वाहन कर्जाचा योग्य पर्याय...

जयंत मराठे 
बुधवार, 21 मार्च 2018

कुठल्याही कर्जासाठी ग्राहकाचे सिबिल रेकॉर्ड अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. सिबिल रेकॉर्डनुसार तुम्ही जर धोकादायक गटात असाल, तर तुम्हाला कर्ज देणे वित्तसंस्थांसाठी जोखमीचे ठरते. त्यामुळे यापुढील काळात प्रत्येकाने सिबिल रेकॉर्ड उत्तम ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कुठल्याही कर्जासाठी ग्राहकाचे सिबिल रेकॉर्ड अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. सिबिल रेकॉर्डनुसार तुम्ही जर धोकादायक गटात असाल, तर तुम्हाला कर्ज देणे वित्तसंस्थांसाठी जोखमीचे ठरते. त्यामुळे यापुढील काळात प्रत्येकाने सिबिल रेकॉर्ड उत्तम ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे.

वाहन उद्योगात सर्वाधिक चर्चा आणि या उद्योगाला चालना देणारी बाब म्हणजे वाहन कर्ज. मोटारींचा तसेच दुचाकींचा खप कर्जावर खूप मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतो. ज्याप्रमाणे ऑडी, मर्सिडीज या महागड्या गाड्या थेट स्वतःच्या पैशाने खरेदी करणारे श्रीमंत लोक भारतात आहेत, तसेच मारुती-८०० या हॅचबॅक गटातील छोट्या गाडीसाठी कर्ज घेणाऱ्या लोकांचीही संख्या मोठी आहे. मोटार आणि दुचाकीसाठी मिळणाऱ्या कर्जामुळे निदान भारतात तरी या उद्योगाला मोठी चालना मिळाली आहे.

मोटारीसाठी किंवा दुचाकीसाठी देशात कर्ज उपलब्ध करणाऱ्या विविध संस्था आहेत. यामध्ये राष्ट्रीयकृत बॅंका, सहकारी बॅंका तसेच खासगी वित्तसंस्था आणि पतसंस्था व खासगी बॅंका यांचा समावेश होतो. आर्थिक उदारीकरणानंतर देशामध्ये ज्या पद्धतीने मोटार आणि दुचाकींचे उत्पादन प्रचंड प्रमाणात होऊ लागले. त्याप्रमाणात तयार केलेल्या या गाड्या घेतल्या जाव्या म्हणून कंपन्यांचे प्रयत्न सुरू झाले त्याला अनेक वित्तसंस्थांनी, बॅंकांनी या क्षेत्रात कर्जवाटप करून मोठा हातभार लावला. 

वाहन उद्योगात कर्जाचे दोन मुख्य प्रकार पडतात. यामध्ये कर्ज घेऊन व्यवसाय करणाऱ्या लोकांचा गट वेगळा आणि वैयक्तिक वापरासाठी वाहन घेणाऱ्यांचा प्रकार वेगळा. ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय करणारे लोक आपल्या मालमोटारीसाठी किंवा व्यवसायासाठी वापरल्या जाणाऱ्या मोटारीसाठी वित्तसंस्थांचे कर्ज घेतात, त्याला कमर्शिअल लोन म्हणले जाते. या प्रकारच्या गाड्यांसाठी कर्जाच्या अटी वेगवेगळ्या असतात, कारण याची गरज आणि त्या वाहनाचा वापर वेगळ्या पद्धतीने होत असतो. या प्रकारचे कर्ज देण्याचे निकष व त्याच्या वाटपाचे प्रमाण वेगळे असते. 

वैयक्तिक वापरासाठी कर्ज घेणाऱ्या ग्राहकाचा गट वेगळा काढला जातो. वैयक्तिक वापरासाठी दुचाकी किंवा मोटारीसाठी जे कर्ज घेतले जाते, त्याचा व्याजदर तुलनेने कमी असतो. दुचाकीसाठी सध्या ९ टक्‍क्‍यांपासून १४ टक्‍क्‍यांपर्यंत व्याजाचे दर आकारले जातात. यामध्ये चार चाकी वाहनासाठी म्हणजेच मोटारीसाठी दिले जाणारे कर्ज यापेक्षाही कमी दरामध्ये काही वेळा दिले जाते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे १० दुचाकीसाठी दिली जाणारी कर्जाची रक्कम एका मोटार कर्जाइतकी असते. त्यामुळे कर्ज देणाऱ्या संस्थेला कमीत कमी माणसांमध्ये जास्तीत जास्त उलाढाल करता येते. त्याचा व्यापही कमी असतो. त्यामुळे विविध संस्थांकडून दुचाकींच्या कर्जांपेक्षा मोटारींच्या कर्जाला प्राधान्य दिले जाते.  

