पंख पसरूनी उडूदे स्वच्छंद... 

इरावती बारसोडे
बुधवार, 6 मे 2020

कव्हर स्टोरी
 

बदलते हवामान, पर्यावरणाचा ऱ्हास याचा जैवविविधतेवर होणारा दुष्परिणाम पटकन लक्षात येत नाही. तो हळूहळू जाणवतो. पक्ष्यांच्या बाबतीतही तेच आहे. पक्ष्यांची संख्या कमी झालेली आपल्या सहज लक्षात येत नाही. शहरांमध्ये आता चिमण्या दिसत नाहीत, एवढीच आपली समज. पण खरेच चिमण्या कमी झाल्या आहेत का? इतर पक्ष्यांची काय स्थिती आहे? तेही कमी झाले आहेत का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या पहिल्या ‘भारतातील पक्ष्यांची सद्यःस्थिती २०२०’ या अहवालातून मिळाली आहेत.

या अहवालामधून काही आनंददायी बाबी, तर बऱ्याच चिंताजनक बाबीही समोर आल्या आहेत. शहरांमधून चिमण्या गायब झाल्या असल्या, तरी त्यांची संख्या गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ स्थिर आहे असे पक्षीतज्ज्ञांचे म्हणणे आहे. एवढेच नव्हे, तर भारताचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराच्या संख्येमध्ये गेल्या दहा वर्षांमध्ये आश्चर्यकारक वाढ झालेली बघायला मिळते आहे. पण, इतर भारतीय पक्ष्यांपैकी ५० टक्के प्रजातींमधील पक्ष्यांची संख्या गेल्या १० वर्षांत कमी झाली आहे. या अहवालामुळे पक्षी संवर्धनासाठी मोठी मदत होणार आहे. 

अशोका ट्रस्ट फॉर रिसर्च इन इकॉलॉजी अँड एन्व्हायर्न्मेंट (अट्री), बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी (बीएनएचएस), फाउंडेशन फॉर इकॉलॉजिकल सिक्युरिटी (एफईएस), नेचर कॉन्झरवेशन फाउंडेशन, राष्ट्रीय जैव विविधता प्राधिकरण, नॅशनल सेंटर फॉर बायलॉजिकल सायन्सेस (एनसीबीएस), सालीम अली सेंटर फॉर ऑर्निथॉलॉजी अँड नॅचजरल हिस्टरी, वेटलँड्स इंटरनॅशनल, भारतीय वन्यजीव संस्था (डब्ल्यूआयआय) आणि वर्ल्ड वाइल्डलाइफ फंड (डब्ल्यूडब्ल्यूएफ) या १० संस्थांनी या अहवालासाठी एकत्रित काम केले आहे. 

‘भारतातील पक्ष्यांची सद्यःस्थिती २०२०’ हा अहवाल भारतात आढळणाऱ्या पक्ष्यांची दीर्घकालीन आणि सध्याची संख्या, अधिवास आणि संवर्धन याबाबतचा पहिलाच सर्वसमावेशक अहवाल म्हणावा लागेल. या अहवालामध्ये ८६७ भारतीय पक्ष्यांच्या सद्यःस्थितीचा अभ्यास करण्यात आला आहे. देशभरातील पक्षी निरीक्षकांच्या नोंदी एकत्र करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. वर्षभर या अहवालाचे काम सुरू होते. eBird या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर देशातील विविध भागांमधील पक्षी निरीक्षकांनी नोंदवलेल्या माहितीचा वापर करण्यात आला आहे. हे मूल्यांकन तीन निकषांद्वारे करण्यात आले आहे. त्यातील दोन निकष पक्ष्यांच्या विपुलतेमधील (संख्येमधील) बदलांवर आधारित आहेत. पहिला आहे दीर्घकालीन कल, ज्यामध्ये २५ वर्षांहून अधिक काळच्या नोंदींचा अभ्यास केला गेला. दुसरा आहे, चालू वार्षिक कल, म्हणजे गेल्या पाच वर्षांमधील कल. तिसरा आहे, अधिवासाचे क्षेत्र (Distribution range size). 

