आशेचे मोल

माधव गोखले
सोमवार, 29 नोव्हेंबर 2021

पुस्तकातून पडद्यावर

माहितीच्या जाळ्यात जगातल्या सर्वोत्तम चित्रपटांची यादी शोधण्याचा प्रयत्न करा. याद्या कोणाच्याही असोत, सर्वोत्तम चित्रपटांच्या निम्म्यापेक्षा जास्त याद्यांमध्ये सापडणारे नाव म्हणजे ‘शॉशँक रिडेम्प्शन!’ टिम रॉबिन्स आणि मॉर्गन फ्रीमन या अभिनेत्यांनी अजरामर करून ठेवलेली मानवी भावनांपासून ते जगण्याच्या तत्त्वज्ञानापर्यंत अनेकविध पदर असलेली एक तुरुंग कहाणी.

‘शॉशँक रिडेम्प्शन’  रिलीज होऊन आता पाव शतकाहून अधिक काळ लोटलाय. प्रदर्शनाच्या रौप्यमहोत्सवाच्या निमित्तानं दोन वर्षांपूर्वी हा चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित होऊन गेला आणि चित्ररसिकांच्या तेव्हाच्या पिढीसारखाच आताच्या पिढीनंही तो पुन्हा एकदा डोक्यावर घेतला. पण अठ्ठावीस वर्षांपूर्वी, १९९४मध्ये, चित्ररसिकांकडून चित्रपटाचं कौतुक झालं असलं, तरी सुरुवातीला तिकीटबारीवर तर तो साफ आपटलाच होता. १९९५च्या ऑस्कर पुरस्कारांच्या स्पर्धेत, सर्वोत्तम चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनय आणि सर्वोत्कृष्ट संगीतासाठीच्या नामांकनासह, सात नामांकने मिळूनही ‘शॉशँक रिडेम्प्शन’च्या वाट्याला एकही ऑस्कर आलं नव्हतं. टॉम हॅन्क्सच्या ‘फॉरेस्ट गम्प’ने त्यावर्षी ऑस्कर पुरस्कारांवर मोहोर उठवली होता. टॉम हॅन्क्स आणि ‘शॉशँक रिडेम्प्शन’ यांचंही एक रंजक नातं आहे, पण त्याबद्दल नंतर. त्यानंतरच्या काळात अमेरिकन सोसायटी ऑफ सिनेमॅटोग्राफर्सचं अॅवार्ड फॉर आउटस्टँडिंग अचिव्हमेंट इन थिएट्रीकल रिलीज (१९९५) आणि जपान अॅकॅडमीचं प्राइझ फॉर आउटस्टँडिंग फॉरेन लँग्वेज फिल्म (१९९६) अशी काही मोजकीच अॅवॉर्ड या चित्रपटाच्या खात्यात जमा झाली. 

भयकथांचा ‘बादशहा’, किंग ऑफ हॉरर, म्हणून इंग्रजी साहित्यविश्वात प्रसिद्ध असणाऱ्या स्टीफन किंग या अमेरिकी लेखकाच्या ‘रिटा हॅवर्थ ॲण्ड शॉशँक रिडेम्प्शन’ या कादंबरिकेचं हे चित्ररूप. ‘डिफरंट सिझन्स’ या १९८२साली प्रसिद्ध झालेल्या कथासंग्रहात ही कादंबरिका समाविष्ट होती. अजरामर चित्रकृती ठरलेल्या या चित्रपटाची पटकथा लिहिली चित्रपटाचा दिग्दर्शक रँक डॅराबाँट याने. आजदेखील जगभरातल्या अनेक चित्रपट अभ्यासक्रमांचा भाग असणारी ही पटकथा, अनेक चित्रपट जाणकारांच्या मते, स्टीफन किंगची लघुकादंबरी पडद्यावर अधिक प्रभावीपणे सादर करते, आणि हेच त्यांच्या मते पटकथेचं एक बलस्थानही आहे.