दुचाकीसाठी दिल्या जाणाऱ्या कर्जामध्ये महत्त्वाचे दोन प्रकार असतात. हायपोथिकेशन आणि हायर पर्चेस अशा स्वरूपात ही कर्जे वितरित केली जातात. हायपोथिकेशन म्हणजे नजरगहाण कर्ज तर हायर पर्चेस म्हणजे कर्ज देणारी संस्था त्या वाहनाची मालक असते. कर्ज फिटेपर्यत केवळ तुम्ही ते वाहन वापरत असता, त्यावर तुमची मालकी नसते. 

आयसीआयसीआय किंवा एचडीएफसी यासारख्या खासगी क्षेत्रातील बॅंका तसेच श्रीराम फायनान्स किंवा सुंदरम फायनान्स यासारख्या वित्तसंस्था ग्राहकांना मोटारींसाठी किंवा दुचाकीसाठी जे कर्ज देतात, ते कर्ज बहुतांशवेळा हायर पर्चेस स्वरूपाचे असते. त्यामुळे यामध्ये कर्ज घेणाऱ्या ग्राहकाचे ३ हप्ते जरी थकले, तरी या संस्था तातडीने कर्जदाराकडून ते वाहन परत घेतात आणि लगेच विकून टाकून आपली कर्जाची रक्कम वसूल करतात. अशा स्वरूपाच्या कारवाईमध्ये कर्जधारकाला त्या संस्थेने आपली गाडी का विकली, याबद्दल कसलाही जाब विचारणे अवघड जाते तसेच कुठेही दाद मागणे अडचणीचे ठरते. तीन हप्ते थकणे म्हणजे वाहन गमावणे इतका याचा सोपा साधा अर्थ असतो. या स्वरूपाच्या कर्जावर वाहन धारकांच्या दोन किल्ल्यांपैकी एक किल्ली कर्ज देणाऱ्या संस्थेकडे असते. तर दुसरी किल्ली कर्जदाराकडे असते. या संस्था अत्यंत कमीत कमी कागदपत्रांमध्ये आणि कमीत कमी वेळेमध्ये ग्राहकाला कर्ज वितरण करतात, त्यामुळे ग्राहकाला या संस्थांकडून कर्ज घेणे सोयीचे वाटते.

राष्ट्रीयकृत बॅंका किंवा सहकारी बॅंका यांच्याकडून वाहन कर्ज देताना कर्जदाराची आर्थिक कुवत बघितली जाते. त्यासंबंधीच्या आवश्‍यक त्या कागदपत्रांची तपासणी केली जाते. त्याचबरोबर दोन जामीनदार घेतले जातात. हे कर्ज हायपोथिकेशन म्हणजे नजरगहाण स्वरूपाचे असते, यामध्ये वाहनाचा ताबा कर्जदाराकडे असतो. गहाण तत्त्वावरती हे कर्ज दिलेले असते, त्यामुळे राष्ट्रीयकृत बॅंका किंवा सहकारी बॅंका या कर्जाचे हप्ते तीन महिन्यापेक्षा जास्त थकले, तरी लगेच वाहन जप्तीची कारवाई सहसा करीत नाहीत. कर्जदाराला थोडीफार मुदत देतात. या दोन कर्जामध्ये हा महत्त्वाचा फरक असतो.

गेल्या काही वर्षांमध्ये कुठल्याही कर्जांसाठी ग्राहकाचा सिबील रेकॉर्ड अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कुठल्याही नागरिकाने कुठल्याही संस्थेकडून बॅंक अथवा वित्तसंस्था यांच्याकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी केली आहे, त्याने त्या कर्जाचे हप्ते थकविले आहेत, किंवा मागेपुढे केले आहेत, किंवा कर्ज बुडविले आहे, किंवा तो दिवाळखोर निघाला आहे काय, याची नोंद ठेवली जाते. या नोंदीवरून ग्राहकांच्या पतमापमानाचा दर्जा ठरवला जातो. त्याला सिबिल रेकॉर्ड म्हटले जाते. सिबिल रेकॉर्डनुसार तुम्ही जर धोकादायक गटात असाल, तुम्हाला कर्ज देणे वित्तसंस्थेच्या दृष्टीने जास्त जोखीम ठरणारे असे ठरत असेल तर तुम्हाला कर्ज मिळणे अवघड होते. किंबहुना अशा गटातील नागरिकांना कर्ज मिळतच नाही. त्यामुळे आपले सिबिल रेकॉर्ड खराब होणार नाही, याची काळजी घेणे अत्यंत आवश्‍यक असते. 

