आभासी चलनांचे मायाजाल

कौस्तुभ केळकर
सोमवार, 17 जानेवारी 2022

कव्हर स्टोरी

आजकाल क्रिप्टोकरन्सी म्हणजेच आभासी चलनांचा बोलबाला आहे. जिथेतिथे हा विषय ऐकायला मिळतो. पण यामध्ये अज्ञानातून केलेली गुंतवणूक घातक ठरू शकते, कारण बनावट आभासी चनलांद्वारे होणाऱ्या फसवणुकीच्या घटनाही वाढत आहेत. भारतामध्ये मॉरिस कॉइनद्वारे झालेल्या फसवणुकीच्या ताज्या घटनेच्या पार्श्वभूमीवर हे आभासी चलनांचे मायाजाल समजावून घेणे आवश्यक आहे.

आभासी चलन आणि त्यांचे व्यवहार 
आभासी चलन एक डिजिटल ॲसेट असून ते रुपया, डॉलर यांसारख्या चलनांप्रमाणे प्रत्यक्ष स्वरूपात नसते. आर्थिक व्यवहारांसाठी यांचा उपयोग करता येतो. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या आधारे हे व्यवहार केले जातात. या व्यवहारांवर बँका, तसेच आपल्या देशातील सेबीसारख्या नियामक यंत्रणांचे कोणतेही नियंत्रण नसते. आभासी चलनाद्वारे केलेले आर्थिक व्यवहार गोपनीय असतात आणि ते थेट दोन व्यक्तींमध्ये होत असल्याने, त्यांमध्ये बँका, दलाल यांचा समावेश नसतो. हे पाहता या चलनाच्या व्यवहारांसाठी कोणत्या बँकेशी संलग्न राहण्याची आवश्यकता नाही. विकेंद्रित व्यवस्था असल्याने या आभासी चलनावर कोणत्या एका संस्थेची, देशाची किंवा कंपनीची मक्तेदारी नाही. काही देशांतील हॉटेल, दुकाने, कंपन्या व्यवहारात आभासी चलन स्वीकारतात. या व्यापक होत जाणाऱ्या मान्यतेमुळे आभासी चलनाचे मूल्यही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आभासी चलनांची एक्सचेंज अस्तित्वात आली आहेत. परिणामी यातील व्यवहार तसेच गुंतवणूक वाढत आहे. आजही आभासी चलनाला काही ठरावीकच देशांची मान्यता आहे, सर्व देशांनी मान्यता दिलेली नाही. तरीही आभासी चलनांमध्ये अब्जावधी डॉलरची उलढाल होत आहे. 

एखादी नवीन कंपनी बाजारातून भांडवल उभारणीसाठी इनिशियल पब्लिक ऑफर - आयपीओद्वारे (प्राथमिक समभाग विक्री) शेअरची विक्री करते. त्याप्रमाणे आभासी चलनातला एखादा स्टार्टअप नवे आभासी चलन बाजारात आणण्यासाठी इनिशियल कॉइन ऑफर (आयसीओद्वारे) भांडवल उभारतो आणि गुंतवणूकदारांना नवे आभासी चलन दिले जाते. या उभारलेल्या पैशाचा वापर करून ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे हे नवे आभासी चलन बाजारात आणले जाते. या आयसीओमध्ये गुंतवणूक केल्यावर अनेकांना मोठा फायदा मिळाला आहे. परंतु यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने यामध्ये घोटाळे, फसवणुकीचे प्रकारही घडले आहेत. ‘मॉरीस कॉइन’ हे याचे आपल्या देशातील एक ढळढळीत उदाहरण. हे सर्व पाहता आभासी चलन हे दुधारी शस्त्र असून यावर वेळेतच अंकुश घालून नियंत्रण ठेवले नाही, तर जागतिक अर्थकारणात हाहाकार होऊ शकतो.

