काय मिळतं या शोधातून...?

मकरंद केतकर
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

कव्हर स्टोरी

प्राण्यांच्या, कीटकांच्या प्रजातींवर संशोधन करणाऱ्यांना हमखास विचारण्यात येणारा प्रश्‍न म्हणजे, ‘काय मिळतं नवीन प्रजाती शोधून?’ पण संशोधनामुळेच मानव आणि वन्यजिवांचे साहचर्य सुकर होते... 

वीसेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. शिक्षक, आईवडील, मित्र, नातेवाईक वगैरे मंडळींनी दिलेल्या टुणूक टुणूकच्या प्रोत्साहनाच्या जोरावर हा भोपळा दहावी नावाचे जंगल पार करून बाहेर पडला होता. अंगात असलेले मूळचेच साहस आणि प्राण्यापक्ष्यां बद्दलच्या कुतूहलाची रग स्वस्थ बसू देत नव्हती. योगायोगाने कॉलेजमध्येही असेच टुणूक टुणूक करत पोहोचलेले चार भोपळे भेटले आणि मी सह्याद्रीत पहिल्यांदा ट्रेकिंगसाठी पाऊल ठेवले. माझ्या पालकांना सुरुवातीला बरे वाटले, की सारखे नवीन काम मागणाऱ्‍या या बाटलीतल्या राक्षसाला आता नवा अव्याहत चाळा मिळाला. पण जसजसे हे वेड अंगात भिनत गेले, तसतसा इतर अनेक ट्रेकर्सना सहन करावा लागणारा प्रश्न मलाही विचारला जाऊ लागला. तो म्हणजे, ‘काय मिळतं त्या दगड धोंड्यात जाऊन?’ 

आमच्या गेल्या बावन्न पिढ्यांमध्ये असा प्राण्यापक्ष्यांच्या मागे धावणारा, बेधडक गचपणात शिरणारा, उद्याचा ट्रेकिंग प्लॅन आदल्या रात्री सांगणारा कोणी निपजला नसल्याने मी इतर भावंडांमध्ये साहजिकच वेडे कुरूप पिल्लू होतो. पण फिरस्तीमधून मिळणाऱ्‍या समाधानापुढे मी त्याकडे दुर्लक्ष करून पुढचे बेत ठरवायचो. संसारिक जबाबदाऱ्‍या पार पाडणाऱ्‍या आईवडिलांना मी अजिबात दोष देणार नाही. पण तो आनंद, ते अनुभवातून मिळणारे शिक्षण, स्वतःच्या क्षमतांना मिळणारे आव्हान, समविचारी मित्रांसोबत हिंडताना मिळणारी ऊर्जा व त्यातून येणारी प्रगल्भता, आपल्या सामाजिक, जैविक आणि भौगोलिक समृद्धीची प्रचिती, कुठल्याही टिपिकल पर्यटन स्थळांवर आईवडिलांबरोबर जाऊन माझ्यासारख्या अधाश्याला कशी मिळणार होती? पुढे कालांतराने जसा करिअरच्या जोडीने वन्यजीव संशोधन या क्षेत्राशी हौसेपोटी जोडला गेलो, तेव्हासुद्धा हेच प्रश्न शब्दांची फेरफार करून अनेक जणांनी मला विचारले, ‘काय मिळतं जंगली प्राण्यांचा अभ्यास करून? कशासाठी नवनव्या जाती शोधायच्या?’ अगदी योग्य प्रश्न आहेत, पण याचे उत्तर मात्र आता वैयक्तिक पातळीऐवजी वैश्विक पातळीवर द्यावे लागते... कारण आम्ही ‘चिंता करितो विश्वाची!’