काही प्रजातींबद्दल अपुरी माहिती उपलब्ध होती किंवा माहिती अजिबातच उपलब्ध नव्हती. दीर्घकालीन कल अभ्यासताना अशा प्रजाती वगळून २६१ प्रजातींबाबत दीर्घकालीन कल ठरवण्यात आला. यामध्ये २००० पासून ५२ टक्के प्रजाती कमी झाल्याचे दिसत असून २२ टक्के प्रजातींमध्ये वेगाने घट झाली आहे. ४३ टक्के प्रजाती दीर्घ काळ स्थिर आहेत आणि फक्त ५ टक्के प्रजातींमध्ये वाढ झाली आहे. नोंदींच्या उपलब्धतेनुसार १४६ प्रजातींचा चालू वार्षिक कल ठरवण्यात आला. त्यापैकी जवळपास ८० टक्के प्रजाती कमी होत असून ५० टक्के प्रजाती वेगाने कमी होत असल्याचे दिसते. फक्त सहा टक्के प्रजाती स्थिर असून १४ टक्के प्रजातींमधील पक्ष्यांची संख्या वाढली आहे. 

गेल्या २५ वर्षांमध्ये पांढऱ्या पाठीचे गिधाड (White-rumped Vulture), रिचर्डची तीरचिमणी (Richard''s Pipit), लांब चोचीचे गिधाड (Indian Vulture), मोठ्या चोचीचा पर्णवटवट्या (Large-billed Leaf Warbler), सोन चिखल्या (Pacific Golden Plover), बाकचोच तुतारी (Curlew Sandpiper) या पक्ष्यांच्या संख्येमध्ये सर्वाधिक घसरण आहे. तर, मोरासह गुलाबी मैना (Rosy Starling), फेरल पिजन, मोर शराटी (Glossy Ibis), साधा वटवट्या (Plain Prinia), राखी वटवट्या (Ashy Prinia) या पक्ष्यांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. 

वरील तिन्ही निकष इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झरवेशन ऑफ नेचर (आययूसीएन)च्या लाल यादीबरोबर पडताळून भारतासाठीच्या संवर्धन यादीमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये कमी काळजी करण्यासारख्या (Low Concern) ४४२ प्रजाती आहेत. थोडीफार काळजी करावी (Moderate Concern) अशा ३१९ प्रजाती आहेत. संकटात आहेत (High Concern) अशा १०१ प्रजाती आहेत. संकटात असलेल्या प्रजातींचा अधिवास गेल्या अनेक वर्षांपासून कमी होत गेला आहे आणि अजूनही कमी होतो आहे. ज्यांचा अधिवास अतिशय मर्यादित क्षेत्रामध्ये आहे, अशा प्रजातीही या विभागामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. 

अहवालामध्ये शिकार करणारे पक्षी, पाणपक्षी, आहारानुसार वर्गीकरण केलेले पक्षी, अधिवास अशा विविध निकषांनुसार पक्ष्यांचे वर्गीकरण केले आहे. शिकार करणाऱ्या पक्ष्यांची (Raptors) संख्या वेगाने कमी होत आहे. 

पाणपक्ष्यांची संख्याही कमी झालेली आहे. सागरी पक्ष्यांच्या संख्येमध्ये सर्वाधिक घट झाली आहे. तसेच बदके, हंस, पाणकोंबड्या, करकोचे, सुरय, कुरव यांची संख्याही खालावली आहे. स्थलांतरित पाणपक्षीही कमी झाले आहेत. हे पक्षी कमी का झाले असावेत, याची कारणे अजून स्पष्ट नाहीत. स्थानिक पाणपक्ष्यांची संख्या गेल्या पाच वर्षांमध्ये वेगाने घटली आहे. हा वेग चिंताजनक असून याचा सखोल अभ्यास करण्याची नितांत गरज आहे.  

