गोष्ट एका जादूई दुनियेची!

इरावती बारसोडे
सोमवार, 5 एप्रिल 2021

पुस्तकातून पडद्यावर

‘हॅरी पॉटर अँड डेथली हॉलोज्’ चित्रपटाचा दुसरा भाग २०११ मध्ये आला, तेव्हा मला हा चित्रपट कोणत्याही परिस्थितीत बघायचाच होता. तिकिटंही कशीबशी मिळाली. चित्रपटगृहात ते टिपिकल थीम म्युझिक वाजू लागलं, वॉर्नर ब्रदर्सचा लोगो झळकला आणि लगेचच माझ्या शेजारी बसलेल्या माझ्या बहिणीचा प्रश्नांचा भडिमारही सुरू झाला. मी पुस्तकं आधीच वाचली असल्यानं, मग आता या भागात काय होतं? कोणी मरतं का? यात व्हॉल्डमॉर्ट मरतो का?... एक ना अनेक प्रश्न सुरूच होते. माझ्या हे लक्षात राहण्याचं कारण म्हणजे, हाच प्रकार आमच्या पुढं-मागं, उजवीकडं-डावीकडं बसलेल्या प्रेक्षकांमध्ये सुरू होता. कोणीतरी एकानं पुस्तक वाचलेलं होतं आणि पुस्तक न वाचलेला त्याला प्रश्न विचारत होता... कारण, पुस्तकामध्ये अशा अनेक गोष्टी असतात, ज्या पडद्यावर येत नाहीत. 

हॅरी पॉटरच्या कथांची पुस्‍तकं तर उत्तम आहेच आणि त्यावर निघालेला सिनेमाही जरूर बघावा, अशा मोजक्याच कलाकृती असतात, त्यापैकीच एक ‘हॅरी पॉटर’ मालिका म्हणावी लागेल. पुस्तकांची पूर्ण मजा सिनेमांना येत नसली, तरी ज्यांना अजिबातच वाचायला आवडत नाही, त्यांनीही ‘हॅरी पॉटर’ सिनेमे बघावेत, कारण हे एक वेगळंच अद्‍भुत, रम्य जग आहे... जादूई जग! 

जे. के. रोलिंग ही ‘हॅरी पॉटर’ मालिकेची लेखिका. १९९०मध्ये ट्रेनमधून प्रवास करताना तिला ‘हॅरी पॉटर’ची कल्पना सुचली. ‘हॅरी पॉटर’ ही सात पुस्तकांची मालिका आहे. त्या सातही भागांवर आठ चित्रपट निघाले. आठ अशासाठी की शेवटचा भाग एका चित्रपटामध्ये संपण्यासारखा नव्हता म्हणून. १९९७मध्ये या मालिकेतलं पहिलं पुस्तक, म्हणजेच ‘हॅरी पॉटर अँड फिलॉसॉफर्स स्टोन’ प्रकाशित झालं आणि पहिला चित्रपट २००१मध्ये प्रदर्शित झाला. पहिल्या चित्रपटाच्यावेळी अवघ्या १०-११ वर्षांचे असलेले प्रमुख नायक-नायिका चित्रपट मालिका संपली तेव्हा २०-२१ वर्षांचे होते. इतका दीर्घ काळ या चित्रपट मालिकेनं प्रेक्षकांवर ‘जादू’ केली होती. 

हॅरी पॉटर अँड ‘फिलॉसॉफर्स स्टोन’, ‘चेंबर ऑफ सिक्रेट्स’, ‘प्रिझनर ऑफ अॅझ्कबान’, ‘गॉब्लेट ऑफ फायर’, ‘ऑर्डर ऑफ फिनिक्स’, ‘हाफ ब्लड प्रिन्स’ आणि ‘डेथली हॉलोज्’ ही पुस्तक मालिका १९९७ ते २००७ या दहा वर्षांमध्ये प्रसिद्ध झाली. सन २०१८ पर्यंत या पुस्तकांच्या ५०० मिलियन प्रतींची विक्री झाली होती. ‘हॅरी पॉटर’ची ८० भाषांमध्ये भाषांतरंही झाली आहेत. भारतामध्ये मराठीबरोबरच हिंदी, बंगाली, गुजराती, मल्याळी, तामीळ, तेलगू इ. भाषांमध्ये भाषांतर झालेलं आहे. गंमत म्हणजे ब्लुम्सबरी पब्लिशर्सच्या आधी १२ प्रकाशकांनी ‘हॅरी पॉटर’ प्रकाशित करण्यास नकार दिला होता. ब्लुम्सबरी तेव्हा तुलनेनं नवीन प्रकाशन होतं. सुरुवातीला फक्त ५०० प्रती छापण्याचं ठरलं, मात्र मार्च १९९९ पर्यंत एकट्या युनायटेड किंग्डममध्येच या पुस्तकाच्या तीन लाख प्रती विकल्या गेल्या होत्‍या. १९९८ मध्ये रोलिंगनं ‘वॉर्नर ब्रदर्स’बरोबर डील साइन केलं. 