काळ १९४७चा. व्यवसायिक बँकर असणाऱ्या अँड्य्रू, ॲन्डी, ड्यूफ्रेस्नची रवानगी शॉशँकच्या कारागृहात झाली आहे. ॲन्डीविरूद्ध त्याची अप्रामाणिक बायको आणि तिच्या प्रियकराचा खून केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने त्याला दोन जन्मठेपा भोगायच्या आहेत. तुरुंगाच्या चार भिंतीतही डोळ्यात एक विलक्षण चमक घेऊन वावरणारा ॲन्डी टिम रॉबिन्सनी अत्यंत ताकदीनं उभा केला आहे. अमेरिकेच्या मेन राज्यात देहदंडाची शिक्षा नाही, त्यामुळे जन्मठेपेवर जाणाऱ्या प्रत्येकासाठी शॉशँक हा जगाचा आणि जगण्याचाही शेवट आहे. इथे येणाऱ्या प्रत्येकाला शॉशँक जणू गिळून टाकत असतो. शॉशँकमध्ये पाऊल टाकणाऱ्या बहुतेक जणांचा प्रवास संपतो तो तुरुंगाच्याच आवारात असलेल्या दफनभूमीत. इथून आता आपण आपल्या मुलामाणसांत जात नाही याची खात्री झालेल्या बंद्यांनी मग शॉशँकची स्वतःची अशी एक खास जीवनशैली बनवलीय, त्या जगण्याचंही एक तत्त्वज्ञान बनवलंय.

निरपराधी असल्याची मनातली भावना मरू न देण्याच्या प्रयत्नात असलेल्या अॅन्डीला तुरुंगाच्या त्या भावनाहीन दगडी वातावरणात एक मित्र मिळतो. एलिस बॉयड रेडिंग ‘रेड’. स्वतःच्या बायकोच्या विम्याचे पैसे लाटण्यासाठी तिचा अपघात घडवून आणण्याच्या प्रयत्नात रेडच्या हातून तीन खून झाल्याने त्याच्या कपाळी तीन जन्मठेपा आहेत, आणि त्या त्याला एकामागोमाग एक भोगायच्या आहेत. चाळीस वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर कैद्यांना पॅरोल मंजूर करणाऱ्या पॅनेलला तिसऱ्यांदा सामोरे जाताना, ‘रिहॅबिलिटेटेड? आय डोन्ट नो व्हॉट डझ दॅट मिन...’ असं म्हणताना रेडच्या मनातली खळबळ चेहऱ्यावर न उमटू देण्याची मॉर्गन फ्रीमननी साधलेली किमया ही केवळ प्रत्यक्ष पडद्यावर अनुभवण्याचीच चीज ठरते.

कथेच्या ओघात असाच ब्रुक्स हॅटलन भेटतो. शॉशँकची लायब्ररी, त्या लायब्ररीतली पुस्तकं, आणि बाहेरच्या आकाशाचा एक चतकोर तुकडा दाखवणाऱ्या एका झरोक्यातून येणारा एक कावळा. हे त्याचं जग आहे. ते त्याच्या इतकं अंगवळणी पडलंय की त्याच्या या जगातून त्याची सुटका होणं हा त्याच्या आयुष्यातला मोठा भूकंप आहे.

लघुकादंबरी सुरू होते ती रेडच्या स्वतःबद्दलच्या निवेदनाने. ती पुढे जाते तीदेखील त्याच्या निवेदनातूनच. चित्रपटाची सुरुवात होते ती अत्यंत विस्कटलेल्या अवस्थेत त्याच्या गाडीमध्ये बसलेल्या ॲन्डीपासून. लघुकादंबरी आणि चित्रपटातलं एक साम्य म्हणजे माणसं आणि त्यांची मनं उलगडणारे संवाद. त्याहीपेक्षा महत्त्वाचं साम्य म्हणजे कथाकार स्टीफन किंग आणि पटकथाकार रँक डॅराबाँट -दोघांच्याही कलाकृती पहिल्या क्षणापासून रसिकांचा ताबा घेतात. 