काही पक्ष्यांचे त्यांच्या आहारानुसार वर्गीकरण करण्यात आले आहे. सर्वभक्षी पक्ष्यांच्या संख्येत तुलनेने कमी घट आहे. वनस्पतींच्या बिया, फळे, मध खाणारे पक्षीही हळूहळू कमी झाले आहेत. गरुड, ससाणे यांसारख्या मांसाहारी पक्ष्यांची संख्या सर्वात कमी झाली आहे. २००० पूर्वी जेवढे मांसभक्षी पक्षी होते, त्याच्या निम्मेच पक्षी आता शिल्लक आहेत. फक्त कीटक खाणाऱ्या पक्ष्यांची स्थितीही थोडीफार अशीच आहे, परंतु आता या पक्ष्यांची संख्या स्थिर असल्याचे दिसते आहे. 

अधिवासानुसार वर्गीकरण केलेल्या पक्ष्यांमध्ये जंगलांमध्ये राहणारे पक्षी वेगाने कमी झाले आहेत. त्या खालोखाल अनुक्रमे गवताळ प्रदेशात राहणारे, पाणथळ ठिकाणी राहणारे पक्षी आहेत. ज्यांचा ठराविक अधिवास नाही, अशा पिंगट पोटाचा सातभाई, निलगिरी फुलटोचा यांसारख्या पक्ष्यांची संख्याही कमी झाली आहे. एशियन एररल्ड डोव्ह, तुरेवाला सर्पगरुड यांसारख्या जंगली प्रजाती, तसेच इंडियन सिल्व्हरबिल आणि चंडोल या प्रजातीतील पक्ष्यांची संख्या स्थिर आहे. अधिवास कोणताही असो, पक्ष्यांची संख्या कमीच होताना दिसते आहे. 

मोरांची संख्या वाढली़; चिमण्यांची संख्या स्थिर
मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी. या पक्ष्याला कायदेशीर संरक्षणही आहे. मोर भारतामध्ये अति कोरडे आणि अति रूक्ष प्रदेश सोडले, तर सर्वत्र आढळतो. दीर्घकालीन तसेच सद्यःस्थितीमध्येही मोराच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. अधिवासाचा विस्तार हे त्यामागील एक कारण आहे. म्हणजेच पूर्वी ज्या ठिकाणी मोर आढळत नव्हते, त्या ठिकाणीही दिसू लागले आहेत. उदा. केरळ. तसेच पूर्वीपासून असलेल्या अधिवासामधील मोरांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे एकूणच मोरांची संख्या वाढली आहे. या ट्रेंडचा सखोल अभ्यास अजून झालेला नाही. परंतु, केरळमधील संख्या वाढण्याचे कारण तेथील सुकलेल्या जमिनी असाव्यात. तसेच थार वाळवंटामधील कालवे आणि सिंचनामुळे तिथली संख्या वाढली असण्याची शक्यता आहे, असे संशोधकांना वाटते. कायद्यामधील तरतुदींमुळेसुद्धा संख्या वाढली असावी. देशातील काही भागांमध्ये मोरांमुळे पिकांचे नुकसान होत असल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे संख्या जरी वाढली असली, तरी त्याचा मुळापासून अभ्यास करून मानव-वन्यजीव संघर्ष थांबवणे आवश्यक आहे. 

आजूबाजूला चिमण्या दिसत नसल्यामुळे त्या कमी झाल्याचे मानले जात होते. प्रत्यक्षात मात्र, चिमण्यांची संख्या गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ स्थिर असल्याचे आकडेवारीवारून स्पष्ट होते. पण मुंबई, बंगळूर, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद आणि कोलकता येथून गोळा केलेल्या माहितीमध्ये संख्या हळूहळू कमी होताना दिसते आहे. थोडक्यात, जिथे वृक्षसंपदा आहे तिथे चिमण्या आहेत. जिथे इमारती आहेत, तिथे त्या नाहीत.

