शोध राष्ट्रीय फुलपाखराचा...

इरावती बारसोडे
सोमवार, 5 ऑक्टोबर 2020

प्राणी, पक्षी, वनस्पती, कीटक या प्रजाती जेव्हा सामान्यांनाही माहिती असतात, तेव्हा त्यांचे संवर्धन अधिक प्रभावीपणे होण्यास मदत होते. फुलपाखरांचेही प्रभावी संवर्धन व्हावे यासाठी भारताचे राष्ट्रीय फुलपाखरू असावे, असा विचार फुलपाखरू प्रेमींच्या मनात आला... आणि सुरू झाली फुलपाखरांची निवडणूक!  
 

आपल्या भारताचे राष्ट्रीय फळ आहे, फूल आहे, पक्षी आहे, प्राणी आहे, पण राष्ट्रीय कीटक नाही. परिसंस्थेमध्ये छोट्याशा किड्यालाही महत्त्व असतेच की. फुलपाखरू कितीही सुंदर दिसत असले, तरी तेही कीटकच असते. आता भारताचे राष्ट्रीय फुलपाखरू असावे, यासाठी काही फुलपाखरू प्रेमीमंडळींनी पुढाकार घेतला आहे. राष्ट्रीय फुलपाखरू कोण असावे, यासाठी सध्या उमेदवारांमध्ये निवडणूक सुरू आहे, होय निवडणूक! आणि त्यासाठी भारतभरातून सात उमेदवारही निवडणुकीला उभे आहेत.

फुलपाखरू हा अन्नसाखळीमधील महत्त्वाचा घटक आहे. परागीभवनासाठीही फुलपाखराची मदत होते. त्याशिवाय ते दिसतेही किती सुंदर, सुरेख! इतर प्रजातींप्रमाणेच याच्याही संवर्धनाची नितांत गरज आहे. म्हणूनच राष्ट्रीय फुलपाखरू असले, तर त्याच्याही संवर्धनाचे प्रयत्न आणखी जोमाने होतील, या उद्देशाने कोरोना साथीमुळे झालेल्या लॉकडाउनच्या काळात ही निवडणुकीची संकल्पना उदयाला आली. त्यासाठी राष्ट्रीय फुलपाखरू निवड संघाचीही स्थापना करण्यात आली. यामध्ये डॉ. कृष्णमेघ कुंटे (एनसीबीएस, बंगळूर), आयझॅक किहिमकर (बीएनएचएस, मुंबई), डॉ. कलेश सदाशिवन (केरळ), डॉ. अमोल पटवर्धन (ठाणे), डॉ. विलास बर्डेकर (माजी अध्यक्ष, जैवविविधता मंडळ, नागपूर), जुधाजीत दासगुप्ता (कोलकता), अनिल नागर (माजी मुख्य वन संरक्षक, भोपाळ, मध्यप्रदेश), डॉ. मान्सून ज्योती गोगोई (आसाम), डॉ. शाखा शर्मा (काश्मीर), शरण व्यंकटेश (तामिळनाडू), दिवाकर ठोंबरे (ठाणे), विजय बर्वे (मुंबई), हेमंत ओगले (सिंधुदुर्ग), डॉ. जटीश्वर (मणिपूर) या आणि सुमारे ५० हून अधिक फुलपाखरू अभ्यासक, शास्त्रज्ञ, संशोधक व फुलपाखरू प्रेमींनी यासाठी कष्ट घेतले आहेत. भारतामध्ये ही अशाप्रकारची निवडणूक पहिल्यांदाच होत आहे. 

