खिळवून ठेवणारं रहस्य...

माधव गोखले
सोमवार, 28 जून 2021

पुस्तकातून पडद्यावर

गेली आठ दशकं, जगभरातल्या दर्दी वाचकांच्या ‘सर्वोत्कृष्ट रहस्यकथां’च्या यादीतलं ‘मर्डर ऑन द ओरिएन्ट एक्सप्रेस’चं स्थान आजवर ढळलेलं नाही. पहिल्या चित्रपटानंतर तब्बल चाळीस वर्षांनंतर त्याच कथेवर पुन्हा चित्रपट काढणे आणि कथेचा शेवट माहिती असणाऱ्या असंख्य दर्शकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवणे, हे आव्हानात्मकच. 

मूळ कथेला सुरुवात होते ती सिरीयातल्या अलेप्पो रेल्वे स्थानकात उभ्या असणाऱ्या तौरस एक्स्प्रेसपासून आणि कथा प्रत्यक्ष घडते ती युरोपच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत धावणाऱ्या ओरिएन्ट एक्स्प्रेसमध्ये; खरंतर त्या गाडीच्या एक-दोन डब्यातच.

इस्तंबूलपासून ते फ्रान्समधल्या कॅलेपर्यंत म्हणजे युरोपच्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत धावणारी ओरिएन्ट एक्स्प्रेस एका मध्यरात्री हिमप्रपातामुळे एका निर्जन ठिकाणी अडकून पडते. अडकून पडलेल्या प्रवाशांपैकी सॅम्युएल रॅचेट या अमेरिकी प्रवाशाचा खून झाल्याचे सकाळी लक्षात येते. योगायोगाने विख्यात बेल्जियन गुप्तहेर हर्क्युल पायरोही याच गाडीतून प्रवास करीत असतात. त्यांचा मित्राच्या, रेल्वे कंपनीचा संचालक असणाऱ्या एम. ब्योकच्या विनंतीवरून पायरो या खुनाचा छडा लावण्याची कामगिरी स्वीकारतो. आपल्या जिवाला धोका असल्याने आपल्यासाठी काम करण्याची ऑफर रॅचेटने खुनाच्या आदल्याच दिवशी पायरोला दिलेली असते. मृतदेहाची तपासणी करताना पायरोला एका जुन्या पत्राचा एक तुकडा सापडतो. त्यावरून रॅचेट म्हणजेच लॅन्फ्रॅन्को कॅसेटी नावाचा गुन्हेगार असल्याचे उघड होते. कॅसेटीवर ब्रिटिश सैन्यातल्या कर्नल आर्मस्ट्राँग यांच्या लहान मुलीचे अपहरण करून खून केल्याचा आरोप असतो. रॅचेटचा खुनी प्रवाशांपैकीच कोणीतरी असणार आणि पळून जायला फारसा वाव नसल्याने तो अजूनही ओरिएन्ट एक्स्प्रेसमध्येच असणार अशी खूणगाठ बांधून पायरोच्या तपासाला सुरुवात होते. संशयाची सुई रोखलेली असते गाडीतला फ्रेंच कंडक्टर पियरे मिशेल आणि अन्य अकरा सहप्रवासी अशा बाराजणांवर. पायरोच्या सगळ्या सहप्रवाशांची पार्श्वभूमीही वेगवेगळी आहे. त्यांच्यात ब्रिटिश लष्करातला अधिकारी आहे; एक जरा शिष्ठच रशियन राजकन्या आहे; एक नवविवाहित काउन्ट आणि काउन्टेस आहे; एक स्वीडिश आया आहे. ‘आय अॅम प्रॉबेबली द ग्रेट डिटेक्टिव्ह इन द वर्ल्ड’, अशी स्वतःची ओळख करून देणाऱ्या पायरोसमोर आव्हान असतं ते या बारा संशयितांमधून नेमका खुनी शोधण्याचं. पायरोची भिस्त असते ती खुनाच्या ठिकाणी मिळालेला एक हातरुमाल, एक पाइप क्लीनर, कंडक्टरचा गणवेष, कॅसेटीचं तुटलेलं मनगटी घड्याळ आणि सर्व संशयितांच्या मुलाखतींवर. 
अखेरीस.... वेट......

अगाथा ख्रिस्ती यांच्या ‘माउसट्रॅप’ या नाटकापासून चालत आलेलं, शेवटी काय होतं हे न सांगण्याचं पथ्य मलाही पाळावं लागणार. अर्थात तुमच्यापैकी अनेकांना शेवट माहिती असणार, अजूनही ज्यांना तो माहिती नाही त्यांनी ह्या उत्कंठावर्धक कहाणीवरच्या दोन चित्रपटांपैकी कोणताही पहावा किंवा दोन्ही पहावेत.

