...जस्ट सिंगिंग इन द रेन

इरावती बारसोडे
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

सिनेमांमधला पाऊस म्हणजे रोमँटिक, असं काहीसं गणित असतं. पण हॉलिवूडपटांमध्ये किंवा इंग्रजी सिनेमांमध्ये पाऊस नुसता रोमँटिक राहत नाही. तो हिरोबरोबर गाण्यावर थिरकतो, कधी गूढ होतो, तर कधी कधी व्यक्तिरेखांना त्यांच्या मारामारीत सोबतही करतो...

पाऊस आणि रोमान्स यांचं नातंच वेगळं आहे. इंग्रजी सिनेमांमध्येही ते दिसतंच. कित्येक सिनेमांमध्ये रोमान्स पावसात बहरत जातो. 

‘सिंगिंग इन द रेन’ या चित्रपटाच्या नावातच पाऊस आहे. १९५२ मध्ये प्रदर्शित झालेला हा म्युझिकल सिनेमा मूकपटांपासून बोलपटांपर्यंतचा प्रवास दाखवतो. ‘सिंगिंग इन द रेन’ हे गाणं आणि त्या गाण्यातला हिरोचा डान्स हा चित्रपटाचा हायलाइट आहे. डॉन (जिन केली) हा सिनेमाचा नायक आहे आणि सिनेमातही तो अभिनेताच आहे. 

‘सिंगिंग इन द रेन’ हे चार-पाच मिनिटांचं आणि मोजक्या ओळींचंच गाणं... पण मनाला कसं भिडतं! गाण्याची पार्श्वभूमी सांगायची झाली, तर डॉन खूपच आनंदात आहे, कारण तो प्रेमात पडलाय आणि त्याचा फ्लॉप होणारा चित्रपट कसा वाचवायचा याची आयडियाही त्याला मिळाली आहे. सिनेमाची नायिका कॅथी (डेबी रेनॉल्ड्स) त्याला म्हणतेही, ‘तू आता सिंगिंग स्टार होणार आहेस, त्यामुळं या कॅलिफोर्नियाच्या पावसात स्वतःला जप.’ पण डॉन इतका खुशीत आहे, की कोसळणाऱ्या पावसात डूडू डू डू गुणगुणत चालू लागतो. हेच ते गाणं... सिंगिंग इन द रेन. पावसात डॉनचं छत्री घेऊन डुलत डुलत चालणं, पाइपमधून कोसळणाऱ्या पाण्याखाली उभं राहून स्वतःला भिजवणं, अगदी लहान होऊन मोठ्या ढांगा टाकत पाण्यात थपाक थपाक चालणं, डबक्यात उड्या मारणं, पाणी उडवणं हे सगळं बघून आपल्यालाही त्याच्याबरोबर पावसात भिजायला जायची इच्छा होते. ढगांना हसत हसत डॉन म्हणतो, 

So dark up above
The Sun''s in my heart 
And I''m ready for Love

हे गाणं सिंगल टेकमध्ये शूट करण्यात आलं आहे. तसंच या गाण्याच्या शूटिंगच्या वेळी जिन केलीच्या अंगामध्ये शंभरच्या वर ताप होता, असं म्हणतात. अशा परिस्थितीत पावसामध्ये जिन केली ज्या एनर्जीनं नाचला आहे आणि तेही सिंगल टेकमध्ये, त्यासाठी हॅट्स ऑफ!
‘द साउंड ऑफ म्युझिक’ (१९६५) हादेखील एक म्युझिकल सिनेमा आहे, १९३८ च्या काळात ऑस्ट्रियामध्ये घडणारा. व्हॉन ट्रॅप या कुटुंबाची ही सत्यकथा आहे. चित्रपटाची नायिका मारिया (ज्युली अँड्र्युज), कॅप्टन जॉर्ज व्हॉन ट्रॅप (ख्रिस्तोफर प्लमर)च्या सात मुलांची गर्व्हर्नेस म्हणून जाते. सुरुवातीला मारियाला सळो की पळो करून सोडणाऱ्या मुलांची आणि तिची गट्टी जमते ती एका वादळी पावसाच्या रात्री. विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि धो-धो पडणाऱ्या पावसाला घाबरलेली मुलं शेवटी मारियाच्या खोलीमध्ये जातात आणि मुलांना शांत करण्यासाठी मारिया छानसं गाणं म्हणते (माय फेव्हरेट थिंग्ज) आणि इथून पुढं मुलांची आणि तिची मैत्री खुलत जाते. 
भर पावसात प्रेमाची कबुली देणं यापेक्षा रोमँटिक ते काय. अनेक चित्रपटांमध्ये पावसातच प्रेमकथा फुलल्या आहेत. तर, काही कारणांनी दुरावलेले नायक-नायिका पावसामध्येच सिनेमाच्या शेवटी प्रेमाची कबुली देऊन एकत्र येतात. ब्रेकफास्ट अॅट टिफनीज (१९६१), फोर वेडिंग्ज अँड अ फ्युनरल, (१९९४) स्वीट होम अलाबामा (२००२), स्पायडर मॅन (२००२), द नोटबुक (२००४) यांसारखे कितीतरी सिनेमे सांगता येतील. स्पायडर मॅन, नोटबुकसारख्या सिनेमांमधली पावसातली दृश्‍यंच त्या सिनेमांची ओळख ठरली आहेत. 

