ग्रीष्म फुलताना...

माधव गोखले 
गुरुवार, 10 मे 2018

कव्हर स्टोरी    
 

माझ्या ऑफिसच्या वाटेवर एक ताम्हण उभी आहे. दरवर्षी त्या झाडाचं अस्तित्व मला नव्याने जाणवतं. एरवी वर्षभर अगदी रोज जातायेताना ते झाड तसं नजरेत येत नाही. पण उन्हं तापायला लागली की अचानक ती ताम्हण उमलून येते. फांद्यांच्या टोकांवर सुरेख जांभळ्या रंगाचे तुरे दिसायला लागतात; आख्खं झाड जणू बोलायला लागलेलं असतं. आणि हे उमलणंही कसं -जादूच्या कांडी फिरवल्यासारखं, म्हणजे कालपर्यंत माझं तिच्याकडे लक्षच गेलेलं नसतं, काही म्हणजे काहीच जाणवलेले नसतं आणि एकदम एखाद्या दुपारी लक्षात येतं, की ताम्हण फुललीय, अंगभर फुलांचे तुरे लेवून ती उभी आहे.

या झाडाशी माझं एक चमत्कारिक नातं आहे, असं मला प्रत्येकवेळी जाणवतं. ही ताम्हण फुललेली पाहिली, की का कोण जाणे पण माझ्या मनात खोल कुठेतरी ‘सगळं काही छान आहे...’ अशी एक भावना लहरून जाते, अत्यंत शुष्क, कोरड्या उन्हाळ्यात क्षणभर दिलासा देऊन जाणाऱ्या अनामिक गारव्यासारखी!

ग्रीष्माचं सौंदर्य आगळंच. उन्हं तापायला लागतात तसा चैत्रातला नव्या पालवीचा कोवळेपणा नजरेआड व्हायला लागलेला असतो. चढत जाणाऱ्या ग्रीष्माबरोबर दूर रानावनातच नव्हे तर अगदी आपल्या आजूबाजूला, अंगणात, रस्त्याकडेला, आपल्याला वेढून टाकत रस-रंग-गंधाची उधळण सुरू झालेली असते. बघणाऱ्याची नजरबंदी करणारा पुष्पोत्सव ही ग्रीष्माची खासियत. गुलमोहर, नीलमोहर, स्पॅथोडिया किंवा आफ्रिकन ट्युलिप, बहावा, पळस, ताम्हण, शिरीष, पांगारा, काटेसावर, कांचन, आईन, चाफा, मोगरा, निशिगंध, मधुमालती, रातराणी, सायली, जाई, जुई, बोगनवेल, गोल्डन बेल (टॅबुबिया), ग्लिरिसिडीया, रेन ट्री, सिल्व्हर ओक, पेल्टोफोरम आणि आणखी कितीतरी... आपलाआपला पुष्पसंभार सांभाळत अंगाची लाही करणाऱ्या ग्रीष्माला पंचेंद्रियांना सुखावणारी किनार जोडत असतात.

ग्रीष्माच्या या सौंदर्याने कधी झपाटले कोण जाणे... हा पुष्पोत्सव वसंतातला की ग्रीष्मातला, असा एक प्रश्‍न नेहमी पडतो. वैशाखातला हा सगळा रंगोत्सव सरत्या वसंतातला, असा साधारणतः आपला  समज असतो. पण, वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. श्री.द. महाजन सरांनी एका लेखात म्हटल्याप्रमाणे, संस्कृत साहित्यातून घेतलेली चैत्र-वैशाख वसंत ऋतू हीच कल्पना चुकीची आहे. उत्तर भारतात लिहिल्या गेलेल्या संस्कृत साहित्यातील ऋतुचक्र दक्षिण भारतात, महाराष्ट्रात चुकत जातं. ऋतू पृथ्वी आणि सूर्य यांच्या परस्पर संबंधांवर आधारित आहेत आणि आपले मराठी महिने हे चांद्रमास आहेत. त्यामुळे आपल्याकडे फेब्रुवारी ते एप्रिल वसंत ऋतू आणि एप्रिल ते जून ग्रीष्म ऋतू हेच योग्य आहे, असं महाजन सर लिहितात.

