एका दंतकथेची अखेर

किशोर पेटकर
सोमवार, 7 डिसेंबर 2020

कव्हर स्टोरी

दिएगो मॅराडोना... हे शब्द उच्चारताच डोळ्यासमोर ऐंशीच्या दशकात जागतिक फुटबॉलवर गारुड केलेले पाच फूट पाच इंच उंचीचे व्यक्तिमत्व येते. मैदानावर हे व्यक्तिमत्व उतरल्यानंतर चेंडू त्याच्या पायांच्या प्रेमात पडे; नव्वद मिनिटे पाय आणि चेंडू यांचीच लगट पाहायला मिळत असे. त्याच्यामुळे जागतिक फुटबॉलमध्ये ऐतिहासिक कालखंड प्रकाशमान झाला. मॅराडोना यांनी फुटबॉल खूपच नयनरम्य केले. हा खेळाडू फुटबॉलमधील रॉकस्टार होता. केवळ त्यांना पाहण्यासाठी, त्यांच्या पायातील जादू अनुभवण्यासाठी मैदानावर तुफान गर्दी उसळत असे. मॅराडोना काही वर्षांपूर्वी भारतात आले. या खंडप्राय देशात ते कधी खेळले नाहीत, पण त्यांचे चाहते असंख्य आहेत. त्याचा प्रत्यय त्यांच्या भेटीत मॅराडोना यांना आला. कोलकाता आणि केरळमध्ये लाभलेल्या उदंड प्रेमाने मॅराडोना भारावून गेले होते. २००८ मध्ये कोलकात्यात आलेल्या मॅराडोना याची झलक डोळ्यांत साठविण्यासाठी देशभरातून फुटबॉलप्रेमी सिटी ऑफ जॉयमध्ये दाखल झाले होते. मॅराडोना यांच्या निधनानंतर केरळमधील कन्नूर येथील एका हॉटेलने त्यांनी वास्तव्य केलेल्या खोलीचे वस्तुसंग्रहालय करण्याचे ठरविले आहे. आठ वर्षांपूर्वी मॅराडोना यांनी केरळला भेट दिली होती. मॅराडोना यांचा मोठा चाहता वर्ग साऱ्या भूतलावर होता आणि यापुढेही राहील. मॅराडोना यांच्यामुळे फुटबॉल मैदानावर १० क्रमांकाच्या जर्सीस आगळेच तेज प्राप्त झाले.

