एका शिक्षकाची कहाणी...

इरावती बारसोडे
सोमवार, 13 डिसेंबर 2021

पुस्तकातून पडद्यावर

मूळ पुस्तक आणि त्यावरून काढलेला चित्रपट अशा दोन्ही गोष्टी आवर्जून वाचाव्यात/बघाव्यात अशा फार कमी कलाकृती असतात. ‘टू सर, विथ लव्ह’ ही त्यापैकी एक कलाकृती म्हणावी लागेल. 

‘टू  सर, विथ लव्ह’ हा चित्रपट नेमका कधी बघितला हे आठवत नाही. पण तो मिळाला तेव्हा अनेक वेळा पाहिला. नंतर कळलं की हा पुस्तकावर बेतलेला चित्रपट आहे. मग पुस्तक आणलं. तेही आता अनेक वेळा वाचून झालं आहे. मराठीसह जगातल्या पंचवीसहून अधिक भाषांमध्ये या पुस्तकाचे अनुवाद झाले आहेत. पुस्तक वाचल्यानंतर चित्रपटात काही दम नाही, असं बऱ्याचदा वाटू शकतं. पण इथं मात्र असं होत नाही. पुस्तक वाचल्यानंतरही मी चित्रपट पुन्हा बघितला आहे. 

विद्यार्थ्यांवर जीव ओवाळून टाकणारा आणि आपलं सर्वस्व पणाला लावून त्यांना घडवण्याचा प्रयत्न करणारा शिक्षक लाभावा यासाठी विद्यार्थ्यांचं नशीब चांगलं असावं लागतं. शिक्षकाचं विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्त्व ही कादंबरी पुन्हा एकदा अधोरेखीत करते. ‘टू सर, विथ लव्ह’ ही मूळ कादंबरी ई. आर. ब्रेथवेट यांची. आपल्या शिक्षकीपेशातून आलेले अनुभव त्यांनी कागदावर उतरवले. नंतर त्यांनी इतरही पुस्तकं लिहिली आणि समाजकार्याकडे वळाले.  

ब्रेथवेट यांचा जन्म १९२० साली ब्रिटिश गयानामध्ये झाला. त्यांचे आई-वडील उच्चशिक्षित होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रेथवेट रॉयल एअरफोर्समध्ये दाखल झाले. युद्धानंतर त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून भौतिकशास्त्राची पदवी मिळवली. मात्र, हवाईदलातला अनुभव आणि उच्चशिक्षण गाठीशी असूनही वर्णभेदामुळं त्यांना त्यांच्या क्षेत्रात काम मिळालं नाही. क्षमता असूनही कंपन्या केवळ त्यांच्या कृष्णवर्णामुळे त्यांना काम द्यायला तयार नव्हत्या. त्यातून आलेलं नैराश्य, अपमानित झाल्याची भावना ब्रेथवेट मोठ्या उद्वेगानं मांडतात. पोट भरण्यासाठी का होईना काहीतरी काम करायला हवं, म्हणून ते अध्यापनाकडे वळाले. त्यांना लंडनच्या ईस्ट एंड भागातील एका शाळेत शिक्षकाची नोकरी पत्करावी लागली. याच नोकरीच्या सुरुवातीला आलेले अनुभव या कादंबरीमध्ये वाचायला मिळतात.

ही त्या काळातली गोष्ट आहे, जेव्हा कृष्णवर्णीयांना उघड उघड नसला, तरी आडून आडून वर्णद्वेषाचा सामना करावा लागत होता. बसमधून जाताना, भाड्यानं घर शोधताना, विद्यार्थ्यांबरोबर ट्रेनमधून जाताना... ठिकठिकाणी अनुभवावा लागलेला वर्णद्वेष ब्रेथवेट यांनी लिहिलेल्या छोट्या छोट्या प्रसंगांमधून समोर येत राहतो. 

ईस्ट एड ही लंडनमधील गरीब आणि गलिच्छ वस्ती. तिथली सामाजिक, आर्थिक परिस्थिती वेगळी आहे. युद्धानंतर तर त्या वस्तीचं रूप आणखी भयाण झालं आहे. अशा वस्तीतल्या ग्रीनस्लेड सेकंडरी स्कूल या शाळेत ब्रेथवेट यांना शिक्षकाची भूमिका बजावायची आहे. या शाळेत विद्यार्थ्यांच्या बेशिस्त, उद्दाम वर्तणुकीमुळे बरेचसे शिक्षक फार काळ टिकत नाहीत. शाळेत शिकवण्याविषयीच्या ब्रेथवेट यांच्या कल्पनेला पहिल्याच दिवशी जबरदस्त तडा जातो. त्यांना अपेक्षित असलेली शिस्त, नीटनेटकेपणा वगैरे दूरदूरपर्यंत कुठंही दिसत नाही. त्याउलट ब्रेथवेटना अनुभवायला मिळते ती ‘बेशिस्त, बेफिकीर, अस्वच्छ मुलांची सर्कस’. अशा मुलांना शिकवायचं, त्यांना शिस्त लावायची हेच इथलं मोठं आव्हान आहे. ते ब्रेथवेट यांनी कसं लीलया पेललं हेच या पुस्तकातून वाचायला मिळतं आणि चित्रपटातून बघायला मिळतं. 

