झंडा ऊंचा रहें हमारा...!

नरेश शेळके, नागपूर
सोमवार, 13 सप्टेंबर 2021


कव्हर स्टोरी

‘Believe me, the reward is not so great without the struggle,’ अमेरिकेची धावपटू विल्मा रुडॉल्फची ही प्रसिद्ध प्रतिक्रिया टोकियो पॅरालिंपिकमध्ये १९ पदके जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंसाठी समर्पक अशीच आहे. टोकियोतच भारतीय खेळाडूंनी ऑलिंपिकमध्ये सात पदके जिंकल्यावर भारतीयांची मान अभिमानाने उंचावली. हा विक्रम पॅरालिंपियन खेळाडूंनी मागे टाकला आणि चक्क पाच सुवर्णपदकांसह एकोणीस पदकांना गवसणी घातली. हे यश म्हणजे क्रीडा क्षेत्रातील ‘बदलते भारत की तस्वीर’ असेच म्हणावे लागेल. 

शारीरिक मर्यादा, त्यामुळे होणाऱ्या वेदना, त्यात ताठ मानेने जगण्यासाठीचा संघर्ष आणि समाजाकडून होणारी उपेक्षा, असे अनेक उंबरठे ओलांडत पॅरालिंपियन क्रीडापटूंनी विक्रमी पदके जिंकत दिव्यांग खेळाडूंकडे पाहण्याचा सामान्यांचा दृष्टिकोनच बदलून टाकला. या खेळाडूंची प्रत्येकाची आपली एक कहाणी आहे. दोन पदके जिंकणारी अवनी लेखरा असो, टेबल टेनिसमध्ये पहिले पदक जिंकणारी भाविना पटेल असो, की भालाफेकीत सुवर्णपदक जिंकणारा सुमीत अंतिल असो, प्रत्येकाने जीवनात बरेच काही गमावले असले, तरी टोकियोत पदक जिंकून आत्मसन्मान बुलंद केला आहे. १९८४च्या स्पर्धेत जोगिंदरसिंग बेदी यांनी गोळा, थाळी व भालाफेकीत तीन पदके जिंकत विक्रम केला. मात्र, ही कामगिरी प्रसिद्धीच्या दृष्टीने दुर्लक्षितच राहिली. ज्यावेळी त्यांना जीवनगौरव जाहीर झाला, त्यावेळी ते नागपूरजवळच्या कामठी येथे राहतात हा उलगडा झाला. हे पॅरालिंपियन खेळाडू इतके नजरेआड होते. आता मात्र परिस्थिती बदलली आहे.

ऑलिंपिकमध्ये भारतीय नेमबाजांना पदकांची सर्वाधिक पसंती देण्यात आली होती. मात्र, त्यांनी साफ निराशा केली. ही कोंडी १९ वर्षीय अवनी लेखराने फोडली. राजस्थानातील जयपूरच्या अवनीचे २०१२मध्ये झालेल्या एका अपघातामुळे जीवनच बदलून गेले. वडिलांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे ती नेमबाजीकडे वळली. अशा या खेळाडूने प्रथम दहा मीटर एअर रायफल प्रकारात ऑलिंपिक व विश्वविजेत्या खेळाडूंना पराभूत करून ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली भारतीय नेमबाज होण्याचा मान मिळविला. ती म्हणते, ‘२००८च्या स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्राचे आत्मचरित्र वाचण्यात आले आणि तिथूनच माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली.’ तिनेही अभिनवप्रमाणे नेमबाज होण्याचा निर्णय घेतला आणि ती पनवेल येथे सुमा शिरूर यांच्या प्रशिक्षण केंद्रात दाखल झाली. ‘अवनीला मिळालेली दोन पदके आणि सांगता समारोहात ध्वजधारक होण्याचा तिला मिळालेला मान ही मला शिक्षक दिनी मिळालेली सर्वोत्तम भेट होय,’ असे सुमा म्हणाली. अवनीने ५० मीटर थ्री पोझिशन या नेमबाजीतील अवघड प्रकारात कांस्यपदक जिंकून एकाच स्पर्धेत दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू होण्याचा आगळा-वेगळा विक्रम केला. मात्र, अवनीच्या सुवर्णपदकापूर्वी भाविना पटेलने टेबल टेनिसमध्ये रौप्यपदक जिंकले होते. या पदकापासूनच सुरू झाली होती, खेळाडूंची पदकांची लयलूट! यावेळी ९ खेळांत ५४ भारतीय खेळाडू सहभागी झाले होते. टोकियोपूर्वी पॅरालिंपिकमध्ये भारताला एकूण फक्त १२ पदके जिंकता आली होती. त्यात पाच वर्षांपूर्वी रिओत मिळविलेल्या चार पदकांचाही समावेश आहे. यावेळी १९ पदके जिंकून भारताने पदकतालिकेत चक्क २४व्या स्थानावर झेप घेतली. 

