नाताळची सजावट

मृणाल तुळपुळे
सोमवार, 21 डिसेंबर 2020

कव्हर स्टोरी

संपूर्ण जगभरात उत्साहाने साजरा केला जाणारा नाताळ जवळ आला, की घराची साफसफाई, रंगीबेरंगी दिव्यांचा झगमगाट, ख्रिसमस ट्री आणि विविध प्रकारच्या केक्स व कुकीजनी भरलेल्या बेकरी हे सगळे डोळ्यासमोर येते.

नाताळच्या सजावटीत लाल, हिरवा, पांढरा आणि सोनेरी हे चार रंगदेखील खूप महत्त्वाचे आहेत. घर अथवा ख्रिसमस ट्री सजवताना प्रामुख्याने या चार रंगांचा वापर केलेला दिसून येतो. त्यातील हिरवा आणि लाल रंग नाताळ नंतर येणाऱ्‍या वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी वापरला जातो. सोनेरी रंग सूर्य आणि प्रकाशाचे प्रतीक म्हणून, तर पांढरा रंग शुद्धता आणि शांतता याचे प्रतीक म्हणून वापरला जातो. 

ख्रिसमस ट्री नाताळचा एक अविभाज्य घटक असून तो सजवून तयार झाला, की खऱ्‍या अर्थाने नाताळ सुरू झाला असे म्हटले जाते. नाताळसाठी पूर्वी फर, पाईन, कोनिफर किंवा फर्नची फांदी घरात आणून ती  सजवत असत; पण कालानुरूप त्याचे स्वरूप व आकारमान बदलत गेले. आता तर बाजारात प्लॅस्टिकचे ख्रिसमस ट्री मिळायला लागले आहेत. जुन्या पद्धतीनुसार तो सजवताना त्यावर कागदी गुलाब, सफरचंद आणि मिठाईचा वापर केला जाई. आज पारंपरिक वस्तू आणि नावीन्यपूर्ण कल्पना वापरून ख्रिसमस ट्री आकर्षकरीत्या सजवला जातो. 
अशा पारंपरिक वस्तू म्हणजे कँडीकेन्स, रंगीबेरंगी गोळे, घंटा, चांदण्या आणि रिबिन्स. त्यापैकी लाल, पांढऱ्या‍ रंगाच्या कँडीकेन्स मेंढपाळांच्या हातातल्या काठीच्या आकाराच्या असून त्या लहान मुलांना खायला फार आवडतात. आकाशातील ताऱ्‍यांचे प्रतीक म्हणून ख्रिसमस ट्रीवर चांदण्या व चमचमणारे दिवे लावले जातात, तर बेथेलेहम या ताऱ्‍याचे प्रतीक म्हणून झाडाच्या सर्वात वरच्या टोकाला एक मोठी चांदणी लावतात.

असा सजवलेला, नटवलेला ख्रिसमस ट्री घरातील दिवाणखान्यात किंवा मुख्य खोलीत ठेवून त्याच्या खाली आकर्षक वेष्टणात गुंडाळलेल्या भेटवस्तू व पॉन्सेटियाच्या कुंड्या ठेवल्या जातात. पुरातन काळापासून हिरवीगार पाने व चांदणीसारख्या लाल पाकळ्या असलेल्या पॉन्सेटियाच्या फुलांना नाताळच्या सजावटीत  महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. 

वेगवेगळ्या माध्यमातून तयार केलेल्या रंगीबेरंगी रेथचा म्हणजे चक्राकार माळेचा नाताळच्या सजावटीत अनेक ठिकाणी वापर केला जातो. प्राचीन परंपरेनुसार रेथ हे काटेरी मुकुटाचे प्रतीक आहे. असे सांगितले जाते, की येशू ख्रिस्ताला सुळावर चढवण्याच्या आधी त्याच्या डोक्यावर एक काटेरी मुकुट घातला होता व त्याची आठवण म्हणून नाताळच्या वेळी असा रेथ तयार करून घराच्या दारावर, घरातील भिंतीवर वा खिसमस ट्रीवर लावला जातो. गोलाकार रेथला सुरुवात व शेवट नसल्यामुळे ते पूर्णावस्था व एकीचे प्रतीक मानले जाते. रेथ शक्यतो हिरव्या रंगाचे असते; ते लाल व सोनेरी रंगाच्या वस्तूंनी नटवलेले असतात. नाताळचे रेथ हिरव्यागार होलीच्या पानांचे करतात व त्यात लालचुटूक चेरीज, सोनेरी रिबीन व घंटांचा  वापर केला जातो.

घंटा व नाताळचे अगदी जवळचे नाते आहे. ख्रिसमस ट्रीवर तर लहान लहान शोभेच्या घंटा लावल्या जातातच; पण घराच्या मुख्य दरवाजावर एक मोठी घंटा लावली जाते. लाल रिबिनीत बांधलेली सोनेरी घंटा व हिरवेगार पान हे सजावटीत अनेक ठिकाणी दिसून येते.  

नाताळच्या वेळी भयप्रद अशा काळोखाला दूर करण्यासाठी मेणबत्त्या लावल्या जातात. मेणबत्तीच्या उजेडामुळे तो अंधार दूर होऊन सर्वत्र आशादायी असा प्रकाश पसरेल व मेणबत्तीचा मंद उजेड सणातील वातावरण प्रसन्न करून टाकेल अशी त्यामागची भावना असते. जुन्या परंपरेनुसार नाताळसाठी एक मोठी मेणबत्ती तया केली जाते. ती मेणबत्ती ख्रिसमस ईव्हला पेटवून नाताळच्या दिवशीचा सूर्य उगवेपर्यंत रात्रभर  पेटलेली ठेवली जाते. या व्यतिरिक्त नाताळची सजावट करताना वेगवेगळ्या वासाच्या रंगीबेरंगी मेणबत्त्या जेवणाच्या टेबलवर, ख्रिसमस ट्रीच्या शेजारी ठेवल्या जातात.

सजावटीचा एक भाग म्हणून घरी आलेली नाताळशी निगडित शुभेच्छा पत्रे ख्रिसमस ट्रीच्या शेजारी मांडून ठेवली जातात किंवा भिंतीवर लावली जातात. 

नाताळच्या वेळी घरांप्रमाणे सगळी चर्चदेखील सजवली जातात. चर्चच्या सजावटीमधला मुख्य भाग म्हणजे तेथे ख्रिसमस ट्रीच्या जोडीने येशूच्या जन्माचा देखावा मांडला जातो. त्यात हिरवीगार पाने, घंटा, मेणबत्त्या व पॉन्सेटियाच्या फुलांचा खूप वापर केला जातो.  

भिंतींवर घंटा व रेथ लावले जातात, तसेच सर्वत्र विद्युत रोषणाई करण्यात येते. 

अशाप्रकारची घरांमधली व चर्चमधली नाताळची सजावट बघून मन प्रसन्न होते व सणाचा आनंद द्विगुणित होतो.

संबंधित बातम्या