‘युनिव्हर्सल’  भाषा

इरावती बारसोडे
सोमवार, 6 जुलै 2020

संवादाच्या आधुनिक माध्यमांमध्ये सर्वदूर वापरली जाणारी एक गोष्ट म्हणजे ईमोजी. अगदी अलीकडच्या काळात, म्हणजे गेल्या दशकामध्ये ईमोजीचा विकास झाला आहे. ईमोजी म्हणजे आधुनिक चित्रलिपीच... सगळ्यांना समजेल, उमजेल अशी आणि शब्दांची जागा घेणारी!

चित्रलिपी हे संवादाचे फार प्राचीन साधन आहे. नंतर माणूस भाषा वापरायला शिकला. लिपी विकसित झाल्या आणि माणूस शब्द, वाक्यांच्या मदतीने संवाद साधू लागला. कोसाकोसावर भाषेमध्ये बदल होत गेले. पण आता इंटरनेटच्या जगात पुन्हा एका ‘युनिव्हर्सल’ भाषेत माणूस बोलू लागला आहे. ती भाषा म्हणजे आधुनिक चित्रलिपीच आहे. आता आपण त्यांना ‘ईमोजी’ म्हणतो. 

सध्याच्या जगात संवादासाठी इंटरनेट हे खूप महत्त्वाचे माध्यम झाले आहे. व्हिडिओ, ऑडिओ कॉल्सबरोबरच विविध मेसेजिंग ॲप्सच्या माध्यमातून टेक्स्ट मेसेजेसही मोठ्या प्रमाणात एकमेकांना पाठवले जातात. टेक्स्ट मेसेजेसमध्ये ईमोजी अजिबात न वापरणारा मनुष्य विरळाच. साधे हाय म्हणायचे झाले, तरी Hi एवढी दोन अक्षरे टाइप करण्याऐवजी हा ईमोजी आपण वापरतो. एखाद्या विनोदावर हसायचे असले, की पूर्वी Hahaha असे उत्तर दिले जायचे (विनोद किती उत्तम आहे यावर ha कितीवेळा लिहायचे हे ठरणार), पण आता smiling किंवा grinning ईमोजी टाकला, की झाले. त्यातही विनोदाच्या दर्ज्यावर कुठला ईमोजी वापरायचा याची स्केल ठरते. सुमार असेल, पण रिप्लाय तर करायलाच हवा असे असेल, तर  विनोद चांगला असेल तर  आणि खूपच भारी असेल, एवढा की हसूनहसून मी गडाबडा लोळते आहे, असे सांगायचे असेल तर  खूप जास्तच हसायला आले तर याच ईमोजीची संख्या वाढते. हीच गोष्ट इतर भावभावनांचीही. राग येणे, वाईट वाटणे, रडू येणे, आश्चर्य वाटणे, बरे न वाटणे इथपासून थंडी वाजणे, गरम होणे, अगदी उलटी येण्यापर्यंत प्रत्येक भाव हल्ली ईमोजीतून व्यक्त होतो.

आता I love you च्या ऐवजी  आणि LOL (Laugh out loud) च्या ऐवजी  वापरले की काम झाले. सांगू नकोस कोणाला म्हणताना पुढे  जोडले, की भावना पटकन पोचतात. वाढदिवसाला शुभेच्छा देताना  हा केक नाही, असे होतच नाही. पुढे   ! कोणाला सभ्यपणे शिव्या घालून राग व्यक्त करायचा असेल तर  (पु.ल. म्हणतात तशा फुल्या फुल्या फुल्या...) कोरोनाच्या आधीच आलेला  हा मास्कवाला ईमोजीही हल्ली भरपूर वापरला जातो. नुसते हास्य दाखवणारे १३ ईमोजी आहेत, यात डोळे मारून हसणारे धरलेले नाहीत. ‘सॅड फेसवाले’ही असेच १३-१४ ईमोजी आहेत. वर्क ईमोजीमध्ये शेफ, डिटेक्टिव्हपासून ॲस्ट्रॉनॉटपर्यंत अनेक व्यवसाय आहेत. स्पोर्ट्स अॅक्टिव्हिटी करणारे ईमोजी आहेत. काल्पनिक कॅरॅक्टर्सही किती असावीत... जादुगार, एल्फ, व्हँपायर, झाँबी, जादूई दिव्यातून बाहेर आलेला/ली जिनी, मर्मेड, परी. हेअरकट, हेड मसाज, स्पा यांसारख्या पर्सनल केअरसारख्या गोष्टीही फक्त एका ईमोजीने शेअर करता येतात. ड्रॅगनपासून डायनासॉर आणि पाळीव कुत्रा, मांजरापासून डुकरापर्यंत सर्व पाळीव व जंगली प्राणी, पक्षी, कीडे, सरपटणारे प्राणी, मासे, झाडे, फुले, इंद्रधनुष्य, ढग, पाऊस, स्नो फ्लेक, सूर्य, चंद्र, वीज असे सगळे ईमोजी आहेत. भाज्या आहेत, नूडल्स आहेत, फ्रेंच फ्राईजही आहेत; अन्नपदार्थांबरोबर पेयांमध्येही भरपूर व्हरायटी आहे... दुधापासून मधापर्यंत आणि कॉफीपासून मार्टिनीपर्यंत सर्व काही. तीन हजारांहून अधिक ईमोजी आहेत, त्या सगळ्यांचा इथे उल्लेख करायचा म्हणजे कठीणच होईल. 