आभासी चलनांना मान्यता कोणाची? 
आभासी चलनांना मान्यता देण्याबाबत जगातील अनेक देश निश्चित भूमिका घेताना दिसत नाहीत. अमेरिकेमध्ये आभासी चलनांमध्ये व्यापार होतात, परंतु  अमेरिकेच्या सिक्युरिटी एक्सचेंज कमिशनने (एसइसी) याबाबत निश्चित भूमिका घेतलेली नाही. एल सॅल्वाडोर या देशाने ‘बिटकॉइन’ हे आभासी चलन देशाचे अधिकृत चलन म्हणून स्वीकारले आहे, तर बांगलादेशने यावर संपूर्ण बंदी घातली आहे. विविध देशांची आभासी चलनाबद्दलची भूमिका आणि वापर याबाबतची सध्याची स्थिती पाहू या. 

  • अमेरिका - अमेरिकेमध्ये आभासी चलनांना वापर आणि गुंतवणूक करण्यास परवानगी आहे. आभासी चलनांना ॲसेट मानले जाते आणि यांच्या गुंतवणुकीतून होणाऱ्या नफ्यावर भांडवली नफा कर आकाराला जातो. परंतु फेडरल रिझर्व्हने यांना चलन म्हणून स्वीकारलेले नाही.
  • युरोपीय महासंघ - येथे आभासी चलनांना वापर आणि गुंतवणूक करण्यास परवानगी आहे. परंतु यावर मोठे नियंत्रण आणण्याच्या दिशेने पावले पडत आहेत.  
  • चीन - या देशाने आभासी चलनांवर संपूर्ण बंदी घातली आहे. यामध्ये व्यवहार करणाऱ्यांवर खटले भरण्यात येतात. 

भारताची भूमिका 
आपल्या देशाच्या रिझर्व्ह बँकेला आभासी चलनांवर संपूर्णपणे बंदी हवी आहे. परंतु सरकारचे धोरण वेगळे दिसते. सरकारने संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आभासी चलन नियमनाविषयी ‘क्रिप्टो करन्सी ॲण्ड रेग्युलेशन ऑफ ऑफिशियल डिजिटल करन्सी बिल, २०२१’ हे विधेयक मांडण्याचे ठरवले होते, परंतु ते सादर झाले नाही आणि आता ते केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठवण्यात आले आहे. 

सरकार आणि रिझर्व्ह बँक यांच्या संयुक्त समितीच्या (मॉनेटरी पॉलिसी कमिटी) एका सदस्याने अलीकडे नमूद केले, की आपल्या देशात आभासी चलनांवर संपूर्ण बंदी घालणे शक्य नाही, परंतु आभासी चलनांना मान्यता देता येणार नाही. त्यापेक्षा नियंत्रण घालून त्यांचा गैरवापर होणार नाही यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आभासी चलनांवर नियमन अत्यावश्यक आहे, मात्र या चलनाचे व्यवहार विदेशी एक्सचेंजमधून होत असल्याने त्यावर प्रभावीपणे बंदी घालणे आव्हानात्मक ठरेल, असे मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी डिसेंबरमध्ये व्यक्त केले होते.

आभासी चलनांचे प्रकार  
जगामध्ये सुमारे आठ हजार प्रकारची आभासी चलने असून काही निवडक आभासी चलनांच्या आधारे व्यवहार होतात आणि त्यामध्ये गुंतवणूक केली जाते. पुढील तक्त्यामध्ये काही निवडक आभासी चलनांची माहिती, त्यांच्या किमती दिल्या आहेत.

याखेरीज ‘टेथेर’, ‘सोलुन’, ‘कार्डानो’, ‘एक्सारपी टेरा’, ‘पोल्कडोट’ अशी काही लोकप्रिय आणि मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणि व्यवहार होत असलेली आभासी चलने आहेत.

हॅकरचा भर आभासी चलनांच्या मागणीवर 
वर्ष २०१७मध्ये १५० देशामंधील अनेक कंपन्या, संस्था यांच्या कॉम्प्युटरवर व्हायरसचा हल्ला झाला होता आणि हा व्हायरस काढून टाकण्यासाठी हॅकरनी ‘बिटकॉइन’मध्ये खंडणी मागीतली होती. अगदी आठवड्याभरापूर्वी, म्हणजे ८ जानेवारी रोजी हॅकरनी पुण्यातील एका मोठ्या वित्तीय कंपनीला, ७५ लाख ९५ हजार डोजेकॉइन (११ कोटी ६३ लाख रुपये) द्या, नाहीतर आम्ही तुमचा सर्व डेटा हॅक करून अशी धमकी दिल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत कंपनीला २८ नोव्हेंबर २०२१ रोजी ई-मेल आली होती. इतर कोणत्याही डिजिटल मार्गाने (नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड) खंडणी घेतली, तरी याचा पुरावा राहतो आणि माग काढता येतो. परंतु, आभासी चलनांचे सर्व व्यवहार गोपनीय असल्याने, हॅकरची वैयक्तिक माहिती उघड होत नाही.

