शोध 'कासव-मार्गा'चा

हर्षल कर्वे
सोमवार, 14 मार्च 2022

कव्हर स्टोरी
 

ऑलिव्ह रिडले प्रजातीची मादी कासवे एका विशिष्ट हंगामात म्हणजेच केवळ विणीचा काळातच समुद्राबाहेर वालुकामय किनाऱ्यांवर येतात, फक्त अंडी घालण्यासाठी! अंडी घातल्यानंतरचा या कासवांचा प्रवास हे अजूनही एक रहस्यच आहे. या रहस्याचा उलगडा करण्यासाठी संशोधकांनी भारताच्या पूर्व किनाऱ्यावर कासवांना सॅटेलाईट टॅग लावून त्यांचा समुद्रातील वावर समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यशही मिळाले आणि कासवांच्या प्रवासाची अभूतपूर्व माहिती जगाला समजली.

भारतात समुद्री कासवांच्या ‘ऑलिव्ह रिडले’, ‘ग्रीन सी’, ‘हॉक्सबिल‘, ‘लॉगरहेड’ आणि ‘लेदरबॅक’ अशा एकूण पाच प्रजाती सापडतात. या सर्व प्रजाती महाराष्ट्राजवळच्या समुद्रातसुद्धा आढळतात. परंतु, यातील फक्त ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासवेच महाराष्ट्राच्या किनाऱ्यांवर अंडी घालण्यासाठी येतात. ऑलिव्ह रिडले प्रजातीची मादी कासवे एका विशिष्ट हंगामात म्हणजेच केवळ विणीचा काळातच समुद्राबाहेर वालुकामय किनाऱ्यांवर येतात, फक्त अंडी घालण्यासाठी! अंडी घातल्यानंतरचा या कासवांचा प्रवास हे अजूनही एक रहस्यच आहे. या रहस्याचा उलगडा करण्यासाठी संशोधकांनी भारताच्या पूर्व किनाऱ्यावर कासवांना सॅटेलाईट टॅग लावून त्यांचा समुद्रातील वावर समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यशही मिळाले आणि कासवांच्या प्रवासाची अभूतपूर्व माहिती जगाला समजली. 

पूर्व किनाऱ्यावरील हा प्रयोग पश्चिम किनाऱ्यावरही व्हायला हवा असा ‘विचार कांदळवन प्रतिष्ठान’ आणि ‘भारतीय वन्यजीव संस्थान’च्या संशोधकांनी केला आणि एक नवीन प्रवास सुरू झाला. या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्राच्या वनविभागाचा कांदळवन कक्ष, कांदळवने आणि सागरी जैवविविधतेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणारे कांदळवन प्रतिष्ठान आणि भारतीय वन्यजीव संस्थान यांच्यातील सामंजस्य कराराने झाली. या करारांतर्गत महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी येणाऱ्या पाच ऑलिव्ह रिडले कासव माद्यांवर सॅटेलाइट टॅग लावण्याचे ठरले. कासवांच्या प्रजाती वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ अंतर्गत संरक्षित असल्यामुळे सॅटेलाइट टॅग लावण्याची  परवानगी पर्यावरण, वने आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाकडून मिळाली.  टॅगिंगसाठी वापरले जाणारे टॅग आणि त्याकरिता लागणारा विशिष्ट गोंद उपलब्ध करून द्यायची जबाबदारी भारतीय वन्यजीव संस्थानाने घेतली. या संशोधन प्रकल्पाला आर्थिक आणि तांत्रिक साहाय्य करण्यास कांदळवन प्रतिष्ठानाने पुढाकार घेतला. 