इंग्रजांना पाजले पाणी
फुटबॉल आणि मॅराडोना यांना अलग करणेच अशक्यच. १९८६ मध्ये विश्वकरंडकातील उपांत्यपूर्व लढतीत मॅराडोना यांनी एकहाती इंग्लंडला पाणी पाजले. त्या पराभवानंतर इंग्रज त्यांचा तिरस्कार करू लागले, पण त्यामुळे त्यांची मैदानावरील खेळाची उंची कमी झाली नाही. अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यातील फॉकलंड युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंग्रजांना तो पराभव चांगलाच झोंबला. मेक्सिको सिटीतील एझ्टेका स्टेडियमवर २२ जून १९८६ रोजी मॅराडोना या खेळाडूने नवा इतिहास रचला. सामन्याच्या उत्तरार्धातील सहाव्या मिनिटाला भलेही त्यांनी केलेला पहिला गोल अखिलाडूवृत्तीत मोडणारा असला, तर दुसरा गोल सर्वकालील श्रेष्ठ ठरला. एका बुटक्या खेळाडूने सत्तर यार्डावरून तब्बल पाच इंग्लिश खेळाडूंना विलक्षण कौशल्याच्या बळावर गुंगारा देत, गोलरक्षकासही चकीत केले. मॅराडोना यांना धडाका पाहून इंग्लिश गोलरक्षक पीटर शिल्टन क्षणभर बावरला. भानावर आला तेव्हा शतकातील सर्वोत्तम गोलची नोंद झाली होती. अजूनही हा गोल पाहताना सारे मंत्रमुग्ध होतात. जादूई गोलचे गुणगान होत असताना इंग्रजांनी मॅराडोना यांच्या हँड ऑफ गॉड गोलचा बाऊ केला. फुटबॉल मैदानावर बऱ्याच घटना अपघाताने घडतात. मॅराडोना यांची सर्वसामान्य उंची फुटबॉलमध्ये हेडिंग साधण्यास अजिबात लायक नाही, पण ते घाबरले नाहीत. मॅराडोना हा धाडसी आणि आव्हान स्वीकारणारा खेळाडू. शुद्ध गुणवत्तेच्या बळावर बुटके खेळाडूही हेडिंगवर गोल नोंदवू शकतात हे सिद्ध केले आहे. इंग्लंडविरुद्ध भावनातिरेकात हेडिंग साधताना मॅराडोना यांचा डाव्या हाताची मूठ व चेंडू यांचा मिलाफ झाला आणि गोलचा आक्रोष साऱ्या स्टेडियमवर निनादला. सामन्यातील ट्युनिशियन रेफरींच्या नजेरेतून ही बाब निसटली. आजच्याप्रमाणे अत्याधुनिक तंत्रज्ञान असते, तर मॅरेडोना यांचा तो गोल अवैध ठरला असता. स्वतःचा उदोउदो करणाऱ्या इंग्रजांनी पराभवासाठी मॅराडोना यांनी हाताच्या मदतीने केलेल्या गोलबाबत त्यांना दुष्ट ठरविले, पण कालांतराने त्यांच्या दुसऱ्या गोलवर खुद्द फिफानेच सर्वोत्तमचीही मोहर उमटविल्याने एकप्रकारे इंग्रजांना गुपचुपपणे मॅराडोना यांची महानता मान्य करावीच लागली. खुद्द मॅराडोना यांनीही आपली अखिलाडूवृत्ती लपविली नाही, अनावधानाने केलेली चूक कबुल करण्याचा मोठेपणाही दाखविला. हँड ऑफ गॉड (देवाचा हात) असे सांगत त्यांनी त्या गोलचे समर्थनच केले. मॅराडोना यांच्या निधनानंतर इंग्लंडचे माजी कर्णधार गॅरी लिनेकर यांनी त्यांना श्रद्धांजली वाहताना ते आपल्या कालखंडातील, तसेच सर्वकालीन महान फुटबॉलपटू असल्याचे मान्य केले, पण त्याचवेळी त्रासदायक जीवनानंतर त्यांना अखेरीस देवाच्या हातात थोडा आराम मिळण्याची आशा व्यक्त करत असल्याची खोचक टिप्पणी करण्यास लिनेकर विसरले नाहीत.

