महिला वर्ल्ड कपचा थरार...

जयेंद्र लोंढे, मुंबई
सोमवार, 7 मार्च 2022

कव्हर स्टोरी

महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट विश्वकरंडकाचा थरार आता न्यूझीलंडमध्ये रंगू लागला आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये भारतासह जगभरातील आठ संघांमध्ये जेतेपदासाठी झुंज पाहायला मिळेल. ख्राईस्टचर्चमधील हॅगली ओव्हल येथे ३ एप्रिलला अजिंक्यपदाचा फैसला होईल. या पार्श्वभूमीवर या स्पर्धेच्या इतिहासासह वर्तमानावर टाकलेला प्रकाशझोत.

सन १९७३पासून महिलांच्या क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेला सुरुवात झाली. पण त्यानंतर दोन विश्वकरंडक स्पर्धांमधील अंतर नेहमीच बदलत राहिले. कधी तीन, कधी चार, कधी पाच, तर कधी सहा वर्षांनंतर ही स्पर्धा खेळवण्यात आली. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये कसोटीला पहिल्यापासूनच प्राधान्य दिले जात असे. पुरुषांच्या एकदिवसीय विश्वकरंडकाला १९७५पासून प्रारंभ झाला. पहिल्या दोन विश्वकरंडक स्पर्धांत वेस्ट इंडीजने बाजी मारली. भारतीय संघाने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली १९८३मध्ये पहिल्यांदाच विश्वकरंडक पटकावला आणि भारतामध्ये क्रिकेटची लाट आली. एकदिवसीय क्रिकेट जगभरातही फोफावू लागले. अमाप पैसा येऊ लागला. भारतातील क्रिकेटवेड्या जनतेमुळे ‘आयसीसी’ या जागतिक संघटनेलाही ‘बीसीसीआय’समोर नतमस्तक व्हावे लागले. आजही जागतिक क्रिकेटमध्ये भारताचीच मक्तेदारी प्रकर्षाने दिसून येत आहे.

एकीकडे पुरुषांचे क्रिकेट नवनवी शिखरे पादाक्रांत करीत असतानाच महिला क्रिकेट मात्र जमिनीवरून उठलेच नाही. महिला क्रिकेटमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धा नावालाच घेतल्या जात होत्या. महिला विश्वकरंडक स्पर्धेतील देशांची संख्याही कमीच असायची. पुरुषांच्या क्रिकेटप्रमाणे महिलांच्या क्रिकेटला प्राधान्य मिळावे, यासाठी ‘बीसीसीआय’सह ‘आयसीसी’कडून पुढाकार घेण्यात आला. गेल्या काही वर्षांमध्ये आता महिला क्रिकेटचेही चित्र बदलू लागले आहे. ऑस्ट्रेलिया व इंग्लंड या दोन देशांमधील टी-२० लीगला उदंड प्रतिसाद मिळू लागला आहे. भारतामध्येही ‘आयपीएल’च्या धर्तीवर महिलांची टी-२० लीग खेळवण्याचा विचार सुरू आहे. सध्या छोट्या प्रमाणात ही स्पर्धा भारतात खेळवण्यात येत आहे.

सन २०१७मध्ये इंग्लंडमध्ये महिलांची एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा खेळवण्यात आली होती. यजमान इंग्लंडने या स्पर्धेच्या जेतेपदावर हक्क सांगितला. त्यानंतर २०२१मध्ये पुढील स्पर्धा खेळवण्यात येणार होती. पण कोरोनामुळे आता ही स्पर्धा २०२२मध्ये खेळवण्यात येणार आहे. दोन विश्वकरंडकातील अंतर पाच वर्षे आहे. यामधील दोन वर्षे कोरोनामुळे वाया गेली. पण आता कोरोना साथीचा वेग मंदावत चालला आहे. क्रीडाविश्वही पूर्वपदावर येऊ पाहत आहे. महिला क्रिकेटमध्येही बदल घडू लागले आहेत. जगभरातील महिला टी-२० लीगला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या खेळाकडे करिअर म्हणून पाहणाऱ्‍या मुलींच्या संख्येत वाढ होत आहे. कानाकोपऱ्‍यांमधून मुली पुढे येत आहेत. आगामी वर्षांमध्ये विश्वकरंडकातील देशांची संख्याही वाढणार आहे. ‘आयसीसी’कडून यासाठी पाऊल उचलले जाईल.

