तणावानंतर उजळली अयोध्या! 

मंगेश कोळपकर
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

कव्हर स्टोरी
 

‘सकाळ’च्या ऑफिसमध्ये वार्ताहर म्हणून नेहमीप्रमाणे काम करीत असताना शुक्रवारी (ता. ८ नोव्हेंबर) रात्री नऊच्या सुमारास संपादकांनी निरोप दिला, की शनिवारी (ता. ९ नोव्हेंबर) रामजन्मभूमी प्रकरणाचा निकाल लागण्याची दाट शक्यता आहे. ताबडतोब अयोध्येला पोच. रात्री साडेदहा वाजता काम संपवून घरी गेलो, पॅकिंग करून १ वाजता पुण्यातील लोहगाव विमानतळावर पोचलो आणि पहाटे साडेतीनच्या विमानात बसलो. 
लखनौच्या चौधरी चरणसिंह विमानतळावर शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास पोचलो. अयोध्येला जाण्यासाठी गाडी शोधून (पैसे नेहमीपेक्षा जास्तच द्यावे लागले) सातच्या सुमारास निघालो. 

अयोध्येजवळच्या पहिल्या चेकपोस्टवर सकाळी नऊच्या सुमारास पोचलो. पोलिसांनी कोठे जायचे, कशासाठी जायचे असे पोलिसी खाक्याने नाना प्रश्न विचारले. पत्रकार आहे, हे समजल्यावर त्यांनी सोडले आणि पुढे काही अंतरावरच असलेल्या दुसऱ्या चेकपोस्टवर गाडी पुन्हा अडविली. पुन्हा तेच प्रश्न अन् पुन्हा तीच उत्तरे आणि निकालही तसाच. काही अंतरावर पुन्हा पोलिस. पण आता गाडी घेऊन पुढे जाऊ देण्यास ते तयार नव्हते, तुमची गाडी (मोटार) पुढे सोडणार नाही, गाडी तुम्ही इथे सोडा आणि पुढे चालत जा, असा निर्वाणीचा इशारा दिला. पर्याय नसल्यामुळे गाडी सोडली अन् मोठी बॅग घेऊन खाली उतरलो. काही अंतर चालत गेल्यानंतर सायकल रिक्षावाला दिसला, त्याला कुठे जायचे ते सांगितले. जेवढे नेता येईल तेवढे नेतो, म्हणून आम्ही निघालो. 

जाताना रस्त्याच्या दुतर्फा पोलिसांचा बंदोबस्त. रस्त्यावर लोकांची वर्दळ बंद झालेली. जणू काही अघोषित संचारबंदीच! अयोध्या रेल्वे स्टेशनच्या अलीकडे एक किलोमीटर अंतरावर पोलिसांनी पुन्हा थांबवले अन् रिक्षा सोडावी लागली. पाठीवर सॅक आणि हातात मोठी बॅग घेऊन चालत निघालो. रस्ता अगदी निर्मनुष्य. सकाळचे नऊ-साडेनऊ वाजले होते. दीड किलोमीटर अंतर पार केल्यावर अखेर हनुमान गढीपासून ३०० मीटर अंतरावर अलीकडे पोचलो. हनुमान गढीपासून रामजन्मभूमी अगदी २०० मीटर अंतरावर असल्याने त्या ठिकाणी प्रचंड म्हणावा इतका पोलिस बंदोबस्त होता. त्यामुळे तेथील चेकपोस्टवरून पोलिस पुढे सोडण्यास तयार नव्हते. पण त्यांना सांगितले, की हनुमानगढीजवळ हॉटेलमध्ये माझे बाकीचे सहकारी थांबलेले आहेत, परंतु पोलीस सोडायला तयार नव्हते. अखेर ‘मी गेलो नाही तर माझे सहकारी इथे येतील आणि मग काय होईल, त्याची जबाबदारी तुमची असेल,’ अशा पुणेरी पद्धतीने त्यांनाच इशारा दिला. ही मात्रा लागू पडली अन् हॉटेलवर पोचलो. सुदैवाने हव्या असलेल्या हॉटेलमध्ये जादा पैसे न देता रूम मिळाली अन् मनोमन रामलल्लाचे आभार मानले. 