नेमबाजी ः अवनीचा अचूक नेम
स्पर्धेत भारताचे दहा नेमबाज सहभागी झाले होते. त्यांनी दोन सुवर्णपदकांसह पाच पदके जिंकली. त्यात अवनी लेखराचा वाटा एक सुवर्ण, एक कांस्य; तर हरियानातील फरिदाबादचे असलेले ३९ वर्षीय सिंघराज अधाना यांचा वाटा एक रौप्य व एक कांस्यपदकाचा आहे. हरियानाच्याच २० वर्षीय मनीष नरवालने मिश्र ५० मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकावर अचूक नेम साधला. कुस्तीपटू वडील दिलबाग सिंग यांच्या सूचनेनुसार मनीषने अवघ्या पाच वर्षांपूर्वी नेमबाजीची कास धरली. त्याचा एक हात जन्मतःच अधू होता. 

अवनीला राजस्थान सरकारने त्यांच्या ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ अभियानाची ब्रँड अॅम्बेसेडर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे तिला तीन कोटी रुपयांचे पारितोषिक आणि राज्य वन विभागात साहाय्यक वनसंरक्षक पदावर नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे. 

बॅडमिंटन ः प्रमोदची कमाल, जिल्हाधिकाऱ्यांना रौप्य
टोकियोत आपले सात खेळाडू सहभागी झाले होते. ओडिशाच्या प्रमोद भगतने एकेरीत सुवर्ण, उत्तराखंडच्या ३१ वर्षीय मनोज सरकारने कांस्य आणि सुहास यथीराज यांनी रौप्यपदक जिंकले. लहानपणीच पोलिओ झालेल्या प्रमोदकडून पॅरालिंपिकमध्ये पदार्पण करणाऱ्या बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदकाचीच अपेक्षा होती. ग्रेट ब्रिटनच्या डॅनिअल बेथेलवर मात केल्यानंतर प्रमोद म्हणाला, ‘मला सुवर्णपदकच जिंकायचे होते आणि हे सुवर्णपदक इतर शंभर पदकाच्या बरोबरीचे आहे. मी सर्वोत्तम आहे आणि सुवर्णपदक मीच जिंकणार असा विश्वास प्रशिक्षक गौरव खन्ना यांना होता. तो शब्द खरा करून दाखविला.’ कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील असलेले सुहास यथीराज हे २००७च्या उत्तर प्रदेश केडरचे आयएएस अधिकारी. सध्या ते गौतमबुद्ध नगर (नोएडा) येथे जिल्हाधिकारी (डीएम) आहेत. निवडणूक आणि इतर प्रशासकीय कार्यरत व्यग्र असतानाही त्यांनी आपले बॅडमिंटनप्रेम जपले होते. त्यामुळे ते पॅरालिंपिक पदक जिंकणारे पहिले आयएएस अधिकारी झाले आहेत. अंतिम फेरीत ते फ्रान्सच्या लुकास मझूरकडून पराभूत झाले. प्रमोदप्रमाणे गौरव खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या जयपूरच्या २२ वर्षीय कृष्णा नागरने एकेरीच्या एसएच-६ गटात सुवर्णपदक जिंकून भारताला पाचवे सुवर्णपदक मिळवून दिले. 