आज विषय निघालाच आहे तर सविस्तर आणि सोदाहरण बोलतो. आपण सगळे अशा जगात राहतो, जिथे प्रत्येक गोष्ट ‘अँथ्रोपोसेंट्रीक’ म्हणजे मानवकेंद्री आहे. जगभरातील प्रत्येक समाजव्यवस्थेचा कल मानवी जीवन सुखकर करण्याकडे असल्याने सहसा कुठलेही संशोधन, मोहीम आणि उपाययोजना माणसांवर त्याचा काय परिणाम होईल याचा विचार करून केली जाते. अगदी साप, विंचू आणि इतर अनेक प्राण्यांच्या विषावर ‘कर्करोगावरील औषध’ म्हणून जगभर संशोधन सुरू आहे. आम्हीसुद्धा हे सगळे उपद्व्याप करतो, कारण त्यांचा कुठलातरी संबंध आपल्या-माणसाच्या जगण्याशी येतो. निसर्गाच्या चक्रातला प्रत्येक जीव त्याची भूमिका यथायोग्य पार पाडत असतो. आपल्या व्यवहारांमुळे जेव्हा त्याचे अस्तित्व धोक्यात येते, तेव्हा चक्र बिघडून त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात. आपण अमेरिकेतील एक उदाहरण पाहू. ‘यलोस्टोन नॅशनल पार्क’ या अजस्र राखीव क्षेत्रात घडलेली ही घटना आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला युरोपियन लोकांनी तिथल्या लांडग्यांची खेळ म्हणून, तसेच ते गुरांवर हल्ले करतात म्हणून बेबंद शिकार केली. हळूहळू तिथून लांडगे नाहीसे झाले. लांडगे त्या प्रदेशातील मुख्य शिकारी होते. ते नाहीसे झाल्यावर तिथल्या ‘एल्क’ या सांबरासारख्या शाकाहारी प्राण्यांची संख्या वारेमाप वाढली व त्यामुळे वनस्पतींचे आवरण कमी झाले. तिथल्या प्रवाहांमध्ये फांद्या तसेच ओंडक्यांच्या साहाय्याने धरणे बांधणाऱ्‍या बीव्हर या प्राण्यांना पुरेसे लाकूड उपलब्ध होईना. त्यामुळे प्रवाहांचा वेग वाढला व जमिनीत पाणी मुरणे कमी झाले. मातीची धूप आणि तत्सम वाईट परिणाम दिसू लागले. या परिस्थितीचा अभ्यास करून स्थानिक प्रशासन संस्थांच्या अभ्यासकांनी पुन्हा एकदा इतर प्रदेशातून लांडगे आणून त्या अधिवासात सोडले व निरीक्षण सुरू केले. शिकारी प्राणी परतल्यावर भीतीपोटी शाकाहारी प्राणी फिरतीवर राहू लागले. त्यांच्या चराईचा पॅटर्न बदलला. हळूहळू परिस्थितीत सुधार दिसू लागला व कालांतराने प्रमाणाबाहेर फुगलेली नदीसुद्धा पूर्ववत वाहू लागली.

भारतातही अशी अनेक उदाहरणे आहेत. अभ्यासपूर्वक केलेल्या नियोजनामुळे निसर्गाची साखळी पूर्ववत झाली, संघर्ष कमी झाला; मानव आणि वन्यप्राणी या दोघांनाही आपापल्या पद्धतीने जीवन जगणे शक्य झाले. पुण्यातील प्रसिद्ध वन्यजीव संशोधक डॉ. मिलिंद वाटवे यांनी ताडोबा येथे शाकाहारी प्राण्यांमुळे होणाऱ्‍या शेतीच्या नुकसानीसाठी एकूण परिस्थितीचा अभ्यास करून काही अभिनव उपाय सुचवले. त्यामुळे नुकसानीचा अचूक अंदाज काढता आला. एवढेच नव्हे तर शेतकऱ्‍यांनी पूर्वीपेक्षा अधिक उत्पन्न घेऊन दाखवले. सध्या प्रचलीत असलेल्या नुकसानभरपाईच्या पद्धतीमध्ये दृश्य परिस्थितीचा निरीक्षणाद्वारे आढावा घेतला जातो. ही पद्धत हत्तीसारख्या मोठ्या प्राण्यांनी केलेल्या नुकसानीचा अंदाज लावण्यासाठी योग्य आहे. कारण त्यांच्या वावरामुळे शेतातली पिके पूर्णपणे जमीनदोस्त होतात. परंतु सदर पद्धतीत लहान प्राण्यांनी केलेले नुकसान अचूक पद्धतीने मोजता येत नाही. कारण अनेकदा हे प्राणी फक्त शेंगा, कळ्या किंवा कोवळी पाने खातात. यामुळे वनस्पती मरत नाही पण त्यामुळे होणारे नुकसानही दृष्टिक्षेपात येत नाही. डॉ. वाटवे यांनी आठ वर्षांच्या अभ्यासातून मांडलेल्या गणिती मॉडेलनुसार काढणीच्या वेळेला शिल्लक राहिलेल्या पिकातून येणारे उत्पन्न मोजले व त्यानुसार तौलनिक अभ्यास करून अधिक अचूक नुकसानभरपाई देता आली. ही नुकसानभरपाई डॉक्टरांनी स्वतःचे योगदान तसेच या अभ्यासासाठी मिळालेल्या देणग्या यातून दिली. नुकसानभरपाईमुळे शेतकऱ्‍यांमध्ये जशी समाधानाची भावना निर्माण झाली तसाच ‘तुमचे प्राणी’ हा वनखात्याबरोबर असलेला दुरावाही कमी झाला. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, शासनाने या पद्धतीचा वापर इतर ठिकाणीही केल्यास शेतकरी आणि प्राणी यांच्यातील जुने साहचर्य पूर्ववत होऊन संघर्ष कमी होण्यास मदत होईल.

