आहे. त्वचेला होणारे जंतूसंसर्ग, सूर्यप्रकाशापासून होणारे आजार, त्वचा कोरडी पडल्याने होणारे विकार यासाठी जर काही पथ्ये पाळली, तर आपल्याला काही प्रमाणात ते निश्‍चित टाळता येऊ शकतील किंवा जर असा आजार आपल्याला झाला असेल, तर त्याची तीव्रता कमी ठेवता येईल.

सध्या बुरशीमुळे होणारे गजकर्ण व गोरेपणासाठी वापरण्यात येणाऱ्या स्टेरॉईड प्रकारच्या मलमांच्या वापराने होणारे त्वचाविकार या समस्यांचे प्रमाण वाढले आहे. हे आजार बरे करण्यासाठी त्वचारोग तज्ज्ञांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे. केस गळणे, वाढत्या वयात होणारा मुरुमांचा त्रास व अनावश्‍यक केसांची वाढ या समस्या घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या हळूहळू वाढत आहे. बदललेली जीवनशैली, मानसिक तणाव, व्यायामाचा अभाव आणि अयोग्य आहार याला कारणीभूत ठरत आहे. सौंदर्यप्रसाधनांचा अतिरेकी वापर व त्याच्या वापराविषयी असलेले अज्ञान यामुळे त्वचेच्या व केसांच्या आरोग्यावर दुष्परिणाम झालेले आढळून येतात. त्वचारोग तज्ज्ञ विविध स्तरांवर रुग्णांसाठी व समाजासाठी प्रबोधनपर कार्यक्रम घेऊन गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत असतात. त्वचा व केस निरोगी ठेवण्यासाठी अशाच काही उपयुक्त मार्गदर्शक सूचनांचे आपण पालन केले, तर गैरसमजामुळे होणारे घातक परिणाम व औषधांवर होणारा वारेमाप खर्च टाळता येईल.

बुरशीमुळे होणारे गजकर्ण, अंगावर उठणारे पिवळे फोड, केसतोड असे आजार त्वचेच्या दमटपणामुळे पसरतात. सध्या बुरशीमुळे होणाऱ्या आजाराची भारतभर मोठी साथ पसरली आहे. घरगुती उपचार अथवा स्वतःच्या मनाने स्टेरॉईडमिश्रित मलमांचा वापर केल्याने ही साथ आटोक्‍यात आणण्यासाठी तज्ज्ञांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे. नेहमीपेक्षा अशा रुग्णांना जास्त दिवस उपचार घ्यावे लागत असून, सर्वसामान्य औषधांना हे जंतू दाद देत नाहीत. तसेच संसर्गामुळे घरातील अनेक जणांमध्ये ही बुरशी पसरत आहे. हे संकट टाळण्यासाठी सैलसर व सुती कपडे वापरावेत. बंद व घामाच्या जागा कोरड्या ठेवण्यासाठी पावडर वापरावी. टिश्‍यू पेपरने ओलसरपणा टिपून घ्यावा. वापरलेले कपडे व टॉवेल रोजच्या रोज स्वच्छ धुऊन हवेशीर ठिकाणी अथवा उन्हात वाळवावेत. कपडे पूर्ण कोरडे झाल्यावरच वापरावे. स्वतःचा साबण व टॉवेल वेगळा ठेवावा. जीन्सच्या पॅंटचे कापड जाड असल्याने ते घाम शोषून घेत नाही. कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये असे कपडे न धुता आठवडाभर तेच वापरण्याकडे कल दिसून येतो. जर आपण हेच कपडे वापरणार असू, तर ते रोज धुवावेत व उलटे करून आतल्या बाजूने कोरडे करावेत. इस्त्रीचा वापर करावा. गरमपणामुळे कपड्यावरील बुरशी नष्ट होते व आपल्याला परत संसर्ग होत नाही. ज्या व्यक्तींना गजकर्ण झाले आहे, त्यांनी सार्वजनिक ठिकाणी जाताना काळजी घ्यावी. पोहायला जाण्याचे टाळावे. आपले कपडे वेगळे धुवावेत. मशिनमध्ये इतरांबरोबर न मिसळता बादलीत धुवावेत. ज्या व्यक्तींना पायाला हा त्रास आहे, अशा रुग्णांनी बूट घालणे टाळावे. जर बूट वापरणे गरजेचे असेल, तर काढल्यावर हवेशीर ठिकाणी ठेवावेत. आतील भाग हेअर ड्रायरने कोरडा करावा अथवा ऊन द्यावे. मोजे रोज धुवावेत.