पण काही काही इमोजींचा कोण कशासाठी वापर करत असेल ते मला कळत नाही. उदा. कोळ्याचे जाळे (हॅलोविनच्या शुभेच्छा देण्यासाठी पाश्चिमात्य लोक याचा वापर करत असावेत), नट-बोल्ट, सेफ्टी पिन, शवपेटी.. अशी बरीच उदाहरणे देता येतील. 

कुठून आले ईमोजी?
ईमोजी हे आधी ईमोटिकॉन होते, पण ईमोजी आणि ईमोटिकॉन या दोन वेगळ्या संकल्पना आहेत. ईमोजीच्या आधी ईमोटिकॉन आले. एखादी भावना दर्शविण्यासाठी विरामचिन्हे, अक्षरे आणि आकड्यांचा वापर केला तर तो ईमोटिकॉन होतो. ईमोशलन आयकॉन यापासून ईमोटिकॉन हा शब्द तयार झाला आहे. स्मार्टफोन्सची लाट येण्याआधी समोरच्याला एक स्माइल पाठवण्यासाठी :) याचा वापर  केल्याचे तुम्हाला आठवत असेल. तेव्हा हा ईमोटिकॉन मान वाकडी करून पाहावा लागत असे. नापसंती दाखवण्यासाठी :( हा फ्राउनिंग फेस वापरला जायचा. तर, वेडावण्यासाठी जीभ बाहेर काढायची तर :P वापरले जायचे.

ईमोजी (emoji) हा मूळ जपानी अक्षरांपासून तयार झालेला शब्द आहे. e म्हणजे picture आणि moji म्हणजे character. ईमोजीचा शोध शिगेटाका कुरिटा यांनी १९९९ मध्ये लावला. मूळ ईमोजी फक्त जपानी ग्राहकांसाठी तयार करण्यात आले होते. ते मांगा आर्ट आणि कांजी कॅरॅक्टर्सवरून तयार करण्यात आले. जपानी ग्राहकांना आकृष्ट करण्यासाठी २००७ मध्ये पहिल्या आयफोनमध्ये ईमोजी कीबोर्ड समाविष्ट केला होता. यामध्ये १७६ ईमोजी होते, जे सध्या न्यूयॉर्कच्या म्युझियम ऑफ मॉडर्न आर्टमध्ये पर्मनंट कलेक्शनमध्ये ठेवले आहेत. सुरुवातीला ईमोजी डोकोमो, केडीडीआय, सॉफ्टबँक या जपानी फोन्समध्येच उपलब्ध होते. नंतर गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि अॅपलसारख्या पाश्चिमात्य कंपन्यांनीही ईमोजीचा वापर करायला सुरुवात केली. लवकरच ईमोजी जगात सगळीकडे अतिशय लोकप्रिय झाले. १७ जुलैला जागतिक ईमोजी दिनही साजरा केला जातो. 

आता सर्वच मेसेंजिंग अॅप्समध्ये ईमोजी वापरले जातात. प्रत्येक टेक कंपनीची स्टाइल थोडी वेगवेगळी असते, म्हणजे ‘ग्रिनिंग फेस’चा ईमोजी फेसबुकसाठी वापरताना वेगळा दिसतो, व्हॉट्सॲपसाठी वेगळा दिसतो, आयफोनवर वेगळा दिसतो आणि अँड्रॉईड फोनवर वेगळा दिसतो. ईमोजी हा काँप्युटरच्या दृष्टीने फक्त एक कॅरॅक्टर असतो, पण त्याचा वापर जगातील असंख्य लोक भावना व्यक्त करण्यासाठी करतात. 