भारत, ऑस्ट्रेलिया व इंग्लंड या तीन देशांमध्ये महिला क्रिकेटचा स्तर उंचावू लागला आहे. भारतामध्ये तर पुरुषांप्रमाणे महिला क्रिकेटपटूंनाही श्रेणीवार पद्धतीने करारबद्ध करून मानधन देण्यात येत आहे. खेळाडूंना नोकऱ्‍याही मिळू लागल्या आहेत. पण फक्त या तीन देशांमध्येच महिला क्रिकेटचा विकास होऊन हा खेळ जागतिकदृष्ट्या संपन्न होणार नाही. जगातील इतर देशांमध्येही महिला क्रिकेटचा प्रचार व प्रसार व्हायला हवा. महिलांच्या आंतरराष्ट्रीय लढतींचे प्रक्षेपण वाहिन्यांवर व्हायला हवे. जेणेकरून आत्ताची पिढी हे सामने पाहून या खेळाकडे आकर्षित होईल. महिला क्रिकेटच्या उत्तुंग भरारीसाठी खेळाचे मार्केटिंग करणे, प्रायोजक मिळवणे हाही महत्त्वाचा भाग आहे. ‘बीसीसीआय’ व ‘आयसीसी’ या दोन्ही संघटना याकडे लक्ष देत असतील अशी आशा आहे. 

महिला क्रिकेट विश्वकरंडकाच्या इतिहासावर नजर टाकूयात... महिला क्रिकेट विश्‍वकरंडकाला १९७३पासून सुरुवात झाली. इंग्लंडमधील व्यावसायिक जॅक हायवर्ड व महिला क्रिकेटपटू रचेल हेहोई यांच्या पुढाकाराने या स्पर्धेचा श्रीगणेशा झाला. तेव्हापासून आत्तापर्यंत ११ विश्‍वकरंडक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. न्यूझीलंडमध्ये आता खेळवण्यात येणारी जागतिक स्पर्धा बारावी आहे. १९७३मध्ये पार पडलेल्या पहिल्यावहिल्या विश्‍वकरंडक स्पर्धेत सात देशांचा सहभाग होता. क्रिकेटची पंढरी इंग्लंडमध्ये ही स्पर्धा खेळवण्यात आली. या स्पर्धेमध्ये इंग्लंडचे दोन संघ सहभागी झाले. इंग्लंड या मुख्य संघाबरोबर ‘यंग इंग्लंड’ या नावाने आणखी एक संघ यामध्ये उतरला. त्या काळात प्रत्येकी ६० षटकांचा सामना होत असे. तसेच पहिल्या दोन विश्‍वकरंडक स्पर्धांत सर्वाधिक गुणांच्या आधारावर विजेता ठरवला गेला. इंग्लंडने २० गुणांसह पहिल्यावहिल्या स्पर्धेच्या जेतेपदावर मोहोर उमटवली. दुसऱ्या क्रमांकावरील ऑस्ट्रेलियाने १७ गुणांची कमाई केली.

भारतामध्ये १९७८मध्ये महिलांची दुसरी विश्‍वकरंडक स्पर्धा खेळवण्यात आली. या स्पर्धेमध्ये फक्त चार देशांचा सहभाग होता. यजमान भारतासह इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशांमध्ये जेतेपदासाठी चढाओढ पाहायला मिळाली. ऑस्ट्रेलियाने तीन विजयांसह सहा गुणांनिशी या स्पर्धेत विजेता होण्याचा मान मिळवला. इंग्लंडने चार गुणांसह दुसरा व न्यूझीलंडने दोन गुणांसह तिसरा क्रमांक पटकावला. पहिल्यांदाच सहभागी झालेल्या भारतीय संघाला एकाही लढतीत विजय मिळवता आला नाही. त्यामुळे यजमान संघाची गुणांची पाटी कोरीच राहिली. हैदराबादमधील लाल बहादूर शास्त्री स्टेडियममधील अखेरच्या लढतीनंतर या स्पर्धेचा विजेता ठरला हे विशेष.

सन १९८२मध्ये न्यूझीलंडमध्ये विश्‍वकरंडक स्पर्धेचा खेळ रंगला. या स्पर्धेमध्ये पाच देशांचा सहभाग होता. १९७८मध्ये सहभागी झालेले चार देश, तसेच एक आंतरराष्ट्रीय इलेव्हनचा संघ असे पाच देश जेतेपदासाठी आमनेसामने उभे ठाकले. यावेळी सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या देशाला विजयी घोषित करण्यात आले नाही. साखळी फेरीच्या लढतींमध्ये प्रत्येक देशाच्या प्रत्येक देशाविरुद्ध तीन लढती झाल्या. त्यानंतर सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या दोन देशांमध्ये अजिंक्यपदाची लढाई पार पडली. अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला हरवले व दुसऱ्यांदा विश्‍वकरंडक जिंकण्याची करामत करून दाखवली.