इथल्या मुलांना फक्त ज्ञान द्यायचं नाहीय. त्यांना स्वच्छतेचे धडे द्यायचेत. बोलण्या-वागण्याचे, सभ्यतेचे धडे द्यायचे आहेत. पण ते काम इतकं सोपं नाही. शाळेचे मुख्याध्यापक मि. फ्लोरियन मुलांची परिस्थिती समजावून सांगताना म्हणतात, ‘बऱ्याच मुलांच्या घरची आर्थिक परिस्थिती इतकी गरिबीची असते की त्यांना धड अन्न, वस्त्र व निवारा पुरवण्याची ऐपतही त्यांच्या पालकांची नसते. त्यामुळे नियमित सकस आहार त्या मुलांना बरेचवेळा मिळतच नाही. आता जर एखादं मूल खोपटवजा छोट्याशा खोलीत, माणसांच्या गर्दीत रात्रभर झोपत असेल आणि उठल्यावर अर्धा कप चहा आणि एखादा ब्रेडचा स्लाईस खाऊन शाळेला येत असेल, तर अंकगणितासारख्या विषयात त्याचं मन कसं लागणार? तुम्ही त्याला कितीही शिक्षा करा नाहीतर धाक दाखवा, त्यामुळे काय साध्य होणार?...’ या अशा परिस्थितीमध्ये शिकवण्याचा काडीचाही अनुभव नसलेल्या ब्रेथवेट यांना मुलांना शिकवायचं आहे. 

 ब्रेथवेट ज्या वर्गाचे शिक्षक आहेत, तो मोठ्या मुलांचा वर्ग आहे. त्यामुळे त्यांच्यात जरा जास्तच उद्दामपणा आहे. आम्ही शहाणे आहोत, आम्हाला सगळं कळतं, हा कोण आलाय आम्हाला सांगायला, अशी त्यांची वृत्ती आहे. नवीन शिक्षकाविरुद्ध पहिल्यापासून बंडाची भूमिका घेणारे हे विद्यार्थी आहेत. त्यांनी ब्रेथवेट यांच्याविरुद्धसुद्धा बंड पुकारलंय... सुरुवातीला गप्प बसून सांगितलेलं काम निमूटपणे करायचं, नंतर उगाचच मधे मधे बोलायचं आणि तिसरा टप्पा म्हणजे वर्गात शिवीगाळ करायची, ही त्यांची नेहमीची पद्धत. मुलांना बोलायचं नाही, ओरडायचं नाही, म्हणून ब्रेथवेट काही काळ हे सगळं सहन करतात, पण एक दिवस मुलांच्या बेशिस्तीचा कडेलोट होतो... आणि हाच त्यांच्या पुढं जाऊन बदलणाऱ्या नात्याचा टर्निंग पॉइंट ठरतो. ब्रेथवेट मुलांना लहान मुलासारखं न वागवता मोठ्या, समजूतदार तरुणांसारखं वागवायला सुरुवात करतात. मुलांना त्यांच्या आडनावानं आणि मुलींना मिस म्हणून संबोधायला सुरुवात करतात. मग मुलांचाही पवित्रा बदलतो. हळूहळू ब्रेथवेट त्यांचे ‘फ्रेंड, फिलॉसॉफर, गाइड’ होतात. एका प्रसंगात वर्गातल्या कृष्णवर्णी सील्सची आई गेल्यानंतर सुरुवातीला कोणीच अंत्ययात्रेसाठी जायला तयार होत नाही, कारण हेच की ‘लोक काय म्हणतील’. हे ऐकल्यावर आपल्या शिकवण्याचा, बोलण्याचा काहीही उपयोग झाला नाही, असंच ब्रेथवेट यांना वाटतं. पण अंत्ययात्रेच्या दिवशी मात्र आख्खा वर्ग सील्सच्या दाराबाहेर आत्मविश्वासानं उभा राहिलेला दिसतो, तेव्हा ब्रेथवेट यांच्या डोळ्यातून पाणी आल्यावाचून राहत नाही. मुलांमध्ये बदल घडवण्यात ब्रेथवेट यशस्वी होतात. 