चार दिग्दर्शकांचे दिग्दर्शन लाभलेली चित्रपट मालिका २००१ ते २०११ या दहा वर्षातली. म्हणजेच पुस्तकाची मालिका संपायच्या आधीच, चित्रपट यायला सुरुवात झाली होती. पुस्तकांना जेवढी लोकप्रियता लाभली, तेवढीच लोकप्रियता प्रत्येक चित्रपटाला लाभली. पुस्तकं-सिनेमांनी लाखो-करोडोंचा व्यवसायही केला आणि आजही करत आहेत. 

प्रत्येक भागाची गोष्ट सांगायची झाली, तर सात लेख लिहावे लागतील. पण थोडक्यात सांगायचं, तर ‘हॅरी पॉटर’ ही लहान मुलांची एक जादूई गोष्ट आहे. यात जादूची छडी वापरून जादू करणारे विझार्ड, विचेस आहेत. जायंट आहेत, मरपिपल आहेत, सेंटॉर आहेत, हाऊस एल्फ्स आहे, आपण विचारही करू शकणार नाही असे तीन तोंडाच्या फ्लफी नावाच्या कुत्र्यासारखे नानाविध प्राणीही आहेत. 

या आगळ्यावेगळ्या दुनियेत हॅरी केवळ एक वर्षाचा असताना त्याचे आई-वडील लॉर्ड व्हॉल्डमॉर्ट नावाच्या डार्क विझार्डकडून मारले जातात, पण चिमुकला हॅरी तेवढा वाचतो आणि ‘द बॉय हू सर्व्हाइव्हड’ म्हणून जादूई दुनियेत फेमस होतो. हॅरी ११ वर्षांचा झाल्यानंतर ‘हॉगवर्ट्स स्कूल ऑफ विचक्राफ्ट अँड विझर्डरी’मध्ये जाऊ लागतो. तिथं त्याला रॉन विजली व हर्मायनी ग्रिंजर हे जिवाभावाचे मित्र मिळतात. हॅरीला आणि त्याच्या मित्रांना हॉगवर्ट्समध्ये सात वर्षं शिक्षण घ्यायचं आहे. या सात वर्षांत त्याला दर वर्षी व्हॉल्डमॉर्टचा सामना करताना नवीन साहसाला सामोरं जावं लागतं. कधी त्याचे शिक्षकच त्याच्या जिवावर उठतात, तर कधी बासलिस्कसारखा प्राचीन अजस्र साप शाळेतल्या ठरावीक मुलांना पॅट्रिफाय करतो. तिसऱ्या वर्षात अॅझ्कबानमधून सुटलेल्या मास मर्डरर सिरियस ब्लॅकच्या मागे आलेले डिमेंटॉर संकटात भर घालतात. शाळेच्या चौथ्या वर्षात हॅरीला मारण्यासाठी म्हणून ट्रायविझार्ड टुर्नामेंटमध्ये त्याचं नाव घातलं जातं; याच वर्षी लॉर्ड व्हॉल्डमॉर्टही परत येतो. पाचव्या वर्षी नवी शिक्षिका डोलोरस अंब्रिज सगळ्यांनाच सळो की पळो करून सोडते... अति गोड बोलून डोक्यात जाणारी काही माणसं असतात, ही अंब्रिज तशीच आहे; तिची चीड यावी असाच अभिनय इमेल्डा स्टाँटनने केला आहे. सहाव्या भागात व्हॉर्ल्डमॉर्टचं एक गुपित हॅरीला कळतं, पण त्यापायी त्याला त्याचे आवडते हेडमास्टर प्रो. डम्बलडोर यांना गमवावं लागतं... आणि सातव्या भागात तर हॅरी आणि व्हॉल्डमॉर्टमधली अंतिम लढाई आहे. 

