पर्यटनकेंद्रित विकास

निखिल पंडितराव
बुधवार, 28 मार्च 2018

कोल्हापूर हे आता पर्यटन डेस्टिनेशन म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. पर्यटनवृद्धीसाठी कोल्हापूरचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. नैसर्गिक समृद्धी असलेल्या या जिल्ह्याची अर्थव्यवस्था पर्यटनाच्या माध्यमातून बळकट करण्याचे काम केले जात आहे. याविषयी त्यांच्याशी साधलेला संवाद...

प्रश्‍न ः पर्यटन विकासासंदर्भातील तुमची भूमिका काय?
उत्तर ः सह्याद्रीच्या रांगेत वसलेला कोल्हापूर जिल्हा निसर्ग सौदर्यांने नटलेला आहे. आपली संस्कृती, कला जपत हा जिल्हा विकासाची कास धरतो आहे. बदलाला सामोरे जातानाही आपल्या संस्कृतीचा बाज कायम ठेवून, बदल स्वीकारून वेगाने पुढे जात आहे. जिल्ह्याच्या विकासाच्या वाटचालीत आता पर्यटन ही नवीन संधी उपलब्ध झाली आहे. पर्यटनाच्या माध्यमातून जगातील अनेक देशांनी तसेच आपल्या देशातील अनेक राज्यांनी विकास साधत आर्थिक विकासात नवी क्षितिजे पादाक्रांत केली आहेत. अंबाबाई मंदिरात देवीच्या दर्शनासाठी वर्षाला लाखो भाविक येतात. या पर्यटकांना जिल्ह्यातील अन्य सुविधा व पर्यटन स्थळांची माहिती मिळावी व त्यांना याच ठिकाणी उत्तम पर्यटनाचा आनंद घेता यावा यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू केले आहेत. जिल्ह्यातील गावाकडील पर्यटनाची एक वेगळीच खासियत आहे. ऐतिहासिक, धार्मिक महत्त्व तसेच निसर्गसौंदर्य, लेणी, धरणे, घाट रस्ते अशा वैविध्याने हा जिल्हा समृद्ध आहे. त्याचे महत्त्व जगाला पटावे आणि पर्यटनातून केवळ शहराचाच आर्थिक विकास नव्हे तर तर ग्रामीण अर्थव्यवस्थाही बळकट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

प्रश्‍न ः पर्यटनवाढीसाठी तुम्ही काय प्रयत्न केले?
उत्तर ः आपल्याकडे परदेशी, देशातील, राज्यातील आणि स्थानिक अशा पद्धतीचे पर्यटक दरवर्षी देतात. हे पर्यटक येताना मुख्यतः अंबाबाई मंदिर केंद्रस्थानी असते. त्यापाठोपाठ जोतिबा, खिद्रापूर, चांदोली धरण, राधानगरी धरण व दाजीपूर अभयारण्य, शिवाजी विद्यापीठ, पन्हाळा, नृसिंहवाडी अशा विविध ठिकाणी ते भेट देतात आणि लगेच परत जातात. त्यांना या ठिकाणी थांबण्यासाठी मनोरंजनाचे साधन किंवा त्या पद्धतीच्या सुविधा नसल्याचे लक्षात आले. तिरुपती हे शहर केवळ पर्यटकांच्या माध्यमातून विकसित झाले. तेथे येणारा पर्यटक थांबतो आणि पैसा खर्च करतो. त्यामुळे येथे विकास साधला जात आहे. तिथे फक्त धार्मिक पर्यटनच आहे; मात्र आपल्याकडे धार्मिक पर्यटनाच्या बरोबरीने ऐतिहासिक वास्तू, निसर्ग सौंदर्य, असे विविध पर्यटनाचे प्रकार उपलब्ध आहेत. मात्र ते फारसे कोणाला माहीत नाही. पन्हाळ्याला पर्यटक जातात; मात्र पावनखिंड, मसाई पठार या ठिकाणी जाऊन त्यांनी तेथे आनंद घेतला पाहिजे. यासाठी जिल्ह्यातील प्रादेशिक पर्यटनांतर्गत दोन वर्षात जिल्ह्यात २७ कोटी २० लाखांच्या १५ कामांना मंजुरी दिली आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेकांना रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध झाल्या. अगदी वाहनांपासून लॉजिंगपर्यंत, गाईडपासून अन्य वस्तू विक्रेत्यांना याचा फायदा झाला आणि त्यांचा स्तर उंचावला आहे.