‘शॉशँक रिडेम्प्शन’ आपल्यासमोर माणसं ठेवतो. ती येतात, त्यांच्या बऱ्यावाईट भावना घेऊन येतात; पण चित्रपट आणि मूळ कथाही फिरते ती ॲन्डी आणि रेड यांच्याभोवती. ॲन्डी  शॉशँकला आल्यापासून त्यांची दोस्ती जमलीय. एका अनामिक कळवळ्यानी रेडनी ॲन्डीला ‘आपलं’ मानलंय; तुरुंगातल्या ‘सिस्टर्स गँगला’ ॲन्डीपासून लांब ठेवायचंय. खरंतर पन्नाशी उलटलेला रेड तुरुंगातला फिक्सर आहे. तिथे शिक्षा भोगणाऱ्या बंद्यांना लागणाऱ्या अनेक मौल्यवान चिजा काही रकमेच्या मोबदल्यात मिळवून देणारा फिक्सर. रेडच्या मेन्यूकार्डावर अगदी दाढीच्या ब्लेडपासून ते सिगारेटींपर्यंत वस्तू आहेतच, पुस्तकंही आहेत, व्हॅलेंटाइन डेची चॉकलेटस् आहेत आणि इतर काही ‘खास वस्तू’ही आहेत. एकदा तर त्यानी कैद्यांच्या एका पार्टीत  सिनेमाचा शोही ऑर्गनाईझ केला आहे. त्यासाठी नंतर रेडला आठवडाभर ‘होल’मध्ये, अंधारकोठडीतही घालवायला लागला, पण रेडला त्याची फिकीर नाही. या सगळ्या उद्योगांमधून त्याला पैसा कमवायचाय असंही नाही. त्यामागे त्याचंही एक कारण आहे. शॉशँकच्या भिंतींआडही रेडची एक प्रतिष्ठा आहे, आणि त्याला जपायचीय. तो फक्त बंदुका आणि अमली पदार्थाचा व्यापार करत नाही. कोणी कोणाचा जीव घेणं, अगदी स्वतःचाही, हे नीतिमत्तेच्या त्याच्या चौकटीत बसत नाही.

निरपराध असूनही शॉशँकमध्ये यावे लागलेल्या ॲन्डीला त्याचा एक पोक्त सल्ला आहे, ‘‘दीज वॉल्स आर फनी... सुरुवातीला या भिंतींबद्दल तिरस्कार वाटतो. मग त्या आपल्याशा वाटतात. शेवटी शेवटी तर जगण्याचा आधारच बनतात. भिंतींशी दोस्ती कर...’’

शॉशँकचं वास्तव स्वीकारत असताना ॲन्डीला विरंगुळा सापडतो तुरुंगाच्या आवारात सापडणाऱ्या चकचकीत दगडांच्या रूपानं. बँकर असल्याने आकड्यांच्या खेळात तो प्रवीण असला तरी त्याला दगडाबिगडांमध्येही रस आहे, हातात आणि मनातही कला आहे. एके दिवशी ॲन्डी रेडकडे त्याची पहिली मागणी नोंदवतो. त्याला एक छिन्नी हवीय. तुरुंगाच्या आवारात सापडलेल्या दगडांना आकार देण्यासाठी. रेड त्याची मागणी पुरी करतो.

शॉशँकचा वॉर्डन सॅम्युअल नॉर्टनच्या (बॉब गुन्टन) नजरेत ॲन्डी येतो तो कर वाचविण्याच्या एका सल्ल्यामुळे. एका बाजूला अत्यंत सश्रद्ध असणारा नॉर्टन दुसऱ्या बाजूला तितकाच लोभी, क्रूर आणि विधिनिषेधशून्य आहे. ॲन्डीच्या सल्ल्यामुळे प्रिझन गार्डस्चा प्रमुख असणाऱ्या बायरन हॅडलीला मिळालेल्या वडिलोपार्जित इस्टेटीचा मोठा वाटा करापोटी जाण्यापासून वाचल्याचं समजल्यावर नॉर्टननी अत्यंत धूर्तपणे ॲन्डीचा वापर करून घ्यायचं ठरवलंय. आता ॲन्डीकडे आणखी एक रोल आलाय, कैदी आणि तुरुंग कर्मचाऱ्यांचा टॅक्स कन्सल्टंटचा. नॉर्टननी त्याला लायब्ररीत बसायला जागाही दिलीय.  

