ज्येष्ठांचे मधुर निवास

ज्योती बागल
सोमवार, 8 जुलै 2019

कव्हर स्टोरी
 

पुणे-मुंबईसारख्या शहरांत अनिवासी भारतीय मुलांच्या पालकांसाठी उत्तम सोयीच्या निवासिका बांधलेल्या आहेत. पण अशा पालकांना याखेरीज भावनिक, मानसिक आधाराचीही गरज असते. एकटेपणाची जीवघेणी शिक्षा त्यांना सहन होत नाही. म्हणून त्यांच्यासारख्याच वृद्धाश्रमात असणाऱ्या समवयस्क वृद्धांमध्ये ते राहायला जातात, तिथं रमतात आणि मनमोकळेपणानं आपलं आयुष्य जगतात.

प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला सन्मानानं जगता यावं म्हणून अंजली देशपांडे यांनी २०१२ मध्ये ‘मधुरभाव’ वृद्धाश्रम सुरू केलं. वृद्धाश्रम सुरू करण्याला त्यांच्या आयुष्यातले एक गोष्ट कारणीभूत ठरली. २००० मध्ये त्यांचे आईवडील इंदौरवरून पुण्यात आले. वडिलांना डिमेंशिया आजार होता. दोन वर्षे ते झोपूनच होते. त्यांच्या आईला वयोमानानं त्यांचा सांभाळ करणं होत नव्हतं. तेव्हा त्यांच्या आईनं अंजली यांना वृद्ध रुग्णांची सेवा करणारा, काळजी घेणारा वृद्धाश्रम शोधायला सांगितलं. त्याकाळी पुण्यात खूप ठिकाणी पाहिलं, पण रुग्ण असलेल्या वृद्धांना घेतील असा एकही वृद्धाश्रम त्यांना मिळाला नाही. तेव्हा त्यांनी ‘निवारा’ इथं चौकशी केली. ती एकच चांगली संस्था आहे, जी वृद्ध रुग्णांच्या राहण्याची सोय करत होती. या घटनेनं मात्र अंजली यांना खूप वाईट वाटलं. आपण असतानादेखील आपल्या वडिलांवर आश्रमात राहण्याची वेळ आली आहे आणि त्यावेळच्या आश्रमांची अवस्थापण काही खूप चांगली नव्हती. त्यावेळी त्यांनी असा विचार केला, की त्यांच्या वडिलांसारख्या रुग्ण वृद्धांनादेखील सन्मानानं जगवणारे वृद्धाश्रम असावे. त्यांनी मनात ठरवलं, भविष्यात जेव्हा केव्हा त्या आर्थिकदृष्टया सक्षम होतील, तेव्हा त्या असे वृद्धाश्रम सुरू करतील. त्यासाठी त्यांनी परदेशात जाऊन आवश्‍यक ते शिक्षण घेतलं आणि २००८ मध्ये एका वृद्धापासून सुरुवात केली. तर अधिकृतरीत्या ‘मधुरभाव’ वृद्धाश्रमाची सुरुवात २०१२ मध्ये केली. हा वृद्धाश्रम सुरू करण्यामागचा उद्देश एवढाच होता, की परदेशात किंवा परगावी राहणाऱ्या मुलांच्या पालकांची उत्तम सोय व्हावी. जेणेकरून त्या मुलांना असणारी पालकांविषयीची असुरक्षितता कमी होईल. इथल्या अशाच काही आजी-आजोबांशी साधलेला हा संवाद...