सकाळी साडेदहाच्या सुमारास बाहेर पडलो, निर्मनुष्य रस्त्यावरून चालत हनुमान गढीच्या दिशेने गेलो. रस्त्यावर फक्त पोलिसच. गढीजवळ काही दूरचित्रवाणी वाहिन्यांचे पत्रकार दिसले आणि माझा जीव भांड्यात पडला. त्यांच्याबरोबर थोडावेळ थांबलो, तोपर्यंत घराघरात टीव्हीवर अयोध्येचा निकाल सुरू झालेला होता. साडेबाराच्या सुमारास हिंदूंच्या बाजूने निकाल लागला अन् आता राम मंदिर होणारच, असा निकाल लागल्याचे ‘व्हॉट्सॲप’वर समजले. त्याच वेळी मनात धडकी भरली. घरी, ऑफिसमध्ये ‘मी सुरक्षितपणे अयोध्येत पोचलो,’ असा मेसेज टाकला. आता इंटरनेट बंद होईल का, अशी भीती जम्मू -काश्मीरच्या अनुभवावरून वाटत होती. पण, सुदैवाने तसे काही झाले नाही अन् मोबाईल पुन्हा चार्ज केला. 

निकाल पूर्ण लागल्यानंतर रस्त्यावर थोडीफार वर्दळ दिसू लागली. दुपारी दीडनंतर काही नागरिक रस्त्यावर आले आणि चॅनेलचे प्रतिनिधी त्यांना गराडा घालून बसले. तेव्हा काही भाविकही रामलल्लाचे दर्शन घेऊन परतले. त्यांनाही कॅमेऱ्यांनी घेरले.  दुपारी दोन - अडीचच्या सुमारास तेथून निघालो. एक मोठा राउंड मारला, रस्त्यावर अजिबात गर्दी नव्हती. पोलिसांकडे चौकशी केली तर जमावबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आल्यामुळे चारपेक्षा जास्त माणसे एकत्र फिरू शकत नाही, असे सांगण्यात आले. फिरताना प्रत्येक ठिकाणी पोलिसांची संशयी नजर माझ्यावर होती. वाटेत अर्धवट सुरू असलेल्या एका छोट्या हॉटेलमध्ये पोटपूजा केली. 

सायंकाळी चार - साडेचारच्या सुमारास रस्त्यावर काही प्रमाणात वर्दळ सुरू झाली. मुख्य रस्त्यावरील बंद असलेली काही दुकाने सुरू झाली. दुकानाबाहेर येऊन थांबलेल्या एका दुकानदाराशी गप्पा मारण्यास सुरुवात केली. बिपीनचंद्र गुप्ता, हे त्यांचे नाव. ‘एवढा बंदोबस्त का?’ असे त्यांना विचारल्यावर त्यांनी अगदी बोलकी प्रतिक्रिया दिली, ते म्हणाले, ‘अहो बंदोबस्तच एवढा ठेवायचा, की लोकांनी घाबरून घराबाहेर पडूच नये.’ तेवढ्यात शेजारच्या दुकानातून ‘गुरुनानक चौकात जल्लोषाची तयारी सुरू झाली आहे,’ अशी माहिती मिळाली. वार्ताहर म्हणून माझी पावले आपोआपच तिकडे वळली. 

त्या चौकामध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते एका कोपऱ्यात उभे होते. त्यांच्या हातात झेंडे आणि फुगे होते, पण पोलिसांनी त्यांच्याभोवती कोंडाळे केले होते. आता नेमका जल्लोष कसा साजरा होणार, याबद्दल माझ्या मनात कुतूहल होते म्हणून थांबलो. तेवढ्यात बाजूच्या गल्लीमधून फटाक्यांचे आवाज आले. त्यामुळे पोलिसांची थोडी धावपळ, पळापळ झाली. पोलिस पोचेपर्यंत फटाक्यांचे आवाज बंद झाले होते. परिणामी त्या चौकात जल्लोष झालाच नाही. 