ज्यांना वारंवार केसतोडीचा त्रास होतो अशा स्त्रियांनी वॅक्‍सिंग करणे टाळावे. केस काढण्यासाठी रेझरचा वापर करून ब्लेड टाकून द्यावे. त्वचेला खरखरीत उटणे, पीठ अथवा स्क्रब वापरल्याने संरक्षित कवच कमकुवत होते व पटकन जंतूसंसर्ग होतो. त्यामुळे अशा गोष्टी टाळाव्यात व सौम्य मलमाने त्वचा स्वच्छ करावी.

अशा आजारांत औषधांचा वापर हा वैद्यकीय सल्ल्यानेच करावा. औषध दुकानदाराच्या सल्ल्याने अथवा स्वतःच्या मनाने स्टेरॉईडमिश्रित मलमे वापरू नयेत. अशा मलमांमुळे त्वचा पातळ होणे, पांढरी पडणे, स्ट्रेच मार्क्‌स येणे, रक्तवाहिन्यांचे जाळे निर्माण होणे, घर्षणामुळे रक्तस्राव होणे, उन्हात चेहरा लाल पडणे, मुरुमे व अनावश्‍यक केस उगवणे, तीव्र स्वरूपाचा आजार होणे हे धोके संभवतात. काही वेळा झालेला आजार नेहमीच्या औषधांना दाद देत नाही व ड्रग रेझिस्टन्स निर्माण होतो.

काही वेळा स्टेरॉईडमिश्रित गोरेपणाची मलमे वापरली जातात. खरे पाहिले तर त्वचेच्या रंगापेक्षा त्वचेचे आरोग्य व तजेलदारपणा जास्त महत्त्वाचा आहे. पण अजूनही मुलीच्या शिक्षणापेक्षा तिच्या रंगाला लग्नाच्या वेळी अवाजवी महत्त्व दिले जाते. हळूहळू या मानसिकतेत बदल होताना जाणवत आहे. त्यामुळे तीव्र दुष्परिणाम होणारी मलमे स्वतःच्या मनाने वापरण्यापेक्षा आपण सूर्यप्रकाशापासून संरक्षण घेतले, हवेतील प्रदूषणापासून बचाव केला व ऋतुमानानुसार योग्य अशी त्वचेची काळजी घेतली, तर आपण आपला नैसर्गिक व जन्मजात असलेला रंग टिकवू शकतो. बाहेर जाताना शरीराच्या उघड्या भागावर सनस्क्रीन पसरावे. ते न चोळता दर दोन-तीन तासांनी परत लावावे. संरक्षक कपडे, टोपी व चेहऱ्याला रुमाल बांधला तरी चालेल. फक्त या कपड्यांची वीण घट्ट असावी व रंग फिकट असावा. हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते. अशावेळी साबणाचा वापर कमी करावा व आंघोळीनंतर अंग टिपून मॉईश्‍चराईझर वापरावे. डाळीचे पीठ, उटणे यामुळे त्वचेचा रुक्षपणा वाढतो. या गोष्टी वापरणे टाळावे. पावसाळ्यात व उन्हाळ्यात उलट त्वचा दमट राहते. घामाच्या जागा ओलसर राहिल्याने गजकर्ण होऊ शकते. चेहरा तेलकट होऊन मुरुमे वाढू शकतात व उष्णतेमुळे घामोळ्याचा त्रास होऊ शकतो. दिवसातून कमीत कमी दोन वेळा आतले कपडे बदलावेत. सुती व सैलसर कपडे घालावेत. चेहरा दोन-तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुणे व घामट जागा टिश्‍यू पेपरने पुसून कोरड्या ठेवणे, याकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे.

केसांवरही परिणाम
हवामानातील बदलांचा केसांवरदेखील विपरीत परिणाम होऊ शकतो. केस तेलकट असल्यास दररोज सौम्य शांपूने धुवावेत. कंडिशनर अथवा तेल लावू नये. तेलकट केसांमध्ये कोंडा होणे, पिवळसर फोड येणे व चिकटपणा राहणे असे त्रास संभवतात. तेलामुळे केसाचा रंग काळा राहतो व केस जास्त घनदाट होतात हा निव्वळ गैरसमज आहे. केस कोरडे असतील तर ते बसवण्यासाठी तेलाचा कंडिशनर म्हणून उपयोग होतो. त्यामुळे सरसकट तेल लावण्यापेक्षा आपल्या केसाचा पोत कसा आहे हे जाणून घेऊन त्याचा वापर करावा. केस धुतल्यावर कोरडे करण्यासाठी शक्‍यतो टॉवेलचा वापर करावा. ड्रायरमधील गरम हवेचा झोत अथवा इस्त्रीचा वापर केल्याने केस रुक्ष होऊन तुटू शकतात. तसेच आपल्या असलेल्या केसांच्या रचनेत बदल करण्यासाठी केले जाणारे उपचार - पर्मिंग अथवा स्ट्रेटनिंग यामुळेसुद्धा केस तुटून रखरखीत होतात. त्यामुळे हे प्रकार शक्‍यतो टाळावेत व करणे गरजेचे असेल तर केसांच्या मुळांचे संरक्षण करावे. यासाठी तज्ज्ञ व्यक्तींकडून उपचार घ्यावा. केस विंचरताना जास्त ओढले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. गुंता काढण्यासाठी जाड दातांचा कंगवा अथवा हाताची बोटे वापरावीत.