१९८८मध्ये झालेली विश्‍वकरंडक स्पर्धा ऑस्ट्रेलियासाठी मोठा आनंद देणारा ठरली. मायदेशात रंगलेल्या या स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलियाने मेलबर्नमधील ऐतिहासिक स्टेडियममध्ये इंग्लंडला धूळ चारली व सलग तिसऱ्यांदा मानाची स्पर्धा जिंकली. भारताचा या स्पर्धेमध्ये सहभाग नव्हता. आयर्लंड व नेदरलँड या दोन देशांनी पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये खेळण्याचा अनुभव घेतला.

सन १९९३मध्ये इंग्लंडमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. पहिल्यांदाच आठ देश या स्पर्धेत सहभागी झाले. वेस्ट इंडीज व डेन्मार्क या देशांचे या स्पर्धेत पदार्पण झाले. ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्यांदाच अंतिम दोन संघांत स्थान मिळवू शकला नाही. यजमान इंग्लंडच्या संघाने जेतेपदाच्या लढतीत न्यूझीलंडला हरवले व दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले.

सन १९९७मध्ये भारतामध्ये महिलांची विश्‍वकरंडक स्पर्धा खेळवण्यात आली आणि पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये ११ देशांनी भाग घेतला. पाकिस्तान, श्रीलंका व दक्षिण आफ्रिका हे देशही सहभागी झाले. ११ संघांची दोन गटांत विभागणी करण्यात आली. त्यानंतर दोन्ही गटांतील प्रत्येकी चार देश उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरले. भारतीय संघ पहिल्यांदाच उपांत्य फेरीत पोहोचला. पण ऑस्ट्रेलियाकडून भारताला हार सहन करावी लागली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला हरवत चौथ्यांदा विश्‍वकरंडकाच्या अजिंक्यपदावर नाव कोरले.

सन २०००मध्ये न्यूझीलंडमध्ये ही स्पर्धा खेळवण्यात आली. आठ देश या स्पर्धेत सहभागी झाले. भारतीय संघ पुन्हा एकदा उपांत्य फेरीत पोहोचला खरा, पण यजमान न्यूझीलंडकडून पराभूत होताना भारताला निराशेचा सामना करावा लागला. न्यूझीलंडने अंतिम फेरीच्या लढतीत बलाढ्य ऑस्ट्रेलियावर ४ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला व पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला.

सन २००५मध्ये पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेत ही स्पर्धा खेळवण्यात आली. आठ देश सहभागी झाले होते. त्यावर्षी भारतीय संघाने पहिल्यांदाच या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. पण ऑस्ट्रेलियाचे आव्हान परतवून लावण्यात भारतीय संघ अपयशी ठरला. अखेर उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. कांगारूंनी पाचव्यांदा ही स्पर्धा जिंकली.

सन २००९मध्ये इंग्लंडने, २०१३मध्ये ऑस्ट्रेलियाने व २०१७मध्ये पुन्हा इंग्लंडने ही स्पर्धा जिंकली. आत्तापर्यंतच्या विश्‍वकरंडक जेतेपदावर नजर टाकल्यास ऑस्ट्रेलिया व इंग्लंड या देशांचीच मक्तेदारी प्रकर्षाने दिसून येते. ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक सहा वेळा ही स्पर्धा जिंकली आहे, तर इंग्लंडने चार वेळा या स्पर्धेमध्ये बाजी मारली आहे. न्यूझीलंडने या स्पर्धेत अजिंक्यपदाचा मान एकदा मिळवला आहे. इतर कुठल्याही देशाला ही स्पर्धा जिंकता आलेली नाही. न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या या स्पर्धेमध्ये नवा चॅम्पियन मिळतो का हे पाहणे रंजक ठरेल.

यंदाच्या विश्वकरंडकातील सहभागी संघ 
न्यूझीलंड (यजमान) ः यंदाचा विश्वकरंडक न्यूझीलंडमध्ये खेळवण्यात येत आहे. याआधी १९८२ व २०००मध्ये न्यूझीलंडमध्ये विश्वकरंडकाचे आयोजन करण्यात आले होते. २०००मध्ये मायदेशात न्यूझीलंडने विश्वकरंडक जिंकला होता. आता तब्बल २२ वर्षांनंतर त्याची पुनरावृत्ती करण्यासाठी यंदाचा न्यूझीलंड संघ प्रयत्नांची शिकस्त करताना दिसेल.

