अ पीस ऑफ द केक

माधव मुकुंद गोखले
सोमवार, 21 डिसेंबर 2020

कव्हर स्टोरी

केक या पदार्थाची माझी सगळ्यात जुनी आठवण लहान शाळेतली आहे. (आमच्या प्राथमिक शाळेला ‘लहान शाळा’ आणि पाचवी पासूनच्या पुढच्या शाळेला ‘मोठी शाळा’ असं म्हणण्याची पद्धत होती, म्हणून लहान शाळा.) आता पुण्यातल्या न्यू पूना बेकरी -केक शॉपचा पसारा सांभाळणारे उमेश गिरमकर माझे वर्गमित्र. शाळेत असताना त्यांच्या वाढदिवसाला उमेश आख्ख्या इयत्तेला केक वाटायचे. मी त्याही आधी केक चाखला असणार, पण आजही वाटी केक खाताना मला मोठ्या पसरट ट्रे मधून सहाध्यायींना केक वाटणारा माझा मित्र आठवतो. चाळीस -पंचेचाळीस वर्षांपूर्वीच्या माझ्या त्या जगात केक अगदीच निषिद्ध होते असं नाही, पण या पदार्थाचा माझ्या जगातला एकूणच वावर खूप कमी होता. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यात अंडं असायचं. आणि खारी, बिस्कीटं क्वचित क्रीमरोल वगैरे दिवाण-ए-आम मधली मंडळी सोडली तर केक, पाव वगैरे मातब्बरांची संभावना त्यावेळी ‘श्रीमंती खाण्यात’ (माझ्या आजीचा शब्द जसाच्या तसा वापरायचा तर ‘चोचल्यां’ मध्ये) होत असे. माझ्या बाबांचे एक मित्र होते, त्यांचीही बेकरी होती. बाबांबरोबर तिथे गेलो की क्रीमचा केक हमखास खाऊ म्हणून हातावर ठेवला जायचा.

केकचा उल्लेख झाल्यावर आणखी एक आठवण हटकून येते. ‘भाकरी मिळत नसेल तर केक खा’ असा उर्मट सल्ला देणाऱ्या फ्रान्सच्या राणीची. सातवीच्या इतिहासाच्या पुस्तकात फ्रान्सची ही शेवटची राणी मारी अॅन्टोनेट्झ  पहिल्यांदा भेटली. अठराव्या शतकाच्या अखेरीस झालेल्या फ्रेंच राज्यक्रांतीनंतर तिला मृत्युदंड देण्यात आला. अर्थात इयत्ता सातवीत राणीच्या या उद्गारांचं महत्त्व ‘जोड्या लावा’, ‘गाळलेल्या जागा भरा’ किंवा ‘कोण कोणास म्हणाले’ एवढ्यापुरतंच मर्यादित होतं. पुढे केव्हातरी ‘अवांतर’ वाचनामध्ये राणीनी असं खरंच कधी म्हटलं होतं का याविषयीची चर्चा वाचल्याचं आठवतंय. असो.

केक हा आणखी एक युनिव्हर्सल खाद्यपदार्थ. आइस्क्रीम सारखाच मेजवानीच्या शेवटच्या टप्प्यात येणारा केकही आइस्क्रीम सारखाच जिथे गेला तिथल्या इन्ग्रेडियन्टसना आपलंसं करत गेला. केक आवडतच नाही असं म्हणणारे असतीलही, पण केक न आवडणारी ही जमात तशी दुर्मिळच. केकचं आपल्यापैकी बहुतेकांच्या मनातलं नातं जरी पाश्चात्त्य रिवाजांशी जोडलेलं असलं तरी आइस्क्रीम सारखाच केक कधीही कापावा आणि खावाही. केक आणि वाढदिवस, केक आणि ख्रिसमस अशी काही नाती आपल्या मनात असली तरी आनंद वाटण्याच्या कोणत्याही प्रसंगी केकची उपस्थिती खटकत नाही. अलीकडे लग्न समारंभातही केक कापण्याची ''प्रथा'' मूळ धरताना दिसते आहे. अंतरपाटाचा पडदा हटण्यापूर्वीचा ‘सावधान...’चा अंतिम  