अॅथलेटिक्स ः सुमीतचा विश्वविक्रम
अॅथलेटिक्समध्ये भारताचे २० पुरुष व ४ महिला खेळाडू सहभागी झाले होते. त्यापैकी एका सुवर्णपदकासह आठ पदके पुरुषांनी जिंकली. कुस्तीपटू होण्याची स्वप्ने रंगविणाऱ्या सुमीत अंतिलने भालाफेकीत ६८.५५ मीटरचा विश्वविक्रम करून सुवर्णपदक जिंकले. २०१५मध्ये झालेल्या अपघातानंतर त्याचा डावा पाय गुडघ्याच्या खाली कापावा लागला. त्यामुळे तो फार निराश झाला होता. दिल्लीत पदवीचे शिक्षण घेत असताना राजकुमार यांनी त्याला प्रशिक्षक नितीन जयस्वाल यांच्याकडे सोपविले आणि जयस्वाल यांनी सुमीतला भालाफेकीत तरबेज करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे ज्या स्टेडियममध्ये नीरज चोप्राने सुवर्ण जिंकले त्याच स्टेडियममध्ये सुमीतनेही तीनदा विश्वविक्रम करून सुवर्ण जिंकले. 

भालाफेकपटू देवेंद्र झाझरियाच्या नावावर अथेन्स (२००४) आणि रिओ (२०१६)मध्ये सुवर्णपदकाची नोंद आहे. येथे त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मात्र, ६४.३५ ही सर्वोत्तम कामगिरी केल्याचा त्याला अभिमान आहे. तो म्हणतो, ‘यापूर्वी मी फक्त एकटा विजयी मंचावर राहायचो. आता इतर खेळाडूही आहेत. त्याचा आनंद आहे.’ गांधीनगरच्या साई केंद्रात सराव करीत असतानाच गेल्या ऑक्टोबरमध्ये त्याच्या वडिलांचे निधन झाले त्यावेळी तो त्यांच्यासोबत नव्हता. रौप्यपदक जिंकल्यानंतर देवेंद्र म्हणाला, ‘मी पदकाची हॅटट्रीक करावी अशी माझ्या वडिलांची इच्छा होती. त्यामुळे हे पदक मी त्यांना समर्पित करतो. या पदकासाठी मी खूप त्याग केला आहे. त्यामुळे याचा आनंद अवर्णनीय आहे.’

 भालाफेकीप्रमाणे उंच उडीत भारताने तीन पदके जिंकली. त्यात मरियप्पन थंगवेलू हा विद्यमान सुवर्णपदक विजेता होता. मात्र, त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मरियप्पन, निशाद कुमार आणि शरद कुमार हे तिघेही बंगळूर येथील साईच्या केंद्रावर सत्यनारायण यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. योगेश कठुनिया व प्रवीण कुमार यांनी अनुक्रमे थाळीफेक व उंच उडीत रौप्यपदकाची कमाई केली. दोघेही दिल्लीत सत्यपाल यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. २.०७ मीटरचा आशियाई विक्रम करणारा २० वर्षीय प्रवीण म्हणाला, ‘पदक जिंकण्याचा विश्वास होता. मात्र, रौप्यपदक जिंकेन असे वाटले नव्हते. आता या कामगिरीचा योग्य सन्मान होईल अशी आशा करतो.’ 

भाविनाने उघडले खाते
बारा महिन्यांची असताना गुजरातच्या भाविना पटेलला पोलिओ झाल्याचे लक्षात आले होते. त्यामुळे या मुलीचे काय होईल याची चिंता आई-वडिलांना होती. मात्र, टोकियोतील पदक जिंकल्यावर ते म्हणतात, ‘मुलीने आमचे नाव उंचावले.’ दीपा मलिकनंतर पॅरालिंपिकमध्ये पदक जिंकणारी भाविना दुसरी महिला तर टेबल टेनिसमध्ये पहिली खेळाडू ठरली. भाविनाप्रमाणेच हरियानाच्या कैथल जिल्ह्यातील असलेल्या आर्चर हरविंदरची कहाणी अशीच प्रेरणादायी आहे. लहानपणी डेंग्यू झाल्याने आई-वडील उपचारासाठी डॉक्टरकडे घेऊन गेले. डॉक्टरने इन्जेक्शन दिल्यावर काही दिवसांनी त्याचे पाय लुळे पडले. मात्र, त्याने हार मानली नाही. पतियाळा येथे पंजाबी विद्यापीठात शिक्षण घेत असताना सर्वप्रथम त्याचा आर्चरीशी परिचय झाला आणि ११ वर्षांच्या अथक परिश्रमानंतर ही त्याची ओळख झाली. टोकियोत दक्षिण कोरियाच्या किम मिन सू या खेळाडूला शूट ऑफमध्ये पराभूत करून ३१ वर्षीय हरविंदरने वैयक्तिक रिकर्व प्रकारात कांस्यपदक जिंकण्याचा मान मिळविला.    