    ऑस्ट्रेलिया ः महिला विश्वकरंडकातील सर्वात यशस्वी ठरलेला संघ म्हणून ऑस्ट्रेलियाकडे बघितले जाते. यंदाही या संघाकडे जेतेपदासाठी प्रबळ स्पर्धक म्हणून बघितले जात आहे. विश्वकरंडकातील ८४पैकी ७० लढतींमध्ये या संघाने विजय मिळवला आहे. या आकडेवारीवरून ऑस्ट्रेलियाचे घवघवीत यश अधोरेखित होते.

    इंग्लंड ः इंग्लंडने आतापर्यंत तीन वेळा या स्पर्धेचे यजमानपद भूषवले आहे. महत्त्वाचे म्हणजे तिन्ही वेळा ही स्पर्धा जिंकण्याची करामत या संघाने करून दाखवली आहे. तसेच २००९मधील ऑस्ट्रेलियात पार पडलेली स्पर्धाही इंग्लंडने जिंकून दाखवली आहे. या संघाचीही विश्वकरंडकातील कामगिरी वाखाणण्याजोगी आहे.

    दक्षिण आफ्रिका ः दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाला महिला विश्वकरंडकात अद्याप मोठी कामगिरी करता आलेली नाही. या संघाने २००० व २०१७मधील विश्वकरंडकात अंतिम चारमध्ये प्रवेश केला आहे. याव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेला ठसा उमटवता आलेला नाही.

    भारत ः भारतीय संघाने दोन वेळा अंतिम फेरी गाठली आहे. पण दोन्ही वेळा या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. मिताली राज व झुलन गोस्वामी या दोन अनुभवी व दिग्गज महिलांचा हा अखेरचा विश्वकरंडक आहे. त्यामुळे शेवट गोड करण्यासाठी दोघीही सर्वस्व पणाला लावतील यात शंका नाही.

पाकिस्तान ः पाकिस्तानी महिला क्रिकेट संघाची या स्पर्धेतील कामगिरी सुमारच ठरली आहे. २००९मधील विश्वकरंडक स्पर्धेत या संघाने पहिल्या फेरीचा अडथळा ओलांडत सुपरसिक्स फेरी गाठली होती. त्या वर्षी हा संघ पाचव्या स्थानावर राहिला होता. त्या व्यतिरिक्त या संघाला म्हणावा तसा ठसा उमटवता आलेला नाही.

    वेस्ट इंडीज ः वेस्ट इंडीजच्या महिला क्रिकेट संघाला विश्वकरंडकात आपले वर्चस्व गाजवता आलेले नाही. २०१३मध्ये भारतात विश्वकरंडकाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईत पार पडलेल्या अंतिम फेरीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडीजला हरवून जेता होण्याचा मान मिळवला, त्यामुळे वेस्ट इंडीजला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. ही त्यांची विश्वकरंडकातील सर्वोत्तम कामगिरी ठरली होती.

    बांगलादेश ः बांगलादेशचा महिला क्रिकेट संघ पहिल्यांदाच विश्वकरंडक स्पर्धेत खेळणार आहे. पण कर्णधार निगार सुल्ताना व रुमाना अहमद या दोन महिला क्रिकेटपटूंनी स्पर्धेआधीच दमदार कामगिरी करीत आपली ओळख निर्माण केली आहे.

या खेळाडूंवर असणार नजरा
भारत ः भारतीय संघाची कर्णधार मिताली राज व गोलंदाज झुलन गोस्वामी यांचा हा अखेरचा विश्वकरंडक आहे. त्यामुळे त्यांना ही स्पर्धा संस्मरणीय करायची असेलच. या दोघींकडून मोठ्या अपेक्षा बाळगल्या जात आहेत. या दोघींसह स्मृती मानधना, हरमनप्रीत सिंग, दीप्ती शर्मा, शफाली वर्मा, स्नेह राणा, रिचा घोष यांच्या खेळावरही तमाम क्रिकेटप्रेमींच्या नजरा खिळलेल्या असतील.
    ऑस्ट्रेलिया ः यंदाचा विश्वकरंडकातील सर्वात तगडा संघ. या संघामध्ये एकापेक्षा एक अशा सरस खेळाडू आहेत. कर्णधार मेग लॅनींग, उपकर्णधार रचेल हेन्स, अ‍ॅश्ले गार्डनर, एलीसा हिली, बेथ मुनी, एलीसा पेरी, तेहलीया मॅग्रा या सर्व खेळाडूंमध्ये विश्वकरंडक गाजवण्याची क्षमता आहे.