लाडका फुटबॉलपटू
मॅराडोना यांचे निधन झाले. तसे पाहायला गेले तर साठ वर्षे हे काही आयुष्य संपण्याचे वय नाही, पण मॅराडोना यांना काही चुकांनी आजारपणात ओढले. मैदानावरील तेजतर्रार आणि कौशल्यसंपन्न खेळाडूच्या नशिबी रुग्णालयातील खाटेवर गतवैभव आठवण्याची वेळही आली. फुटबॉल मैदानावर भल्याभल्यांना सहजपणे चकवा देणारा हा दैवी गुणवत्तेचा फुटबॉलपटू मृत्यूला हरवू शकला नाही. १९९७ मध्ये मॅराडोना यांनी स्पर्धात्मक फुटबॉलचा निरोप घेतला, त्यानंतरही दिएगो मॅराडोना हा नाव जागात लोकप्रियतेच्या शिखरावर राहिले. या लाडक्या फुटबॉलपटूच्या काळ्याकुट्ट दुसऱ्या बाजूकडे चाहत्यांनी डोळेझाक करत, त्याच्या वैभवशाली, अलौलिक गुणवत्तेला पुजले. मृत्यूनंतर जगभरातील कोट्यवधी फुटबॉलपटू हळहळले. कोरोना विषाणू महामारीची भीती असूनही ब्युनॉस आयर्समधील रस्त्यांवर फुटबॉलप्रेमींचा महापूर आला. आपल्या लाडक्या फुटबॉलपटूचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी गर्दी वाढतच गेली. केवळ अर्जेंटिनातच नव्हे, तर दूरवर इटलीतील नेपल्स येथील सां पावलो स्टेडियमकडे जाणारे रस्तेही फुटबॉलप्रेमींनी भरून गेले होते. प्रत्येकजण अश्रूंना वाट मोकळी करून देत होता. असे उत्स्फूर्त प्रेम फारच मोजक्या जणांच्या नशिबी येते. अर्जेंटिनाचा सध्याचा सुपरस्टार लिओनेल मेस्सी याने म्हटल्याप्रमाणे, दिएगो मॅराडोना शाश्वत आहेत...! फुटबॉल हा सांघिक खेळ, पण मॅराडोना यांनी जिद्दीच्या बळावर तो वन-मॅन करून दाखविला. बुटका, काहीसा स्थूल मॅराडोना प्रतिस्पर्धी रिंगणात चेंडूवर अचाट नियंत्रण राखत बंदुकीच्या गोळीप्रमाणे घुसायचा तेव्हा फुटबॉलप्रेमींचा श्वास क्षणापुरता रोखला जायचा. केवळ मॅरेडोना यांना पाहण्यासाठी स्टेडियमवर गर्दी व्हायची. अर्जेंटिनातील बोका ज्युनियर्सकडून मैदान गाजविण्यास सुरुवात करणाऱ्या मॅराडोना यांच्या खेळाने स्पेनमधील बार्सिलोना क्लबला आकर्षित केले, तेथून इटलीतील नापोली क्लबकडून खेळताना मॅराडोना यांचा खेळ खूपच बहरला. नेपल्स शहरातील संघाकडून तो तब्बल सात वर्षे खेळला. साहजिकच इटलीशी मॅराडोना यांचे मोठे ऋणानुबंध आहेत.

