वाढता वाढता वाढे... तापमान!

इरावती बारसोडे
सोमवार, 2 मार्च 2020

कव्हर स्टोरी
 

यंदाचा उन्हाळा फेब्रुवारीमध्येच सुरू झाला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गेली काही वर्षे तापमान जागतिक पातळीवर नवनवीन विक्रम प्रस्थापित करते आहे. गतवर्ष म्हणजेच २०१९ हे आत्तापर्यंतचे दुसरे सर्वांत उष्ण वर्ष नोंदवले गेले आहे. २०१६ हे हवामानाच्या नोंदी सुरू झाल्यापासून आत्तापर्यंतचे सर्वांत उष्ण वर्ष आहे. इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, की २०१६ मध्ये ‘एल निनो’ हा हवामानाचा घटक कार्यरत होता, ज्याने तापमानवाढीस हातभार लावला. मात्र, २०१९ मध्ये अशा प्रकारचा कोणताही घटक कार्यरत नसतानाही हे वर्ष दुसरे सर्वांत उष्ण वर्ष म्हणून नोंदवले गेले. एवढेच नव्हे, तर २०१९ चे जागतिक सरासरी तापमान २०१६ पेक्षा फक्त ०.०४ अंश सेल्सिअस एवढेच कमी होते. २०१९ मध्ये जागतिक सरासरी तापमान विसाव्या शतकातील सरासरीपेक्षा ०.९५ अंश सेल्सिअस अधिक नोंदवले गेले आहे. 

गेल्या दहा वर्षांमध्ये तापमानाचे आलेख सातत्याने चढता क्रम दर्शवत आहेत. २०१०-२०१९ हे आत्तापर्यंतचे सर्वाधिक उष्ण दशक आहे. या दशकामध्ये सातत्याने उच्चतम तापमानाचे विक्रम मोडले गेले आहेत. तर, गेली पाच वर्षे ही सर्वाधिक उष्ण वर्षे म्हणून नोंदवली गेली आहेत. तर, गेल्या पाच वर्षांमधील तापमान सरासरीच्या १.१ ते १.२ अंश सेल्सिअस अधिक होते. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, दरवर्षी होणारी जागतिक तापमानवाढ ही काही हवामानाची कधीतरीच घडणारी तीव्र घटना नाही; ही दीर्घकालीन घडामोड आहे. वातावरणामधील कार्बन डाय ऑक्साइडचे वाढते प्रमाण आणि मानवी कृतींमुळे उत्सर्जित होणारे हरित वायू यांमुळे तापमान वाढते आहे.

जागतिक हवामान संस्था (डब्ल्यूएमओ), अमेरिकेतील नासाची गोडार्ड इन्स्टिट्यूट फॉर स्पेस स्टडीज, नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉसफेरिक असोसिएशन (नोआ), युनायटेड किंग्डमचे मेट ऑफिस हाडले सेंटर, कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिस या सर्व हवामानाचा अभ्यास करणाऱ्या मोठ्या संस्थांच्या नोंदींमध्ये २०१९ हे दुसरे सर्वांत उष्ण वर्ष असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

जगभरात नोंदवलेले सागरी तापमान, म्हणजेच सागराच्या वरच्या थरांमध्ये साठवली जाणारी उष्णता ही २०१९ मध्ये सर्वाधिक होती. सागरी तापमान अतिरिक्त वाढल्यास समुद्र पातळी वाढण्याची शक्यता असते. या वर्षात ध्रुवीय बर्फाचा विस्तारही कमी होता. आर्क्टिक आणि अंटार्क्टिट या दोन्ही ठिकाणी सरासरी बर्फाचे सर्वात दुसरे नीचांकी प्रमाण पाहायला मिळाले. डिसेंबर २०१९ हा महिनाही विक्रमी तापमानाचा महिना ठरला. या महिन्यात तापमान सरासरीपेक्षा १.०५ अंश सेल्सिअस अधिक राहिले, जे दुसरे सर्वांत विक्रमी तापमान होते. मध्य युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, मादागास्कर, न्यूझिलंड, अलास्का, मेक्सिको आणि पूर्व दक्षिण अमेरिका या सर्व ठिकाणी विक्रमी भूपृष्ठीय तापमान नोंदवले गेले. युरोपसाठी २०१९ हे आत्तापर्यंतचे दुसरे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले. युरोपातील अनेक देशांमध्ये या वर्षी उष्णतेची लाट होती, तसेच अनेक ठिकाणी विक्रमी तापमान नोंदवले गेले. ऑस्ट्रेलियामध्ये हे वर्ष सर्वोच्च तापमानाचे वर्ष म्हणून नोंदवले गेले. अलास्कामध्येही आत्तापर्यंतचे उच्च तापमान होते. या वर्षी सागरी भूपृष्ठीय तापमान (Sea Surface Temprature) ०.७७ अंश सेल्सिअस होते. हे तापमान आणखी थोडे जरी वाढले असते, तर त्याने २०१६ मधील विक्रमी तापमानाला मागे टाकले असते.

जागतिक तापमान १८८० पासून प्रत्येक दशकाला सरासरी ०.०७ अंश सेल्सिअसच्या दराने वाढले आहे. तर, १९८१ पासून हे प्रमाण दुप्पट होऊन ०.१८ अंश सेल्सिअस इतके झाले आहे.  

भारतातील स्थिती
भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) माहितीनुसार, २०१९ मध्ये भारतामधील तापमानही सरासरीपेक्षा जास्त होते. भारतामधील हवामानाच्या नोंदी १९०१ पासून सुरू झाल्या आहेत. २०१९ हे तेव्हापासूनचे सातवे सर्वांत उष्ण वर्ष ठरले आहे. या वर्षातील तापमान २०१६ च्या तुलनेत कमीच म्हणावे लागेल. २०१६ मध्ये भारतातही उच्चतम तापमान नोंदवले गेले होते. 