ऋग्वेदात ऋतूचा ‘हंगाम’ या अर्थी उल्लेख आहे, आणि वसंत, ग्रीष्म व शरद या तीनच ऋतूंचा उल्लेख आहे, अशी नोंद विश्‍वकोशातही आहे. आर्य पूर्वेकडे जात असताना ऋतूंची संख्या पाच झाली असावी. हेमंत आणि शिशिराचाही उल्लेख काही ठिकाणी आढळतो. तैतिरीयसंहितेत मात्र सहा ऋतूंचा उल्लेख आढळतो, असंही ही नोंद पुढे सांगते.

तर, ग्रीष्माच्या या सौंदर्याने कधी झपाटले कोण जाणे... बहुधा हे वारं कोकणातले. ऐन उन्हाळ्यात कोकणात झालेल्या एका फेरीत डोंगरउतारावर फुललेला पळस सारखा खुणावत होता. तापल्या उन्हात कोकणात कोसळणाऱ्या त्या सह्याद्रीच्या रांगावरच्या पिवळ्या, तपकिरी, काळसर हिरव्या गर्दीत झळाळता केशरी रंग अचानक एका वळणावर डोळ्यात भरला. मग पुढच्या प्रवासात पेटलेल्या पलित्यांसारख्या त्या केशरी पुंजक्‍यांनी पाठच धरली, सुटता सुटेचना... गाडीत बसल्याबसल्या, ती फुलं कसली असतील यावर विचार करण्याखेरीज करायला दुसरं काहीच नव्हतं. (त्यावेळी मोबाईल फोन हे ‘श्रीमंती चोचले’ होते; आणि इंटरनेट असं गावगन्ना पसरलेलं नव्हतं. माझ्या माहितीतलं इंटरनेटचं एकमेव कनेक्‍शन ही माझ्या त्यावेळच्या साहेबांची मिरासदारी होती कारण ते त्यांच्या टेबलावरच्या कॉम्प्युटरला होतं.) अस्वस्थावस्थेच स्वतःलाच विचारल्यासारखं गाडीच्या चक्रधराला विचारलं, ‘कसली फुलं ती?’ तोही पुणेकरच... ‘माहीत नाही’, हे दोन शब्द संपूर्ण शब्दकोशात कुठेही एकत्र आलेले नाहीत याची खात्री करून मगच शब्दकोश विकत घेणारं शहर हे... त्यानी गाडी चालवता चालवताच ‘कोणती हो’ करत इकडेतिकडे पाहिलं. ‘ती लाल-शेंदरी.. तीऽऽऽऽ तिकडे दिसतायत ती...’ करत मी चक्रधराला फुलं दाखवली... म्हणजे मी दाखवली असा माझा समज आहे. ‘हां ती होय... ती गुलमोहराची एक जात असतीय.’ पुढचा प्रवासभर मी गप्प!

कोकणात ज्यांना भेटायचं होतं त्यांच्या घरी गेल्यावर पत्ता लागला.. ‘तो पळस, चिक्कार फुलतो या दिवसात’.

तो एक चाळाच झाला. पुढच्या काही प्रवासांत, सकाळी उठून ‘कॉमन ट्रीज्‌’ पासून ते बीएनएसएसच्या ‘द बुक ऑफ इंडियन ट्रीज्‌’ आणि भारतातल्या झाडांवरची इतर पुस्तके वाचल्याशिवाय आपला दिवसच मावळत नसल्याच्या थाटात लोकांना मी पळस दाखवू लागलो. उत्साहाच्या भरात एकदोनदा मी शेवरी आणि काटेसावरही पळस म्हणून दाखवली. मग कधीतरी खराखरा झाडतज्ज्ञ असलेल्या एका मित्रानी मला त्या सगळ्यातला फरक समजावून सांगितला. (इन्सिडंटली, ‘द बुक ऑफ इंडियन ट्रीज्‌’च्या कव्हरवर फुललेल्या पळसाचा सुंदर फोटो आहे.) 