पाऊस हा नेहमीच रोमँटिक असतो असं नाही. कधीकधी लव्ह स्टोरी आपल्याला हवी तशी संपत नाही. कधीकधी ‘हॅपिली एव्हर आफ्टर’ऐवजी दोघांच्या वाटा वेगळ्या होतात. तेव्हाही पाऊस सोबतीला असतोच. ‘द ब्रिजेस ऑफ मॅडिसन काऊंटी’ (१९९५) ही फ्रांचेस्का (मेरिल स्ट्रीप) आणि रॉबर्ट (क्लिंट इस्टवूड) यांची अधुरी प्रेमकथा. नॅशनल जिऑग्राफिकसाठी फोटोजर्नलिस्ट म्हणून काम करणारा रॉबर्ट, मॅडिसन काऊंटीच्या ऐतिहासिक पुलांचे फोटो काढण्यासाठी तिथे येतो, फ्रांचेस्काला भेटतो आणि दोघे प्रेमात  

पडतात. पण ते त्या वाटेनं पुढं जाऊ शकतं नाहीत, कारण फ्रांचेस्का लग्न झालेली आणि दोन मुलांची आई आहे. मुसळधार कोसळणाऱ्या पावसात फ्रांचेस्का तिच्या नवऱ्याची वाट बघत गाडीत बसलेली असते तेव्हा तिला रॉबर्ट दिसतो. पावसात चिंब भिजलेला, गाडीपासून थोड्या अंतरावर उभा असलेला. ती खिडकीतून त्याच्याकडं पाहते, दोघं एकमेकांकडं बघून मंद हसतात आणि रॉबर्ट त्याच्या गाडीत जाऊन बसतो. तीच त्यांची शेवटची भेट. 

असाच दुसरा सिनेमा म्हणजे ‘कास्ट अवे’ (२०००). फेडेक्स कुरिअर कंपनीसाठी काम करणारा चक नोलंड (टॉम हँक्स) आणि केली फ्रिअर्स (हेलन हंट) एकमेकांच्या प्रेमात आहेत. चकच्या आयुष्यात केली एक महत्त्वाची व्यक्ती आहे. कामानिमित्त ख्रिसमसच्या दिवशीच चक मलेशियाला जायला निघतो आणि त्याचं आयुष्यच बदलतं. पॅसिफिक समुद्रावर फेडेक्सचं कार्गो विमान, ज्यातून चकही प्रवास करत असतो,  वादळाच्या तडाख्यात सापडतं. यातून चक एकटा वाचतो आणि एका बेटावर अडकतो. केलीला पुन्हा भेटायचं आहे, या आशेनं तो जगतो. तो कसा जिवंत राहतो हीच कास्ट अवेची गोष्ट असली, तरी केली आणि चक मात्र पुन्हा एकत्र येऊ शकत नाहीत. चक त्या बेटावर चार वर्षं असतो. दरम्यानच्या काळात केलीचं लग्नही होतं आणि तिला मुलगीही होते. सिनेमाच्या शेवटी चक केलीला तिनं त्याला दिलेलं गिफ्ट परत देण्यासाठी भेटतो, तिला बाय म्हणून परत जायलाही निघतो. बाहेर धो-धो पावसात निघून जाणारी चकची गाडी केली गॅरेजमधून बघत राहते आणि शेवटी न राहवून त्याला हाक मारते, तोही मागं फिरतो. ‘मला माहीत होतं तू मेलेला नाहीस, माझ्यावर कोणी विश्वास ठेवला नाही, मी तुला विसरायला हवं असंच मला सगळे सांगत राहिले,’ भर पावसात तिचे अश्रू दिसत नाहीत पण बोलण्यातला आवेग लक्षात येतो. नखशिखांत भिजलेले चक आणि केली एकमेकांच्या बाहुपाशात विसावतात आणि क्षणभरानंतर गाडीत जाऊन बसतात. त्या क्षणी दोघांनाही जाणीव होते, की त्यांची शेवटी भेट आणि आता इथून पुढच्या वाटा वेगळ्या! त्या धो-धो पावसात केली तिच्या नवरा आणि मुलीकडं परत जाते आणि चकही आपल्या मनाची तयारी करून निघून जातो. 