सन १९६७मध्ये याच नावाचा चित्रपट आला. चित्रपटात ब्रेथवेट यांचं नाव बदलून मार्क थॅकरे करण्यात आलं आहे. बाकीच्या पात्रांची नावं मात्र सारखीच आहेत. मार्क थॅकरेची भूमिका सिडनी पोईटेर यांनी केली आहे. जेम्स कॅव्हेल यांनी दिग्दर्शन केलं आहे. 

चित्रपटातील कथेचा क्रम पुस्तकापेक्षा थोडा वेगळा आहे. काही ठळक फरक मात्र प्रकर्षानं जाणवतात. ब्रेथवेट यांच्या वर्गातली मुलं सुरुवातीला अगदीच गलिच्छ, मळके कपडे घालणारी, आठवड्यातून एकदा अंघोळ करणारी आहेत. पण थॅकरे यांची मुलं एवढी गलिच्छ वाटत नाहीत. महिला शिक्षकांना शिकवण्यापलीकडे जाऊन मोठ्या मुलींना अंतर्वस्त्रांची माहिती करून देणं, स्वच्छतेचे धडे देणं अशी कामंही करावी लागतात, हे प्रसंग चित्रपटांमध्ये टाळले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, ब्रेथवेट यांच्या जिलियन ब्लँचार्ड या शिक्षिकेबरोबरच्या नात्याला चित्रपटात पूर्ण बगल दिली आहे. ब्रेथवेट आणि मिस ब्लँचार्ड एकमेकांच्या प्रेमात पडून लग्न करायचा निर्णय घेतात. ब्लँचार्ड या गौरवर्णी असल्यामुळे इथंही वर्णद्वेषाचा संघर्ष दिसतो. चित्रपटामध्ये शाळेच्या शेवटी सर्व मुलं त्यांच्या सरांना बार्बरा पेगनं म्हटलेल्या छानशा गाण्यातून आभारही मानतात आणि गूडबायही करतात. चित्रपटाच्या शेवटी थॅकरेला दुसरी नोकरी मिळाल्यामुळे त्यांनी शाळेतली नोकरी सोडायचं ठरवलेलं असतं. पण पुढच्या वर्षी ‘सीनियर’ म्हणून येणाऱ्या दोन उद्‍धट मुलांशी त्यांची भेट होते आणि ते तिथंच शिक्षक म्हणून राहायचं ठरवतात. 

‘कोलंबिया पिक्चर्स’ला हा चित्रपट कितपत यशस्वी होईल अशी शंका असल्यामुळं त्यांची चित्रपट करण्याची तयारी नव्हती. तेव्हा पॉईटेर आणि कॅव्हेल दोघांनीही पैसे कमी घेण्याचं ठरवलं. चित्रपट मात्र यशस्वी झाला. सहा लाख चाळीस हजार डॉलरचं बजेट असलेल्या या चित्रपटानं चार कोटी डॉलरचा व्यवसाय केला. १९६७मधला तो आठवा ‘हायेस्ट ग्रॉसिंग’ चित्रपट ठरला. १९९६मध्ये या चित्रपटाचा सिक्वलही आला. यामध्येही सिडनी पोईटेरच मार्क थॅकरे यांच्या प्रमुख भूमिकेत आहेत. 

सिडनी पोईटेर हा मुख्य भूमिकेसाठी ऑस्कर पुरस्कार मिळालेला पहिला आफ्रिकन-अमेरिकन  अभिनेता आहे. १९६३ साली आलेल्या ‘लिलीज ऑफ द फील्ड’ चित्रपटासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. १९६७मध्ये पोईटेर यांचे ‘टू सर, विथ लव्ह’ व्यतिरिक्त आणखी दोन चित्रपट प्रदर्शित झाले, ‘इन द हीट ऑफ नाईट’ आणि ‘गेस हू इज कमिंग टू डीनर’. या तिन्ही चित्रपटांमध्ये वर्णद्वेषावर भाष्य करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक संदर्भ बघितले, तर साठीच्या दशकाचा हा उत्तरार्ध वर्षद्वेष विरोधी चळवळीतला महत्त्वाच्या घडामोडींनी भरलेला दिसतो. १९६७मध्येच अमेरिकेत १५९ वर्णद्वेषी दंगली झाल्या होत्या. त्याच वर्षी जूनमध्ये अमेरिकेतल्या १६ राज्यांमध्ये आंतरवंशीय विवाह बेकायदा ठरवणारे कायदे अमेरिका सर्वोच्च न्यायालयानं रद्द केले, आणि पुढच्याच वर्षी एप्रिलमध्ये मार्टिन ल्यूथर किंग यांची हत्या झाली होती.

संबंधित बातम्या