काँप्युटर हाताळणाऱ्या प्रत्येकाने युनिकोड हा शब्द ऐकलेला असेलच. युनिकोडला युनिव्हर्सल एनकोडिंग सिस्टीम म्हणता येईल. वेगवेगळ्या कंपन्यांच्या वेगवेगळ्या डिव्हाइसेसवर (मोबाइल्स, काँप्युटर्स इ.) टेक्स्ट सारखाच दिसतो, तो युनिकोडमुळेच. हेच ईमोजीच्या बाबतीतही लागू होते. 

युनिकोड कॉन्सोर्टियम (Unicode Consortium) ही अशी संस्था आहे, जी जगातील सर्व काँप्युटर्स, मोबाइल यांच्यासाठी टेक्स्ट स्टँर्डड्स ठरवते. त्यांच्या म्हणण्यानुसार  हा सर्वांत जास्त वापरला जाणारा ईमोजी आहे. २०१० पासून युनिकोड नवीन ईमोजीचे प्रपोजल्स लोकांकडून स्वीकारते. तुमच्याकडे ईमोजीसाठी संकल्पना असेल, तर तुम्हीही ती युनिकोडकडे पाठवू शकता. पण ते वाटते तितके सोपे नाही. तुम्हाला हा ईमोजी का तयार व्हायला हवा याचे स्पष्टीकरण द्यावे लागते, तसेच तो कसा दिसू शकेल हेही सांगावे लागते. युनिकोड कॉन्सोर्टियमच्या ईमोजी सबकमिटीला हे पटले तर त्याचा ईमोजी तयार होऊ शकतो. 

ईमोजीचा वापर आता सर्वदूर पसरला आहे. व्हॉट्सॲप मेसेजेससह सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर ईमोजी आढळतो. २०१४ मध्ये अमेरिकेच्या व्हाइट हाउसच्या आर्थिक संकल्पामध्ये ईमोजीचा वापर करण्यात आला होता आणि त्याची माध्यमांनीही दखल घेतली होती. २०१२ आणि २०१३ मध्ये ईमोजीचा वापर इतका वाढला, की २०१३ मध्ये ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये ईमोजी हा शब्द अधिकृतरीत्या समाविष्ट करण्यात आला. एवढेच नव्हे, तर ऑक्सफर्ड डिक्शनरीचा २०१५ चा ‘वर्ड ऑफ द इयर’   होता. हो   या ‘फेस विथ टीअर्स ऑफ जॉय’ या ईमोजीला शब्दाचा मान देण्यात आला होता. कारण २०१५ मध्ये हा सर्वाधिक वापरलेला ईमोजी होता. अजूनही हाच ईमोजी सर्वाधिक वापरला जातो. 

ईमोजी कीबोर्ड पाहिला, तर त्यामध्ये लिंग, वर्ण, सांस्कृतिक समानता राखण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. पण सुरुवातीला असे नव्हते. जसजशी ईमोजीची संख्या वाढायला लागली, तसे सगळी प्रोफेशन्स तर आहेत, पण ते सगळे पुरुषच का आहेत, सगळे माणूस सदृश ईमोजी गौरवर्णीच का आहेत, कुटुंबाच्या ईमोजीमध्ये समलिंगी जोडपे का नाही, छोट्या देशांचे झेंडे का नाहीत, असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले. २०१५ मध्ये माणूस सदृश ईमोजीमध्ये सहा वर्ण समाविष्ट करण्यात आले.. आणि तिथून पुढे ईमोजीमध्ये सर्व धर्म, संस्कृती, लैंगिकता यांच्यामध्ये समानता दिसू लागली. प्रत्येक प्रोफेशन, स्पोर्ट्स अक्टिव्हिटी ईमोजीमध्ये स्त्री आणि पुरुष दोन्ही ईमोजी आहेत, अगदी मिसेस सांताक्लॉजही आहे. कुटुंबामध्येही गे, लेस्बियन जोडपी आणि सिंगल पॅरेंट्सही दिसतात. हिजाब आणि पगडी घातलेलेही ईमोजी आहेत. 

या तंत्रज्ञान आणि इंटरनेटच्या जमान्यामध्ये जग झपाट्याने बदलते आहे. व्हर्च्युअल जगात आपण अधिकाधिक गुरफटत आहोत. शब्दांपेक्षा ईमोजीतून व्यक्त होणे जास्त सोपे आणि प्रभावी आहे असे आपल्याला वाटते. डॉ. विद्याधर बापट म्हणतात, त्याप्रमाणे खरेच ही सोयही आहे आणि पळवाटही...   