त्यामुळे चौकातून परत निघालो आणि बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर आलो. संध्याकाळचे सहा - साडेसहा वाजले होते. घरांसमोर, दुकानांसमोर आणि मठांसमोर, दिवे लागलेले दिसले. ज्यांच्याकडे तेलाचे दिवे नव्हते त्यांनी मेणबत्या लावल्या होत्या, तर काहीजणांनी पुन्हा आकाशकंदील लावले होते. अयोध्येतील रस्त्यांवर पुण्या-मुंबईसारखे झगझगीत पथदिवे नाहीत. पण रस्त्यांवर लावलेल्या दिव्यांमुळे अवघी अयोध्या उजळून निघाल्याचे दिसून आले. ते चित्र पाहून पावले आपोआपच रस्त्यावर रेंगाळली. चहा घेण्यासाठी एका ठिकाणी थांबलो आणि गोपी नावाच्या युवकाशी गप्पा मारण्यास सुरुवात केली. दिवे कसे काय लावले, असे त्याला विचारले, तेव्हा त्याने, ‘सत्तर वर्षांपासूनचा अपेक्षित निकाल आज लागला, त्यामुळे अयोध्येत आज घरोघरी दिवाळी साजरी होत आहे,’ असे सांगितले. पुढे हॉटेलवर पायी येताना या भावनेचे प्रत्यंतरही आले. 

सकाळी लवकरच बाहेर पडण्याचा निर्धार केला आणि तो यशस्वी झाला. सकाळी सव्वा सात वाजताच रामलल्लाच्या दर्शनासाठी बाहेर पडलो. रामजन्मभूमीवर जाण्याचा उत्साह होताच. मोबाईल, आधार कार्ड, हातात घड्याळ आणि खिशात काही पैसे घेऊन निघालो. प्रवेशद्वारावर ‘आयडी’ म्हणून आधार कार्डची तपासणी झाली. रामजन्मभूमीच्या प्रवेशद्वारावर तपासणीच्या वेळी मोबाईल, घड्याळ एका दुकानातील लॉकरमध्ये त्यांनी जमा करायला सांगितले. त्यानंतर कसून तपासणी झाली आणि पुढे निघालो. तब्बल ६ वेळा कसून तपासणी झाल्यावर ‘रामलल्ला’चे दर्शन झाले. अगदी सकाळची वेळ असल्याने आणि निकालामुळे भाविकही कमी होते. त्यामुळे जरा मुद्दामच रेंगाळलो. पोलिसांच्या लक्षात आले की हा माणूस फार वेळ रेंगाळत आहे, म्हणून आणि खबरदारीचा उपाय म्हणून मला पुढे जाण्यास सांगितले आणि माझे दर्शन आटोपले. 

रामजन्मभूमीच्या बाहेर आल्यानंतर सकाळी साडेआठच्या सुमारास एका ठेल्यावर गरम कचोरीचा आस्वाद घेतला आणि हॉटेलवर आलो आणि बॅग घेऊन पुन्हा बाहेर पडलो. 