पांढऱ्या केसांसाठी कलप वापरण्याआधी योग्य पद्धतीने ॲलर्जी टेस्ट करावी. साधारण ४८ तास कानापाठीमागे रंग लावून ती जागा ओली करू नये. जर लालसरपणा अथवा खाज आली, तर आपल्याला ॲलर्जी आहे असे समजावे. अशावेळी काळी मेंदी, हर्बल मेंदी वापरू नये. यामध्येसुद्धा तीच रसायने असतात व ॲलर्जीचा त्रास होऊ शकतो. वैद्यकीय सल्ल्याने पर्यायी कलपांची माहिती करून घ्यावी. आपल्याला योग्य असे रंग निवडावेत. काहीवेळा घरगुती उपचार करून लिंबाचा रस, दही, कांद्याचा रस, पपईचा गर, संत्र्याची साल अशा अनेक गोष्टी चेहऱ्याला व केसाला लावल्या जातात. प्रत्यक्षात अशा गोष्टींना कोणताही शास्त्रीय आधार नाही. वरून लावण्यापेक्षा जर फळांचे सेवन केले, तर ते जास्त आरोग्यदायी आहे.

सध्या केस गळतीच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली आढळते. अजूनही बहुतांश स्त्रियांमध्ये विविध पोषक घटकांची कमतरता आढळते. काही रुग्णांमध्ये थायरॉईड  ग्रंथींचा आजार अथवा पीसीओडीचा त्रास आढळून येतो. अंतःस्रावातील असंतुलनामुळे उतारवयात मुरुमे येणे, चेहऱ्यावर व शरीरावर अनावश्‍यक केस येणे व डोक्‍याला टक्कल पडणे अशा तक्रारी निर्माण होतात. फॅड डाएट, एकाच प्रकारच्या घटकाचा आहारात समावेश करणे, डबाबंद अथवा गोळ्यांच्या स्वरूपात प्रथिने व इतर पोषक घटक घेणे हे तब्येतीला घातक ठरू शकेल. चौरस आहार, तंतुमय पदार्थांचे सेवन, ताजी फळे व पालेभाज्या, क जीवनसत्त्व युक्त आंबट पदार्थ हे जास्त आरोग्यदायी आहेत. अन्न शिजवताना जास्त शिजवू नये व शिळे अन्न खाणे टाळावे. पदार्थ शिजवताना तयार झालेले पाणी फेकून देऊ नये, त्यामध्ये जीवनसत्त्वांचे प्रमाण जास्त असते. कच्चे गाजर, काकडी, टोमॅटो, कोथिंबीर हे आहारात वाढवावे. अयोग्य जीवनशैलीचे अंगीकरण केल्याने वरील काही गोष्टींचा त्रास वाढतो. बऱ्याच वेळा दिवसभर बंद खोलीत व एसीमध्ये काम करावे लागते, अशा व्यक्तींना ड जीवनसत्त्वाचा अभाव निर्माण होतो. त्वचा काळवंडते, रुक्ष होते व केसांच्या पोतात बदल होतो. हे टाळण्यासाठी विशिष्ट प्रकारची मलमे उपलब्ध आहेत. वैद्यकीय सल्ल्याने त्याचा वापर करावा.

नियमित व्यायाम, संतुलित आहार, ६ ते ८ तास शांत झोप जी नैसर्गिक चक्राला धरून असेल, अशी त्रिसूत्री आचरणात आणली तर लाइफ स्टाईलमुळे होणारे त्वचाविकार निश्‍चित टाळता येतील. आपण शरीराला घातक अशा जीवनशैलीचे पटकन अंधानुकरण करतो. पण शास्त्रीय माहिती घेऊन थोडी कष्टदायक पद्धत आपण टाळू बघतो. कामाच्या ठिकाणचे तणाव, धकाधकीचे जीवन याला कारणीभूत असेल. पण थोडे आत्मपरीक्षण करून आपल्या सहकारी मित्रमैत्रिणींची सोबत घेऊन व्यायामाची सवय लावून घेतली व आहारात बदल घडवून आणले, तर हे आजार लवकर टाळता येतील. आपण खऱ्या अर्थाने निरोगी आयुष्य जगू शकू.  

संबंधित बातम्या