इशाराही कानाआड करून एकमेकांना वरमाला घातल्यावर उपस्थितांचे आशीर्वाद, शुभेच्छा स्वीकारायला वधूवर येण्यापूर्वी लग्नमंचावर एक देखणा केक अवतरतो, आणि नवविवाहितांची मित्रमंडळी आधीच्या पिढीच्या सोबतीने (या आधीच्या पिढीतली काही मंडळी लग्नमंडपात अवतरलेला केक पाहून अवाक झालेली असतात) तो केक कापून नवपरिणीतांना ‘हॅपी मॅरेज’ म्हणून शुभेच्छा देतात. केक असा कुठेही अवतरू शकतो याची दोन तीन कारणं संभवतात असं  मला वाटतं. एक म्हणजे केकची उपस्थिती खरंचच कोणत्याही आनंदाच्या प्रसंगी खटकत नाही. दुसरं अलीकडे केकच्या व्यवसायाने घेतलेल्या भरारीमुळे केक अक्षरशः आयत्या वेळेला मिळू शकतो आणि आनंदाबरोबर केक वाटताना त्या आनंदाचा गोडवा जणू त्या केकमध्ये उतरलेला असतो.

केक आला कुठून, हा प्रश्न आपल्याला सहसा पडत नाही. पण शोधायला बसलं तर केकचं मूळ थेट आठव्या-नवव्या शतकाल्या उत्तर युरोपातल्या व्हायकिंग्ज् पर्यंत जाऊन पोचतं. केकसाठी केलेलं मिश्रण किती फुगतं यावर केकचं यश मोजलं जातं आणि फुगण्याची प्रक्रिया अवलंबून असते ती मिश्रणाची घनता आणि भट्टीच्या तापमानावर, असंच सगळे केक-बल्लव सांगतात. पदार्थ फुगवण्याचं हे तंत्र मात्र इजिप्शियन लोकांनी इ.स.पू. २६०० मध्ये शोधलं होतं, असा उल्लेख विश्वकोशात आढळतो. त्या काळात हे तंत्र पाव बनविण्यासाठी वापरलं जायचं. नंतरच्या काळात रोमन लोकांनी या तंत्रात काही सुधारणा केल्या. पहिला केक कोणी बनविला यावर वादविवाद शक्य असले तरी केक-जाणकारांच्या मते स्कॉटलंड ही खऱ्या अर्थाने ''लॅन्ड ऑफ केकस्''. इंटरनेटच्या महाजालात यावर लिहिलेले अनेक ब्लॉग्ज सापडतील. आज आपण जे केक पाहतो त्याचं आद्य स्वरूप उदयाला आलं ते सतराव्या शतकातल्या युरोपात. एकोणिसाव्या शतकापासून केकची लोकप्रियता वाढीस लागली आणि येणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक नव्या नव्या डिझाइनची आणि रूपाची लेणी ल्यालेल्या केकची लोकप्रियता शुक्लेंदु प्रमाणे वृद्धिंगतच होते आहे.

केकची वाढदिवसाशी सांगड कशी घातली गेली, याविषयी मात्र दोन-तीन वेगवेगळी मतं आढळतात. एका मता प्रमाणे ही प्रथा मध्ययुगातल्या जर्मनीतली. किंडरफेस्ट या नावाने साजऱ्या होणाऱ्या लहान मुलांच्या वाढदिवसांशी जोडलेली. अन्य काही अभ्यासकांच्या मते प्राचीन ग्रीसमध्ये चंद्रदेवता अर्टेमिसच्या वाढदिवशी तिच्यासाठी चंद्राप्रमाणे गोलाकार केक बनविला जायचा. त्या केकच्या बाजूला पेटविलेल्या मेणबत्त्यांमुळे त्या केकला जणू चांदव्याचंच रुपडं मिळायचं. मेणबत्त्यांचा प्रकाश ज्याचा वाढदिवस आहे त्याचं आयुष्य उजळून टाकतो, अशीही एक कल्पना सांगितली जाते. गोष्ट कोणतीही असो जगातल्या बहुतेक भागातले हॅप्पी बर्थडे आता केकशिवाय साजरे होत नाहीत, हे मात्र खरं.