राष्ट्रीय फुलपाखरू कोणते असावे, यासाठी काही निकष ठरवण्यात आले. त्यामध्ये फुलपाखरू फार दुर्मीळ नसावे आणि त्याचवेळी अगदी सर्वत्र आढळणारेही नसावे. फुलपाखरू दिसायला अत्यंत सुंदर, देखणे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये charismatic म्हणतो, तसे असावे. त्या फुलपाखराची रंगसंगती आपल्या भारतीय संस्कृतीशी कुठेतरी मिळतीजुळती असावी. पीक नष्ट करणाऱ्या किंवा कुठल्याही पद्धतीने नुकसान करणाऱ्या फुलपाखराचा राष्ट्रीय फुलपाखरू म्हणून विचार केला जाऊ नये. गेल्या तीन वर्षांमध्ये भारतामधील अनेक राज्यांनी आपापली राज्य फुलपाखरे घोषित केलेली आहेत, त्या प्रजातींना वगळावे. तरुण वर्गाला आकर्षित करेल, त्याचा अभ्यास करायला आवडेल असे फुलपाखरू असावे. ज्याची वैशिष्ट्ये ठळकपणे दिसतात, असे फुलपाखरू असावे. फुलपाखराच्या नर व मादीमध्ये जास्त फरक नसावा. अशा अनेक निकषांचा आधार घेऊन ५० फुलपाखरे निवडण्यात आली. ही सर्व फुलपाखरे भारतातील ठराविक क्षेत्रामध्येच आढळणारी नाहीत, म्हणजेच ती कुठल्याही क्षेत्रातील endemic नसून ती साधारण सगळीकडे आढळतात, अशी माहिती समन्वयक दिवाकर ठोंबरे यांनी दिली. 

राष्ट्रीय फुलपाखरू निवडीसाठी लोकांना सहभागी करून घेण्याचे ठरले. पण निवडीसाठी ५० फुलपाखरे लोकांसमोर ठेवली असती, तर लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असता. म्हणून आधी आम्हीच मतदान करून सात फुलपाखरे निवडायचे ठरवले, असेही ठोंबरे यांनी सांगितले. लोकशाही पद्धतीने म्हणजेच प्रथम पसंती, द्वितीय पसंती अशा पद्धतीने मतदान केले. त्यातून सात फुलपाखरे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आली, अशी माहिती जैवविविधता मंडळाचे माजी अध्यक्ष विलास बर्डेकर यांनी दिली. आत्तापर्यंत ३८ हजारांहून अधिक मतदान झाले असून त्यामध्ये महाराष्ट्रातून सर्वाधिक म्हणजे १६ हजारांहून अधिक जणांनी मतदान केले आहे. त्या खालोखाल पश्‍चिम बंगाल, मध्यप्रदेश, तामिळनाडू, आसाम, केरळ या राज्यांमधून मतदान होत आहे. 

राष्ट्रीय फुलपाखरू घोषित करायचे किंवा नाही हा अधिकार पर्यावरण मंत्रालयाचा असतो. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर विजेत्या उमेदवाराची माहिती मंत्रालयाकडे देण्यात येणार आहे, असेही ठोंबरे यांनी सांगितले. 

कोण आहेत उमेदवार?
कृष्णा पिकॉक, इंडियन जेझबेल, ऑरेंज ओकलीफ, फाईव्हबार स्वर्डटेल, इंडियन नवाब, यलो गॉरगॉन आणि नॉर्दन जंगल क्वीन ही राष्ट्रीय फुलपाखरू निवडणुकीतील उमेदवार फुलपाखरे आहेत. 

फाईव्हबार स्वर्डटेल-
या फुलपाखराची तलवारीसारखी शेपूट असल्यामुळेच याचे नाव स्वर्डटेल पडले असावे. पश्चिम घाटातील सदाहरित वने, पूर्व हिमालय आणि ईशान्य भारतामध्ये हे फुलपाखरू आढळते. या तिन्ही प्रदेशांमध्ये वेगवेगळी जैवविविधता पाहायला मिळते आणि ही क्षेत्रे महत्त्वाची बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स आहेत. 

इंडियन जेझबेल-
इंडियन किंवा कॉमन जेझबेल भारतभरात अगदी कुठल्याही बागेत सहज दिसेल असे फुलपाखरू आहे. त्याच्या पंखावरचे लाल-पिवळे पट्टे हळदी-कुंकवाचा आभास निर्माण करतात. म्हणून याचे मराठीमध्ये हळदी-कुंकू असे नामकरणही करण्यात आले आहे. त्याच्या पंखावरील रंगसंगती त्याचे अनेक भक्षकांपासून संरक्षण करते. 