इथे ॲन्डीनी आणखी एक उद्योग आरंभलाय. शॉशँकच्या लायब्ररीला काही पैसे मिळवून द्यावेत म्हणून त्यानी स्टेट सिनेटवर पत्रांचा मारा सुरू केला. सहा वर्षं दर आठवड्याला एक पत्र लिहिल्यानंतर सिनेटनी दोनशे डॉलरचा एक चेक पाठवून, ॲन्डीला ‘आता बास’ अशी तंबी दिलीय. त्याला उत्तर म्हणून महाचिवट ॲन्डीनी सिनेटला दर आठवड्याला दोन पत्र पाठवायला सुरुवात केलीय. उत्तरादाखल आलेल्या रद्दीच्या एका भल्यामोठ्या ढिगात ॲन्डीच्या हाताला लागतो मोझार्टचा ‘मॅरेज ऑफ फिगारो’. मग आणखी एक भलतंच धाडस. पहारेकऱ्याला ऑफिसात कोंडून तुरुंगाच्या पब्लिक अॅड्रेस सिस्टिमवरून आख्ख्या तुरुंगाला मोझार्ट ऐकवण्याचं. शॉशँकच्या मुर्दाड भिंतीवर कोरड्या, करड्या शब्दांऐवजी मोझार्टची सुरावट उतरत असताना शॉशँकही क्षणभर स्तब्ध झाल्यासारखं दिसतं. परिणामी ॲन्डीच्या वाट्याला येते वीस दिवसांची अंधारकोठडी. ॲन्डीची त्यावरची प्रतिक्रिया आहे -माझा आजवरचा सर्वोत्तम वेळ तिथं गेलाय. मोझार्ट माझ्यासोबत होता...

चित्रपट बघत असताना एकदा ॲन्डी रेडकडं भलतीच मागणी नोंदवतो, रिटा हेवर्थच्या एका मोठ्या पोस्टरची. मग पाठोपाठ ॲन्डीच्या कोठडीतल्या भिंतीवर रॅकेल वेल्श आणि लिंडा रॉन्डस्टॅड्टचीही पोस्टर लागतात.

शॉशँकमध्ये ॲन्डीपेक्षा जास्त पावसाळे बघितलेल्या रेडला ॲन्डीच्या आशावाद टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नांबाबत मात्र शंका आहेत. किंबहुना त्याचा विरोधच आहे. आशा मरू देणार नाही, आणि शॉशँक जगू देणार नाही, याबद्दल खात्री असलेला रेड त्याला परोपरीनं सांगतोय, आशावादाची चैन इथं परवडणारी नाही. पण ॲन्डीची काही स्वप्नं आहेत. ती त्यानी रेडबरोबर शेअरही केली आहेत. कधीकाळी पॅरोल मिळालाच तर त्याला मेक्सिकोतल्या ‘झिहुआंतानेओ’ला ‘जाऊन निळ्याशार समुद्राच्या साथीनं शांत आयुष्य जगायचंय. फार आशावादी न राहण्याचा सल्ला देणाऱ्या रेडला ॲन्डीचं उत्तर आहे, ‘गेट बिझी लिव्हिंग ऑर गेट बिझी डाइंग, जगण्यात गुंतून राहायचं की मरण्यात हे ज्याचं त्यानं ठरवायचं असतं... ॲन्डीच्या आशावादाचा हा मंत्रच आहे. चित्रपटात आणि कादंबरिकेतही, ‘शॉशँक रिडेम्प्शन  कोट्स’ म्हणून उद्धृत केली जाणारी, अशी चमकदार वाक्यं अनेक ठिकाणी येतात. 