वाहन कर्जासाठी कर्ज देताना त्या वाहनाची किंमत लक्षात घेऊन कर्ज घेणाऱ्या ग्राहकाची आर्थिक क्षमता बघून प्रसंगी कर्ज देणाऱ्या संस्थेकडून १०० टक्‍क्‍यांपर्यंत कर्ज दिले जाते. काही वेळा वाहनाच्या किमतीच्या १० टक्के ते २५ टक्‍क्‍यांपर्यंतची रक्कम मार्जिन मनी म्हणून घेतली जाते आणि उरलेली रक्कम कर्ज स्वरूपात दिली जाते. कर्ज किती कालावधीसाठी दिले जाते, यावर कर्जाचा व्याजदर ठरवला जातो. तीन वर्षांसाठी जर कर्ज घेतले, तर त्यासाठी कर्जाचा व्याजदर तुलनेने कमी असतो, मात्र हेच जर कर्ज तीन वर्षांपेक्षा जास्त म्हणजे ७ वर्षांपर्यंत घेतले गेले, तर कर्जाचा व्याजदर जास्त असतो. व्याजामध्ये जास्त रक्कम भरावी लागू नये, अशी जर इच्छा असेल, तर कर्जाची मुदत कमी आणि राष्ट्रीयकृत किंवा सहकारी बॅंकांकडून कर्ज घेणे फायदेशीर ठरू शकते. 

सिबिल रेकॉर्ड उत्तम ठेवण्यासाठी आणि पुढचा मनस्ताप टाळण्यासाठी आपल्या बॅंक खात्यावर किमान तीन महिन्याच्या हप्त्याची रक्कम शिल्लक ठेवणे अत्यंत शहाणपणाचे ठरते. ही रक्कम ४५ दिवस ते ९० दिवसांच्या अत्यंत छोट्या कालावधीच्या मुदत ठेवींमध्ये गुंतवून आपले नुकसानही टळून थोडेफार व्याजही मिळविता येणे शक्‍य होते. 

यापुढील काळात सिबिल रेकॉर्ड हा वाहन कर्ज मिळण्यासाठी अत्यंत परवलीचा शब्द ठरणार आहे, हे प्रत्येक कर्ज घेणाऱ्या इच्छुकाने कटाक्षाने लक्षात ठेवले पाहिजे.

कर्जाची मुदत संपल्यानंतर आर. टी. ओ. ऑफिसमध्ये जाऊन आपल्या वाहन कर्जाच्या कागदपत्रांमध्ये वित्तसंस्थेच्या मालकीची नोंद आठवणीने काढून टाकणे, ही देखील कर्जधारकाचीच जबाबदारी असते, हे कधीही विसरायचे नसते.

थोडक्‍यात, कर्ज घेणाऱ्या ग्राहकाने कमीतकमी त्रासाचे व कमीतकमी व्याज द्यावे लागेल, असे कर्ज निवडावे हेच योग्य. वाहन उद्योगाच्या दृष्टीने मात्र वित्तसंस्था, बॅंका यांच्याकडून मिळणाऱ्या कर्जामधून या उद्योगाला एक प्रकारे ऑक्‍सिजनच मिळत असतो. त्यामुळे हल्ली वाहन कंपन्याच अशा स्वरूपाच्या वित्तीय संस्थांची उभारणी करून आपली वाहने खपविण्याचा प्रयत्न करीत असतात. त्याचबरोबर सध्या बाजारात असलेल्या वित्तसंस्थांकडून देशभरातील वाहन उद्योगातील वितरकांना नवेनवे कर्जदार मिळवून दिल्यावर हल्ली कमिशनही देण्याचे प्रमाण काही ठिकाणी सुरू झाले आहे.  वित्तसंस्थांच्या दृष्टीने हे कर्ज सुरक्षित असल्याने या कंपन्या कर्जवाटप जास्त व्हावे, या उद्देशाने वितरकांना सवलतींची वेगवेगळी पॅकेजेस किंवा बक्षीस योजना राबवत असतात. दोघांच्या दृष्टीने हा फायद्याचा मामला असतो. 

संबंधित बातम्या