दुसरे उदाहरण जरा जुने आहे. पावसाळा आणि बेडूक यांचे करोडो वर्षांपासून सख्य आहे. पावसाळ्यात विणीसाठी विविध जातींचे बेडूक सुप्तावस्थेतून बाहेर येतात. त्यापैकी बुलफ्रॉग हा एक भलामोठा बेडूक आहे. पण काही दशकांपूर्वी कोकणात, पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांत या बेडकाची त्याच्या मांसल पायांसाठी पावसाळ्यातच मोठ्या प्रमाणात शिकार व्हायची. गोव्यात तर यांना ‘जम्पिंग चिकन’ नावाने ओळखले जायचे. बेसुमार कत्तलीमुळे हे बेडूक अक्षरशः दिसेनासे झाले आणि हळूहळू त्याचे दुष्परिणाम भातशेतीवर दिसू लागले. पावसाळ्यातच दिसणारा खेकडा हा भातशेतीचे नुकसान करणारा एक जीव आहे आणि बुलफ्रॉग्सच्या आहारात खेकड्यांचा समावेश होतो. बेडूक नाहीसे झाल्यावर खेकड्यांचा सुळसुळाट झाला आणि पिकाची टक्केवारी घटली. पुढे याचा जसा अभ्यास झाला, तसे या बेडकांना वन्यजीव कायद्यानुसार संरक्षण देण्यात आले. त्यांच्या शिकारीवर बंदी घालण्यात आली आणि पुढे परिस्थिती सुधारली. 

जगभरात वन्यजीवांचे आपल्या आयुष्यावर होत असलेले प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष परिणाम लक्षात घेऊन नुकसान टाळण्यासाठी संशोधन करून उपाययोजना केल्या जात असतात. त्यातून विविध देशांमधील अभ्यासक आणि संशोधक यांना नवीन कल्पना आणि प्रेरणा मिळत असतात. उदा. जंगल भागातून जाणाऱ्‍या महामार्गांवर दरवर्षी लाखो प्राणी वाहनांखाली सापडून मृत्युमुखी पडतात व अनेकदा वाहनांचेही नुकसान होते. म्हणून प्राण्यांना महामार्ग ओलांडताना येणाऱ्‍या अडथळ्यांवर उपाय योजण्यासाठी संशोधन सुरू झाले. काही ठिकाणी स्पीडब्रेकर्स, प्राण्यांची चित्रे असलेली चिन्हे असे उपाय केले गेले. काही ठिकाणी प्राण्यांसाठी पूल बांधले गेले, तर काही ठिकाणी वाहनांसाठी पूल बांधले गेले. पूल बांधणे ही पद्धत खर्चीक असली तरी मानवी स्वभाव पाहता अधिक उपयुक्त आहे असे लक्षात आले. आपल्याकडे याचे उदाहरण पेंच व्याघ्रप्रकल्पात आहे. या व्याघ्रप्रकल्पातून जाणाऱ्‍या राष्ट्रीय महामार्गावर, जिथून वन्यप्राणी रस्ता ओलांडतात अशा ठिकाणांचा अभ्यास करून तिथे वाहनांसाठी उड्डाणपूल बांधले गेले. यामुळे एका वर्षात सुमारे सहा हजार प्राण्यांनी या पुलांखालून निर्धोकपणे महामार्ग ओलांडला असल्याचे पुरावे तिथे लावलेल्या कॅमेरा ट्रॅप्समधून समोर आले आहेत. तामिळनाडूमध्ये वालपराई या भागात वानरे तसेच शेकरू यांना जंगल ओलांडण्यासाठी झाडांवर दोऱ्‍यांचे पूल बांधले आहेत, ज्यामुळे त्यांना खाली उतरून रस्ता ओलांडण्याची गरज राहिली नाही. आसाममध्ये ‘राम तेरंग’ या गावात हत्तींच्या भ्रमणमार्गात येणारी शेती आणि घरे यांच्यामुळे संघर्ष निर्माण होत होता. वनखात्याने पुढाकार घेऊन गावकऱ्‍यांना नव्या जागी पक्की घरे, शौचालये, शाळा तसेच शेती उपलब्ध करून दिली व हा संघर्ष संपुष्टात आला.