हॅरी पॉटरबरोबरच रॉन विजली आणि हर्मायनी ग्रिंजर या प्रमुख व्यक्तिरेखा. चित्रपटांमध्ये या व्यक्तिरेखा अनुक्रमे डॅनियल रॅडक्लिफ, रुपर्ट ग्रिंट आणि एमा वॉटसन यांनी साकारल्या आहेत. पहिल्या भागामध्ये रॉन आणि हॅरी, हर्मायनीला प्रचंड अशा ट्रोलपासून वाचवतात आणि तीच त्याच्या मैत्रीची सुरुवात असते. पुढं त्यांच्यातील मैत्री हळूहळू बहरत जाते. रॉन आणि हर्मायनी, हॅरीला प्रत्येक ठिकाणी साथ देतात. जेव्हा आख्खं जग त्याला खोटं ठरवतं, तेव्हा ते खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभे राहतात. रॉनचं मोठं कुटुंब (आई-वडील, पाच भाऊ आणि एक बहीण) हॅरीचंही कुटुंब होतं. त्यांचं हे नातं सातही पुस्तकांमधून खूप छान समोर येतं. पुस्तकांमध्ये दिसणाऱ्या तिघांच्या मैत्रीला चित्रपटांमध्ये काही ठिकाणी योग्य न्याय दिलेला नाही, असं वाटतं. मैत्रीच काय, पण रॉन-हर्मायनी आणि हॅरी-जिनी (रॉनची बहीण) यांच्यातील प्रेमाचं नातंसुद्धा व्यवस्थित स्पष्ट होत नाही. हॅरीला त्याच्या गॉड फादर- सिरियस ब्लॅकबद्दल असलेला जिव्हाळा, डम्बलडोरविषयी असलेला आदर, ऑर्डरच्या सदस्यांबद्दल असलेला आपलेपणा, ड्रेको मॅल्फॉयबद्दलचा राग आणि तिरस्कार... या सगळ्याच भावना दृश्यांपेक्षा शब्दांमधून अधिक प्रभावीपणे उमटतात. 

उदाहरणार्थ, डेथली हॉलोजमध्ये हॅरी व रॉनमध्ये भांडणं होतात आणि रॉन त्या दोघांना सोडून निघून जातो. तो गेल्यानंतर हर्मायनी आणि हॅरी कित्येक दिवस एकमेकांशी बोलतसुद्धा नाहीत. याउलट चित्रपटामध्ये हे दोघं रेडिओवर लागलेल्या गाण्यावर हसत-खेळत नाच करताना दाखवले आहेत. याच भागामध्ये रॉन परत येतो, तेव्हा त्याच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी किती मोठी होती, हे हॅरीला जाणवतं. त्याच वेळी आपण निघून जाऊन किती मूर्खपणा केला याची जाणीव रॉनलाही झालेली असते. पुस्तकामधील त्यांचे संवाद, हॅरीचं रॉनला समजावणं आणि त्यांनी मारलेली मिठी त्यांची घट्ट मैत्रीच दाखवते. चित्रपटामध्ये याच प्रसंगात मात्र रॉन हॉर्क्रक्स (व्हॉल्डमॉर्टच्या आत्म्याच्या एक तुकडा; त्याने स्वतःच्या आत्म्याचे सात भाग करून वस्तूंमध्ये दडवून ठेवलेले असतात) नष्ट करतो आणि म्हणतो, ‘जस्ट थ्री मोअर टू गो...,’ जणू याआधी काही घडलंच नव्हतं; रॉनचा पश्चात्ताप नाही, हॅरीचं त्याला मिस करणं नाही...  

पुस्तकातल्या बऱ्याचशा गोष्टी पडद्यावर दिसल्या नसल्या, तरी काही गोष्टी आपण नक्कीच एंजॉय करतो. उदा. उडत्‍या झाडूवर बसून हवेत खेळला जाणारा क्विडिच खेळ, पहिल्या भागातील विझार्ड चेस (यात बुद्धिबळावरची प्यादी चक्क जिवंत होऊन मारामारी करतात), ट्रायविझार्ड टुर्नामेंट (गॉब्लेट ऑफ फायर), शेवटचं बॅटल ऑफ हॉगवर्ट्स इ. 