इंडियन नवाब-
इंडियन नवाब किंवा कॉमन नवाब भारतातल्या आर्द्र परिसंस्थेमध्ये आढळते आणि सहज दिसते. नवाब या आपल्या नावाप्रमाणेच राजबिंडे असे हे फुलपाखरू आहे. त्याचे दणकट शरीर असते आणि हालचालीही वेगवान असतात. 

कृष्णा पिकॉक-
कृष्णा पिकॉक हे जगातील मोठ्या आणि अतिशय देखण्या फुलपाखरांपैकी एक फुलपाखरू आहे. हे फुलपाखरू हिमालयातील जैवविविधतेचे एक प्रतीक असून तेथील महत्त्वाची प्रजाती आहे. हवामान बदलामुळे हिमालयी जैवविविधतेचे संवर्धन हा कळीचा मुद्दा आहे. त्या पार्श्वभूमीवर हे फुलपाखरू तेथील जैवविविधतेचे प्रतिनिधित्व करते. त्याच्या पंखावर असलेल्या निळ्या पट्ट्यामुळे त्याला त्याचे नाव मिळाले आहे. 

ऑरेंज ओकलीफ-
ऑरेंज ओकलीफ पंख मिटून बसते, तेव्हा एखाद्या वाळलेल्या पानाप्रमाणे दिसते. त्यामुळेच त्याचे भक्षकांपासून संरक्षण होते. पण हे जेव्हा पंख उघडते तेव्हा त्याच्या पंखावरची सुंदर निळी-केशरी रंगसंगती मोहवून टाकते. त्याच्या रंगसंगतीमुळे ते पटकन ओळखून येते. पश्चिम घाटांचा उत्तर भाग, तसेच मध्य, उत्तर आणि ईशान्य भारतामध्ये हे आढळते. 

नॉर्दन जंगलक्वीन-
नॉर्दन जंगलक्वीनच्या पंखांच्या टोकावर असणाऱ्या लालबुंद गोळ्यांमुळे याची रंगसंगती विशेष उठावदार दिसते. एरवी उठून दिसत असले, तरीही ते जंगलामध्ये पंख मिटून सहज मिसळून दिसेनासे होते. हे अरुणाचल प्रदेशात आढळते. अरुणाचल प्रदेशातील मिश्मी समाजामध्ये केले जाणारे विणकाम या फुलपाखराच्या डिझाइनवरून प्रेरणा घेऊन केलेले दिसते. 

यलो गॉरगन-
विचित्र आकाराचे पंख, मोठा आकार आणि पिवळा धम्मक रंग यांमुळे हे फुलपाखरू लक्ष वेधून घेते. हे फुलपाखरू वेगाने वर-खाली उडते. यलो गॉरगॉन हिमालयी क्षेत्र आणि ईशान्य भारत येथील जंगले, टेकड्या आणि झऱ्यांवर बागडताना दिसते.

कसे कराल मतदान?
राष्ट्रीय फुलपाखरासाठीची निवडणूक आता काही दिवसांसाठीच आहे. ८ ऑक्टोबर ही मतदानाची अंतिम तारीख आहे. मतदान करण्यासाठी गुगल फॉर्म तयार करण्यात आला आहे. यामध्ये तुम्हाला फक्त नाव, वय, व्यवसाय, राज्य आणि तुमचे फुलपाखराबरोबरचे नाते एवढ्याच गोष्टी नमूद करायच्या आहेत. फुलपाखराबरोबरचे नाते म्हणजे, तुम्ही त्याचे फोटो काढता का किंवा त्यांच्यावर संशोधन करता का किंवा तुम्हाला फक्त फुलपाखरे आवडतात अशा प्रकारच्या पर्यायांमधून एक पर्याय निवडायचा आहे. वरील माहिती भरल्यानंतर जे फुलपाखरू आवडले, त्याच्यावर क्लिक करून सबमिट म्हणायचे आहे. मतदान करण्यासाठी https://forms.gle/u7WgCuuGSYC9AgLG6 या लिंकवर क्लिक करून गुगल फॉर्म ओपन करता येईल, तसेच क्यूआर कोड स्कॅन करूनही तुम्ही मतदान करू शकता.

संबंधित बातम्या