या प्रकल्पाची सुरुवात झाली ती महाराष्ट्रातील कासवांच्या अंडी घालण्याच्या  वेळापत्रकाच्या अभ्यासापासून. कांदळवन प्रतिष्ठानाच्या संशोधन विभागातील कर्मचाऱ्यांनी मागील पाच वर्षांच्या वेळापत्रकाचा अभ्यास करून रत्नागिरीतील मारळ, हरिहरेश्वर, वेळास, आंजर्ले, दाभोळ आणि गुहागर या किनाऱ्यांची निवड केली. दर वर्षी अंडी घालण्याकरिता माद्या विशिष्ट तारखांच्या कालावधीत व ठरावीक किनाऱ्यांवर येतात, असेही या अभ्यासातून असेही लक्षात आले होते. आधीचे अनुभव लक्षात घेऊन किनाऱ्यावर कासवे असण्याची शक्यता दृढ असेल अशा तारखांच्या कालावधींची  निवड या प्रकल्पाकरिता करण्यात आली.

 वेळास गावापासून या प्रकल्पाची सुरुवात करायची ठरली तसा लगेच सर्व संशोधकांचा गट वेळासकरिता रवाना झाला. योगायोगाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील पहिली समुद्री कासव संवर्धनाची मोहीमही याच गावातून २००३मध्ये सुरू झाली होती. २४ जानेवारी २०२२ रोजी सर्वजण वेळासला पोचले आणि लगेचच किनारा गस्तीला सुरुवात झाली. त्यासोबतच आसपासच्या किनाऱ्यांवरील कासव मित्रांना मादी कासव आढळल्यास त्वरित कळवण्याविषयीही सांगण्यात आले. ऑलिव्ह रिडले कासवांच्या माद्या त्यांच्या नैसर्गिक शत्रूंपासून, आणि आता माणसांपासूनही, त्यांना कमीतकमी धोका असेल अशा रात्री किंवा पहाटे भरतीच्या सुमारास किनाऱ्यांवर येतात. त्यामुळे ही गस्त अनिवार्य होती. सर्वांचे कष्ट म्हणा किंवा ते करत असलेल्या संवर्धन कार्याला निसर्गाकडून मिळालेली दाद म्हणा पण किनारा गस्तीला सुरुवात झाली त्याच संध्याकाळी साडेसातच्या सुमारास एका कासव मादीने वेळास किनाऱ्यावर हजेरी लावली. 

पहिल्या कासव मादीला टॅग लावण्यासाठी साऱ्यांची धावपळ सुरू झाली. अंडी घालून होईपर्यंत या कासव मादीला पकडायचं नाही, हे ठरले होते त्यामुळे तोपर्यंत तिच्यासाठी छोटेसे कुंपण तयार करण्यात आले. त्या कुंपणाच्या आत तिला हालचाल करता येईल, परंतु त्यातून बाहेर जाता येणार नाही, अशी ही व्यवस्था होती. अंडी घालून झाल्यावर तिला अलगद या कुंपणात आणून ठेवले. तिचे कवच स्वच्छ केले गेले. तिला कमीत कमी त्रास होईल आणि काम लवकरात लवकर होईल याची काळजी सर्वजण घेत होते. त्या टॅगला विशिष्ट प्रकारचा एक गोंद लावला गेला आणि टॅग कासवाच्या पाठीवर विराजमान झाला. समुद्री अपृष्ठवंशीय प्राणी त्या टॅगला चिकटू नयेत म्हणून या टॅगला अँटिफाउलींग रंगाचा मुलामा देण्यात आला. हे सर्व संपेतोवर मध्यरात्र झाली होती. तेवढ्यातच जवळच्या आंजर्ल्याच्या किनाऱ्यावर एक मादी अंडी घालण्यास आल्याचे समजले. काही स्वयंसेवकांवर वेळासमधील मादीची जबाबदारी सोपवून संशोधकांचा गट आंजर्ल्याकडे निघाला. 