स्थानिक पक्ष्यांपेक्षा स्थलांतरित पक्ष्यांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. तीव्र हिवाळ्यापासून सुटका करून घेण्यासाठी अनेक पक्षी भारतामध्ये येतात, त्यामुळे भारतीय उपखंड या पक्ष्यांसाठी मुख्य ‘विंटरिंग एरिया’ आहे. 

पश्‍चिम घाटामध्ये स्थानिक असणाऱ्या १२ प्रजातींमधील पक्ष्यांची संख्या २००० च्या तुलनेत तब्बल ७५ टक्क्यांनी घटली आहे. क्रिमझन-बॅक्ड सनबर्ड (शिंजीर) आणि पिवळ्या भुवईचा बुलबुल यांसारख्या सहज आढळणाऱ्या पक्ष्यांची संख्याही कमी झाल्यामुळे ही बाब चिंताजनक असल्याचे अहवालामध्ये म्हटले आहे. 

भारतामध्ये बस्टार्ड पक्ष्यांच्या चार प्रजाती आढळतात; माळढोक (ग्रेट इंडियन बस्टार्ड), हुबारा (मॅक्वीन्स बस्टार्ड), तणमोर (लेसर फ्लोरिकन) आणि बंगाल फ्लोरिकन. हे चारही पक्षी शिकार आणि अधिवासाचा नाश यांमुळे संकटात सापडले आणि नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. विजांच्या तारांचा धक्का लागूनही अनेक बस्टार्ड मृत्युमुखी पडले. त्यांची वाढ आणि प्रजनन दोन्ही हळू होते. त्यामुळे जेवढे बस्टार्ड जन्माला आले, त्यापेक्षा अधिक मारले गेले. माळढोक हा यांच्यातला सगळ्यात मोठा. तो सध्या आययूसीएनच्या लाल यादीत ‘अति संकटग्रस्त’ म्हणून समाविष्ट आहे. बीएनएचएस, बर्डलाइफ इंटरनॅशनल, डब्ल्यूआयआय आणि इतर संस्था याच्या संवर्धनार्थ प्रयत्न करीत आहेत. तसेच याचे बंदिस्त अधिवासात प्रजनन करून प्रजाती पूर्ण नामशेष होण्यापासून रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

माळढोक, पांढरे गिधाड (इजिप्शियन व्हल्चर), अमुर ससाणा यांसारख्या महत्त्वाच्या पक्ष्यांच्या संवर्धनाचा पाठपुरावा वारंवार होतो. परंतु भारतात असेही काही दुर्लक्षित पक्षी आहेत, ज्यांच्याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामध्ये हिरवी मनोली, स्वॉम्प ग्रास बॅब्लर, चेस्टनट-बॅक्ड लाइटनिंग थ्रश, इंडियन ऑलिव्ह बुलबुल, नागा व्रेन बॅब्लर, ग्रे काऊन्ड प्रिनिया यांसारख्या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्याची आवश्‍यकता असल्याचे अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. फिनचा सुगरण हाही अशाच पक्ष्यांपैकी एक. पूर्वी हा भारतातील ४५ ठिकाणी आढळायचा आणि आता फक्त ९ ठिकाणी सापडतो. जागतिक पातळीवर फक्त एक हजाराहून कमी आणि भारतात ५०० च्या आसपास फिनचा सुगरण पक्षी शिल्लक राहिल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे याच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. 

