आहे मनोहर तरी...

डॉ. रत्नावली दातार
सोमवार, 8 जुलै 2019

कव्हर स्टोरी
 

पूर्वी ‘घरी व्हिजिट’ला जाणे हे आम्हा डॉक्‍टर्सना नेहमीचेच असे. आता ती पद्धत लोप पावली आहे. कुटुंबे विभागली, तशी फॅमिली डॉक्‍टर ही संकल्पनाही बंदच पडली. (आता फक्त टीव्ही व सिनेमातूनच हे दिसून येते.) त्यामुळे थोड्या वृद्धाश्रमांमधील व्हिजिट्‌स सुरू झाल्या होत्या. पण तेथून परतताना मात्र मन विषण्ण होई. त्यांची ‘ती’ केविलवाणी नजर, अगतिकता, विकलांगता व अनेकांत असूनही भोगावे लागणारे एकटेपण सतत पाठलाग करी. पूर्वीच्या मानाने हल्ली व्यवस्था व स्वच्छता यात थोडा फरक पडलाय एवढेच! पण तरी...!

अचूक निदान, जालीम औषधे व तत्काळ वैद्यकीय सेवा, यामुळे आयुर्मान वाढत चाललेय, पण त्या प्रमाणात वृद्धाश्रमांची संख्या व्यस्तच आहे. अजूनही आपल्याकडे मुलांनी टाकलेले, असे म्हणूनच या वृद्धांकडे बघितले जाते. सध्या या अति वेगवान जीवनशैलीत, स्त्री-पुरुष दोघेही काम करणारे असल्याने त्यांच्याकडे वृद्ध आई-वडिलांकडे बघायला, त्यांच्या समस्या सोडवायला वेळच नसतो. मग होते काय, गैरसमजुती वाढत जातात व त्या बरोबरच नाती व कुटुंबे तुटतात, विभक्त होतात. उरलेल्या घरात एकट्या वा दुकट्या वृद्धाला राहणे अवघड होते. कामाला माणसे मिळत नाहीत. छोट्या छोट्या कामांसाठी वृद्धांना मोलाच्या (मिळाली तर) माणसांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे कामे होतही नाहीत वा पडून राहतात. अशा रोजच्या रोज उद्‌भवणाऱ्या कटकटी जर कोणी सोडवल्या तर वृद्धांना नक्कीच दिलासा मिळेल.

नुकतेच अमेरिकेत सिॲटलमधील ‘Assisted living old age home’ बघण्यात आले. तेथे वार्षिक पैसे भरून राहता येते. तेथेही खूप रांग असते. अशा आश्रमात नाश्‍ता, चहा-कॉफी, जेवण, दुपारचे खाणे उत्तम व स्वच्छ मिळतेच. त्यासाठी तेथे जिम, पोहण्याचा तलाव, रंगमंच, सिनेमा थिएटर, ग्रंथालय उपलब्ध आहे. शिवाय मैदानी वा घरातील खेळ असतात. फिरायला छान रस्ते, सर्व ठिकाणी घरात व बाहेर ठिकठिकाणी बसण्यास बाके इत्यादी सोयी आहेत. रोज टीव्हीवर एक सिनेमा दाखवितात व महिन्यातून एकदा मोठी ट्रीप व एक छोटी एकदिवसीय ट्रीप असते. रोज डॉक्‍टरची व्हिजिट असते. शिवाय चष्मा, कानाचे यंत्र, पायासाठी हाडवैद्य व पोडियाट्रिस्ट रोज येतात. फिजिओथेरपीपण रोज उपलब्ध होते. अशा सर्व सोयी एका छताखाली मिळतात. त्याही रोजच्या कटकटींशिवाय आणि अति स्वच्छ व सुंदर वातावरणात. ते वृद्धाश्रम खरेच आनंदाश्रम असेल.

हल्ली काही ६५ वयाच्या वरील वृद्ध मुद्दाम तिथे नाव नोंदवून राहायला येतात व ९० वयाच्या आसपासच्या वृद्धांची सेवा करतात. त्यांना मदत करतात किंवा काही जण ऑफिसमध्येही कामाला हातभार लावतात. थोडक्‍यात ‘Time Bank’ ही आपोआप चालविली जाते. काही ठिकाणी बालवाड्या, पाळणाघरे चालविली जातात, जेणेकरून ज्येष्ठांना लहान मुलांची संगत मिळते. त्यांची मने त्यांच्या सोबतीने आनंदित होतात व ते जास्तच सकारात्मक होतात. स्वतःचे दुःख, आजार विसरून जातात. 

आपल्याकडेही अशा मदत घराची नितांत आवश्‍यकता आहे. आपल्याकडील वृद्धाश्रमांची स्थिती फारशी चांगली नाही. (काही अपवाद सोडल्यास.) तसेच, विरंगुळा केंद्रेही (day care centers) कमीच आहेत. इथे आहे मनोहर तरी...(?) अशी स्थिती आहे. पण याचे फक्त ‘आहे मनोहर’ व्हायला वेळ लागू नये, ही इच्छा व ही नवीन मदत घरे पुढची आनंदाश्रमे ठरावीत, ही सदिच्छा!    

संबंधित बातम्या