इंग्रजी सिनेमांमध्ये पाऊस फक्त प्रियकर-प्रेयसीला सोबत करत नाही. तो युद्धातही सहभागी होतो. अनेक गाजलेल्या सिनेमांचे ॲक्शन सिक्वेन्स पावसातले आहेत. 

सोसाट्याचा वारा, काळवंडलेलं आकाश, उधाणलेला समुद्र, त्यात तयार झालेला भोवरा, त्या भोवऱ्याच्या टोकावर एकमेकांना भिडलेली दोन जहाजं... आणि या सगळ्याला धुवाधार पावसाचा परफेक्ट बॅक ड्रॉप... ‘पायरेट्स ऑफ द कॅरेबियनः अॅट वर्ल्ड्स एंड’ (२००७) या सिनेमाचा हा क्लायमॅक्स सीन अर्थात शेवटचं युद्ध! ही समुद्री चाच्यांची गोष्ट असल्यामुळं यात सागरी देवता आहे, शापित माणसं आणि जहाजं आहेत, शरीरातून बाहेर काढून पेटीत ठेवलेलं हृदयसुद्धा आहे (हे का, कसं यासाठी सिनेमा बघावा). पायरेट्सच्या ब्रेथ्रन कोर्टानं (ज्यामध्ये जगभरातील समुद्री चाच्यांचा समावेश आहे) ईस्ट इंडिया कंपनीशी लढण्याचा निर्णय घेतल्यामुळं हे युद्ध होतं. ईस्ट इंडिया कंपनीच्या साथीला डेव्ही जोन्स आणि त्याचं फ्लाइंग डचमन हे जहाज आहे. तर, त्यांच्या विरोधात कॅप्टन जॅक स्पॅरो (जॉनी डेप) आणि त्याचं ब्लॅक पर्ल, तसंच पायरेट्सचा अख्खा आरमाडा आहे. कॅलिप्सो या सागरी देवतेनं पायरेट्ससाठी अनुकूल वातावरण निर्माण केलेलं असतं... विजांचा कडकडाट, वादळी पाऊस आणि भोवरा. युद्धात तोफांचे बार उडतात, तलवारीला तलवारी भिडतात, पण खरी लढाई रंगते ती भोवऱ्याच्या टोकावर असलेल्या दोन महत्त्वाच्या ब्लॅक पर्ल आणि डचमन या जहाजांमध्ये. ही दोन जहाजंच का महत्त्वाची हे कळण्यासाठी पायरेट्स ऑफ कॅरेबियनचे आधीचे भाग बघावे लागतील. जॅक स्पॅरो, बार्बोसा, डेव्ही जोन्स, एलिझाबेथ स्वॉन, विल टर्नर या सगळ्या प्रमुख व्यक्तिरेखांची या लढाईमध्ये सहभागी होण्याची वैयक्तिक कारणं आहेत. जीवनमरणाच्या या खेळात जिवंत राहू की नाही याची खात्री नसल्यामुळं विल तिथंच एलिझाबेथला लग्नाची मागणी घालतो आणि तीही हो म्हणते. जहाजाचा कॅप्टन असलेला बार्बोसा त्याचं लग्न लावतो. पण एकीकडं लग्न लागत असताना दुसरीकडं तिघंही शत्रुपक्षाच्या माणसांना आपापल्या तलवारीनं भोसकत राहतात. दुसरीकडं जॅक आणि डेव्ही जोन्सचीही तलवारबाजी आहे. या सगळ्या खडाजंगीत पाऊस बदाबदा कोसळतच राहतो. 