मीनाक्षी पालेकर या आजी गेली पाच वर्षं या आश्रमात आहेत. इथल्या वातावरणात त्या एकदम मिसळून गेल्या आहेत. त्यांना त्यांच्या आयुष्याबद्दल विचारलं असता त्या म्हणाल्या, ‘मी इथं २०१४ पासून आहे. हे मला माझ्या घरासारखंच वाटतं. माझा मुलगा ऑस्ट्रेलियाला राहतो. तो प्रोफेसर आहे. माझी सूनपण प्रोफेसर आहे. मुलगी पुण्यातच असते. मुलगा येणार होता भेटायला, पण ते जेट विमानाचं काहीतरी प्रकरण झालं म्हणून येऊ शकला नाही. पण येतो तो भेटायला... आणि साधारण महिन्यातून एकदा फोनही करतो. माझा नातू लहान असताना मी आणि माझे पती ऑस्ट्रेलियाला गेलो होतो. त्यानंतर नाही गेले मी. तो चल म्हणतो तिकडे, पण मी येणार नाही म्हणून सांगून टाकलं आहे. मला नाही वाटत त्यानं इथं यावं, कारण त्याला इथलं वातावरण अजिबात सूट होत नाही. त्याला इथली धूळ, घाण अजिबात आवडतही नाही. त्यानं एकदा इथं नोकरीसाठीपण प्रयत्न केले होते, पण त्याला पाहिजे तसा पगार नाही मिळाला. म्हणून तो परत गेला. इथं मी एकटीच राहत होते. पण मला रात्री अधेमधे चक्कर येऊन मी बेशुद्ध पडते. मग मुलाला काळजी वाटायची म्हणून त्यानं आणि जावयानं हे ठिकाण शोधून काढलं. मुलगा वेळेवर पैसेपण पाठवतो. इथंही माझी सगळी व्यवस्थित सोय होते. आम्ही सगळे सण साजरे करतो. अंजलीदेखील मुलीसारखी काळजी घेते. मी स्वत: योग शिकले आणि आता सकाळी सगळ्या आजींना व्यायाम शिकवते. इथं माझा दिवस छान जातो. माझ्या गुरूंकडून मी दीक्षा घेतली आहे. त्याची साधना मी करत असते. 

शिरीष भिडे इथं गेल्या सहा महिन्यांपासून राहत आहे, मी एअर इंडियामध्ये होतो. हैदराबादमधून निवृत्त झालो. सध्या पायाला जरा जखम झाली असल्यानं मी इथं राहायला आलो आहे. मी नोकरीनिमित्त जिथं जाईन तिथं घर केलं होतं. नंतर विकून टाकलं. आता दोन मुलींसाठी दोन घरं आहेत. एका घरात मी राहतो आणि एक भाड्यानं दिलं आहे. एक मुलगी मुंबईमध्ये असते, तर एक पुण्यात असते. लग्न होऊन त्या आपापल्या घरी आहेत. मुलींना वाटेल तेव्हा येतात त्या भेटायला.

शशी अगरवाल यांचा पाय फ्रॅक्‍चर होता. त्या उठू-बसू शकत नव्हत्या. त्यासाठी त्यांना इथं यावं लागलं. त्यांना इथं येण्याबद्दल विचारलं असता त्या म्हणाल्या, ‘मी एक वर्षापासून इथं आहे. पायाला दुखापत झाली म्हणून इथं यावं लागलं. घरी शिड्या चढून वरती जावं लागतं, म्हणून इथं येऊन राहिले आहे. तसा सुनेला मला सांभाळायला काहीच त्रास नाही, फक्त मला पायामुळं अजिबातच फिरता येत नव्हतं म्हणून मुलांनी ऑनलाइन हे ठिकाण शोधलं. शनिवारी-रविवारी सगळ्यांच्या घरचे येतात इथं भेटायला. आता काही दिवसांतच मी पण घरी जाईन.’

पुष्पा काशीकर आजी या उच्चशिक्षित आहेत. या वृद्धाश्रमात त्या साधारण नऊ महिन्यांपासून राहत आहेत. त्यांचं इथं राहण्याचं कारण म्हणजे त्यांचा मुलगा आणि सून नोकरीनिमित्त अमेरिकेला असतात. त्यांच्याविषयी सांगताना त्या म्हणतात, ‘मी महाराष्ट्रीय आहे. हैदराबाद माझं गाव आहे. माझा मुलगा आणि सून अमेरिकेला असतात. मी आठ दिवसांपूर्वीच आले असून उद्या जाणार आहे. मुलगा एका मीटिंगसाठीच अमेरिकेला गेला आहे. आता तो परत येईल आणि मला घेऊन जाईल...’ पुन्हा त्या आवर्जून हेही सांगतात, ‘जरी मुलगा न्यायला आला नाही तरी माझं काही अडत नाही. मी इथं मजेत राहते. वाचन करते, माझ्या खूप मैत्रिणी आहेत इथं...’ 