 हॅकरकडून याप्रकारे खंडणी मागण्याचे प्रकार अनेक वेळा 
घडले आहेत. तसेच आभासी चलनांचा वापर दहशतवाद, अमली पदार्थांचा व्यापार यामध्येसुद्धा केला जातो. नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने २०२०मध्ये  अमली पदार्थ विकत घेण्याच्या प्रकरणात आभासी चलनाचा वापर होत असल्याचे समोर आणले होते. हे पाहता जगातील सर्व देशांनी संयुक्त राष्ट्रसंघामध्ये, तसेच जी-७, जी-२० या राष्ट्रांच्या परिषदेमध्ये आभासी चलनांवर कसे नियंत्रण आणता येईल, यावर मतैक्य घडवून आणून ठोस पावले उचलणे अत्यावश्यक आहे.

 ‘मॉरिस कॉइन’चा गैरव्यवहार
या वर्षाच्या सुरुवातीला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ‘मॉरिस कॉइन’ या बनावट आभासी चलनाच्या आयसीओ (इनिशियल कॉइन ऑफर - प्राथमिक  कॉइन विक्री) प्रकरणात बंगळूर येथील लॉँग रीच टेक्नॉलॉजी, लॉँग रीच आणि मॉरिस ट्रेडिंग सोल्युशन्स या कंपन्यांवर आणि देशात ११ ठिकाणी छापे टाकले. ‘मॉरिस कॉइन’ या चलनाच्या आयसीओसाठी आणि याचे व्यवहार करण्यासाठी व्यवहार यंत्रणा नव्हती. गुंतवणूकदारांना ‘मॉरिस कॉइन’ देण्यात आले नाहीत. ही सर्व फसवाफसवी होती. या कंपन्यांच्या प्रवर्तकांनी केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यातील सुमारे ११ लाख गुंतवणूकदारांना सुमारे १ हजार २६५ कोटी रुपयांचा गंडा घातला असावा असा ईडी आणि पोलिसांचा अंदाज आहे. निषाद के. नामक व्यक्ती या सर्व कंपन्यांची मालक असून ही व्यक्ती सध्या परदेशात आहे. 

‘मॉरिस कॉइन’ हे बनावट आभासी चलन आहे. यामध्ये गुंतवणूकदारांनी किमान १५ हजार  रुपयांची गुंतवणूक केल्यास पुढील ३०० दिवस दररोज २७० रुपये दिले जातील आणि १ हजार रुपये किमतीची १५ ‘मॉरिस कॉइन’ दिली जातील असे आमिष दाखवण्यात आले. यामध्ये गुंतवणूकदारांच्या फसवणुकीचा आकडा तीन हजार कोटी रुपयांपर्यंत जाईल असा अंदाज आहे. कारण यामध्ये काळा पैसा गुंतवला असण्याच्या शक्यतेने तक्रार करण्यासाठी अनेक जण पुढे येत नसावेत. गुंतवणूकदार पुढे येत नाहीत याचे आणखी एक कारण म्हणजे यामध्ये गुंतवणूक करणे हे प्राईज चिट्स ॲण्ड मनी सर्क्युलेशन (बँनिंग) ॲक्ट १९७८ या कायद्यानुसार गुन्हा आहे. काही लोकांनी ४० लाख रुपयांपर्यंत रक्कम गुंतवली आहे. केरळमधील एका रेल्वे स्टेशनवरील चहा विक्रेत्याने आपल्या पत्नीच्या डायलिसिससाठी सतत होणाऱ्या खर्चाच्या तरुतुदीकरिता कर्ज घेऊन यामध्ये दोन लाख रुपये गुंतवले. आता ही सर्व रक्कम बुडाल्यात जमा आहे. अशा अनेक छोट्या गुंतवणूकदारांना फसवण्यात आले आहे. सुरुवातीला या कंपन्यांनी चेन मार्केटिंग (मल्टी लेव्हल मार्केटिंग) योजनांतून वर नमूद केल्याप्रमाणे गुंतवणूकदारांकडून किमान १५ हजार रुपये घेतले. पुढील काळात त्यांना ‘मॉरिस कॉइन’ देऊ असे आश्वासन देण्यात आले. परंतु गुंतवणूकदारांचे पैसे कंपनीच्या प्रवर्तकांच्या खात्यामध्ये आणि लॉँग रीच प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या खात्यामध्ये वळवण्यात आले. यातून कंपनीच्या प्रवर्तकांनी केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक या तीन राज्यांत  स्थावर मालमत्ता आणि तसेच एक फिल्म प्रॉडक्शन कंपनी खरेदी केली. या प्रकरणात आत्तापर्यंत सात जणांना अटक झाली आहे. हे सर्व होऊनसुद्धा कंपनीचे काही अधिकारी ‘मॉरिस कॉइन’ची जगातील मोठ्या एक्सचेंजेसवर नोंदणी होणार असून गुंतवणूकदारांनी धीर धरावा, कारण भविष्यात यातून बख्खळ फायदा होणार आहे, असे सांगत आहे. परंतु आजपर्यंत कोणालाही ‘मॉरिस कॉइन’ मिळालेलीच नाहीत.   

