ड्रॅगनचे मनसुबे 

लेफ्टनंट जनरल डी. बी. शेकटकर (निवृत्त) 
सोमवार, 13 जुलै 2020

डोकलामचा मुद्दा शमतो न शमतो तोच चीनने आता गलवान खोऱ्यात अतिक्रमण करून दुसऱ्या वादाला अवघ्या तीन वर्षांत तोंड फोडले. 45 वर्षांनंतर भारत-चीन सीमा रक्तरंजित झाली. एकीकडे कोरोना विषाणूच्या उद्रेकाशी संपूर्ण भारत लढत असताना नवीन कुरापत काढण्याची चीनने हीच वेळ का साधली? त्यासाठी गलवान खोऱ्याचीच निवड का केली? चीनचे नेमके मनसुबे आहेत तरी काय? या प्रश्नांची उकल करणारा लेख. 

भारत आणि चीन हे सख्खे शेजारी. या दोन्ही देशांदरम्यान तीन हजार 488 किलोमीटर लांबीची सीमा आहे. जम्मू आणि काश्मीरपासून सुरू होणारी चीनची सीमारेषा - लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेशपर्यंत पसरली आहे. लष्कराच्या परिभाषेत ही सीमा तीन सेक्टरमध्ये विभागली गेली आहे. पूर्व सेक्टर, मध्य सेक्टर आणि पश्चिम सेक्टर. पूर्व सेक्टरमध्ये अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम राज्यांना लागून असलेल्या चीनच्या सीमारेषेचा समावेश होतो. मध्य सेक्टरमध्ये उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश तर, पश्चिम सेक्टरमध्ये जम्मू, काश्मीर आणि लडाखचा भाग येतो. या भागातील बहुतांश ठिकाणी दोन्ही देशांमध्ये सीमा निश्चित झालेल्या नाहीत. त्यामुळे तेथे प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (लाइन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल) असते. बर्फाच्छादित प्रदेशात काही वेळा सीमेवर गस्त घालणाऱ्या दोन्ही देशांच्या सैनिकांकडून नियंत्रण रेषा ओलांडली जाते. पण, दोन्ही लष्कराच्या वरिष्ठ अधिकऱ्यांमध्ये चर्चा होऊन त्यातून मार्ग काढला जातो. त्यानंतर तेथील तणाव कमी होतो. पण, १५ जूनला रात्री भारत आणि चिनी सैन्यात हाणामारी झाली. त्यात वीस भारतीय जवान शहीद झाले. त्यानंतर तातडीने लष्करी पातळीवर चर्चा झाल्या. पण, घटनेच्या पंधरा दिवसांनंतरही सीमारेषेवरील तणाव कायम आहे. त्यामुळे या दोन्ही देशांमधला सीमावाद पुन्हा उफाळत असल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. 

कोरोना जीवास्त्र 
कोरोना विषाणू ज्याला लोक चिनी किंवा वुहान व्हायरस असेही म्हणतात; हा जैविक युद्धाचा एक भाग आहे. जगातील वेगवेगळ्या १८ देशांमध्ये या प्रकारच्या युद्धपद्धतीवर प्रयोग सुरू आहेत. गरज पडल्यास शत्रू सैन्याला जैविक अस्त्राने कसे नेस्तनाबूत करायचे याचाही विचार यात केला जातो. जैविक अस्त्रांचा वापर न करण्याचा आंतरराष्ट्रीय जिनिव्हा करार झाला असला तरीही प्रत्यक्षात छुप्या पद्धतीने हे प्रयोग सुरू असल्याचे कोरोना उद्रेकातून दिसत आहे. जैविक प्रयोगशाळा वुहानमध्ये आहे. त्यामुळे जैविक अस्त्राचे प्रयोग सुरू असताना त्यातून या विषाणूचा फैलाव झाला आहे. या विषाणूंचा दुष्परिणाम किती होईल, हे तपासण्याच्या प्रक्रियेतून हा विषाणू प्रयोगशाळेच्या बाहेर आला असण्याची शक्यता आता वर्तविली जात आहे. बंदुकीतून गोळ्यांचा फैरी झाडल्या नाहीत, बॉम्बस्फोट नाही, तोफा डागल्या नाहीत मात्र जगभरात लाखो जण या विषाणूच्या संसर्गाने मृत्युमुखी पडले. या सगळ्याला चीनच कारणीभूत आहे. कोरोना विषाणूमुळे जगातील बहुतांश राष्ट्रांचा रोष चीनवर आहे. याचा थेट परिणाम चीनच्या उद्योग क्षेत्रावर होत आहे. चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकला जात आहे. 