‘रहस्यकथांची राणी’ हे डेम अगाथा ख्रिस्ती यांचं बिरुद सार्थ ठरवत, ‘हूडनइट’ कुळातल्या त्यांच्या कथा गेली शंभर वर्षे वाचनवेड्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. त्यांच्या नाटकांना, त्यांच्या कथांवर बेतलेल्या चित्रपटांना आणि दूरचित्रवाणी मालिकांनाही रसिकांकडून रहस्यकादंबऱ्यांइतकाच भरभरून प्रतिसाद मिळत गेला. ‘मर्डर ऑन द ओरिएन्ट एक्स्प्रेस’ हे त्याचं एक उदाहरण.

दंतकथा बनून राहिलेल्या ही लेखिकाही दंतकथेत शोभावं असंच आयुष्य जगली. आजही सर्वाधिक भाषांतरे झालेल्या लेखकांच्या यादीत अगाथा यांचच नाव पहिल्या क्रमांकावर आहे -विल्यम शेक्सपियरच्याही वर. त्यांच्या नावावर गुप्तहेरकथा, कादंबऱ्या, नाटकं अशी त्र्याऐंशी पुस्तकं आहेत, आणि त्यांच्या या पुस्तकांच्या आजवर खपलेल्या प्रतींची संख्या तीस कोटींच्या वर आहे. 

चित्रपटांविषयी फार ममत्व नसणाऱ्या अगाथा यांच्या कथांवर इंग्लंड, अमेरिकेबरोबरच जर्मनी, फ्रान्स, भारत आणि रशियात मिळून आतापर्यंत जवळजवळ सेहेचाळीस चित्रपट झाले आहेत. नभोवाणी आणि दूरचित्रवाणी मालिका, ग्राफिक नॉव्हेल, व्हीडिओ गेम आणि अॅनिमेशनपटांची एकत्रित संख्यादेखील शेकड्यांच्या घरात आहे.

एखाद्या रहस्यकथेवर चित्रपट किंवा नाटक करणे हेच मुळात मला अत्यंत आव्हानात्मक वाटतं. कारण उघड आहे. रहस्यभेदाचा क्षण जर फसला तर तो चित्रपट किंवा ते नाटक करणाऱ्यांच्या आणि बघणाऱ्यांच्या अशा दोघांच्याही हातातून निसटतं आणि मग त्याचं नुसतंच घरंगळत जाणं बघत राहण्याखेरीज पर्याय नसतो.

‘मर्डर ऑन द ओरिएन्ट एक्स्प्रेस हे असंच एक आव्हान. ही रहस्यकथा प्रसिद्ध झाली १९३४मध्ये. ओरिएन्ट एक्स्प्रेस बर्फात अडकण्यापासून ते रहस्याच्या मुळाशी असणाऱ्या प्रकरणापर्यंत वास्तवाशी संबंध असणाऱ्या अनेक घटनांसह ही कथा आकार घेते. ‘श्रीमती ख्रिस्ती एक अत्यंत अशक्य कथा वास्तवाच्या पातळीवर आणतात, वाचकांना मंत्रमुग्ध करून शेवटपर्यंत वेगवेगळे अंदाज बांधायला लावून गुंतवून ठेवतात,’ अशी टिपणी लंडनच्या ‘द टाइम्स लिटररी सप्लिमेंट’ने पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीचे स्वागत करताना केली होती. तेव्हापासून, म्हणजे गेली आठ दशकं, जगभरातल्या दर्दी वाचकांच्या ‘सर्वोत्कृष्ट रहस्यकथांच्या’ यादीतलं या कथेचं स्थान आजवर ढळलेलं नाही. अगाथा यांच्या अन्य कथांप्रमाणेच ‘मर्डर ऑन द ओरिएन्ट एक्सप्रेस’ही अन्य भाषांमध्ये भाषांतरित झाली आहे. 

कथा प्रसिद्ध झाल्यानंतर तब्बल चाळीस वर्षांनी इतक्या वाचल्या गेलेल्या कथेवर चित्रपट काढणे आणि कथेचा शेवट माहिती असणाऱ्या असंख्य दर्शकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवणे, हे आव्हानात्मकच. जॉन ब्रेबॉर्न आणि रिचर्ड गुडविन या ब्रिटिश निर्मात्यांसह सिडनी लूमेट या अमेरिकी दिग्दर्शकाने हे आव्हान पेलले. अल्बर्ट फिनी, इनग्रीड बर्गमन, जॉन गिलगुड, सीन कॉनरी, अॅन्थनी पर्किन्स अशा त्यावेळच्या तगड्या अभिनेत्यांना घेऊन लूमेटनी १९७४मध्ये ‘मर्डर ऑन द ओरिएन्ट एक्स्प्रेस सादर केला. 
त्यानंतर त्रेचाळीस वर्षांनी, २०१७मध्ये, केनेथ ब्रेना या कसलेल्या अभिनेता -निर्मात्याने हे आव्हान पुन्हा एकदा स्वीकारले आणि ‘मर्डर ऑन द ओरिएन्ट एक्स्प्रेस’च्या मूळ ढाच्याला धक्का न लावता पण काही बदलांसह रुपेरी पडद्यावर आणली. ब्रेना यांच्याबरोबर टॉम बॅटमन, विल्यम डाफो, ज्यूडी डेन्च, जॉनी डेप, ऑलिव्हिया कोलमन असे बिनीचे अभिनेते पाहायला मिळतात. 