शापित उत्तरार्ध
या महान खेळाडूच्या आयुष्यातील उत्तरार्ध मात्र शापित ठरला. फुटबॉल मैदाने गाजविणारा हा जिंदादिल खेळाडू मैदानाबाहेर वाहावत गेला. पार्ट्या, दारू, अंमली पदार्थ यात पुरता बुडाला. परिणामी फुटबॉलच्या या जादुगारास खूप लवकर जगाचा निरोप घ्यावा लागला. विसाव्या शतकातील महान फुटबॉलपटू म्हणून जागतिक फुटबॉल महासंघाने मॅराडोना, तसेच ब्राझीलचे दिग्गज पेले यांच्या कर्तृत्वावर शिक्कामोर्तब केले. ब्राझीलच्या तीन जगज्जेतेपदात पेले यांचा मोलाचा वाटा राहिला, तर मॅराडानो यांचा संघ एक वेळा विश्वविजेता ठरला. या दोघा असामान्य फुटबॉलपटूंत वीस वर्षांचे अंतर आहे. पेले वयाच्या ऐंशीच्या वर्षी अजूनही प्रकाशझोतात येतात, परिपूर्ण जीवनशैलीच्या बळावर पेले यांनी निवृत्तीनंतरही आयुष्यरूपी कारकीर्द संस्मरणीय केली, पण मॅराडोना यांना सर्वांगसुंदर जीवनाचा आनंद लुटता आला नाही. खेळत असतानाच ते व्यसनाधीन झाले. अंमलीपदार्थाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला, त्यामुळे मैदानावर प्रतिस्पर्ध्यांना सहजपणे गुंगारा देणारे त्यांचे शरीर खूप लवकर थकले. साठाव्या वाढदिवसानंतर काही दिवसांतच अर्जेंटिनाच्या या महान सुपुत्राने इहलोकीची यात्रा संपविली. फुटबॉलने मॅराडोना यांना मोठे वैभव दिले, तर व्यसनांमुळे त्यांना अवहेलना झेलावी लागली. केवळ आणि केवळ मॅराडोना यांच्या जादूई खेळामुळे अर्जेंटिनाने १९८६ मध्ये मेक्सिकोत झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत बाजी मारली. सबकुछ मॅराडोना, पण याच खेळाडूस १९९४ मध्ये अमेरिकेत झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेपूर्वी मोठी नामुष्की झेलावी लागली. उत्तेजक सेवन चाचणीत दोषी आढळल्यामुळे त्यांची स्पर्धेपूर्वीच हकालपट्टी झाली. पेले यांच्याप्रमाणे मॅराडोना यांचे निवृत्तीनंतरचे जीवन आदर्शवादी ठरले असते, तर ब्युनॉर्स आयर्सजवळील उपनगरातील मातीच्या रस्त्यांवर खेळत फुटबॉलमध्ये देवत्व प्राप्त झालेले हे व्यक्तिमत्त्व आणखीनच उजळले असते हे नक्की. मैदानावरील घटना, मैदानाबाहेरील जीवन, व्यसनाधिनता या साऱ्यांवर मॅराडोना यांनी कधी पांघरुण घातले नाही. स्वतःच्या इच्छेनुसार ते जीवन जगले. बऱ्याच वेळा चुकलेही. मात्र खुल्या दिलाने त्याची कबुली दिली. २००४ मध्ये रुग्णालयात दाखल केल्यानंतरही मॅराडोना यांनी दुर्दम्य इच्छाशक्ती बळावर प्रशिक्षक होऊन फुटबॉल मैदानावर पुनरागमन केले. शरीर साथ देत नसतानाही ते दोन वर्षांपूर्वी रशियात विश्वकरंडक फुटबॉल पाहण्यात दाखल झाले होते. मॅराडोना यांच्यासाठी फुटबॉल हेच जीवन होते, चिखलात रुतल्यानंतरही त्यांनी या खेळाचा ध्यास सोडला नाही. एकदा ते म्हणाले होते, ‘मी मॅराडोना आहे, जो गोल करतो, जो चुका करतो. मी हे सर्व स्वीकारतो. सर्वांशी झगडण्याइतपत माझे खांदे खंबीर आहेत.’

मंत्रमुग्ध कौशल्याची देणगी
मेक्सिकोतील १९८६ मधील विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा मॅराडोनामय ठरली. अगोदर इंग्लंड, नंतर अंतिम लढतीत पश्चिम जर्मनी संघ मॅरेडोना यांच्या असामान्य, अविश्वासनीय गुणवत्तेसमोर हतबल ठरला. १९७८ मध्ये अर्जेंटिनाने पहिल्यांदा विश्वकरंडक जिंकला होता, पण मॅराडोनाने गाजवलेली स्पर्धा अवर्णनीय ठरली. मेक्सिकोत संभाव्य विजेतेपदाच्या दावेदारांत अर्जेंटिनाला फारच कमी लोकांनी स्थान दिले होते. मॅराडोनाने एकहाती देशाला जगज्जेते केले. विश्वविजेतेपद पटकाविताना अर्जेंटिनाने एकूण १४ गोल नोंदविले, त्यापैकी दहा गोलांत मॅराडोना यांचा मोलाचा वाटा राहिला. पाच गोल त्यांनी स्वतः नोंदविले, तर अन्य पाच गोलांत मदतीची भूमिका निभावली. संपूर्ण स्पर्धेच्या कालावधीत मॅरेडोना यांनी प्रतिस्पर्ध्यांवर फसव्या, पण चतुर ड्रिबलिंगने वर्चस्व राखले. चेंडूवर अमर्याद नियंत्रण राखत हुकमतीसह दणदणीत गोल केले. सहकार्यांना गोल करण्यास मदत करताना जबरदस्त मुसंडी मारली. मेक्सिकोत त्यांनी अलौकिक गुणवत्तेच्या बळावर साऱ्या जगाला मंत्रमुग्ध केले. ब्युनॉस आयर्समधील झोपडपट्टीत वाढलेला मुलगा सुपरस्टार झाला. तेथील धुळीने माखलेल्या रस्त्यांवर फुटबॉल खेळणारा एक मुलगा जगज्जेता झाला. मुख्यतः १९८६ ते १९९० या चार वर्षांत जागतिक फुटबॉल मॅराडोनामय होते आणि लोभस खेळाच्या बळावर त्यांनी असंख्यजणांच्या मनात घर केले. नव्वदमध्ये इटलीतील विश्वकरंडकात अंतिम फेरी गाठूनही मॅराडोना यांच्या अर्जेंटिनास विजेतेपद राखता आले नाही, मात्र त्यांच्याभोवतीचे वलय कमी झाले नाही. मैदानावर मॅराडोना खेळत असताना चेंडू त्यांचा आदेश मानत असे, मॅरेडोना यांच्या दिशानिर्देशानुसार चेंडू आज्ञाधारी असायचा. त्यामुळे मॅराडोना सर्वाधिक यशस्वी ठरले.