पुढे पळसाची ओळख आणखी घट्ट झाली. ‘कशासाठी पोटासाठी... ’ करत आगगाडी खंडाळ्याचा घाट उतरत असताना कर्जतच्या अलीकडे पळसदरी नावाचं एक छोटं स्टेशन आहे. माझ्या आजीच्या बोलण्यात या परिसराचा उल्लेख बऱ्याचदा असायचा. तिच्या सासरी-माहेरी पत्रावळ्या लावण्यासाठी पळसाची पानं तिथून यायची म्हणे. (गम्मत म्हणजे माझी आजी पळस्प्याची.) पळसाशी ओळख झाल्यावर एका मुंबई प्रवासात हा संदर्भ पुन्हा अधोरेखित झाला. पुण्यातल्या लॉ कॉलेज रस्त्यावर आणि चिंचवडला जुन्या पुणे-मुंबई हायवेवर, असे दोन एकुटवाणे उभे असलेले पळसही चांगले परिचयाचे झाले होते. ते फुलल्यावर एक-दोघा मित्रांना आवर्जून नेऊन पळस दाखवल्याचं आठवतंय.

‘या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतुनी चैतन्य गावे’ अशी रसरशीत निसर्गकविता लिहिणाऱ्या ना.धों. महानोरांचं गाव पळसखेड्याचे हा निव्वळ योगायोग नसावा, नाही का?

खूप वर्षांपूर्वी अमरावतीला जाताना बडनेऱ्याच्या अलीकडे लाल फुलांनी डवरलेली कितीकरी झाडं खूपवेळ सोबत करीत होती. या फुलांपासून कुंकू बनवतात म्हणून ही कुंकवाची झाडं, अशी माहिती बरोबर प्रवास करणाऱ्या पत्रकार मित्राकडून मिळाली. आत्ता परवा पुन्हा विदर्भातल्या एका जाणकार मित्राकडे कुंकवाच्या झाडांची चौकशी केली तर त्यानी अशी झाडंच नसतात असं छातीठोकपणे सांगितलं. वर, ‘जरा नीट आठवून बघ’, असा सल्लाही दिला. नंतर विश्‍वकोशात पळस शोधताना कुंकुम वृक्ष सापडला, पण त्याच्या फुलांपासून कुंकू बनतं की नाही कोण जाणे. पळसाच्या फुलांपासून मात्र रंग बनतात.

वैदिक काळापासून पळस जगण्याशी, त्यातल्या काही रूढी-परंपरांशी जोडला गेला आहे. वैदिक वाङ्‌मयापासून ते उत्तररामचरित, ऋतुसंहार, गीतगोविंद, प्राचीन संस्कृत साहित्यात पळसाचे अनेक संदर्भ आढळतात. लालभडक पलाशपुष्पे बुद्धाला वंदन करणाऱ्या भिक्षुसंघासारखी दिसत असल्याचा उल्लेख सातवाहनाच्या गाथा सप्तशतीत आहे. आणखी एका गाथेत अरण्यात पेटलेला वणव्याला फुललेला पळस समजल्याने अडचणीत सापडलेल्या हरणाचा उल्लेख आहे. पुराणकथांनुसार, शंकराने शापलेला अग्नी म्हणजे पळस. रानाला वणवा लागल्याचा भास उत्पन्न करणाऱ्या फुललेल्या पळसाचं वर्णन इंग्रजीतही ‘फ्लेम ऑफ द फॉरेस्ट’ असंच करतात. पोपटाच्या चोचीसारख्या किंवा मुंगसाच्या कानांसारख्या दिसणाऱ्या फुलांनी लगडणारा त्रिपर्णी पळस अस्सल भारतीय असल्याचे वनस्पती अभ्यासक सांगतात. फुललेल्या पळसावर असंख्य पक्षी येतात, असंही पक्षिप्रेमी मित्रांकडून ऐकलंय.

काटेसावर किंवा शाल्मलीची लाल फुलंही अशीच मोहात पाडणारी.