या दोन चित्रपटांदरम्यान २०१०मध्ये अगाथा ख्रिस्ती यांच्या साहित्यावरच्या ‘पायरो’ या दूरचित्रवाणी मालिकेच्या ६४व्या भागात ‘मर्डर ऑन द ओरिएन्ट एक्स्प्रेस’ पुन्हा प्रेक्षकांसमोर सादर केली होती.

लूमेटच्या चित्रपटाचा प्रवासही रंजक आहे. त्यांच्या साहित्यावर आधी झालेल्या काही चित्रपटांच्या हाताळणीवर अगाथा अत्यंत नाराज होत्या. त्यामुळे यापुढे चित्रपटांचे हक्क द्यायचेच नाहीत असंच त्यांनी ठरवलं होतं. ब्रेबॉर्न यांच्या विनंत्यांना त्यामुळे अगाथांनी सुरुवातीला दादच दिली नाही. ‘मर्डर ऑन द ओरिएन्ट एक्सप्रेस’चे चित्रपटाचे हक्क मिळवायचेच असा चंग बांधलेल्या ब्रेबॉर्न यांना मदत झाली ती त्यांच्या सासऱ्यांची, लॉर्ड लुइस माउन्टबॅटन, यांची. माउन्टबॅटननी जावयासाठी अगाथांकडे शब्द टाकला. ‘रोमिओ अॅण्ड ज्युलिएट’ आणि ‘द टेल्स ऑफ बॅट्रिक्स पॉटर’ हे ब्रेबॉर्न यांचे आधीचे चित्रपट अगाथा यांना आवडले होते, त्याला सासऱ्यांच्या शब्दाची जोड मिळाली, असाही एक उल्लेख वाचायला मिळतो. अत्यंत गुंतागुंताची ही कथा सादर करताना ब्रेबॉर्न आणि लूमेटनी तो काळ उभा करण्यावर विशेष भर दिला होता. चित्रपटासाठी खऱ्याखुऱ्या ओरिएन्ट एक्स्प्रेसचे डबे वापरण्यात आले होते, असे अगाथा ख्रिस्ती यांच्या कथांवर १९९३पर्यंत प्रदर्शित झालेले चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांची विस्तृत माहिती संकलित करणाऱ्या स्कॉट पामर यांनी नोंदवले आहे. 

एखाद्या कथेवर किंवा कादंबरीवर चित्रपट होत असताना सादरीकरणात दिग्दर्शकाच्या आकलनाप्रमाणे काही बदल होत असतात. दोन्ही ‘मर्डर ऑन द ओरिएन्ट एक्स्प्रेस’मध्ये असे बदल आहेत. मात्र त्यातल्या त्यात लूमेट मूळ पुस्तकाच्या बरेच जवळ जातात. मूळ कथेत आर्मस्ट्राँग प्रकरणाचा संदर्भ तपास सुरू झाल्यावर येत असला तरी लूमेटचा चित्रपट सुरू होतो तो आर्मस्ट्राँग अपहरण प्रकरणाच्या उल्लेखानेच, तर ब्रेना यांच्या चित्रपटात पायरोचा आर्मस्ट्राँग प्रकरणाशी वैयक्तिक संबंध आहे. चित्रपटात शेवटी पायरोने केलेल्या खुलाशाप्रमाणे आर्मस्ट्राँगने पत्र पाठवून पायरोची मदत मागितलेली असते, पण ते पत्र पायरोच्या हातात पडेपर्यंत खूप उशीर झालेला असतो. (इथे अगाथा यांच्या ‘द मर्डर ऑन द लिंक्स’ची आठवण होते.) आपल्या अॅक्शनपॅक्ड आवृत्तीत दिग्दर्शक ब्रेना यांनीच पायरोची व्यक्तिरेखा साकारली आहे. ब्रेना सुरुवातच पायरोच्या एका यशस्वी तपासाने करतात. या चित्रपटात अनेक बदल अाहेत, मात्र तपासादरम्यानचे पाठलागाचे दृश्य अकारणच येते असे मत अनेक चित्रपट समीक्षकांनी व्यक्त केले आहे. ब्रेना यांनी मूळ कथेतली काही पात्रही बदलली आहेत. मूळ कथेतल्या ग्रेटा ओहल्सन या डेझी आर्मस्ट्राँगच्या स्वीडिश आया ऐवजी पिलार इस्ट्राव्हॅडोस ही स्पॅनिश आया येते. ब्रेनांचा कर्नल अर्बथनॉट हे मूळ कथेतल्या आणि डॉ. काँस्टँटाइन या व्यक्तिरेखांचं मिश्रण आहे. अँटोनिओ फोस्कॅरेली ह्या इटालियन प्रवाशाऐवजी या चित्रपटात बिनियामिनो मार्क्विझ आता मोटारी विकणारा आर्मस्ट्राँगचा माजी चालक येतो. 
२०१०च्या ‘मर्डर ऑन द ओरिएन्ट एक्स्प्रेस’मधले अनेक प्रसंग मात्र मूळ कथेत नाहीत, अशी एक नोंद वाचताना सापडते. या मालिकेत पायरोच्या भूमिकेत अभिनेता डेव्हिड सुचेट आहेत.