अयोध्येत राममंदिर उभारणीसाठी दगडांवर नक्षीकाम कारसेवक पुरममध्ये सुरू आहे, अशी माहिती समजली होती. तिकडे निघालो. या कार्यशाळेत विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते सुरेंद्र शर्मा यांची भेट झाली. नियोजित राममंदिरासाठी सुमारे दीड लाख घनफूट दगड लागणार असून, त्यातील ६५ दगडांवर नक्षीकाम झाले आहे, असे त्यांनी सांगितले. याच ठिकाणी जगभरातून राममंदिरासाठी आलेल्या शिला (विटा) पाहायला मिळाल्या अन् नियोजित राममंदिराचा आराखडाही! मंदिरासाठीचे दगड राजस्थान, गुजरातमधून येतात. नक्षीकाम करण्यासाठी सुमारे ४०० कारागीर राजस्थानमधूनच आले आहेत आणि निकाल रामाच्या बाजूने लागल्यामुळे आता त्यांची संख्या ६०० करणार असल्याचे शर्मा यांनी सांगितले. विषय खर्चाचा निघाला तेव्हा रामजन्मभूमी न्यासाकडे भाविकांनी दिलेल्या निधीतून मंदिर होणार आहे, मदतीचा ओघ जगभरातून होतो, त्यामुळे काही अडचण होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. माहिती घेतल्यावर येथून ई-सकाळवर केलेल्या ‘एफबी लाइव्ह’ला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्या दरम्यान भाविकांची गर्दी सुरू झाली होती. अनेक राज्यांतील भाविक मोठ्या संख्येने येथे येताना दिसत होते. 

शर्मा यांच्याशी गप्पा मारताना रामजन्मभूमी खटल्यातील प्रतिवादी हाशिम अन्सारी यांचा मुलगा इकबाल अन्सारी आता खटल्याचे काम बघत आहे, असे समजले. अयोध्या रेल्वे स्टेशनजवळ श्रीराम हॉस्पिटलजवळ तो राहतो, असे समजले म्हणून त्यांना भेटायला निघालो. हॉस्पिटलपर्यंत पायीच गेलो कारण दुसरा पर्याय नव्हता. तिथे चौकशी केल्यावर पंचक्रोशीत प्रसिद्ध झालेल्या अन्सारी यांचे घर सापडले. त्यांनाही पोलिस बंदोबस्त दिलेला होता. थोडा वेळ चर्चा झाली, तेव्हा त्यांच्या वडिलांनी ७० वर्षांपूर्वी मशिदीसाठी याचिका दाखल केली होती, असे समजले. तेव्हापासून अन्सारी कुटुंब याबाबत न्यायालयीन संघर्ष करीत असल्याचे समजले. इकबाल यांना ४ मुले. दोघेजण शाळेत शिकत आहेत, तर दोघेजण गाड्यांचे पंक्चर काढण्याचे दुकान चालवतात. इकबाल यांच्याकडे बोलेरो जीप आहे अन् ती भाडेतत्त्वावर देण्याचा त्यांचा व्यवसाय असल्याचे त्यांच्या पत्नीकडून समजले. ७० वर्षे केस लढली, खूप खर्च झाला आता अपील करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. आमची नवी मशिद ५ एकर जागेत उभारण्यासाठी आता पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जेमतेम आर्थिक परिस्थिती असलेले अन्सारी कुटुंब आता खंगले असल्याचे जाणवले. ‘एमआयएम’चे असदुद्दीन ओवेसी यांनी अपील करण्याची घोषणा केली आहे, असे विचारल्यावर ‘इतकी वर्षे केस सुरू होती, त्यात का नाही आले ते, आता बोलत आहेत,’ असे म्हणत अन्सारी यांनी मनातील विषाद व्यक्त केला. 

अयोध्येत मंदिर आणि मठांची संख्या सुमारे ५ हजार आहे. त्यातील प्रत्येक मठाचे स्वतंत्र संस्थान असल्याप्रमाणे त्यांचा कारभार चालतो, असे ऐकले होते. स्थानिक पत्रकार मित्रांच्या मदतीने महंत गिरीशपती त्रिपाठी यांना भेटायला गेलो. मठात उच्चासनावर ते बसले होते तर त्यांचे सेवक (चेले) बाजूला उभे होते. महाराष्ट्रातून पुणे शहरातून भेटायला आलो आहे, असे सांगितल्यावर त्यांच्याजवळ (उच्चासनाच्या बाजूला खाली जमिनीवर) बसायला मिळाले. गप्पा सुरू झाल्या. त्यांनी अयोध्येत नव्हे तर देशात सर्वत्र या खटल्याचे महत्त्व काय आहे, अयोध्येतील महंतांची भूमिका हे अगदी मुद्देसूदपणे सांगितले. या महंतांनी काँग्रेसच्या उमेदवारीवर यापूर्वी लोकसभा, विधानसभा निवडणूक लढविली आहे, असेही नंतर समजले. 