ता. २५ जानेवारीच्या पहाटे चार वाजताच्या हाडे गोठवणाऱ्या थंडीत सर्वजण आंजर्ले गावाच्या किनाऱ्यावर पोचले. अंडी घालून झाल्यावर वेळासप्रमाणेच कासव मादीला कुंपणात सुरक्षित ठेवून त्यावर टॅग आणि रंग लावण्यात आला. या मादीवरचा टॅग सुरक्षित केल्यावर तेथील स्वयंसेवकांना योग्य त्या सूचना देऊन संशोधक पुन्हा वेळासच्या दिशेने निघाले. कासवांना अधिक काळ पकडून ठेवल्यास त्यांना त्रास होतो, याची कल्पना असल्याने सर्व संशोधक शक्य तितक्या वेगाने वेळासला पोचले. तेथील मादीच्या टॅगचा गोंद आणि रंग सुकला होता त्यामुळे तिला हळुवारपणे कुंपणातून बाहेर काढण्यात आले. या सगळ्या कार्यात तेथील स्थानिकांची स्वयंसेवक म्हणून मोलाची मदत होती. हे पश्चिम किनाऱ्यावरील टॅग केलेले पहिले कासव होते आणि म्हणूनच सर्वानुमते या कासवाचे ‘प्रथमा’ असे नामकरण करून तिला समुद्राच्या  दिशेने सोडण्यात आले. अशा प्रकारे टॅग लावलेल्या पहिल्या कासवाचा परतीचा प्रवास सुरू झाला आणि सोबतच कासवाच्या समुद्री वावराचे रहस्य उलगडण्यासही! 

वेळासच्या ‘प्रथमा’ची पाठवणी करून तत्काळ सर्व संशोधक आंजर्ले किनाऱ्याकडे निघाले. त्या कासवावरील टॅगचा गोंद आणि रंग नीट सुकला आहे याची खात्री करून घेण्यात आली. आंजर्ल्याची ग्रामदेवता सावनेकरीण देवीच्या नावावरून या कासवाला ‘सावनी’ असे नाव देण्यात आले आणि तिलाही पुढील प्रवासासाठी सोडण्यात आले. 

संशोधकांचा गट पुन्हा वेळासला रवाना झाला. अडचणींशिवाय कुठलेही नवीन काम पूर्ण होईलच कसे? या प्रकल्पाबाबतही आत्तापर्यंत सुरळीत चालेल्या कार्यात एक अडथळा आलाच. पुढचे दोन  दिवस, म्हणजेच २७ आणि २८ जानेवारीच्या रात्री वेळासच्या किनाऱ्यावर कडाक्याच्या थंडीत रात्रीची गस्त घातली, परंतु कासवांचा वावरही जणू थंडावला होता. आम्हाला दोनच कासवांवर समाधान मानून परतीची रस्ता धरावा लागला.

पुढच्या टप्प्यात संशोधकांच्या गटाने नव्या उत्साहाने उर्वरित तीन कासवे गुहागर किनाऱ्यावर टॅग करायची ठरवली. त्याकरिता १४ फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आली. गुहागरचा किनारा फार विस्तीर्ण आहे आणि त्यामुळे तेथे कासव घरट्यांचे प्रमाणही अधिक आहे. या किनाऱ्याचा विस्तार लक्षात घेऊन गस्तीच्या दृष्टीने सोयीचे व्हावे याकरिता संशोधकांनी किनाऱ्याला एक-एक किलोमीटरच्या पट्ट्यांमध्ये विभागले. एका एका गटाला एक एक पट्टा नेमून देऊन गस्त घालायला सुरुवात केली. रात्री ११.२५ला पहिली कासव मादी किनाऱ्यावर आली. अंडी घालून झाल्यावर १५ जानेवारीच्या पहाटे तिला कुंपणात ठेवण्यात आले. प्रमाणित कार्यप्रणालीप्रमाणे गोंद लावलेला टॅग गुहागरमधल्या पहिल्या कासवाच्या पाठीवर लागला. महाराष्ट्र राज्याच्या वन विभागाकडून प्रथमच असा उपक्रम केला जात असल्याने या कासवाला ‘वनश्री’ असे नाव देण्यात आले. 