एवढा मोठा आणि सर्वसमावेशक अहवाल तयार करणे शक्य झाले, ते देशातील पक्षीप्रेमींमुळे. भारतात अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत, ज्यांच्या माध्यमातून पक्षीप्रेमी आपले निरीक्षण नोंदवू शकतात. वेटलँड्स इंटरनॅशनल साऊथ एशिया आणि बीएनएचएस यांच्या समन्वयाने एशियन वॉटरबर्ड सेन्सस (एडब्ल्यूसी) या अंतर्गत पाणपक्ष्यांची मोजणी केली जाते. १९८७ पासून दरवर्षी जानेवारीमध्ये ही नोंदणी केली जाते. २०१४ मध्ये स्थापन झालेली बर्ड काऊंट इंडिया ही आणखी एक अशीच संस्था असून त्या माध्यमातूनही हजारो लोक पक्षी नोंदणीमध्ये सहभागी होतात. बीएनएचएसने २०१५ मध्ये सुरू केलेल्या कॉमन बर्ड मॉनिटरिंग प्रोग्रॅम(सीबीएमपी)द्वारेही पक्षी नोंदणी होते. या कार्यक्रमाअंतर्गत इच्छुक व्यक्तींना एक किंवा दोन किलोमीटरचे क्षेत्र निर्धारित करून दिले जाते आणि त्यांनी दर चार महिन्यांनी त्या क्षेत्रातील पक्ष्यांची नोंदणी करायची असते. केरळ बर्ड ॲटलास हा केरळमधील बर्डवॉचिंग प्लॅटफॉर्म आहे. पक्षी निरीक्षकांसाठी eBird हा सर्वात मोठा ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि डेटाबेस आहे. मूळ अमेरिकेत सुरू झालेला या प्लॅटफॉर्मवर भारतामधून आजपर्यंत सुमारे एक कोटी नोंदी आहेत. देशातल्या जवळपास ९५ टक्के जिल्ह्यांमधून दोन लाख ठिकाणांहून या नोंदी आहेत. 

या अहवालामुळे अति संकटग्रस्त प्रजाती कोणत्या हे स्पष्ट झाल्यामुळे त्यांच्या संवर्धावर भर देणे सोपे होईल. त्याकरिता अहवालामध्ये काही शिफारसीही करण्यात आल्या आहेत. त्या अशा़- 

 • अहवालामधील संवर्धनाच्या मूल्यांकनानुसार जागतिक पातळीवरचे मूल्यांकन अद्ययावत करणे.
 • अधिक चिंताजनक स्थिती असलेल्या प्रजाती आणि संख्या घटलेल्या प्रजातींचे अधिवास यांच्यासाठी संवर्धन मदत पोचवणे.
 • जागरूक व उत्साही नागरिक आणि संशोधकाच्या निरिक्षणाच्या कार्यास सहकार्य करणे.
 • संशोधक आणि सामान्य नागरिकांना एकत्र येऊन काम करण्यास प्रोत्साहन देणे.
 • दुर्लक्षीत प्रजातींचा अभ्यास करण्यासाठी प्रयत्न सुरू करणे 
 • प्रजाती कमी होण्याची कारणे शोधणे.
 • पक्ष्यांची नोंदणी करून सार्वजनिक माध्यमातून प्रसारित करणे. 
 • पक्षी निरीक्षण कमी असलेल्या क्षेत्रांमध्ये माहितीची कमतरता भरून काढण्यात मदत करणे. 
 • पक्षी निरीक्षणाविषयी जागृती निर्माण करणे आणि स्थानिक पातळीवर निरीक्षणाचे प्रयत्नांस सुरुवात करणे.