या वृद्धाश्रमात वास्तव्यास असलेले मध्यमवर्गीय कुटुंबातील सिद्धनाथ रेणावीकर आजोबा म्हणतात, ‘आम्हा वृद्धांना माणसांचं सान्निध्य आणि सहवास या दोनच गोष्टी तर हव्या असतात. त्या इथं मिळतात म्हणून आम्ही इथं राहतो. मला एक मुलगा आणि मुलगी आहे. दोघंही पुण्यात असतात. माझी पत्नी गेल्यानंतर मी १० वर्षं एकटा राहिलो. नंतर मुलाकडं काही दिवस आणि मुलीकडं काही दिवस राहिलो. पण व्हायचं काय, सगळे कामानिमित्त दिवसभर घराबाहेर असायचे. नातूदेखील कॉलेजसाठी दिवसभर घराबाहेर असतात... आणि हायफाय सोसायट्यांमध्ये लोक शेजाऱ्यांकडं लक्ष देत नाहीत. त्यामुळं दिवसभर एकटं राहण्यापेक्षा इथं समवयस्क लोकांमध्ये राहायलापण मिळतं आणि वेळही छान जातो. इथं भूतकाळाची चिंता नसते ना भविष्याची. फक्त वर्तमानात जगायचं. मुलं म्हणत होती आम्ही असताना तुम्ही तिकडं जाऊ नका. पण मी स्वत: ठरविल्यामुळं मग त्यांनी हा वृद्धाश्रम शोधून काढला. इथल्या माणसांच्या जगण्याचं कौतुक करू तेवढं थोडं आहे. 

‘जेव्हा कोणा मुलांचा फोन येतो की माझ्या आईला किंवा बाबांना इथं टाकायचं आहे, तेव्हाच मी त्यांना बोलून स्पष्ट करते की ही राहण्याची जागा आहे, टाकण्याची नाही! जे कोणी नवीन आजी-आजोबा इथं येणार असतात, त्यांना कल्पना देऊन इथं आणावं, असं मी त्यांच्या मुलांना सांगते. नाहीतर कुठंतरी आपण फसवले गेल्याची भावना त्यांच्या मनात कायम राहते. तसंच जे जे आजी-आजोबा घरी राहू शकतात, त्यांच्या घरच्यांना मी समजावून सांगून त्यांना घरी घेऊन जायला सांगते. अशी अनेक उदाहरणं आहेत. बरेच वृद्ध पेशंटदेखील आमच्या इथून बरे होऊन घरी परत गेले आहेत. मला असं वाटतं, आपलं घर असतं ते आपलंच असतं पण त्यानंतर कुठं या लोकांना सुरक्षित वाटावं तर ते इथं वाटावं... आणि असाच आमचा प्रयत्न असतो. काही दिवसांपूर्वीची घटना आहे. शांतीबेन चव्हाण नावाच्या ९२ वर्षांच्या एक आजी आहेत. त्यांनी अगदी जेवण-पाणी सोडलं होतं. त्यांच्या घरचे त्यांना इथं घेऊन आले. तेव्हा मी ‘त्यांना घरीच ठेवा’ म्हणत होते. पण त्यांच्या घरचे म्हणाले ‘काही पण करा पण त्यांना इथं ठेवा त्या घरी काहीच खात-पित नाहीत.’ मग आम्ही त्यांना ठेवून घेतलं. त्या का खात नव्हत्या माहिती नाही. पण इथं आल्यावर आम्ही त्यांना प्रेमानं थोडं थोडं खाऊ घालण्याचा प्रयत्न केला. त्यांना ती आपुलकी-प्रेम भावलं आणि त्या इथं रमल्या. काही दिवसांतच त्यांच्या चेहऱ्यावर तेज आलं. अशावेळी जे समाधान मिळतं ना ते कशातच नसतं. आहेत अशी बरीच मुलं जी त्यांच्या काही अपरिहार्य कारणांमुळं इच्छा असूनदेखील पालकांसोबत राहू शकतं नाहीत. अशा मुलांना ‘मधुरभाव’सारख्या वृद्धाश्रमांची खूप मदत होते. पण पालकांच्या अगदी शेवटच्या क्षणांत तरी मुलांनी त्यांच्यासोबत असावं असं मनापासून वाटतं. म्हणून आमच्या इथं आलेल्या व्यक्तीला आम्ही शेवटपर्यंत इथं ठेवतो. माझ्या या कामात माझा मुलगा हर्षद देशपांडे माझी मदत तर करतोच; शिवाय आता तो पूर्णवेळ हेच काम करणार आहे.  
अंजली देशपांडे 
संस्थापक-संचालिका, मधुरभाव वृद्धाश्रम, मो. नं. ९८५००१६६६९ 


महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संथा संचलित वृद्धाश्रम
 कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे आजी-आजोबांसाठी वृद्धाश्रम असा वेगळा विभाग आहे. वृद्धाश्रमासाठी सुखनिवास, आनंद निवास आणि कल्पतरू या तीन इमारती असून प्रत्येक इमारतीची वेगळी फी आहे. सुरुवातीला फक्त आजींसाठीच राहण्याची सोय होती. परंतु, आजी-आजोबा अशा जोडीलादेखील आश्रमाची गरज आहे असे लक्षात आल्यावर संस्थेनं नवीन इमारत बांधली. सुखनिवासमध्ये ६० हजार डोनेशन आहे, तर आनंदनिवासमध्ये ५० हजार आणि कल्पतरूमध्ये दीड लाख रुपये डोनेशन आहे. कल्पतरू हे आजी-आजोबा अशा जोडीसाठी आहे. एकदा घेतलेली फी परत दिली जात नाही, पण त्याचबरोबर एकदा प्रवेश मिळवला तर ते शेवटपर्यंत किंवा त्यांची इच्छा असेपर्यंत इथे राहू शकतात. इथे येणाऱ्या आजी ६० वर्षांपेक्षा जास्त आणि ७० वर्षांपेक्षा कमी वयाच्या असाव्यात. तसेच त्या मेडिकली फीट असाव्यात. इथं येणाऱ्या आजींचे पुण्यात आणि पुण्याबाहेर दोन-दोन नातेवाईक असणं आवश्‍यक आहे. तसेच येणाऱ्या आजी स्वखुशीनं इथं यायला हव्यात. त्यासाठी त्यांची मुलाखत घेतली जाते. जबरदस्तीनं इथं आणून सोडणाऱ्या आजींना इथं प्रवेश नाकारला जातो. वृद्धाश्रमात असणाऱ्या आजींना कोणत्याही प्रकारचं बंधन नसतं. त्यांच्यासाठी वर्षभरातील सर्व सण साजरे केले जातात. वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. त्यांना आवडत असेल ते काम करू दिले जाते. संस्थेच्या डॉक्‍टरांकडून त्यांची वेळोवेळी तपासणी केली जाते. आजींना इथं सर्वच प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. यासोबतच काही नादार आजीदेखील संस्थेत आहेत. या एकूण आठ जागा असतात. ज्या आजींना कोणीच नाही, ज्या एकट्या आहेत, ज्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत अशा आजींचा पूर्ण सांभाळ संस्था करते.

संस्थेतल्या सुशीला आपटे आजींबरोबर संवाद साधला असता त्या म्हणाल्या, ‘मी या संस्थेच्या सुखनिवास वृद्धाश्रमात गेली दहा वर्षं राहत आहे. मी इथं आले कारण मी आधी माझ्या नातेवाईकांकडं भाड्यानं राहतं होते. वर्षा-वर्षाला भाडं वाढायला लागलं, म्हणून मग मी इथं आले. माझ्या भावंडांत मी एकटीच राहिले आहे. त्यांची मुलं कधीतरी भेटायला येतात. इथं माझा वेळ मस्त मजेत जातो. मी संस्थेसाठी स्वेच्छेने भाऊबीज गोळा करण्याचं काम करते. तसंच पडदे, खुर्च्या आणि काही आर्थिक मदतदेखील मी संस्थेला केली आहे.’ 

‘वृद्धाश्रमात आजी येण्याचं कारण म्हणजे त्यांना हवं असणारं स्वातंत्र्य आणि समाधान. त्याचबरोबर या वयात आजी-आजोबांना हवी असलेली सिक्‍युरिटी! एक तर ते एकटे असतात त्यामुळं काळजी घेणारं कुणी नसतं... आणि जरी असेल तरी त्यांना त्यांच्या मनाप्रमाणं राहता येत नाही. तेच आमच्या इथं त्यांना पूर्णपणे उपभोगता येतं. इथं चोवीस तास लाइट, पाणी आणि सिक्‍युरिटी उपलब्ध आहे. सगळं खायला-प्यायला व्यवस्थित दिलं जातं. संस्थेच्या तशा मेसदेखील आहेत. महत्त्वाचं म्हणजे सगळ्या आजी उच्चशिक्षित असल्यानं त्यांनी आपापले छंद जोपासले आहेत.
- रूपाली देशमुख, व्यवस्थापक
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था संचलित वृद्धाश्रम विभाग
कर्वे नगर पुणे, फोन नं : ०२०-२५३१३०००/२५३१३२००

संबंधित बातम्या