पर्जन्यसंस्कृती

नीती मेहेंदळे
सोमवार, 25 जुलै 2022

...इतक्यात पावसाचे ठोके जाणणारं कोवळं धुकटं आच्छादून जातं, अवघ्या शिखर मंडलावर त्‍याचं सांप्रदायित्‍व बहाल होतं बघता बघता. आपण मर्त्य मानवानं काय करायचं अशा वेळी? अनिमिष डोळ्यांनी पिऊन घ्यायचं फक्त हे निसर्गी मायामृत. पानांची तरतरी घ्यावी देहभरात साठवून. हात जोडते चक्क निसर्गदेवतेला. त्या एकाहून एक उंचीच्या भव्यतेच्या स्पर्धा मांडणाऱ्या शिखरांकडे पुन्हा वळून पाहते. काय दिसतं मला? एका पुरातत्त्वीय संस्कृतीशी पर्जन्ययुग संस्कृतीचं मीलन होत आहे.

...इतक्यात पावसाचे ठोके जाणणारं कोवळं धुकटं आच्छादून जातं, अवघ्या शिखर मंडलावर त्‍याचं सांप्रदायित्‍व बहाल होतं बघता बघता. आपण मर्त्य मानवानं काय करायचं अशा वेळी? अनिमिष डोळ्यांनी पिऊन घ्यायचं फक्त हे निसर्गी मायामृत. पानांची तरतरी घ्यावी देहभरात साठवून. हात जोडते चक्क निसर्गदेवतेला. त्या एकाहून एक उंचीच्या भव्यतेच्या स्पर्धा मांडणाऱ्या शिखरांकडे पुन्हा वळून पाहते. काय दिसतं मला? एका पुरातत्त्वीय संस्कृतीशी पर्जन्ययुग संस्कृतीचं मीलन होत आहे.

मस्त पाऊस येतो रात्र झाल्यावर. मग सगळं शांत झालं की रात्रभर हल्ली पानांची ओली सळसळ बोलत असते.
खिडकी टेबलाला सोबत देत राहते निष्ठेनं जागी राहून.
एवढं संपवायचंच म्हणून हट्टानं एक जाडजूड पुस्तक माझ्यावर राज्य करू पाहतं. कधी ते शिस्तीत टेबलावर बसतं, कधी मांडीवर, तर आळोखे पिळोखे देत सोफ्यावर लोळतं कधी. रात्र आता मध्यावर येते. बाहेर पाऊस रेटत असतो त्याचं म्हणणं. म्हणून द्यायचं त्याला म्हणायचंय ते. लोकशाहीतला पाऊस तो. 
खोल हुंगत राहते मी त्याला खिडकीबाहेर डोकं काढून. पण मातीचा वास अजून येतोय म्हणजे पाऊस भिनायचाय पुरता.
एवढ्या उशिरा एक काळाच्या पोटात गाडलं गेलेलं पुरातत्त्व मात्र मूडमध्ये आलेलं असतं. भलतंच.
डोळे जड होऊन भरभर लिहिलेलं काहीबाही सावकाश वाचायचा प्रयत्न करत असतात. ओठ तेच बोलून उजळू लागतात. पुन्हा पुन्हा बोलत अर्थ मांडू बघतात. एखाद्या शब्दावर सगळे थबकतो. शिखर! निमित्तच पुरतं. मन शोधायचा ध्यास घेतं ना, तेव्हा कसल्याशा चालत्या बोलत्या चाहुली लागतात कानांना. खिडकीशी उभी राहून मी अंधारातला पाऊस कानानं प्रखर ऐकू पाहते. डोळे गच्च मिटून. मिटल्या डोळ्यांनी समोरच्या फूटपाथवर रेनकोटांची उघडझाप निथळताना दिसते मला. धूसर. पावसाच्या आठवणी गडद करू लागतात मला. वर्षांच्या अनेक झिरझिरीत पडद्यांमागे दडून राहिलेली मी. छत्रीचे दोन फोल्ड एका बटणाच्या अधिकारात सताड उघडताना आता स्पष्ट दिसतात. रंगीबेरंगी छत्र्या रेनकोट एकाच रंगाच्या ध्यासात बुडलेले. पाऊस! अजून शिखर खूप दूर असतं. खूपच.
***
मुंबईच्या पावसात मी कुठंतरी जायला निघालेली होते. पाठीला सॅक लावून. डोंगर चढाईखोर लोकांसाठी नित्यनियम असला तरी सामान्य जणांसाठी अवेळीच निघालेले मी. पावसानं धुमाकूळ घालून माणसांची पांगापांग करायला घेतलेली होती. पागोळ्यांशी कुणी आडोशाला उरलेलं मागं चुळबुळत असावं एखाद दुसरं. तिथं बस स्टॉप असावा शेजारी बहुधा. मुंबईचा पाऊस, त्यात जुलैचा म्हणजे शेड असो, छत्री असो, तो हात धुऊन तुम्हाला भिजवायलाच आलेला असतो. सरळ शरण जात छत्री मिटावी आणि एक मोठंसं प्लॅस्टिक खांद्याला लटकवावं त्यात सगळ्या वस्तू कोंबून. तसे बरेच शरणार्थी होते आजूबाजूला माझ्या. 
पिवळेसे रस्ते रड रड रडत होते. कुणाला काही नव्हतं त्याचं. गाड्या छातीशी उशीर घेत बेधडक रस्त्याचं कारंजं करत जात होत्या.
अंतरा-अंतरावरचे स्ट्रीट लाइट आता मला लहान नम्र होत गेलेले दिसत होते. काही उमलत असावं. काही जन्म घेत असावं त्या पावसात..  
 आठवणींचे डोळे ओले
खिडकीमागे चिंब वाहिले
पागोळ्यांची कळी आरसी
पाऊस होऊन नाजूक उमले..