संध्याकाळचे चार-साडेचार झाले होते. शरयू नदीवर संध्याकाळी सहा वाजता पूजा असते, आवर्जून पाहा, असे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे तिकडे निघालो. पायी जात असताना अयोध्या शहर जवळून पाहायला मिळाले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला सांडपाण्याची गटारे उघडी होती, अनेक मंदिरे असल्यामुळे ठिकठिकाणी पत्रावळ्या, टाकून दिलेले खाद्यपदार्थ यांचे ढीग दिसत होते आणि त्याभोवती गाई, कुत्री आणि कावळ्याचे थवे होते. त्यामुळे माशा घोंगावत होत्या. अंतर्गत भागातील रस्त्यांची दुरवस्था झालेली होती आणि सार्वजनिक स्वच्छतागृहांबद्दल तर विचारूच नका, जवळून जाताना एवढी दुर्गंधी येत होती. साधूंची आणि मंदिरांची नगरी म्हणजे अयोध्या नगरी, धार्मिक पर्यटनाचे देशातील एक लोकप्रिय शहर, असा लौकिक असलेल्या अयोध्येचे हे रूप अस्वस्थ करणारे होते. 

शरयूच्या काठावर पोचल्यावर भाविकांची गर्दी दिसली. नदीत डुबकी मारून पूजेला बसणारी अनेक जोडपी दिसत होती. पंडित त्यांना पूजेचे महत्त्व सांगत होते अन् भाविक मनोभावे पूजा करीत होते. शरयू नदीवरील पुलावर आलो अन् १९९२ च्या आठवणी आल्या. कारसेवकांना पोलिसांनी तेव्हा पुलावरून खाली नदीत फेकल्याच्या आठवणी काही जणांनी सांगितल्याचे आठवले. पुलाची लांबी साधारणतः दीड - दोन किलोमीटर असावी. रुंदी ४० फूट तर नदीपात्र खोलवर. अयोध्येत प्रवेश करतानाचा हा एक पूल. त्याच्या बाजूलाच नदीचा एक प्रवाह वळविण्यात आला आहे अन् त्याच्या दुतर्फा घाट बांधण्यात आले आहेत. या घाटांचे नुकतेच सुशोभीकरण झाले आहे. त्यावर दिव्यांची आकर्षक रंगसंगती केल्यामुळे ते दृश्य आकर्षक दिसत होते. घाटावर पोलिस बंदोबस्त कडक असल्याने भाविक कमी होते. मात्र एरवी हे घाट भरलेले असतात, असे तेथील विक्रेत्यांनी सांगितले. 