चीनच्या अंतरंगात काय घडतेय? 
चीनची अंतर्गत व्यवस्था अत्यंत वाईट होत आहे. तेथे अंतर्गत संघर्ष वाढले आहेत. चीनच्या कम्युनिस्ट पार्टीमध्ये असंतोष वाढला आहे. विद्यमान अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या चुकीच्या धोरणाचा फटका चीनला बसताना दिसतो. त्यामुळे त्यांना सत्तेतून बाहेर काढण्याच्या प्रयत्नांना वेग आला. दुसरीकडे, चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’तही (पीएलए) असंतोष वाढत आहे. त्या सैन्यदलातील अडीच कोटी निवृत्त अधिकारी आहेत. त्यांचाही सरकारवर रोष आहे. या सगळ्या परिस्थितीचा विचार करून चीनच्या राजकीय नेतृत्वाने भारताची कुरापत काढली. त्यामुळे या प्रश्नांवर चिनी नागरिकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा हा प्रयत्न आहे. हे अचानक झालेले नाही; पूर्वनियोजित आहे. 

तत्कालीन घडामोडी 
लडाखमध्ये चीन अतिक्रमण करते, ही सवय आपल्याला गेल्या वीस वर्षांपासून झाली आहे. चिनी सैन्य तेथे येते. काही वेळ थांबते आणि परत जाते. परंतु यावेळी ते परत न जाण्यासाठी आले. त्यामुळे भारतीय जवानांनी त्याला विरोध केला. तेव्हा १५ आणि १६ जूनला दोन्ही लष्करात चकमक झाली. त्यात आपले वीस जवान शहीद झाले. चीनचेही काही सैनिक मारले. 
चीनने लडाखवर सातत्याने लक्ष ठेवले आहे. त्यांना तो भाग हवा आहे. त्यासाठी त्यांनी तेथे लष्कर तैनात केले आहे. लडाखपर्यंत युद्धसामग्री पोचविण्यासाठी रस्ते बांधले आहेत. तेथे तोफा सज्ज ठेवल्या आहेत. याचा अर्थ चीनच्या या अतिक्रमणाचा भारत विरोध करेल, हे त्यांना माहिती होते. त्यामुळे भारतावर दबाल आणण्यासाठी ही चाल चीनने खेळली. 

चीनला लडाख का हवा? 
चीनने १९६२ च्या युद्धात लडाखचे ३८ हजार चौरस किलोमीटर क्षेत्र ताब्यात घेतले आहे. त्याला अक्साई चीन म्हटले जाते. तेथे गेल्या ५८ वर्षांमध्ये चीनने रस्ते बांधले  
आहेत. पण, युद्धप्रसंगी भारत लडाखमार्गे अक्साई चीनमध्ये येईल, अशी भीती चीनला सातत्याने वाटते. त्यामुळे लडाखचा जेवढा भाग ताब्यात घेता येईल, तितका तो घ्यावा, असे त्यांचे धोरण आहे. 
पेंगाँग तलाव अडीचशे किलोमीटर लांब आणि चाळीस-पन्नास किलोमीटर रुंद आहे. त्याचा दोन तृतीयांश भाग चीनकडे आणि एक तृतीयांश भाग भारताकडे आहे. हा संपूर्ण तलाव ताब्यात घेण्याचे चीनचे प्रयत्न आहेत. म्हणजे त्यांना भारतात घुसता येईल. 
दौलत बेग ओल्डी हा लेह परिसरातील किल्ला भारताच्या ताब्यात आहे. तेथे भारताने जगातील सर्वांत उंचीवरचे विमानतळ बांधले आहे. जगातील सर्वांत आधुनिक विमाने तेथे उतरतात. तसेच, जगातील सर्वांत उंचीवरची विमानाची धावपट्टी तेथे आहे. अशी वैशिष्ट्ये असणारे मोक्याचे ठिकाण भारताकडे आहे. त्यामुळे भारत हवाई मार्गे चीनवर हल्ला करेल, अशी शक्यता चीनला वाटते. तसेच, विमानाने सैन्य या भागात आणता येईल. त्यानंतर एका तासाभरात हे सैन्य चीनमध्ये येऊ शकेल. 
दौलत बेग ओल्डीपासून अवघ्या चौदा किलोमीटर अंतरावर काराकोरम दर्या आहे. ही चीनची मागची बाजू आहे. काराकोरमपासून ७५ किलोमीटर परिसरात चीन, अफगाणिस्तान, कझाकिस्तान, पाकिस्तान आणि भारत या पाच राष्ट्रांच्या सीमा एकत्र येतात. पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात आल्यास भारताची सीमा अफगाणिस्तानपर्यंत पोचेल. दरम्यान, चीन-पाकिस्तानने इकॉनॉमिक कॉरिडॉर तयार केला आहे. त्यातील रस्त्यांसाठी चीनने केलेली ८० अब्ज डॉलर आतापर्यंत खर्च केले आहे. भारताची सीमा अफगाणिस्तानपर्यंत वाढली तर तो रस्ता भारताच्या ताब्यात येईल. त्यामुळे या मार्गाचा चीन वापर करू शकणार नाही. त्याचा फटका चीनने बलुचिस्तानमध्ये केलेल्या कामाला बसेल. त्यामुळे लडाखवर चीनचा डोळा आहे. 