प्रेरणादायी मार्गदर्शक
निवृत्तीनंतर मॅराडोना यांच्या अफाट फुटबॉल ज्ञानाचा लाभ नवोदितांना मिळावा या उद्देशाने त्यांची अर्जेंटिनाच्या विश्वकरंडक संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली. आजचा फुटबॉल सुपरस्टार लिओनेल मेस्सी २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेतील विश्वकरंडक स्पर्धेत मॅराडोना यांच्या मार्गदर्शनाखाली खेळला. तेव्हा अर्जेंटिनास अपयश आले, पण मेस्सीला सर्वस्व ओतून फुटबॉलचे धडे देणाऱ्या मॅराडोना यांची मार्गदर्शकाची छबी चिरकाल ठरली. मेस्सी याच्या मनात मॅराडोना यांच्याप्रती उत्तुंग आदरभावना आहे. तो मॅराडोना यांना फुटबॉलमधील दंतकथा आणि अनादि रॉकस्टार मानतो. अर्जेंटिनातील फुटबॉलला मॅराडोना यांनी नवऊर्जितावस्था प्राप्त करून दिली. अर्जेंटिना संघातील सहकारी दिएगो सिमोन हे मॅराडोना यांना प्रेरणादायी मार्गदर्शक मानतात. मॅराडोना यांना खेळताना पाहत मोठी झालेली एक पिढी आहे, त्यात सिमोनही आहेत. संघात खेळताना मॅराडोना केवळ सहकारी नव्हते, तर भक्कम आधारस्तंभ होते, असे सिमोन यांनी श्रद्धांजली वाहताना सांगितले. 

कधीतरी आकाशात खेळू...
मॅराडोना यांनी फुटबॉलमुळे कितीतरी मित्र जोडले, त्यात पेले यांचाही समावेश आहे. वयात दोन दशकांचा फरक असूनही ज्युनियर असलेल्या मॅराडोना यांना जीनियस मानत पेले यांनी नेहमीच आपल्या शेजारील देशातील खेळाडूचा गौरव केला. मॅरेडोना यांच्या निधनानंतर, आपण महान मित्र गमावल्याची भावना पेले यांनी व्यक्त केली. आपल्या उतारवयाचा दाखल देत, पेले यांनी एकदिवस मॅराडोना यांच्यासह आकाशात फुटबॉल खेळण्याची आशा व्यक्त केली आहे. याचाच अर्थ ब्राझीलच्या दिग्गजास मृत्यूनंतरही मैत्रीचे बंध आणखी घट्ट करायचे आहेत.