‘मर्डर ऑन द ओरिएन्ट एक्स्प्रेस’च्या रुपेरी पडद्यावरच्या या तिन्ही आवृत्त्यांमध्ये पायरोच्या स्वभावाचे वेगवेगळे कंगोरे दिसतात. विशेषत्वाने लक्षात येते ती निष्कर्ष मांडण्याची पायरोची पद्धत. तसाच लक्षात रहातो तो पायरोचा लूक, विशेषतः त्याच्या मिशा.

आपल्या आधीच्या कथांवरील काही चित्रपटांबद्दल नाराज असणाऱ्या अगाथा यांना ‘मर्डर ऑन द ओरिएन्ट एक्स्प्रेस’ भावला होता. पण त्यातल्या पायरोच्या मिशांबद्दल मात्र त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. ‘माझ्या गुप्तहेराच्या मिशा सगळ्या इंग्लंडमधल्या सर्वोत्तम मिशा आहेत, असं मी लिहिलं होतं. पण चित्रपटात मात्र त्या तशा नाहीत, हे काही बरं नाही. त्याच्या मिशा सर्वोत्तम का असू नयेत?’ अशी टिपणी त्यांनी केल्याचे सांगितले जाते. याउलट ब्रेना यांच्या पायरोच्या मिशा मात्र जरा अधिकच भरघोस आहेत.

ब्रेबॉर्न आणि लूमेट यांच्या ‘मर्डर ऑन द ओरिएन्ट एक्स्प्रेस’ प्रमाणेच ब्रेना यांचा ‘मर्डर ऑन द ओरिएन्ट एक्स्प्रेस’ही चित्ररसिकांच्या पसंतीस उतरला, पण दोन चित्रपटांची तुलना करताना समीक्षक मात्र ब्रेबॉर्न आणि लूमेट यांना थोडे अधिक गुण देतात.

‘मर्डर ऑन द ओरिएन्ट एक्स्प्रेस’च्या पहिल्या आवृत्तीला सहा अॅकॅडमी अवॉर्ड मिळाली होती. पायरोची भूमिका साकारणाऱ्या अल्बर्ट फिनी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे तर इनग्रीड बर्गमन यांना सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचे पारितोषिक मिळाले होते. याशिवाय या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट छायाचित्रण, सर्वोत्कृष्ट वेशभूषा आणि सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीतासाठीही पारितोषिके पटकावली होती. त्याच वर्षी म्हणजे १९७५मध्ये बाफ्टा अवार्डमध्येही या चित्रपटाने बाजी मारली. फिनीने पुन्हा सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून सन्मान मिळवला, त्यांच्या बरोबर इनग्रीड बर्गमन आणि जॉन गिलगुड यांनाही सर्वोत्कृष्ट सहायक अभिनयासाठी गौरवण्यात आले. सर्वोत्कृष्ट छायाचित्रण, सर्वोत्कृष्ट वेशभूषेबरोबर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, संपादन आणि पार्श्वसंगीतासाठीची पारितोषिके आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पारितोषिकही ‘मर्डर ऑन द ओरिएन्ट एक्स्प्रेसने मिळवले. सर्वोत्कृष्ट संगीतासाठीचे १९७६चे ग्रॅमी अवॉर्डही या चित्रपटाला मिळाले होते. सॅटेलाइट अवॉर्डमधील २००५चे बेस्ट क्लासिक डीव्हीडी अवॉर्डदेखील ब्रेबॉर्न आणि लूमेट यांच्या चित्रपटाला देण्यात आले.

संबंधित बातम्या