‘लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ ही एका अंगठीभोवती फिरणारी कथा आहे. यातही जादू आहे, माणसाबरोबर यक्ष आहेत, ऑर्क नावाचे हिडीस दिसणारे शत्रुपक्ष सदस्य आहेत. तीन सिनेमांच्या मालिकेतल्या दुसऱ्या ‘लॉर्ड ऑफ द रिंग्जः द टू टॉवर्स’ (२००२) या सिनेमातली शेवटची लढाईदेखील पावसातच होते. या लढाईत कोण जिंकतं यावर मिडल अर्थचं भवितव्य ठरणार असतं. व्हिलन असलेल्या सॉरॉनच्या ऑर्क्सचं सैन्य हेल्म्स डीप या गढीवर चालून येतं. सॉरॉनला माणसाला उद्ध्वस्त करायचं आहे आणि त्यासाठीच तो वारंवार हल्ले करतोय. पण त्याला तोंड तर द्यायलाच हवं, त्यामुळं लढाईची तयारी होते. यक्षसुद्धा मदतीला येतात. गढीच्या तटावर जय्यत तयारी होते. गडद अंधारातच पावसाची चाहूल देण्यासाठी ढगांचा गडगडाट होतो. विजा चमकतात आणि त्या क्षणिक उजेडामध्ये चाल करून येणारं ऑर्क्सचं अगणित सैन्य बघून आपणही स्तब्ध होतो. पण या कथेतले सगळेच शूरवीर योद्धे आहेत. या लढाईमध्ये जिंकण्याची शक्यता खूप कमी आहे, तरीही लोकांसाठी त्यांना लढायचं आहे. पावसाच्या पहिल्या थेंबांबरोबर लढाईला तोंड फुटतं. हल्ले-प्रतिहल्ले होऊ लागतात, दोन्ही बाजूंना मृतदेहांचा खच पडू लागतो, रक्ताचा चिखल होतो. पहाटेपर्यंत चाललेल्या या लढाईमध्ये शेवटपर्यंत पाऊस नाही, पण ‘बॅटल ऑफ हेल्म डीप’मध्ये जो ड्रॅमॅटिक इफेक्ट इथं अपेक्षित आहे, तो पाऊस साध्य करतो. 

‘सेव्हिंग प्रायव्हेट रायन’ (१९९८) सिनेमाची गोष्ट त्याच्या नावातच आहे. दुसऱ्या जागतिक महायुद्धाचा हा कालखंड. युद्धामध्ये रायन कुटुंबातल्या चार भावांपैकी तीन आधीच शहीद झाले आहेत. म्हणूनच चौथ्या भावाला (मॅट डेमन) सुखरूप परत आणण्याची जबाबदारी आर्मी रेंजर कॅप्टन जॉन मिलर (टॉम हँक्स) आणि त्याच्या सहकाऱ्यांवर सोपवली जाते. प्रायव्हेट रायनच्या शोधात निघालेल्या या सैनिकांचा प्रवास सोपा नाही. दहशतीच्या  वातावरणातच ते निघाले आहेत, अशा ठिकाणी जिथं जर्मन सैनिकांची संख्या जास्त आहे. त्यांच्या या प्रवासात मधेच पाऊस सुरू होतो. पानांवर एक एक पडणारा थेंब, साचलेल्या पाण्यात पडणाऱ्या जलधारा क्षणभर वेगळ्या जगात घेऊन जातात, वाटतं कुठल्यातरी रोमँटिक सिनेमाची गोष्ट आहे... पण पुढच्या क्षणी गोळीबाराच्या आवाजानं स्टीव्हन स्पीलबर्ग (दिग्दर्शक) आपल्याला युद्धभूमीवर आणतो. त्या पावसात खूप काही घडतं. मोडक्या-तोडक्या घरातलं फ्रेंच कुटुंब आमच्या मुलीला तुमच्याबरोबर घेऊन जा, ती सुरक्षित राहील म्हणून विनवण्या करत राहतं. त्या भानगडीत जर्मन स्नायपरची गोळी एका सैनिकाचा वेध घेते. तिथल्या ट्रुपच्या कॅप्टनच्या शोधात निघालेली मिलर आणि मंडळी एका पडक्या घराच्या आसऱ्यानं थांबतात. तिथली आधीच तकलादू झालेली भिंत पडते आणि ध्यानीमनी नसताना जर्मन व अमेरिकी सैनिक समोरासमोर येतात. गळे ताणून दोन्हीकडचे सैनिक आपापल्या भाषेत ‘ड्रॉप द गन’ ओरडत राहतात आणि आपणही खुर्चीच्या कडेवर येऊन बघत राहतो. अर्थातच जर्मन सैनिक मारले जातात. एवढं सगळं होऊन मिलरला जो रायन सापडतो, तो चुकीचा रायन असतो. या सगळ्यात त्या ‘इंटेन्स’ वातावरण निर्मितीचं काम पाऊस करतो. स्पीलबर्गनं पावसाचा फार समर्पक उपयोग केलाय. 