 सगळं सगळं पावसाच्या कार्यक्रमाला त्याचे नातेवाईक असल्यासारखं वातावरण होतं. काही न काही एकमेकांशी बोलू पाहत होते सगळे. मीच एकटी गप्प त्यांना न्याहाळत असावी. एक धडाकेबाज एसटी अशात स्टॉपवर येते. पेण अलिबाग काहीसं अस्पष्ट दिसतं मला. एकच झुंबड. रेनकोट, छत्री झुगारल्याशिवाय एसटी प्रवेश अशक्य दिसतो. आणि मी मला त्या कोलाहलात एकदाची शिरवते. कर्नाळा. असं नाव घेऊन तिकीट काढायची पहिलीच वेळ असावी माझी. उत्सुकता, अधीरता शिगेला पोचलेली. खिंड कोणतीही थरारकच वाटते. दोन बाजूंना उंचच उंच कातळाच्या भिंती उभ्या ठाकलेल्या. मधे अरुंद रेषेसारखी पायवाट. कधी तिच्या बाजूनं एखादी चोरवाट जात राहिलेली. दाट झाडीतली. एखाद्या किल्ल्याकडे नेणारी. सगळं हे चित्र तंतोतंत कर्नाळा खिंडीला लागू होतं. आता त्या पायवाटेचा हमरस्ता करून टाकला असला तरी किल्ल्याची वाट तशीच दुर्गम राहिली आहे. पहाटेला अनेक पावलं फुटली होती जशी काही. रपारप पावसाच्या रबरबाटात काळा कातळ अधिकच चमकत होता. वाटा निसरड्या झाल्या असल्या तरी ओढ अजिबात ओसरू देत नव्हत्या. कसली ओढ ही? निसर्गात अनंत साठलेल्या अद्‍भुताची. थराराची. दमछाक करणारी गडवाट हळूहळू मोकळवणात घेऊन आली आणि कोकण महामार्गाचं पहिलं खणखणीत निशाण असणारा सुळका ताठ मानेनं खुणावू लागला. त्याला समोर ठेवून चढत राहिलो. मागं वळून पाहिलं. अभयारण्यच ते. उंचीच्या स्पर्धा करणारे अनेकविध वृक्ष डोंगरभर पसरलेले दिसत होते. आणि त्यांनी पानांच्या मदतीनं दाटीवाटीनं गडवाट जवळजवळ झाकून टाकली होती. इतके उंच आलो होतो की महामार्गावरचे वाहनांचे आवाजही कानांच्या टापूत नव्हते. गडमाथा मात्र अजून तसा दूर होता. लहान मुलींच्या डोक्यावर इंद्रधनुषी आकाराचा गजरा घालतात तसं माथ्यानं आपल्या डोक्यावर धुकं माळून घेतलं होतं. कर्नाळ्याच्या राकट वाटा, भिंती, कातळ, दुर्गमता सगळं त्या धुक्यानं एकदम अचानक कोमल गंधार लावावा तसं नाजूक करून टाकलं होतं. रोजच्या निसर्गचक्रापेक्षा काही आदिम घडत होतं. 
 रोजच येते सर पेडाची
वेल तिहेरी अधीर वळणे
लगबग सुंदर झरझरताना
पाऊसपक्षी मंजुळ बोले.. 