मेस्सीची आगळी आदरांजली
मॅराडोना यांच्या निधनानंतर भर मैदानावर लिओनेल मेस्सी याने आगळ्या पद्धतीने आदरांजली वाहिली. त्यावेळी आपण खेळाच्या नियमाचे उल्लंघन करत असल्याचे भानही मेस्सीस राहिले नाही. केवळ आदर्शवत मॅराडोना यांच्याप्रती प्रेम त्याला व्यक्त करायचे होते. स्पेनमधील बार्सिलोना क्लबकडून खेळणारा मेस्सी मॅराडोना यांना दैवत मानतो. बार्सिलोना आणि ओसासूना यांच्यातील ला-लिगा लढतीत मेस्सीने ७३व्या मिनिटास गोल केला. त्यानंतर लगेच मेस्सीने बार्सिलोना संघाची जर्सी काढून त्याखालील नेवेल्स ओल्ड बॉईज जर्सी प्रदर्शित केली. पूर्वी मॅराडोना अर्जेंटिनातील रोझारियो येथील नेवेल्स ओल्ड बॉईजकडून काही काळ खेळले होते, तर युवा मेस्सीच्या कारकिर्दीची जडणघडण या संघातून झाली आहे. मॅराडोना यांच्या प्रमाणेच मेस्सीही १० क्रमांकाची जर्सी खेळताना वापरतो. जुन्या क्लबची जर्सी प्रदर्शित करून मेस्सीने मॅराडोना साश्रुनयनांनी श्रद्धांजली वाहिली, पण त्याबदलात त्याला सामना रेफरींकडून नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल यलो कार्ड मिळाले. फुटबॉल नियमानुसार, सामना सुरू असताना मैदानावर अंगावरील जर्सी काढता येत नाही. मेस्सीला नियमापेक्षा आपला आदर्श श्रेष्ठ वाटला.

दिएगो मॅराडोना टाईमलाईन...

 • ३० ऑक्टोबर १९६० रोजी ब्युनॉस आयर्समधील लानूस येथे जन्म
 • १९७६ मध्ये सोळावा वाढदिवस साजरा करण्यापूर्वी अर्जेंटिनाच्या युवा संघात स्थान
 • १९७७ मध्ये १६ वर्षे व १२० दिवसांचा असताना आंतरराष्ट्रीय पदार्पण
 • १९७९ मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय गोल
 • १९८२ मध्ये विश्वकरंडक स्पर्धेत पदार्पण, २ गोल आणि रेड कार्डही
 • १९८२ मध्येच बोका ज्युनियर्सकडून बार्सिलोना संघात
 • १९८४ मध्ये विक्रमी रकमेसह नापोली क्लबशी करार
 • १९८६ मध्ये विश्वकरंडक विजेत्या अर्जेंटिनाचे नेतृत्व
 • १९८७ मध्ये नापोलीच्या पहिल्या इटालियन सेरी ए विजेतेपदात मोलाची कामगिरी
 • १९९० मध्ये विश्वकरंडक स्पर्धेत उपविजेतेपद
 • १९९१ मध्ये कोकेनच्या सेवनामुळे फुटबॉलमधून १५ महिन्याचे निलंबन
 • १९९४ मध्ये अर्जेंटिनाच्या विश्वकरंडक संघात पुनरागमन, पण उत्तेजक सेवन चाचणीत दोषी आढळल्यामुळे हकालपट्टी
 • १९९७ मध्ये फुटबॉलमधून निवृत्ती, डोप टेस्टमध्ये पुन्हा दोषी
 • २००८ मध्ये अर्जेंटिनाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती
 • २०१० मधील विश्वकरंडक स्पर्धेत अर्जेंटिनाचे मार्गदर्शक
 • २०२० मध्ये २५ नोव्हेंबर रोजी आजारपणामुळे निधन

संबंधित बातम्या