भारतात २०१९ मध्ये तापमान जागतिक सरासरीच्या ०.३६ अंश सेल्सिअस अधिक होते. तसेच आत्तापर्यंतची सर्वात उष्ण वर्षे अनुक्रमे २०१६ (+०.७१), २००९ (+०.५४१), २०१७ (+०.५३९), २०१० (+०.५४) आणि २०१५ (+०.४२) अशी आहेत. कंसामधील आकडेवारी सरासरीपेक्षा तापमान किती अधिक होते हे दर्शवते. २००५-२०१९ या १५ वर्षांतील ११ वर्षे उष्ण वर्षे म्हणून नोंदवली गेली आहेत. तसेच हे दशकही सर्वांत उष्ण दशक म्हणून नोंदवले गेले आहे. 

सरासरी तापमानामध्ये १९०१ ते २०१९ या काळात दर १०० वर्षांमागे ०.६१ अंश सेल्सिअस तापमानवाढ दिसते आहे. २०१९ च्या हंगामी (सीझनल) सरासरी तापमानामध्येही वाढ दिसून आली. मॉन्सून सीझन (जून ते सप्टेंबर) सर्वांत उष्ण होता. या काळात सरासरीपेक्षा ०.५८ अंश सेल्सिअस अधिक तापमान नोंदवले गेले. हे १९०१ पासूनचे उच्चतम तापमान आहे. या वर्षातील जानेवारी, मार्च आणि डिसेंबर हे तीन महिने वगळता उरलेल्या सर्व महिन्यांमध्ये तापमान त्या त्या महिन्यातील सरासरी तापमानापेक्षा जास्तच होते. जून महिन्याचे सरासरी तापमान सर्वाधिक म्हणजे १.०२ अंश सेल्सिअस होते. २०१९ मध्ये पावसाने बळी घेतले, त्याचप्रमाणे उष्णतेच्या लाटेनेही बळी घेतले. मार्च ते जून या कालावधीमध्ये ईशान्य आणि मध्य भारतामध्ये उष्णतेची लाट होती. यामध्ये सुमारे ३५० जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यापैकी २९३ मृत्यू हे एकट्या बिहारमध्ये झाले, तर महाराष्ट्रात ४४ जणांचा मृत्यू झाला. 

सर्वाधिक उष्ण वर्ष - २०२०?
चालू वर्षाचीही आत्तापर्यंतच्या सर्वाधिक उष्ण वर्षाकडे वाटचाल सुरू झाल्याचे आकडेवारीवरून दिसते आहे. जानेवारी २०२० हा नोंदी सुरू झाल्यापासून आत्तापर्यंतचा सर्वात उष्ण महिना असल्याचे स्पष्ट झाले आहे. जानेवारीमध्ये जागतिक भूपृष्ठावरील तापमान आणि सागरी तापमान १.१४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. या तापमानाने २०१६ मधील तापमानाला मागे टाकले आहे. आत्तापर्यंतचे चार सर्वांत उष्ण जानेवारी महिने २०१६ पासून म्हणजे गेल्या पाच वर्षांत नोंदवले गेले आहेत. तर, सर्वांत उष्ण १० जानेवारी महिने २०१० पासून नोंदवले गेले आहेत.

जानेवारीमध्ये स्कँडेनेव्हिया, आशिया, हिंदी महासागर, मध्य व पश्‍चिम प्रशांत महासागर, अटलांटिक महासागर आणि मध्य व दक्षिण अमेरिका येथे विक्रमी तापमान नोंदवले गेले आहे. तसेच या महिन्यात आर्क्टिकवरील बर्फावरणही सरासरीपेक्षा ५.३ टक्क्यांनी कमी होते. तर, अंटार्क्टिकवरील बर्फावरण ९.८ टक्के कमी होते. फेब्रुवारीमध्ये अंटार्क्टिकवर पहिल्यांदाच २०.७५ अंश सेल्सिअस एवढ्या विक्रमी तापमानाची नोंद झाली. 

नासा, नोआ, मेट ऑफिस, आपल्या आयएमडी आणि आयआटीएम या संस्था किंवा जगातील इतर हवामान संस्था असोत, या सगळ्यांच्या हवामान नोंदणीच्या पद्धती वेगळ्या आहेत. प्रत्येकाच्या आकडेवारीत अगदी किंचित फरकही असू शकतो. काही फॅरेनहाईटमध्ये तापमान मोजतात, तर आपण सेल्सिअसमध्ये मोजतो. हे काही फरक जरी असले, तरी प्रत्येक संस्थेची अंतिम आकडेवारी दरवर्षी तापमान वाढ नोंदवते आहे. जगात अनेक ठिकाणी तापमानाचे दरवर्षी नवीन विक्रम होत आहेत. आता २०२० ची सुरुवातही काहीशी तापमानवाढीच्या दिशेनेच झाली आहे. २०२० तापमानवाढीच्या बाबतीत पूर्वीचे सर्व विक्रम मोडणार की नाही हे येणारा काळच सांगेल.

क्रमांक    वर्ष    सरासरीपेक्षा अधिक तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
१           २०१६    ०.९९
२           २०१९    ०.९५
३           २०१५    ०.९३ 
४           २०१७    ०.९१
५           २०१८    ०.८३
६           २०१४    ०.७४
७           २०१०    ०.७२
८           २००५    ०.६७
९           २०१३    ०.६७
१०         १९९८    ०.६५
(स्रोत - नोआ)        

 

फोटो फीचर

संबंधित बातम्या