कोकणातल्या डोंगर उतारांवरचा पळस जसा मोहवतो तशीच खुणावते देशावरच्या लांबचलांब माळरानांवर टपोरी पिवळी फुलं घेऊन उभी राहणारी वेडी बाभूळ. दुपार अंगावर घेत फलटण, माण भागातून प्रवास करताना अवचित अशी फुललेली बाभूळ भेटून जाते. एरवी शहरी माणसाशी तिचं नातं म्हणजे फक्त वेळीअवेळी पायात मोडणाऱ्या काट्यांशी जोडलेलं. ‘ऋतुचक्र’तला ‘चैत्रसखा वैशाख’ लिहिताना दुर्गा भागवत म्हणतात -‘दख्खनच्या माळरानातली ती काही खुरटी, काही मोठी बाभळीची झाडे बहरून गेलेली पाहिली, की ‘वद जादुगारिणी तेव्हा मारलीस फुंकर कसली! ओसाड माळ हा सारा पुष्पांनी भरुनी गेला’ या रेंदाळकरांच्या पद्यपंक्ती माझ्या मनात घुमू लागतात. ते प्रेमगीत आहे हे मी विसरते. जणू काही माळरानच प्रफुल्ल बाभळीला उद्देशून हे उद्‌गार काढीत आहेस वाटते.’

खरंतर हा सगळा ग्रीष्मोत्सवच मोहवून टाकणारा. त्या ताम्हिणीसारखंच माझं नातं जुळलंय रोजच्या रस्त्यावरच्या बहाव्याशी. असाच एक टॅबुबिया -गोल्डन बेल -होता चतुःश्रुंगीच्या रस्त्यावर. त्याचा तो फुलून येणारा झळाळता सोनेरी पुष्पसंभार लांबूनच लक्ष वेधून घ्यायचा. आता तो रस्ता मोठा झालाय आणि टॅबुबिया नाहिये तिथे बहुधा, असलाच तर फुलत नाही आता तो पूर्वीसारखा.

बहावा अंगभर फुलं फुलायला सुरवात करतो ना तीही पाहण्यासारखी असते. उन्हं तापायला सुरवात झाली की बहावा फुलायला लागतो. फुलांचे ते लटकते हार दिसायला सुरवात होते. हार वाढत जातात आणि एक दिवस एकदम ते झाड सोन्याची झळाळी घेऊन सामोरं येतं. भुईतनं उगवलेल्या त्या सुवर्णवृक्षावर नावालाही हिरवा रंग उरलेला नसतो. बहाव्याच्या फुलांना वास नाही, पण त्यांची ती झळाळी तापल्या उन्हातही सुखावून जाते. ‘बहाव्याच्या फुलांच्या सौंदर्याची मला अपार आसक्ती वाटते... त्यांचे घोस झाडावर लोंबताना पाहिले, की निसर्गाच्या पिवळ्या रंगाचा सारा मुलायमपणा त्या झाडावर साकार झाल्यासारखा वाटतो...,’ असं दुर्गा भागवत ‘ऋतुचक्र’मध्ये म्हणतात.

असा वेड लागल्यासारखा फुललेल्या ऋग्वेदातल्या या राजवृक्षाला पाहताक्षणी दाद गेली नाही तर पाहणाऱ्याला काही दिसलंच नाही, असं खुशाल समजावं.

बहावा बहरला की दीडएक महिन्यात पाऊस येतो अशी एक पारंपरिक समजूत आहे. पण हल्ली पाऊस बहाव्याचं ऐकतोच असं नाही! 

गदिमांचं एक छान गाणं आहे. कुठल्यातरी सिनेमासाठी त्यांनी मुळात ते लिहिलं; पण त्या सिनेमावाल्यांनी ते घेतलंच नाही. नंतर खूप वर्षांनी दुसऱ्याच एका सिनेमात घेतलं ते, अशी काहीतरी गोष्ट आहे त्या गाण्याची. गाणं असं आहे, ‘हळूवार नखलिले फूल। त्यातून उसळली भूल ।। मी वेडी जाणत नव्हते । ते फूल अफूचे होते ।।’ ग्रीष्मातलं प्रत्येक फूल हे असं ‘अफू’चं असतं, त्यांच्या रंगांतून, गंधातून आसमंताला भुरळ घालणारी भूल उसळत असते.