डॅनियल रॅडक्लिफ, एमा वॉटसन आणि रुपर्ट ग्रिंट यांच्याव्यतिरिक्त संपूर्ण मालिकेमध्ये प्रमुख भूमिकांमध्ये तगडी स्टारकास्ट आहे. मायकल गँबॉन (अॅल्बस डम्बलडोर), डेम मॅगी स्मीथ (मिनर्व्हा मॅकगॉनिगल), अॅलन रिकमन (सेव्हरस स्नेप), गेरी ओल्डमन (सिरियस ब्लॅक), ज्युली वॉल्टर्स (मॉली विजली), मार्क विल्यम्स (ऑर्थर विजली), राल्फ फिन्स (लॉर्ड व्हॉल्डमॉर्ट), हेलेना बोहम कार्टर (बेलाट्रिक्स लेस्ट्रेंज), वॉरविक डेव्हिस (फिलियस फ्लिटविक), एमा थॉम्प्सन (सिबिल ट्रव्हेल्नी), अशी किती जणांची नावं घ्यावीत. प्रमुख भूमिका ब्रिटिश कलाकारांनीच कराव्यात, असा खुद्द रोलिंगचाच आग्रह होता.

राल्फ फिन्स यांच्या लॉर्ड व्हॉल्डमॉर्ट व्यतिरिक्त इतर काही नकारात्मक भूमिकांमधले अभिनयही लक्ष वेधून घेतात. अॅलन रिकमन या अभिनेत्यानं प्रोफेसर सेव्हरस स्नेप ही व्यक्तिरेखा अतिशय उत्तम रंगवली आहे. काळ्या रंगाचा क्लोक, काळे तेलकट केस, चेहऱ्यावर कायम तिरस्काराचे भाव; असा हा हॅरीचा तिरस्कार करणारा स्नेप, हॅरीप्रमाणेच आपल्यालाही पहिल्यापासून आवडत नाही. पण स्नेप ‘हॅरी पॉटर’मधली महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे. सुरुवातीला जरी त्याचा राग आला, तरी नंतर मात्र हा स्नेपच पदोपदी हॅरीची मदत करतो. अॅलन रिकमन हे सिनेमे सोडून देणार होता. पण रोलिंगनं त्याला स्नेपचं महत्त्व सांगितलं आणि रिकमननं आपला विचार बदलला. रिकमन यांना जाऊन पाच वर्षं झाली पण आजही त्यांची स्नेप ही भूमिका तितकीच प्रिय आहे. 

हेलेना बोहम कार्टरनं कळकट दातांची, विचकट हसणारी, क्रूर बेलाट्रिक्स फार सुंदर रंगवली आहे. हेलेना 'डेथली हॉलोज'च्या शूटिंगच्यावेळी ‘द किंग्ज् स्पीच’चं शूटिंगही करत होती. ‘द किंग्ज् स्पीच’मध्ये हेलेनानं क्वीन एलिझाबेथची भूमिका केली आहे... क्वीन एलिझाबेथचा थाट बेलाट्रिक्सच्या अगदी विरुद्ध. तिनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं, ‘मी आठवडाभर ‘हॅरी पॉटर’ करायचे आणि वीकएंडला ‘द किंग्ज् स्पीच’. माझा लहान मुलगा म्हणायचा, आई तुला उद्या विच व्हायचं आहे की क्वीन?’ या दोन्ही विरुद्ध भूमिकांना तिनं उत्तम न्याय दिलेला आहे.

नव्वदीच्या दशकात जन्माला आलेली पिढी ‘हॅरी पॉटर’ आणि त्याच्या मित्रांबरोबर मोठी झाली आहे आणि आज तिशीत असणारी ही मंडळी स्वतःला अभिमानानं 'पॉटरहेड' म्हणवून घेतात. रोलिंगनं एका मुलाखतीत सांगितलं होतं की तिच्या स्वभावातील एकेका गुणधर्मांवरून हॅरी, रॉन आणि हर्मायनीच्या व्यक्तिरेखा तिनं रंगवत नेल्या. आजही ‘हॅरी पॉटर’ची लोकप्रियता एवढी अफाट का, या प्रश्नाचं उत्तर देताना ती म्हणते, ‘लोक या व्यक्तिरेखांच्या प्रेमात पडले, त्या लपलेल्या - आपल्यापेक्षा वेगळ्या, अद्‍भुत जगाबद्दल त्यांना कुतूहल वाटतं.’ खरंच आहे!

संबंधित बातम्या