प्रश्‍न ः प्रादेशिक पर्यटनाअंतर्गत कोणती विकासकामे होतील?
उत्तर ः जिल्हास्तरीय पर्यटन विकास समितीची यासाठी स्थापन केली आहे. प्रादेशिक पर्यटन विकास अंतर्गत जिल्ह्यात प्रामुख्याने पंचगंगा घाट विकासासाठी ४ कोटी ७८ लाख, रंकाळा परिसर विकासासाठी ४ कोटी ८० लाख, गारगोटी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या विजय मार्ग परिसराचे सुशोभीकरण २ कोटी ५८ लाख, श्री क्षेत्र बाहुबली येथील नळपाणी पुरवठा योजना २ कोटी २७ लाख, किल्ले सामानगडसाठी ५० लाख, भुदरगडसाठी ५० लाख अशा विविध कामांचा समावेश आहे. कोल्हापूरचे हृदय असलेल्या रंकाळा परिसर विकासासाठी उपलब्ध झालेल्या ४ कोटी ८० लाखांतून प्राधान्याने कामे हाती घेण्यात येत आहेत. दुसऱ्या टप्प्यात रंकाळा तलाव पर्यावरणविषयक कामे हाती घेतली जातील. श्री क्षेत्र जोतिबा परिसर विकासासाठी उपलब्ध झालेल्या ५ कोटीतून दर्शन मंडप व टॉयलेट कॉम्प्लेक्‍सचे काम होईल. महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला शिखर समितीची मान्यता मिळाली असून याबाबतची शासनस्तरावरील कार्यवाही युद्धपातळीवर केली जात आहे. राजर्षी शाहू जन्मस्थळ येथे म्युझियम, माणगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मारकाचाही विकास होणार आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून वन विभागामार्फत जेऊर, पावनखिंड, भुदरगड, आंबा, कडगाव वनक्षेत्र, बोरबेट, पारगड, चंदगड वनक्षेत्र, पाटणे वनक्षेत्र, करवीर वनक्षेत्र, आळते, रामलिंग येथे २ कोटी १६ लाखाची कामे सुरू झाली आहेत. पन्हाळा येथे लाइट व साऊंड शोसाठी प्रयत्न सुरू आहेत. 

प्रश्‍न ः ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होईल हे कशावरून म्हणता?
उत्तर ः जिल्ह्यातील अनेक पर्यटनस्थळे अशी आहेत, तिथे गेल्यावर तिथले सौंदर्य पाहून सारेच अचंबित होतील. अशा पर्यटनस्थळांच्या पाहणीसाठी कोल्हापूर जिल्हा हॉटेल मालक संघासह अनेकांना बरोबर घेऊन गतवर्षी एक मोठ्या सहलीचे आयोजन केले होते. त्यामध्ये राज्यातील टुर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या प्रमुखांनाही आमंत्रित केले होते. त्यांच्यासह सर्वांना जिल्ह्यातील अन्य पर्यटनस्थळांची माहिती दिली. ही ठिकाणे मुख्यतः ग्रामीण भागात वसलेली आहेत. त्यामुळे जाणीवपूर्वक पर्यटक तिथे गेल्यानंतर तेथील स्थानिक खाद्यपदार्थ, जेवण किंवा अन्य सुविधा दिल्या. ही कामे गावातीलच महिला बचत गट, अन्य महिला संस्था यांना देण्यात आली. नाचणी पिकत असेल तर नाचणीची भाकरी, तांदूळ पीक ज्या भागात जास्त, तिथे तांदळाची भाकरी अशा अस्सल ग्रामीण जेवणाची जोड त्याला दिली. त्यामुळे पर्यटकांनाही आनंद मिळाला आणि ग्रामीण भागातील महिलांसह अन्य अर्थव्यवस्थेला चालना मिळून ती बळकट होत आहे. 

प्रश्‍न ः भविष्यातील पर्यटन विकासाचे नियोजन कसे आहे?
उत्तर ः जिल्ह्यातील विविध सेक्‍टर्सचा अभ्यास केला आहे. प्रत्येक तालुक्‍यातील काही विशिष्ट ठिकाणांची माहिती 
घेतली असून त्या ठिकाणी रस्ते, पाणी यासह गाईडपर्यंत साऱ्या सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. त्यामध्येही ऋतुमानानुसार पर्यटनाची सुविधा देण्याचाही मानस आहे. शाहूवाडी तालुक्‍यातील उदगीर, येळवणजुगाई येथे पाऊस, धुके जास्त असते. तिथे पर्यटक कसा जाईल, त्या दृष्टीने काय केले पाहिजे, अशा पद्धतीचे नियोजन करण्याचे काम सुरू आहे. भविष्यात कोल्हापूर जिल्हा निश्‍चितच जगाच्या नकाशावर पर्यटन जिल्हा म्हणून उदयास येईल, याची खात्री आहे.  

संबंधित बातम्या