म्हणजे महात्मा गांधींचं मुंबईतलं निवासस्थान. गावदेवी भागात हे मणीभवन ज्या रस्त्यावर आहे, त्या रस्त्याचं नाव आहे लॅबर्नम रोड. आज त्या रस्त्यावर बहाव्याऐवजी पेल्टोफोरमची पिवळ्या रंगाच्या आणखी एका जातकुळीशी नातं सांगणाऱ्या फुलांची झाडं उभी आहेत. पण त्या रस्त्याने राष्ट्रपित्याबरोबर आरग्वधाची अमलताश, गोल्डन शॉवर, बहाव्याचीही आठवण जपलीय.

उन्हाळाभर साथ देणारा आणखी एक सोबती म्हणजे गुलमोहर. लाल चुटूक ते पिवळसर केशरी रंगापर्यंतच्या अनेक छटांच्या फुलांची छत्री घेऊन गुलमोहर उभा असतो रस्त्याकडेला, बागांमध्ये, टेकड्या चढणाऱ्या पायवाटांवर, क्वचित एखाद्या माळरानावर एकुटवाणा.

अगदी सवयीचा झालेली गुलमोहर मूळचा मादागास्कर मधला (तेच न्यूयॉर्कमधल्या सेंट्रल पार्क झू मधून थेट आफ्रिकेत पाठवलेल्या ॲलेक्‍स सिंह, मार्टी झेब्रा, मेलमन जिराफ आणि ग्लोरिया हिप्पोच्या सिनेमातलं मादागास्कर). ब्रिटिश आणि पोर्तुगीजांबरोबर तो आधी मॉरिशसमध्ये आला, आणि तिथून थेट मुंबईत. गुलमोहर फुलल्याची भारतातली पहिली नोंद आहे, मुंबईच्या शिवडीतली १८४० मधली.

बहाव्याच्याच कुळातला गुलमोहर पहिल्यांदा भेटला तो लहान शाळेत -म्हणजे आजच्या भाषेत प्राथमिक शाळेत. (कागदोपत्री आमची शाळा प्राथमिक आणि माध्यमिक असली तरी बोली मराठीत ती लहान नूमवि आणि मोठी नूमवि अशीच होती. आज हे उल्लेख जास्त जिव्हाळ्याचा वाटतो.) फुलांच्या पाकळ्या आणि त्यातल्या नख्यांच्या अंगठ्या करणं हा त्यावेळचा एक खेळ होता. आणि फुलातलं पुंकेसर दाताखाली चावलं की एक हलकीशी आंबट चव लागायची.  
वीस-बावीस वर्षांपूर्वी पुणे -कोल्हापूर रस्त्यावरचे बरेचसे गुलमोहर ओळखीचे झाले होते. प्रत्येक झाड पाहताना आपण घराच्या किती जवळ आलोय याचा नकळत हिशेब व्हायचा.

***

 महाष्ट्राचं राज्यफूल असणारी ‘प्राइड ऑफ इंडिया’ ताम्हण किंवा जारूल, तो पिवळाजर्द बहावा, गुलमोहराची ती लाल छत्री, दूरवर जंगलात कुठेतरी फुललेला पळस, मुक्तहस्तानी धुंद करणारा सुगंध वाटणारा मोगरा, रातराणी, मधुमालती किंवा अगदी निर्गंध बोगनवेल या सगळ्या ग्रीष्मसख्यांनी मला एक निष्काम कर्मयोग शिकवला, असं मला नेहमी वाटतं. 

हिंदी कवी नीरज यांची एक रचना आहे - 
नंगी हरेक शाख, हरेक फूल है यतीम, फिर भी पलाश सुखी है इस तेज धूप में। 
कोणी पाहो, न पाहो, कोणी कौतुक करो न करो; आपण जिथे उभे आहोत तिथे आपली वेळ आली की आपण फुलायचं, जे आपल्याजवळ आहे ते दोन्ही हातांनी मुक्तपणे उधळायचं, निसर्गातलं आपलं काम आपण करायचं. आणि ते ही वेळेवर... कळतं, पण दर वेळेला वळतंच असं नाही! 

फोटो फीचर

संबंधित बातम्या