आभासी चलनातील गुंतवणुकीपासून सावध 
‘मॉरिस कॉइन’ सारख्या बनावट आभासी चलनाच्या गैरव्यवहारातून धडा घेणे गरजेचे आहे. तसेच अगदी व्यवहारात असलेल्या आभासी चलनांमध्ये गुंतवणूक करणेसुद्धा जोखमीचे असते. एका ‘बिटकॉइन’ची किंमत सुमारे ३१ लाख रुपये आहे. सामान्य  गुंतवणूकदाराला ते खरेदी करणे शक्य नाही. परंतु १०० रुपयांपासूनसुद्धा यामध्ये गुंतवणूक करता येते आणि त्यासाठी काही कंपन्या ही सुविधा उपलब्ध करून देतात. परंतु आभासी चलनांच्या किमतीमध्ये प्रचंड चढ उतार होत असतात. ‘बिटकॉइन’ १४ एप्रिल २०२१ या दिवशीच्या ४७ लाख ३० हजार रुपयांच्या पातळीवरून ३१ लाख २९ हजार रुपयांच्या पातळीवर खाली आले आहे. यातून अनेकांना नुकसान सोसावे लागले आहे. आणखी महत्त्वाचे म्हणजे या गुंतवणुकीवर, व्यवहारांवर देशातील कोणत्याही नियामक संस्थेचे नियंत्रण नसल्याने, एखाद्या गुंतवणूकदाराची फसवणूक झाली तर दाद मागायची सोय नाही. शेअरच्या बाबतीमध्ये गैरव्यवहार झाला, पैसे किंवा शेअर मिळत नसतील तर सेबीकडे तक्रार करता येते. येथे तशी कोणतीही संस्था नाही. आभासी चलनातील गुंतवणुकीला ‘मॅड मनी’ म्हटले जाते. हे पाहता यापासून दूर राहणे इष्ट. एखाद्या कंपनीत किंवा किंवा गुंतवणूक पर्यायात गुंतवणूक करायची असेल, तर अगोदर त्या कंपनीचा व्यवसाय समजून घ्या. तसेच गुंतवणूक पर्याय कसा असतो, त्यामधील फायदे, तोटे, धोके काय आहेत ते समजून घ्या आणि समजत नसेल तर त्यामध्ये गुंतवणूक करू नका, असा सल्ला  जगप्रसिद्ध गुंतवणूक गुरू वॉरेन बफे देतात. परंतु आपल्या देशात आभासी चलनात गुंतवणूक करणारे १० कोटी गुंतवणूकदार आहेत. हे पाहता ‘दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये,’ हेच खरे आहे असे म्हणावेसे वाटते.

(लेखक आर्थिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

संबंधित बातम्या