सोयही आणि पळवाटही
भावना प्रखरतेने व्यक्त करण्यासाठी आणि सुरक्षित भावना व्यक्त करण्यासाठी ईमोजीचा वापर होतो. शब्दांचा वेगळा अर्थ घेतला जाऊ शकतो किंवा वाक्याची रचना चुकली, तर वेगळा अर्थ निघू शकतो. समोरचा कसा वाचेल, कसा अर्थ घेईल हे आपण सांगू शकत नाही. अशा वेळी ईमोजी नेमक्या भावना पोचवतो. तिथे एक्सप्लनेशची गरज नसते. 

समोरच्याला बरे वाटावे म्हणून ईमोजीद्वारे प्रतिक्रिया दिली जाते. तुम्ही सहमत नसाल तरी अंगठा रिप्लाय दिला की काम होते. माझ्या मते, मूल्ये आणि शिष्टाचार म्हणून यांचा वापर होतो. ईमोजी ही व्यक्त होण्याची सोयही आहे आणि कडवटपणा वाढू नये म्हणून भावना दडवण्यासाठीची पळवाटही आहे. भावना तीव्रतेने प्रकट करायची असेल, तर तो ईमोजी अधिक वेळा वापरला जातो. ईमोजी हा कोड आहे आणि तो शब्दांची जागा घेतो. आय लव्ह यूच्या जागी  वापरतात. पण खरेच मनापासून तसे वाटत असेल तर शब्द वापरून स्पष्ट बोलावे. 
-डॉ. विद्याधर बापट, मानसोपचार व ताणतणाव नियोजन तज्ज्ञ

ईमोजी वापरले की शब्दांची गरज पडत नाही. जे सांगायचे आहे, ते ईमोजी जास्त प्रभावीपणे सांगतात. वेळ वाचतो, ऊर्जा वाचते. ईमोजी शब्दांपेक्षा जास्त लाइव्हली असतात. शब्दांना ईमोजीची साथ असेल, तर खूप परिणामकारक होतात. ते वापरताना मजा येते आणि आनंदही मिळतो. 
-डॉ. उषा मराठे, ज्येष्ठ नागरिक

मी व्हॉट्सॲप, टेलिग्राम दोन्ही ठिकाणी ईमोजी वापरतो, पण जे नेहमीचे ईमोजी आहेत तेच वापरतो, म्हणजे उदा. हाय करणारा मुलगा, स्मायली फेसेस, थंब्ज अप वगैरे. टेलिग्राममध्येही खूप ऑप्शन्स आहेत. कधीकधी असे होते, की नेमका शब्द सापडत नाही. पण मग त्यावेळी ईमोजीमुळे नेमक्या भावना समोरच्यापर्यंत पोचतात. मी शिक्षक आहे. पालकांशी बोलताना कधीकधी नुसते टेक्स्ट उद्धट वाटेल की काय असे वाटते. मग ईमोजीचा वापर करतो. उदा. एका मुलीच्या पालकांनी उत्तरपत्रिका मेल केल्याचा मेसेज केला, पण मला काही मेल मिळाला नव्हता. तुमचा मेल मिळालेला नाही, असे थेट सांगण्याऐवजी मी  आणि can you please check असा मेसेज केला. यामुळे पालकही व्यवस्थित बोलतात. एखादी भावना जास्त तीव्रतेने प्रकट करायची असेल तर एक ईमोजी अनेकवेळा वापरून मेसेज केला 
जातो, जसे की, खूप हसायचे असेल तर     हे आता आउट ऑफ हॅबिट होतेच.
-डॉ. प्रणव जोशीराव, प्राध्यापक

मी ईमोजी भरपूर वापरते आणि सगळ्या भावनांचे ईमोजी वापरते, राग, हसू, रडू... ईमोजी वापरले की समोरच्याला मला काय म्हणायचे आहे, हे व्यवस्थित कळते. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप अशा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर ईमोजी वापरून व्यक्त होते. मित्रमंडळींमध्ये चॅटिंग करताना उपहासात्मक प्रतिक्रिया देण्यासाठीसुद्धा ईमोजी वापरतो. उदा. अगदीच बंडल विनोद असेल, अजिबातच हसायला येत नसेल, तरीसुद्धा मुद्दाम हसणारा ईमोजी वापरतो. आमचे कॉलेजचे व्हॉट्सअॅप ग्रुप्स आहेत. तिथे मोठ्या लोकांबरोबर, शिक्षक-पालकांबरोबर बोलताना मात्र ईमोजी नाही वापरत.
-श्रेया बोरकर, विद्यार्थिनी

संबंधित बातम्या