एका ठिकाणी ॲन्डी म्हणतो, काय गंमत आहे, (तुरुंगाच्या) बाहेर मी एक अत्यंत प्रामाणिक माणूस होतो. एखाद्या बाणासारखा सरळ. तुरुंगात आल्यावर मी लुच्चा माणूस बनलो. आशावाद डेंजरस आहे,असं सांगत राहणाऱ्या रेडला तो सांगतो, आशावाद ही उत्तम गोष्ट आहे, कदाचित सर्वोत्तमही. आणि कोणतीच उत्तम गोष्ट कधीच संपून जात नाही.

मधल्या काळात ॲन्डीच्या निरपराध असण्याचा एकमेव पुरावा असणाऱ्या टॉमीला नॉर्टन संपवून टाकतो. मूळ कथेत मात्र टॉमीची रवानगी दुसऱ्या तुरुंगात होते.

आणि शॉशँकला डांबला गेल्यानंतर पंचवीस वर्षांनी एका वादळी पावसाच्या रात्री ॲन्डी त्याच्या कोठडीतून नाहीसा होतो. मुसळधार बरसणारा पाऊस अँड्य्रू ड्यूफ्रेस्नला नवं, स्वच्छ आयुष्य देतो. त्याआधी त्यानी रेडला एक पत्ता दिलाय आणि एक निरोपही. कधीकाळी रेड सुटलाच तर त्यानं बक्सटनच्या शेतातल्या त्या पत्त्यावर जे सापडेल ते घेऊन नवीन आयुष्य सुरू करावं.

मूळ पुस्तक वाचताना अधिक आनंद मिळतो की चित्रपट अधिक आनंद देऊन जातो...? पुस्तकांच्या पानांतून एखादी कलाकृती पडद्यावर आल्यानंतरचा हा एक सनातन प्रश्न इथेही पडू शकतो. मूळ कादंबरीतील पात्रं आणि चित्रपटातली पात्रं यांच्या स्वभावांमध्ये, वागण्याबोलण्यामध्ये इतकंच काय पण कथेतल्या त्यांच्या वावरामध्येही बऱ्याचदा फरक जाणवतो, तरीही कोणतंच पात्र अस्थानी नाही. दिग्दर्शक डॅरामाँटनी कथेचा ‘होप स्प्रिंग्ज् इटर्नल’ हा मूळ गाभा कुठेही उणावू दिलेला नाही. कदाचित म्हणूनच आजही ‘शॉशँक रिडेम्प्शन’च्या पटकथेचा आवर्जून उल्लेख होत असावा.

टिम रॉबिन्सनी साकारलेल्या अँड्य्रू ड्यूफ्रेस्नच्या भूमिकेसाठी त्यावेळी टॉम क्रूझ, केव्हिन कोस्टनर, थॉमस न्यूमनसह टॉम हँक्सचंही नाव होतं. पण हँक्स त्यावेळी ‘फॉरेस्ट गम्प’मध्ये बिझी होता. गमतीचा भाग म्हणजे ऑस्करच्या स्पर्धेत ‘शॉशँक रिडम्प्शन’च्या स्पर्धेत असणाऱ्या दोन प्रमुख चित्रपटांपैकी एक होता ‘फॉरेस्ट गम्प’. टॉम हँक्सला त्यावर्षी ‘फॉरेस्ट गम्प’साठी ऑस्करही मिळालं.

माणसाला धावायला भाग पाडणाऱ्या आशा नावाच्या शृंखलेचं मोल अधोरेखित करणारी ही गोष्ट आयुष्यातल्या आशा फुलवत ठेवण्याची गरज आणि महत्त्व सांगत राहाते –पुस्तकांच्या पानांमधून आणि रुपेरी पडद्यावरूनही.

संबंधित बातम्या