भारतातला पहिला केक बनवला केरळमधल्या थलासेरीच्या बिस्कीट फॅक्टरीचे मालक मम्बाली बापूंनी, एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या चरणात. ब्राऊन नावाच्या एका ब्रिटिश मळेवाल्याने बापूंना १८८३च्या ख्रिसमससाठी  केक बनवण्याची ऑर्डर दिली आणि भारतातला बेकरी व्यवसायाने आणखी एक वळण घेतले. या घटनेला १२९ वर्षे पूर्ण झाल्याचे निमित्त साधून आठ वर्षांपूर्वी केरळच्या बेकर्स असोसिएशनने १२०० किलोचा ३०० फूट लांब केक बनवून बापू आणि त्यांच्या रॉयल बिस्कीट फॅक्टरीलाही सलामी दिली होती

‘परंपरागत खाद्यपदार्थांबरोबरच ब्रेड व केक करण्याची अगर करून पाहण्याची आवड व उत्सुकता अलीकडे गृहिणींमध्ये, विशेषतः नवीन पिढीमध्ये निर्माण झाली आहे. ब्रेड व केक करण्याकरिता ओव्हन, कुकिंग रेंज अशा आधुनिक साधनेही आता उपलब्ध होत आहेत. त्यादृष्टीने ब्रेडचे व केकचे काही प्रकार करण्याची माहिती देणे योग्य वाटल्यावरून ती या विभागात दिली आहे.’ असा उल्लेख कमलाबाई ओगले यांच्या सत्तरीच्या दशकात लोकप्रिय ठरलेल्या ‘रुचिरा’मध्ये आढळतो. पण गव्हाचं पीठ, मैदा. साखर, अंडी, फुगवणकारक (रासायनिक), मोहन, स्वाद व द्रव पदार्थ यांपासून पुष्कळशा खटाटोपाने तयार होणारा हा पदार्थ तसा सुगरणीची परीक्षा पहाणाराच. अंडी नीट न फेसली गेल्याने केक फसल्याची उदाहरणेच आजूबाजूला जास्त असायची तेव्हा. त्या काळात केक करण्याचे हे प्रयोग ज्यांनी अनुभवले असतील ते सांगू शकतील. आता केकच्या ‘रेडी-टू-मेक’ मिश्रणामुळे परिस्थिती फारच सुधारली आहे.

केकचे असंख्य प्रकार आज उपलब्ध आहेत. केक बनवण्याचं तंत्रही खूप बदललंय, असं उमेश गिरमकर सांगतात. अंड्याला हातही न लावणाऱ्या मंडळींना आता एगलेस केकचा आनंद घेता येतो. आनंदाचा कोणताही प्रसंग साजरा करायला केक चालत असला तरी प्रसंगानुरूप बनणाऱ्या केकची संख्याही मोठी आहे. केवळ वाढदिवसालाच नव्हे तर जुन्या-नव्या प्रत्येक खास दिवसासाठी आता खास केक बनतात. कितीतरी चवींचे केक उपलब्ध असले तरी चॉकलेट, ब्लॅक फॉरेस्ट, बटरस्कॉच, प्लम केक, पायनॅपल केक अशांना आपली लोकप्रियता टिकवून ठेवली आहे. लोकप्रियतेच्या यादीत चॉकलेट केकचा क्रमांक सगळ्यात वरचा असल्याचं नेटीझन्स सांगतात. 

फॉन्डन्ट आयसिंगमुळे केकही आता थ्री-डी व्हायला लागले आहेत. अगदी न्यू यॉर्कच्या स्वातंत्र्यदेवीच्या पुतळ्यापासून ते गॉडझिला पर्यंत असंख्य आकार आता केकमध्ये मिळतात. एखाद्या नेत्याच्या वाढदिवशी बनणारे महाकाय केकही या तंत्राने अगदी आवाक्यात आले आहेत. उत्सवमूर्तीच्या चेहऱ्याच्या आकारापासून ते एखाद्या आठवणीला उजाळा देणाऱ्या छायाचित्रापर्यंत कशाचीही छपाई केलेले, समारंभाला अगदी पर्सनल टच देणारे केक आता सहजशक्य झाले आहेत. खाण्याच्या रंगांची कार्ट्रीजेस वापरून तांदुळाच्या पिठीपासून बनविलेल्या तलम फॉन्डन्ट पेपरवर ही मोहवून टाकणारी छपाई केली जाते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या प्रत्येकच जण स्वतःची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याच्या उद्योगात गुंतलेला असताना केक इंडस्ट्री कशी मागे राहील. अगदी कालपरवा नव्या प्रॉडक्ट्सची माहिती घेताना इम्युनिटी बूस्टर केकही बाजारात आलेले दिसले.