अरुणाचल प्रदेशात कुरघोडी 
भारताचे लक्ष लडाखवरून दुसरकडे वळविण्यासाठी चीन अरुणाचल प्रदेशातही कुरघोडी करत आहे. त्यांनी संपूर्ण अरुणाचल प्रदेशावर दावा सांगितला आहे. तेथेही सैन्य तैनात केले आहे. भारताचं लक्ष ईशान्येकडे वळवून लडाखमध्ये आक्रमण करता येईल, असा एक विचार त्यामागे आहे. 
काराकोरम पासपासून भारत, चीन आणि म्यानमारच्या सीमेपर्यंत तीन हजार सीमारेषेवर चीनचे लक्ष आहे, याकडे आता दुर्लक्ष करून चालणार नाही. 

सैन्याचे मनोबल महत्त्वाचे 
चीनकडे किती सैन्य आहे आणि कोणती युद्धसामग्री आहे. याचबरोबर सैनिकांचे मनोबल हा महत्त्वाचा भाग असतो. युद्ध हे फक्त सैनिकांच्या संख्येच्या आधारावर जिंकता येत नाही. त्यासाठी आवश्यकता असते युद्ध कौशल्याची! छत्रपती शिवाजी महाराजांनी पाचशे मावळ्यांच्या बळावर पाच-पाच हजार मोघल सैन्याचा पराभव केल्याचे उदाहरण आहे. अमेरिकेविरोधातील युद्धात व्हिएतनामने हेच दाखवून दिले आहे. 

भारतीय लष्कराची सक्रियता 
भारतीय लष्कर हे सक्रिय आहे. चीनने १९६२ नंतर युद्ध केलेले नाही. या उलट भारताने १९६५, १९७१, १९९९ या तीन युद्धांना तोंड दिले आहे. त्याचबरोबर काश्मीरमधले छुपे युद्ध, ईशान्य भारतातला दहशतवाद याच्याशी भारतीय सैन्य दल मुकाबला करत आहे. हा सगळा युद्धाचाच भाग आहे. त्यामुळे भारत सक्षम उत्तर देईल, याची पुरती कल्पना चीनला आहे. 

नागरिकांची भूमिका 
सीमेवर तैनात सैन्य आपले काम करेल. शासनदेखील आपले काम करेल. अशा वेळी लोकांवरही जबाबदारी आहे. त्यांनी सरकारवर या अनुषंगाने टीका-टिप्पणी करू नये. विरोधी पक्षांनीही त्यांचे मुद्दे संसदेत, विधान सभेत मांडावेत. तेथे त्यावर चर्चा करावी. पूर्ण राष्ट्राने अशा वेळी एकत्र आले पाहिजे. 
आर्थिक शक्ती हा चीनच्या सैन्यशक्तीचा आधार आहे. त्यातून युद्धसामग्री खरेदी करता येते. ते तर उत्पादन करतात. त्यामुळे चीनच्या आर्थिक शक्तीवर आघात केला पाहिजे. त्यासाठी चिनी मालावर बहिष्कार घालायला हवा. 

मोदी यांच्या लेह भेटीचा अर्थ 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेहला भेट दिली. त्यातून प्रत्यक्ष स्थिती काय आहे, त्याची अचूक माहिती त्यांना मिळाली. भारतीय सैन्याशी त्यांनी संवाद साधला. त्यामुळे लष्कराचे मनोबल उंचावले. तेथूनच त्यांनी चीनच्या विस्तारवादी धोरणावर हल्ला केला. भारत विकासवादी आहे, हे देखील जगाला सांगितले. त्यामुळे विस्तारवादी धोरणाला रोखण्यासाठी वेळप्रसंगी शस्त्रप्रयोगदेखील करावे लागतील, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. मोदी यांच्या लेह भेटीचा विरोधी पक्षांची चुकीचा अर्थ लावला. 

दरम्यान, पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात तणाव कमी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. कॉर्प्स कमांडरच्या बैठकीत ज्या ठिकाणाहून सैन्य मागे घेण्याचे निश्चित झाले होते, तेथून चीनची सैन्य वाहने, तंबू आणि सैनिक एक ते दोन किलोमीटरपर्यंत मागे हटले आहेत. भारतीय लष्करातील सूत्रांच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे. तसेच चिनी सैन्य एक ते दोन किलोमीटर माघारी फिरले असले तरी चिनी सैन्य-वाहने अजूनही या भागामध्ये आहेत. या सर्व परिस्थितीवर भारतीय सैन्याचे अत्यंत बारीक लक्ष आहे. 

आपल्या या सगळ्या प्रयत्नांना आपण सगळ्यांनी साथ दिली पाहिजे. 

(शब्दांकन ः योगिराज प्रभुणे)

संबंधित बातम्या