पॅरालिंपिकमधील भारतीय जिद्द

किशोर पेटकर
सोमवार, 13 सप्टेंबर 2021

कव्हर स्टोरी

टोकियो पॅरालिंपिकमध्ये नवी भारतीय जिद्द पाहायला मिळाली. १९६८पासून भारतीय पॅराअॅथलिट पॅरालिंपिक्समध्ये भाग घेत आहेत, मात्र यावेळेस क्रीडापटूंनी नवा उच्चांक गाठताना पदकांची संख्या वाढवून देशासाठी अभिमानास्पद कामगिरी बजावली. 

पाच सुवर्ण, आठ रौप्य, सहा कांस्यसह १९ पदके जिंकून १६२ सहभागी देशांत भारताने २४वा क्रमांक पटकाविला. २०१६मधील रिओ पॅरालिंपिक स्पर्धेपर्यंत भारताच्या खाती चार सुवर्णासह एकूण १२ पदके जमा होती. कोरोना विषाणू महासाथीमुळे निर्बंध असले, तरी भारतीय पॅराअॅथलिट शौर्य, उत्कटता आणि निर्धार यात सरस ठरले आणि पदकांची संख्या वाढली. देशात पॅरालिंपिक संस्कृती बहरू लागलीय. दिव्यांग क्रीडापटूंना आंतरराष्ट्रीय क्षितिजावर प्रकाशमान होण्यासाठी प्रेरणा गवसली आहे. भारतीय पॅराअॅथलिट विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांत सहभागी होत यश प्राप्त करताना दिसतात. टोकियोतील बहारदार कामगिरीमुळे आता अन्य पॅराअॅथलिट्सना स्फूर्तीदायक दिशा गवसली आहे.

प्रेरणादायी कामगिरी
टोकियो पॅरालिंपिक्समधील भारतीय क्रीडापटूंची कामगिरी प्रेरणादायी आहे. केवळ पदक विजेतेच नव्हे, तर प्रत्येक सहभागी पॅराअॅथलिटने खूप संघर्ष केला. त्यांच्या वाटचालीस भावनिक किनार आहे. गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी असंख्य अडथळे पार करावे लागले. मनातील खोलवरील भीतीवर मातही करावी लागली. धैर्याने उपजत क्रीडाकौशल्य प्रदर्शित केल्यानंतरच या क्रीडापटूंना वाहव्वा मिळविण्याइतपत भरारी घेता आली. १९८८ ते २०००पर्यंत, नंतर २००८ मधील पॅरालिंपिक स्पर्धेतील पदकतक्त्यात भारताची पाटी कोरीच राहिली, मात्र दशकभरात चित्र बदलले आहे. २००४पासून प्रत्येक पॅरालिंपिक्समध्ये भारताच्या खाती किमान एक पदक आहे. त्यास पॅराअॅथलिट्सचे धाडस कारणीभूत आहे. कोविड-१९ महामारीच्या कालखंडात मागे न हटता, अथक मेहनत आणि जबरदस्त इच्छाशक्तीच्या बळावर भारतीय पॅराअॅथलिट्सनी भरभरून यश प्राप्त केले. 
 

संबंधित बातम्या