‘पॅसिफिक रिम’ (२०१३)च्या क्लायमॅक्समध्ये सारं काही आहे, अजस्र रोबोट, एलियन आणि त्यांची मारामारी. हे सारं घडतं अर्थातच पावसात. साय-फाय सिनेमे, त्यातही एलियन्स वगैरे आवडणाऱ्यांनी चुकवू नये अशी ही मारामारी. ‘मॅट्रिक्स रेव्होल्युशन’ (२००३) मधील निओ आणि एजंट स्मिथ, ‘स्टार वॉर्स’ सीरिजमधली ओबी-वॅन आणि जँगो फेट किंवा रे आणि कायलो रेन यांच्यातल्या मारामाऱ्याही ‘एपिक’ म्हणाव्यात अशाच आहेत. 

‘शॉशँक रिडंप्शन’ (१९९४) ही चुकीच्या खुनाच्या आरोपाखाली शॉशँक तुरुंगात जन्मठेप भोगणाऱ्या अँडीची (टिम रॉबिन्स) गोष्ट आहे. तुरुंगातला मित्र रेडला (मॉर्गन फ्रीमन) अँडी सांगतो, ‘सगळ्या गोष्टी दगडांच्या नसतात. असंही काहीतरी आहे ज्याला ते स्पर्श करू शकत नाहीत. ती म्हणजे आशा.’ त्या आशेच्या जोरावरच १९ वर्षं अँडी तुरुंगात राहतो, अत्याचार सहन करतो आणि एक दिवस त्या तुरुंगातून पळून जातो. १९ वर्षं त्यानं त्याच्या कोठडीतून बोगदा खणून त्या दिवसाची तयारी केलेली असते. सांडपाण्याच्या पाइपातून तो बाहेर पडतो. तो पाइप फोडण्यासाठी बाहेर होणाऱ्या ढगांच्या गडगडाटाची मदत होते. त्या गडगडाटात पाइपावर दगडानं घातलेले वार विरून जातात. किळसवाण्या पाइपातून जवळपास अर्धा किलोमीटर सरपटत अँडी एकदाचा बाहेर पडतो तेव्हा बाहेर मुसळधार पाऊस पडत असतो. अंगातला शर्ट काढून दोन्ही हात पसरून अँडी विजांच्या कडकडाटानं आणि गडगडाटानं भरलेल्या आभाळाकडं पाहतो... त्या चिंब पावसात त्याला त्याचं स्वातंत्र्य मिळालेलं असतं! 

मुळात कथा गूढ असेल आणि त्यात पावसाची भर पडली, तर धडकी भरावी अशी भयावह वातावरण निर्मिती होते. ‘सायको’ (१९६०) सिनेमामध्ये मेरियन पैसे चोरून पळते आणि पावसातच गाडी चालवत निघते. फूटभर अंतरावरचंही दिसू नये, अशा परिस्थितीत ती जेव्हा गाडी चालवत राहते, तेव्हाच पुढं काहीतरी विपरीत घडणार आहे, याची चाहूल लागते. ‘सेव्हन’ (१९९५) या क्राइम थ्रिलरमध्ये संपूर्ण सिनेमाभर पाऊस पडत राहतो आणि त्यामुळंच खुनाचं रहस्य आणखी गडद होत जातं.

निसर्गामध्ये पाऊस नवसंजीवनी आणतो, जीवसृष्टी पावसानंतर उभारी घेते. हे उत्तमपणे मांडणाऱ्या ‘लायन किंग’ला कसं विसरून चालेल. सिंबा आणि स्कारच्या शेवटच्या लढाईनंतर सरी बरसू लागतात, आग विझते, सगळं स्वच्छ धुतलं जातं... भिजलेला सिंबा प्राइड रॉकवर उभा राहून डरकाळी फोडतो आणि जंगलाला नवा राजा मिळतो. जुनं सगळं मागं पडून एका नव्या पर्वाची सुरुवात होते.

संबंधित बातम्या