पावसात पठारी महाराष्ट्र देश पूर्वेकडं ठेवत जरा पश्चिमेला सरकावं. भौगोलिक घडामोडींमुळे सहज उत्पन्न झालेल्या आणि मग माणसानं आपली सोय म्हणून केलेल्या घाटांवर मनमुराद फिरावं. सह्याद्रीचं सगळं सौंदर्य एकवटून या कोकणपट्टीत उतरणाऱ्या घाटवाटांमध्ये दडलेलं आहे असं वाटतं. पावसाने ठिबकत राहावं. मग ओल्या रस्त्यांनी संपूच नये. नुसतं वाहत राहावं. वाहते घाट उतारी लागावेत. उतारांवर असंख्य वृक्षसंपत्ती असावी. फक्त एकाच, हिरव्या सुरात माखलेली. पक्ष्यांची भित्री फडफड ऐकू यावी. त्यांच्या रम्य कुजनांनी आसमंत भरून जावा. गर्भरेशमी व्हावा. पाऊस निसर्गात रममाण व्हावा. एकवटावा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसं हे खरं आदिबीज! ते पेरून निसर्गाचा आदिग्रंथ उमलून यावा. रचला जावा. 
 घाव दुधारी कापत जाई
कोसळणारा पाऊस बाई
तरिही रिमझिम पैंजण लावून
डोळ्यामधले मोर नाचले....