त्याच रात्री आणखी दोन कासव माद्या किनाऱ्यावर आल्याचे गस्तीच्या वेळी लक्षात आले. गुहागरच्या किनाऱ्यावर या दोन माद्या दोन विरुद्ध दिशेला असल्याने गट विभागून त्यांना टॅगिंग करायच्या ठिकाणापर्यंत आणण्यात आले. रात्रीचा कडाक्याच्या थंडीत सर्व संशोधक आणि स्वयंसेवकांनी मिळून दोन्ही कासवांना कुंपणात सुरक्षित ठेवले आणि  सर्व कामाला लागले. ठरलेल्या पद्धतीप्रमाणे दोन्ही कासवांवर टॅग आणि रंग लावण्यात आले. पहिल्या कासवाला ‘रेवा’ नावाने संबोधण्यात आले. दुसऱ्या कासव मादीच्या नामकरणाची चर्चा सुरू असताना कोणीतरी ‘या कासवाच्या पाऊलखुणांवर एक रुपयाचे नाणे मिळाले होते’, अशी माहिती दिली. मग त्यावर, देव्हाऱ्यात ठेवण्यात येणाऱ्या कासवाच्या आसनाखाली देवी लक्ष्मीचे प्रतीक म्हणून नाणे ठेवले जाते, असे आणखी कोणीतरी  सांगितले. म्हणूनच या मादी कासवाचे नाव ‘लक्ष्मी’ ठेवावे असे सर्वानुमते ठरले आणि पाचव्या कासव मादीचेही नामकरण झाले. त्यानंतर दोन्ही कासवांना सुखरूप समुद्राच्या  दिशेने सोडण्यात आले. 

महाराष्ट्राच्या किनाऱ्यांवर पाच ऑलिव्ह रिडले कासवांवर यशस्वीपणे सॅटेलाइट टॅग लावल्याची ही थोडक्यात कहाणी. सध्या या पाचही कासवांच्या प्रवासाविषयीची माहिती संशोधकांना नियमित मिळत आहे. हा लेख लिहीत असताना ‘प्रथमा’ दाभोळ खाडीत, ‘सावनी’ आंजर्ले - केळशी जवळच्या समुद्रात, ‘वनश्री’ व ‘रेवा’ जयगड जवळच्या पाण्यात, तर ‘लक्ष्मी’ गणपतीपुळ्याचा दिशेने प्रवास करताना दिसत होती. देशाच्या पश्चिम किनाऱ्यावरील या उपक्रमामुळे कांदळवन कक्ष, कांदळवन प्रतिष्ठान आणि भारतीय वन्यजीव संस्थानने नवीन पायंडा घालून दिला आहे. आजवर फक्त कुतूहलाचा भाग असणाऱ्या कासव-मार्गांवरील माहिती नव्याने उपलब्ध झाल्यामुळे पश्चिम किनाऱ्यांवरील कासव  संशोधनात आणि संवर्धनात नवीन उंची गाठण्यास मोलाची मदत होणार आहे. 

(लेखक सागरी जीवशास्त्रज्ञ व कांदळवन प्रतिष्ठानचे सदस्य आहेत.)

आपल्या पश्चिम किनाऱ्यावर, विशेषतः सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांतील किनाऱ्यांवर, ऑलिव्ह रिडले कासवे येतात. ही कासवे अंड्यातून बाहेर आल्यानंतर कुठे जातात, त्यांचा प्रवास कसा होतो याचा अभ्यास करण्यासाठी आम्ही पाच कासवांना सॅटेलाइट टॅग लावले आहेत. दर वर्षी ही कासवे त्याच किनाऱ्यावर अंडी घालतात, तसेच एका सीझनमध्ये एकापेक्षा जास्त वेळा अंडी घालतात, असा आत्तापर्यंत समज होता. पण टॅग केलेल्या एका कासवाने दुसऱ्या किनाऱ्यावर अंडी घातली आहेत. आता वर्ष-दीड वर्ष या कासवांच्या हालचालींचा अभ्यास करता येईल. यासाठी ९.८३ लाख रुपयांचा निधी आहे. भारताच्या पूर्व किनाऱ्यावर अशा पद्धतीचा प्रयोग झाला आहे. मात्र पश्चिम किनाऱ्यावर पहिल्यांदाच कासवांचे टॅगिंग करण्यात आले आहे.
- विरेंद्र तिवारी (भारतीय वन सेवा)
    अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक, कांदळवन प्रकल्प

संबंधित बातम्या