सोयी-सुविधांसोबत हवा सन्मान
आता पॅरालिंपिकमध्येच नव्हे तर ऑलिंपिकमध्ये झेप घेण्यासाठी भारतीय खेळाडूंना या १९ पदकांचे बळ पुरेसे आहे. या यशात खेळाडूंची मेहनत, त्यांचा त्याग यासोबत त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहणारे प्रशिक्षक, पॅरालिंपिक समिती आणि महत्त्वाचे म्हणजे भारतीय क्रीडा प्राधीकरण (साई) यांचा मोलाचा वाटा आहे. तसेच काही खेळाडूंना गो स्पोर्ट्‌स फाउंडेशन या संस्थेनेही मोलाची साथ दिली. पण अजूनही बऱ्याच सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे भविष्यात आणखी पदके जिंकायची असतील तर या खेळाडूंना त्यांच्या वर्गीकरणानुसार साहित्य पुरविणे, सरावाच्या ठिकाणी सोयी-सुविधा पुरविणे, क्रीडा मानसशास्त्रज्ञाची मदत देणे, ट्रेनर, फिजीओ उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. दुर्लक्षित असलेल्या त्यांच्या प्रशिक्षकांनाही योग्य मान-सन्मान मिळण्याची गरज आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या खेळाडूंना जीवनात स्थैर्य प्राप्त करून द्यायचे असेल तर त्यांच्या नोकरीचा गंभीर प्रश्न निकाली काढणे आवश्यक आहे. त्यामुळेच केंद्र किंवा राज्य सरकारने किमान पॅरालिंपिक स्पर्धेत सहभागी झालेल्या आणि पदक जिंकलेल्या खेळाडूंना स्पोर्ट्‌स कोटातंर्गत नोकरीत सामावून घ्यावे, तरच भविष्यात मोठ्या प्रमाणात पॅरालिंपियन घडण्यास मदत होईल. 

आगामी पॅरालिंपिकमध्ये आणखी पदके जिंकायची असतील तळागळातील खेळाडूंचाही शोध घेऊन त्यांना दर्जेदार प्रशिक्षण देण्याची गरज आहे. क्रीडा संस्कृतीसोबत ऑलिंपिक व जागतिक पदक विजेते खेळाडू घडविणारी संस्कृती निर्माण होईल अशी यंत्रणा निर्माण करण्याची गरज आहे, तरच भारत क्रीडाक्षेत्रातही सुपर पॉवर होऊ शकेल.    

टोकियो पॅरालिंपिक स्पर्धेतील पदकविजेते
सुवर्ण

 •      अवनी लेखरा (नेमबाजी)
 •      सुमीत अंतिल (भालाफेक)
 •      मनीष नरवाल (नेमबाजी)
 •      प्रमोद भगत (बॅडमिंटन)
 •      कृष्णा नागर (बॅडमिंटन) 

रौप्यपदक

 •      भाविना पटेल (टेबल टेनिस)
 •      प्रवीण कुमार (उंच उडी)
 •      निशाद कुमार (उंच उडी)
 •      देवेंद्र झाझरिया (भालाफेक)
 •      सिंघराज अधाना (नेमबाजी)
 •      मरियप्पन थंगवेलू (उंच उडी)
 •      योगेश कठुनिया (थाळीफेक)
 •      सुहास यतिराज (बॅडमिंटन)

कांस्यपदक

 •      अवनी लेखरा (नेमबाजी)
 •      हरविंदर सिंग (आर्चरी)
 •      सुंदर सिंग गुर्जर (भालाफेक)
 •      सिंघराज अधाना (नेमबाजी)
 •      मनोज सरकार (बॅडमिंटन) 
 •      शरद कुमार (उंच उडी)

संबंधित बातम्या