 या निसर्गमायेची तेवढी आसक्तीच असावी लागते. मग तो आपली किमया दाखवू लागतो. पण ती बघायला समजून घ्यायला त्यात मश्गुल होता आलं पाहिजे. 
अशीच बेफाम वृष्टी. कळंबोली सोडून नावडे रस्ता धरला आणि पाऊस कोसळू लागला. पावसानं वाहनं मंदगती झाली होती. रस्ता लहान आणि अफाट पसरलेलं ट्रॅफिक. गाडी बंद करून पाऊस नुसता झेलत राहायचा असतो अशा वेळी. When you can not get out of situation, enjoy the situation! सहज उजवीकडे नजर गेली. एरवी कायम अप्राप्य वाटत राहणारा हाजीमलंगचा सुळका पावसाच्या पार्श्वभूमीवर एकदम निकट वाटत होता. या डोंगरांची एक गंमत असते. पावसापूर्वी दूर दुर्लभ दिसणारे डोंगर पाऊस यायचा झाला की सुस्पष्ट दिसू लागतात. पाऊस टप्प्यात यायचा हा एक ठोकताळाच म्हणू आपण.  ’मै तो मलंग हो गया‘, म्हणणारा मलंगचा सुळका धुक्याचं पागोटं बांधलेला दिसत होता. एखादा वृद्ध तपस्वी असावा तसं.
पारसिकचा डोंगर तसा अस्पर्शित. दुर्लक्षित. ठाण्याहून कल्याण गाठताना मुद्दाम मुंब्र्याचा डोंगर शेजारी घ्यावा. मुंब्रादेवीचं ठाणं ठळक करत डोंगर न्याहाळावा. एका बाजूनं डोंगर चढला की एक सुंदर तलाव आहे वर. देवीच्या मंदिराजवळ डोंगरातून पुढे आलेला सुळका दुरूनही लक्ष वेधून घेतो. वर एका किल्ल्याचे अवशेषही आहेत म्हणे. पावसात या घाटातला एरवीचा शुष्क काळाभोर दगड ताजातवाना झालेला दिसतो. अधूनमधून उगवलेलं हिरवं आयुष्य त्याच्या मऊ हृदयाची ग्वाही देत राहतं. इथं तिथं उगवलेल्या कातळातल्या उभ्या केळी अचंबित करतात. काळ्या कपारींमधून उतरायच्या वाटा शोधणारं पावसाचं पाणी म्हणजे नैसर्गिक धबधबे. मनसोक्त जलस्नान करणारी अनेक माणसं आणि त्यांचे जत्थे. पण त्या उंच सुळक्यावर उमटणारं धुक्याचं तेजोवलय हा या चित्रातला खरा कळसाध्याय!
 एकुटवाणा वाहत अपुला
झरा मुलायम हृदयामधला
पाझर पसरत डोंगर भरला
मग खांद्यावर धुके मिरवले...   

कधी मी माळशेज घाट उतरते आहे. पावसाचं देखणं नक्षत्र सभोवार अवतरलेलं. दऱ्यांनी हिरवा शालू नेसलेला. अधेमधे लाल पिवळी फुलं त्यावर म्हणजे बुट्टीदार श्रीमंतीच जणू! ठिकठिकाणी धबधबे रस्ता अडवणारे आणि दरडी कोसळल्याचे काळीज चरकवणारे अवशेष इतस्ततः. माळशेजच्या पावसाळी वार्ता ऐकून असते पण तरीही तिथं येते. का? ते बोलावणं असतं. साद असते, त्यानं मला घातलेली. तिथल्या एका अवघड वळणाशी मी सरळ थांबते. दरीकडे तोंड करून. आयुष्यात थांबावं एखाद्या वळणाशी असं कधीतरी. काही बिघडत नाही. महाराष्ट्रातल्या डोंगरांचा आजोबा शोभावा असा हरिश्चंद्रगड डोंगर एका बाजूला, कळसूबाईच्या शिखराचा तो नखरा नेटका, त्याच्यापुरता आकर्षक झालेला. डावीकडे सिंदोळ्याची रक्षक उभी भिंत उठावलेली. इंद्रवज्र पडायला काहीसा अवकाश आहे अजून. इतक्यात पावसाचे ठोके जाणणारं कोवळं धुकटं आच्छादून जातं, अवघ्या शिखर मंडलावर त्‍याचं सांप्रदायित्‍व बहाल होतं बघता बघता. आपण मर्त्य मानवानं काय करायचं अशा वेळी? अनिमिष डोळ्यांनी पिऊन घ्यायचं फक्त हे निसर्गी मायामृत. पानांची तरतरी घ्यावी देहभरात साठवून. हात जोडते चक्क निसर्गदेवतेला. तिचं देणं मला मिळालं म्हणून. असंच निरंतर मिळत राहावं म्हणून. त्या एकाहून एक उंचीच्या भव्यतेच्या स्पर्धा मांडणाऱ्या शिखरांकडे पुन्हा वळून पाहते. काय दिसतं मला? एका पुरातत्त्वीय संस्कृतीशी पर्जन्ययुग संस्कृतीचं मीलन होत आहे.

संबंधित बातम्या