स्वातंत्र्यपूर्व काळातल्या मुंबई सरकारने बेकरी, मॅक्रोनी, मसाले, कोको इत्यादी व्यवसायांची पुनर्घटना करण्याच्या उद्देशाने बिनसरकारी सभासदांची एक कमिटी नेमल्याची माहिती, पुण्यातून प्रसिद्ध होणाऱ्या ''अर्थ'' या अर्थविषयक साप्ताहिकाच्या २२ मे १९४६च्या अंकात वाचायला मिळते. बिस्किटे व ब्रेड, केक सारख्या बेकरी प्रॉडक्ट्ससह सहा व्यवसायांच्या वाढीचा विचार करण्यासाठी दुय्यम समित्या त्यावेळी नेमल्या गेल्या होत्या. पुण्यातले बिस्कीट, कोको व चॉकलेट कारखानदार साठे यांच्याकडे या सर्व व्यवसायांची पाहणी करून निवेदन तयार करण्याचे काम सोपवण्यात आले होते. त्या निवेदनाचे काय झाले, हा स्वतंत्र विषय असला तरी केकचे स्पॉंज, त्यावरचे आयसिंग, केकची सजावट आणि केक करण्याच्या शिकवण्या या साऱ्यांनी आजमितीला अनेक गृहिणींना केवळ स्वतःच्या पायावर उभं रहायला मदत केली नाही तर त्यातल्या अनेकजणी आज स्वतःचे यशस्वी व्यवसाय चालवत आहेत. 

आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या केक बाजारपेठेचा विचार करायचा झाला, तर गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार जगातली केकची उलाढाल होती ४२.८४ बिलियन अमेरिकी डॉलरच्या घरात. आणि २०२७ पर्यंत हा व्यवसाय दरवर्षी सव्वातीन टक्क्यांहून थोड्या अधिकच वेगाने वाढेल असा अंदाज बाजारपेठेचा अभ्यास करणाऱ्या मॉर्डोर इंटेलिजन्स या संस्थेने त्यावेळी वर्तवला होता. भारतात मोठ्या कंपन्यांबरोबरच केकच्या बाजारपेठेत असंख्य स्थानिक, लहान उत्पादकही आहेत. मात्र विस्तारणारी शहरे, बाहेर खाण्याचे वाढते प्रमाण, इन्स्टंट फूडला असणारी वाढती मागणी अशा कारणांमुळे भारतातली केकची बाजारपेठ 2020 ते 2025 या काळात दरवर्षी तब्बल साडेबारा टक्क्यांनी वाढेल, असा मॉर्डोरचा अंदाज आहे.

केकबद्दल वाचत असताना आणखी एक रंजक उल्लेख पं. महादेवशास्त्री जोशी यांच्या ‘नक्षत्रलोक’ नावाच्या पुस्तकात अवचित सापडला. सध्या सुरू असलेल्या मार्गशीर्ष महिन्यात आकाश व्यापणाऱ्या मृग नक्षत्रातल्या ‘रोहिणी, बेटलग्यूस, रिगेल आणि व्याध या चौघांची मिळून एक समांतरभुज चौकट तयार होते. सर जेम्स जीन्स तिला केक म्हणतो. आणि (त्या मृगाच्या पोटात घुसलेला) त्रिकांड बाण ही तिच्यावरची साखरेच्या पाकाची नक्षी मानतो.’ सर जीन म्हणजे क्वांटम थेअरीच्या विकासाला हातभार लावणारे ब्रिटिश गणिती.

केकनी आपल्या खाद्ययात्रेचा एक कोपरा असा व्यापला आहे. ''यू कॅनॉट हॅव द केक अॅन्ड इट इट टू'' ही इंग्रजीतील म्हण जशी दोन्ही डगरींवर पाय ठेवून स्वतःचा फायद्याचा विचार करणाऱ्यांसमोर निकं सत्य ठेवते तशीच अगदी सोपी, सहज होणारी कामं ‘केकवॉक’ किंवा ‘अ पीस ऑफ केक’ सारखी गणली जातात. बाजारात ज्या वस्तूवर उड्या पडतात ती ‘हॉट केक’ सारखी विकली जात असते, एखाद्या क्रॅकपॉटचं वर्णन ''नटी अॅज अ फ्रूटकेक'' असं केलं जातं आणि आनंददायी घटनेला आणखी आनंदाची किनार लावणारी घटना ‘आयसिंग ऑन द केक’ असते.

केकवरच्या आनंद द्विगुणित करणाऱ्या आयसिंगचा सुखकारक गोडवा केकसह तुमच्याआमच्या सर्वांच्या वाट्याला येवो एवढ्याच शुभेच्छांसह केकची ही कहाणी (तूर्त तरी) संप्रूण

संबंधित बातम्या