पण हे सगळे संशोधन फक्त विज्ञानशाखेची पदवी मिळवलेलेच करू शकतात असे अजिबात नाही. वाई परिसरातील ऐतिहासिक रायरेश्वर पठाराच्या जवळ असणाऱ्‍या जोर आणि जांभळी गावांच्या खोऱ्‍यांमध्ये असलेल्या घनदाट जंगलांमध्ये कोणकोणते प्राणी राहतात, याचा शोध श्रीकर अष्टपुत्रे नावाच्या माझ्या मित्राने हौसेपोटी स्वखर्चाने कॅमेरा ट्रॅप्स लावून घ्यायला सुरुवात केली. सलग तीन चार वर्षे हे काम केल्यावर त्याच्याकडे अनेक अद्‍भुत नोंदी जमा झाल्या. त्यातून ‘ब्राऊन पाम सिव्हेट’ या उदमांजराच्या एका जातीची त्या परिसरातील पहिली नोंद झाली. या नोंदींचे महत्त्व ओळखून त्याने वनविभाग आणि किरण शेलार या वन्यजीव अभ्यासकाच्या मदतीने हे काम शासनाच्या दरबारी नेले व तो भाग संरक्षित करण्यासाठी धडपड केली. आनंदाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र शासनातर्फे नुकतीच जी सहा नवीन संवर्धन वनक्षेत्रे राखीव करण्यात आली, त्यात या परिसरातील फार मोठ्या भागाचा समावेश करण्यात आला आहे. सदर जंगल कोयनेच्या जंगलाच्या जवळ असल्याने, याचा फायदा जसा वन्यजिवांना विनाअडथळा भ्रमणासाठी होणार आहे, तसाच भविष्यात माणूस प्राणी संघर्ष टाळण्यासाठीसुद्धा होणार आहे.  

वन्यजीव संशोधनामधून निर्माण होणारे वन्यजीव पर्यटन व स्थानिकांना मिळणारा रोजगार हासुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. एखादा पशुपक्षी जर विशिष्ट भागातच दिसत असेल, तर त्याच्या दर्शनासाठी अनेक निसर्गप्रेमी येतात. त्यांना सोयीसुविधा पुरवण्यामधून स्थानिकांना शाश्वत उत्पन्न मिळत राहते व बदल्यात निसर्गही आपसूकच जपला जातो. माझ्या माहितीत अशी काही उदाहरणे आहेत जिथे प्राण्यांमुळेच रोजगार उपलब्ध झाल्याने अट्टल शिकाऱ्‍यांनी बंदुका खाली ठेवून दुर्बीण आणि कॅमेरा हातात घेतले आहेत.