रामजन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास शास्त्री महाराज यांची भेट घेण्यासाठी मणिराम छावणीमध्ये सकाळी ११ च्या सुमारास पोचलो. तत्पूर्वी हनुमानगढीत जाऊन हनुमानाचे दर्शन घेतले होते. महाराज येण्यासाठी एक तास होता. मंदिरामध्ये बसून राहिलो आणि येणाऱ्या भाविकांचे निरीक्षण करत होतो. उत्तर प्रदेशातील गावागावांतून येणारे भाविक गरीब, मध्यमवर्गीय दिसत होते. त्यांचे दिवस बदलावेत म्हणून रामाला साकडे घालताना महाराजांनी वशिला लावावा, या अपेक्षेने ते महाराजांच्या गादीवर डोके ठेवताना दिसत होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास महाराज आल्यानंतर त्यांच्या सेवकाकडे माझे व्हिजिटिंग कार्ड दिले. काही प्रश्न विचारण्यासाठी तुमच्याशी चर्चा करायची असल्याचे महाराजांना धीटपणे सांगितल्यानंतर महाराजांनी जवळ बसविले आणि विचारपूस केली... गेल्या दहा - पंधरा वर्षांत काय बदल झाले आहेत, अयोध्येची पुढची दिशा काय असेल, अयोध्येचा विकास कसा होणार या सगळ्या प्रश्नांना महाराजांची उत्तरे येत होती ती रामजन्मभूमीच्या निकालाच्या बाजूने - ‘निकाल आता आमच्या बाजूने लागला आहे आणि विकासाचे एक नवीन पर्व सुरू होत आहे. अयोध्येतील राम मंदिर हे जगातील सर्वाधिक भव्य मंदिर असेल, त्यासाठी जगभरातून निधी येईल,’ असा विश्वास महाराजांनी व्यक्त केला. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिलेल्या आदेशानुसार होणाऱ्या ट्रस्टमध्ये कोण असेल, असे विचारल्यानंतर महंतांनी सांगितले की ट्रस्टमध्ये अयोध्येतील किमान सहा महंत असतील. बाकी कोण ते सरकारने ठरवावे. ‘ट्रस्ट सरकारचा असला तरी मंदिर मात्र अयोध्येचे असेल,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘पैसे किती लागतील,’ यावर त्यांनी चक्क मुकेश, अनिल अंबानी यांचे नाव घेत त्यांच्यासारखे हजारो उद्योगपती पाहिजे तेवढा पैसा द्यायला तयार आहेत, रामजन्मभूमी न्यासाकडे पैशाची कमतरता नाही, आम्हाला सरकारने पैसे दिले नाहीत, मदत केली नाही तरी हे मंदिर साकारण्याचे थांबणार नाही. कारण जगभरातील सगळेच भारतीय मदत करण्यास तयार आहेत,’ असे ठामपणे सांगितले. त्यानंतर मला भोजनाला घेऊन जाण्याचा सेवकांना आदेश दिला अन् मुलाखतीसाठी मला दिलेला वेळ संपला, हे लक्षात आले. बाहेर पडलो, पण रामजन्मभूमी न्यासाच्या अध्यक्षांचे विचार काही केल्या डोक्यातून जात नव्हते... रामजन्मभूमी न्यासाकडे असलेले कोट्यवधी रुपये ते सरकारला देणार का? मंदिर उभारणीचा खर्च कोण करणार? अयोध्येतील महंत, मंदिर सरकारच्या हातात जाऊन देतील का? मशिदीसाठीची जागा कोठे देणार? त्याची तर कोणी चर्चाही करत नव्हते, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अजून पुढे यायची आहेत अन् ती शोधली पाहिजेत, असे मनोमन वाटत होते. 

मुख्य रस्त्यावर आलो. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत बंदोबस्त थोडा शिथिल झाला होता. मीडियाचीही वर्दळ कमी झाली होती. त्यामुळे रस्त्यांवरून सायकल रिक्षा, बॅटरीवर धावणाऱ्या रिक्षांची आणि खासगी वाहनांची वाहतूक सुरू झाली होती. दुकाने उघडली होती अन् भविकांचीही गर्दी दिसू लागली होती. 

अयोध्येतून बाहेर पडताना, गेल्या ४० वर्षांत येथे राजकारणाशिवाय काहीच झाले नाही, हा व्यापाऱ्यांशी झालेल्या चर्चेतील मुद्दा आठवला. कल्याणसिंह, मायावती, मुलायमसिंग यादव यांची सरकारे आली अन् गेली... जात, धर्म यावर निवडणुका झाल्या... सत्ताधारी बदलत गेले, पण उत्तर प्रदेशमध्ये फारसा बदल झाला नाही, अशी नागरिकांची भावना आहे. आता रामजन्मभूमीचा अखेर निकाल लागला, आता तरी विकासाचे पर्व सुरू होऊन अयोध्या उजळेल का, याकडे सामान्य माणसाचे लक्ष लागले आहे आणि जर तसे झाले तरच सामान्यांना रामलल्ला प्रसन्न झाला, असे म्हणता येईल.....जय श्रीराम!

संबंधित बातम्या