या अहवालाचा सारांश सांगायचा झाला, तर भारतील पक्ष्यांची सद्यःस्थिती फारशी चांगली नाही. सर्वच प्रजातींमधील पक्षी कमी झालेले पाहायला मिळत आहेत; काही पक्षी तर खूप वेगाने कमी होत आहेत. दीर्घकालीन कल असा दिसतो, की पक्ष्यांची संख्या वाढण्याचे प्रमाण हे नगण्य आहे. सद्यःस्थिती कलही हेच दर्शवतो. ८६७ पैकी १०१ प्रजाती अति संकटग्रस्त आहेत. ३१९ प्रजाती संकटग्रस्त आहेत. यांच्यावर काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज असून संख्या आणखी कमी होण्याची चिन्हे दिसत असल्यास योग्य कृती करावी लागेल. शिकारी, पाणपक्षी, स्थलांतरित, जंगली, गवताळ प्रदेशातील, पश्चिम घाटातील स्थानिक पक्षी अशा सर्वच पक्ष्यांची संख्या कमी होत आहे. यातूनच आपली परिसंस्था किती बिघडली आहे हे स्पष्ट होत आहे. थोडक्यात काय, तर पक्ष्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले, तरच त्यांना स्वच्छंद उडता येईल! 

महाराष्ट्रातील महत्त्वाचे पक्षी
ज्या पक्ष्यांच्या संवर्धनाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे, अशा १०१ पक्ष्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील पुढील पक्षी आहेत. 
रुंद शेपटीचा गवती वटवट्या (Broad-tailed Grassbird), वनपिंगळा (Forest Owlet), टायटलरचा पर्ण वटवट्या (Tytler''s Leaf Warbler), मोठा जलरंक (Great Knot), निलगिरी रान पारवा (Nilgiri Wood Pigeon), हिरवी मनोली (Green Munia), पिवळ्या मुकुटाचा सुतार (Yellow-fronted Pied Woodpecker), छोटी लालसरी (Common Pochard), पांढऱ्या मानेचा करकोचा (Woolly-necked Stork), सर्पमार गरुड (Short-toed Snake Eagle), तुरेवाली वृक्षपाकोळी (Crested Treeswift), छोटा गोमेट (Small Minivet), तांबुस डोक्याचा वटवट्या (Rufous-fronted Prinia), रानखाटिक (Common Woodshrike).

 • प्रत्येक देशाचा अशा प्रकारचा अहवाल असतो, तसाच आपणही केला आहे. या अहवालासाठी eBird वरील १५,५०० लोकांच्या चेकलिस्टमधील २० वर्षांपासूनच्या माहितीचे ॲनालिसिस केला आहे. यामध्ये अगदी १९६० पासूनच्या नोंदी आहेत. 
 • मोठ्या शहरांमधून चिमण्या गायब होण्याचे कारण म्हणजे अधिवासाचा नाश, अन्नाची कमतरता. जिथे काँक्रिटिकरण आहे, जागा नाही तिथे तुम्हाला चिमण्या दिसणारच नाहीत. पण झाडे असतील, अन्नाचा स्रोत असेल तर चिमण्या दिसतील. 
 • मोर हा जंगलामध्ये राहणारा पक्षी नाही, तो झुडुपांमध्ये राहतो. आपण जंगले तोडल्यामुळे त्याच्यासाठी पूरक अधिवास तयार झाला आहे आणि त्यामुळे त्याची संख्या वाढली आहे. तसेच तो राष्ट्रीय पक्षी असल्यामुळे त्याची शिकार होत नाही. त्याच्यासाठी योग्य अधिवास असलेल्या क्षेत्रामुळे इतर पक्ष्यांचा अधिवास कमी किंवा नष्ट झाला का, मोरांची वाढती संख्या भविष्यकाळात कोणते परिणाम करणार हे आत्ता सांगता येणार नाही. पुढील किमान १० वर्षांमधील कल बघूनच याची उत्तरे मिळतील. 
 • रॅप्टर्स हे पक्षी अन्नसाखळीमध्ये सर्वात वरती येतात. सर्वच प्रकारच्या रॅप्टर्सची संख्या कमी होणे हे धोकादायक आहे. याचाच अर्थ परिसंस्था कुठेतरी बिघडली आहे. ही धोक्याची सूचना आहे. 

- डॉ. गिरीष जठार, पक्षीतज्ज्ञ, बीएनएचएस

संबंधित बातम्या