शेवटी काय आहे, की आनंद, समाधान, हौस याच्याच जोडीला माणसांच्या अंतरात्म्याला झालेली ‘काहीतरी चुकतंय’ ही जाणीवसुद्धा या सगळ्या धडपडीला चालना देत असते. शरीराच्या आकाराच्या तुलनेत मेंदूचा आकार सगळ्यात मोठा असणारा हा मनुष्यप्राणी निसर्गाच्या सिस्टीमच्या बाहेर पडला आणि सगळा घोटाळा सुरू झाला. माणसाच्या प्रगतीचा प्रवास कष्टाळू असण्याकडून ‘कष्ट-टाळू’पणाकडे झाला आणि निसर्गाच्या सिस्टीम्स बिघडायला सुरुवात झाली. प्रत्येक सहस्रकात जसजसे स्थैर्य वाढत गेले, तसतशी या ना त्या कारणाने नासधूसही वाढत गेली. त्यातसुद्धा मनोरंजन आणि संपत्तीसंग्रह ही दोन मुख्य कारणे आपण सांगू शकतो. एकोणिसाव्या शतकात यंत्रयुग आल्यानंतर तर या विध्वंसाला सीमाच राहिली नाही. परिणामी त्याचे चटके माणसाला बसू लागले व त्यातूनच निसर्गाला समजून घेण्यास सुरुवात झाली. म्हणजे त्यापूर्वी पशुपक्षी किंवा वनस्पती यांचा अभ्यास होत नव्हता असे नाही. पारंपरिकरीत्या देवराया, पाणवठे इत्यादींच्या माध्यमातूनही निसर्ग जपला जात होताच. पण आधुनिकतेच्या नादात हे सगळे मागासलेले समजले जाऊ लागल्याने, या गोष्टी नव्या पद्धतीने समजून घेण्याची आणि समजवण्याची आवश्यकता भासू लागली. त्यातूनच वन्यजीव संशोधन हे क्षेत्र ठळकपणे पुढे आले. यामध्ये जसा झालेल्या नुकसानीचा अभ्यास करून उपाययोजना करणे हा एक भाग आहे, तसाच एखाद्या अस्पर्शीत, आडबाजूला असलेल्या प्रदेशातील प्राण्यांचा कोणीतरी केलेला अभ्यासही कसा कामी येतो याचीही उदाहरणे आपण पाहिली. यात नुसत्या नवीन जाती शोधणे एवढाच भाग नसतो, तर त्या विशिष्ट प्राण्याची जगण्याची पद्धत, त्याच्या जगण्याच्या गरजा आणि त्याच्या अधिवासात मानवी हस्तक्षेपामुळे होणारे एकंदर दूरगामी विपरीत परिणाम यावरसुद्धा संशोधन होत असते. या पृथ्वीच्या प्रत्येक कालखंडात कुठला ना कुठला सजीव इतर जिवांपेक्षा वरचढ ठरलेला आहे. त्यानुसारच गेल्या काही लाख वर्षांच्या कालखंडात माणूस नावाचा प्राणी इतर सजीवांपेक्षा वरचढ ठरलेला आहे, पण त्याची वागणूक अनैसर्गिक आहे. आत्तापर्यंत निसर्गनिर्मित संकटांनीच या सजीवसृष्टीचा तोल सांभाळला असला तरी आपल्या प्रगतीची दिशा पर्यावरणपूरक असणे ही आता काळाची गरज बनली आहे. पृथ्वी सगळ्यांचीच आहे हा समजूतदारपणा दाखवून ‘लाँग टर्म गोल्स’वर काम होणे आवश्यक आहे. अन्यथा त्याच्या बिनआवाजाच्या काठीचा फटका कसा बसतो याचा पुन्हा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. 

‘अजून किती जाती शोधायच्या शिल्लक आहेत?’ एक टिपिकल प्रश्न, ज्याला आम्ही प्रत्येक नव्या संशोधनानंतर गमतीत एकच उत्तर देतो, ‘तेच तर आम्ही शोधतोय!’ शास्त्रीय पद्धतीने वन्यजीव संशोधन हा प्रकार गेली दोन तीन शतके तरी सुरू आहे. त्यासाठी कोणी समर्पित वन्यजीव संशोधकच हवा असा नियम कधीच नव्हता. आमच्या विंचू संशोधनापुरते बोलायचे तर बोटीतून प्रवास करताना बोटीतल्या ओंडक्यावर विंचू आढळले म्हणून त्यांचा अभ्यास करून शोधनिबंध सादर केलेलीही ब्रिटिश माणसे आहेत. ‘अजून किती जाती सापडायच्या आहेत?’ याचे खरे उत्तर तंत्रज्ञान सापेक्ष आहे. खूप पूर्वी ‘धन आणि साधन’ या दोन्हीला मर्यादा होत्या. पण तरी त्यातून धडपड करून संशोधनाला काही एक दिशा देण्याचा प्रयत्न व्हायचा. तंत्रज्ञान बदलत गेले तसे संशोधनही वेगवान, अचूक आणि आधुनिक झाले. आज प्रवासाची साधनं, सॉफ्टवेअर्स, इन्स्ट्रूमेंट्स या सगळ्यातच आमूलाग्र बदल झाले आहेत. त्यामुळे निवृत्त विंचू संशोधक डॉ. देशभूषण बस्तवडे यांना विंचू शोधून त्यांचा अभ्यास करायला जितका वेळ लागायचा त्यापेक्षा कितीतरी कमी वेळेत आज अधिक जास्त आणि अचूक संशोधन होत आहे. याचा अर्थ त्या काळातले संशोधन कमी दर्जाचे आहे असा अजिबात नाही. त्यांनी त्या काळातील अडचणींवर मात करून संशोधन पुढे नेले. आज ती धुरा नव्या पिढीने खांद्यावर घेतली आहे. दोन तीन दशकांनी अजून वेगळे चित्र असेल. त्यामुळे शिरीष कणेकर म्हणतात तसे, ‘कुठल्याही एका काळातला ग्रेट हा दुसऱ्‍या कुठल्याही काळात ग्रेट म्हणूनच ओळखला गेला पाहिजे.’

संबंधित बातम्या