स्त्रीचं आभूषण मेंदी

राजश्री बिनायकिया
सोमवार, 29 जुलै 2019

कव्हर स्टोरी : मेंदी विशेष
 

स्त्रीचं सौंदर्य अधिक अधिक खुलवणारं मेंदी हे एक सुंदर प्रसाधन आहे. गोऱ्या हातावर मेंदीची लाल चुटूक नाजूक नक्षी पाहणाऱ्यांची नजर खिळवून ठेवते आणि तिचा गंध मनाला मोहवून टाकतो. मेंदीची सुंदर नक्षी काढता येणं, ही एक फार मेहनतीनं साध्य होणारी कला आहे. 

एका नाजूकशा झाडाची ही पानं. पण हात लावला आणि काय जादू झाली, तर हात लाल झाले. म्हणून ती खुडली गेली. हातावर चढलेला हा रंग शुभ शकुनाचं प्रतीक मानलं गेलं. अगदी तेव्हापासून मेंदीचा आणि स्त्रीचा संबंध कायमचा जोडला गेला. स्त्रीच्या सौंदर्य प्रसाधनातील मेंदी हा एक महत्त्वाचा भाग झाला. आयुष्यातल्या सर्वांत तरल, रंगीबेरंगी नाजूक क्षणांना अधिक खुलवणारी, आनंददायी करणारी मेंदी ही तिची सखी ठरली. मेंदी ही स्त्रीच्या सौंदर्याची द्योतकच म्हणावी लागेल. मेंदीच्या रंगात प्रत्येक स्त्रीचं मनं गुंतलेलं असतं. मेंदीची नक्षी, तिचा हातावर चढलेला रंग याची नजाकत काही औरच आणि म्हणूनच कितीतरी हजारो वर्षांपूर्वी असलेली मेंदीची संस्कृती आजही टिकून आहे. 

मेंदीचं झाड हे लहान वृक्ष अथवा सामान्य झुडूप या वर्गात येतं. लॅसोनिया प्रजातीतील ही एकच जाती असून तिचा प्रसार बऱ्याचदा बागेत शोभेकरिता झालेला आढळतो. पण ती मूळची उत्तर आफ्रिका आणि आग्नेय आशियातील आहे. भारतात व श्रीलंकेत ती कोरड्या भागात आढळते. तिच्या पानातील रंगद्रव्यामुळं तसंच फुलांपासून मिळणाऱ्या हीना अत्तरांमुळं तिला व्यापारी महत्त्व प्राप्त झालं आहे. एप्रिल ते जुलै या कालावधीमध्ये त्रिकोणी फुलोऱ्यावर लहान, पांढरट किंवा काहीशी गुलाबी रंगाची असंख्य द्विलिंगी सुगंधी फुले येतात. पाच हजार वर्षांपूर्वी इजिप्तच्या पिरॅमिड्‌समध्ये सुरक्षित ठेवल्या गेलेल्या ममीच्या हातावरही मेंदीचे अंश पाहायला मिळतात. 

भारतात मेंदीची परंपरा १२ व्या शतकात मुसलमानांच्या आगमनाने सुरू झाली. त्यावेळी राजस्थानमध्ये मेंदी अधिक लोकप्रिय होती. तसंच पंजाब, उत्तरप्रदेश या भागांत शृंगाराचं एक साधन म्हणून मेंदीला महत्त्व आहे. या भागात विवाहाच्या आदल्या रात्री वधू-वरांना मेंदी लावण्याची प्रथा आहे. त्या रात्रीला ‘मेहंदी की रात’ असंच नाव आहे. ज्या वधूच्या तळहाताची मेंदी अगदी लालचुटूक रंगते तिच्यावर तिच्या पतीचं गाढ प्रेम असतं, असा त्यांच्यामध्ये समज आहे. राजस्थानात करवा चौथ, तीज इत्यादी सणांच्या आधी कुमारिका आणि सौभाग्यवती स्त्री या हातांच्या तळव्यावर व पायांवर विविध नक्षीकाम करून मेंदी रंगवतात. महाराष्ट्रातही मेंदीचा भरपूर प्रसार झाला आहे. नागपंचमीच्या सणाला खेड्यांतील, शहरांतील मुली आणि सुहासिनी मेंदीनं विविध नक्षीकाम करून हातपाय रंगवतात. मेंदीचा उपयोग सौंदर्याव्यतिरिक्त औषधी म्हणूनही केला जातो. 

भारतीय संस्कृतीत शुभकार्यात मेंदीचा वापर केला जात असला, तरी मेंदी आता पाश्‍चिमात्य देशातही तितकीच लोकप्रिय होऊ लागली आहे. त्यांच्या संस्कृतीला शोभणाऱ्या शैल्याही त्यांनी निर्माण केल्या आहेत. तसेच मेंदीच्या नक्षीची विविधता आणि सौंदर्य अधिक अधिक समृद्ध होत आहे. 

झाडाच्या हिरव्या पानांपासूनच आज मेंदीचं अनेक रंगाढंगात रूपांतर झालं आहे. तिचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. प्राचीन काळी सूर्य, चंद्र, तारे यांच्या रचना मेंदीतून साकार केल्या जात असत. मात्र, आधुनिक युगात मेंदीची नक्षी केवळ तळहातावरच नाही, तर अगदी दंडावर, तळहातापासून गुडघ्यापर्यंत वेगवेगळ्या आकार प्रकारात रंगू लागली आहे. शिवाय गळ्याभोवती, पाठीवर, पोटावर, चमचमणारे खडे लावलेल्या मेंदीची डिझाईन्स दिसू लागली आहेत. शिवाय राजस्थानी मेंदी, अरेबियन मेंदी, ब्रश पेंटिंग मीनाकारी मेंदी, हिरामोती, जरदोशी मेंदी, ब्लॅक मेंदी, मॅजिक मेंदी किंवा स्पार्कल मेंदी (चंदेरी मेंदी), स्टीकर मेंदी, आलता मेंदी इत्यादी मेंदींचे विविध प्रकार फॅशनमध्ये आले आहेत.  

संबंधित बातम्या