    इंग्लंड ः इंग्लंडचा संघ जेतेपद राखण्यासाठी जिवाचे रान 
करताना दिसेल. या संघातही अव्वल दर्जाच्या खेळाडूंची कमी नाही. कर्णधार हेदर नाईट, टॅमी बोमोंट, कॅथरीन ब्रंट, नॅट सीवर, आन्या श्रबसोल, सोफी एक्सेलस्टोन या खेळाडूंना जेतेपद राखण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे.

भारत, ऑस्ट्रेलिया व इंग्लंड या तीन देशांव्यतिरिक्त अन्य देशांतील काही खेळाडूही एकहाती सामना फिरवण्याची क्षमता बाळगतात. न्यूझीलंड संघात सोफी डिव्हाईन, अ‍ॅमी सॅटर्थवेट, सुझी बेट्स, मॅडी ग्रीनया खेळाडू फॉर्ममध्ये आहेत. बांगलादेशला निगार सुल्ताना, रुमाना अहमद या खेळाडूंकडून अपेक्षा आहेत. दक्षिण आफ्रिका संघात मेरीजेन कॅप व लिझे ली या दोन खेळाडूंकडून आशा आहेत. वेस्ट इंडीजच्या संघात स्टेफनी टेलर व डिएंड्रा डॉटीन या खेळाडूंमध्ये प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवण्याची ताकद आहे. 

यंदाच्या स्पर्धेतील साखळी सामन्यांतील प्रमुख लढती

 •     ५ मार्च - ऑस्ट्रेलिया - इंग्लंड
 •     ६ मार्च - भारत - पाकिस्तान
 •     ८ मार्च - ऑस्ट्रेलिया - पाकिस्तान
 •     १० मार्च - न्यूझीलंड - भारत
 •     १२ मार्च - भारत - वेस्ट इंडीज
 •     १३ मार्च - न्यूझीलंड - ऑस्ट्रेलिया
 •     १६ मार्च - भारत - इंग्लंड
 •     १९ मार्च - भारत - ऑस्ट्रेलिया
 •     २२ मार्च - भारत - बांगलादेश
 •     २७ मार्च - भारत - दक्षिण आफ्रिका

स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू

 •     १९८८ - कॅरोल होजेस, इंग्लंड (३३६ धावा व १२ बळी)
 •     २००० - लिसा केटली, ऑस्ट्रेलिया (३७५ धावा)
 •     २००५ - केरन रोल्टन, ऑस्ट्रेलिया (२४६ धावा)
 •     २००९ - क्लेअर टेलर, इंग्लंड (३२४ धावा)
 •     २०१३ - सुझी बेट्स, न्यूझीलंड (४०७ धावा)
 •     २०१७ - टॅमी बोमोंट, इंग्लंड (४१० धावा)

अंतिम सामन्यांतील सर्वोत्तम खेळाडू

 •     १९९३ - जो चेम्बरलेन, इंग्लंड (३८ धावा, १/३८)
 •     १९९७ - डेबी हॉकली, न्यूझीलंड (७९ धावा)
 •     २००० - बेलिंडा क्लार्क, ऑस्ट्रेलिया (९१ धावा)
 •     २००५ - केरन रोल्टन, ऑस्ट्रेलिया (नाबाद १०७ धावा)
 •     २००९ - निकी शॉ, इंग्लंड (४/३४)
 •     २०१३ - जेस कॅमरून, ऑस्ट्रेलिया (७५ धावा)
 •     २०१७ - आन्या श्रबसोल, इंग्लंड (६/४६)

महिला विश्वकरंडकातील विक्रम

 •     सर्वाधिक धावा - डेबी हॉकली, न्यूझीलंड (१५०१ धावा)
 •     एका डावात सर्वाधिक धावा - बेलिंडा क्लार्क, ऑस्ट्रेलिया (नाबाद २२९)
 •     सर्वाधिक बळी - लीन फुलस्टोन, ऑस्ट्रेलिया (३९ बळी)
 •     सर्वोत्तम यष्टीरक्षक - जेन स्मिट, इंग्लंड (४० झेल + यष्टीचित)
 •     सर्वाधिक झेल टिपणारी यष्टीरक्षक - जॅनेट ब्रिटीन, इंग्लंड (१९)

संबंधित बातम्या