बहुउद्देशीय लेह-लडाख दौरा

प्रकाश पवार
सोमवार, 13 जुलै 2020

भारत-चीन सीमेवरील वाढता तणाव बघता भारतीय सैन्याचे मनोबल वाढवणे आणि चीनला सज्जड दम भरणे गरजेचे होते. याच विचाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेह-लडाखचा दौरा केला. हा दौरा बहुउद्देशीय स्वरूपाचा होता. शिवाय या दौऱ्यात पाच महत्त्वाची सूत्रे मांडली गेली, त्याविषयी केलेली चर्चा... 

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच लेह-लडाख हा दौरा केला(३ जुलै २०२०). सिंधू नदीच्या किनारी वसलेल्या निमू येथील लष्करी तळाला त्यांनी भेट दिली. तसेच त्यांनी लेहमधील लष्कराच्या रुग्णालयालाही भेट दिली. जन्स्कार पर्वत रांगांमध्ये नरेंद्र मोदींचा वास्तववाद या दौऱ्यात व्यक्त झाला. कारण हा दौरा चीनच्या विस्तारवादी धोरणाच्या विरोधातील भारतीय सार्वभौम यंत्रणेची एक महत्त्वाची भूमिका आहे. भारतीय सार्वभौमत्व अबाधित राखण्यासाठी या गोष्टीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा दौरा बहुउद्देशीय स्वरूपाचा होता. त्याचा अर्थदेखील बहुउद्देशीय लावला जाईल. परंतु, सर्व उद्दिष्ट्ये आणि ध्येय भारतीय सार्वभौमत्वाच्या चौकटीशी संबंधित होती, याबद्दल एकमत होऊ शकते. काही किरकोळ मतभिन्नता पक्षीय स्वरूपाच्या राजकारणाची आढळते. परंतु, चीनच्या विस्तारवादी धोरणाची चर्चा युरिस्का रिपोर्टच्या संदर्भात आणि क्षी जिनपिंग यांच्या धोरणाच्या संदर्भात तपासली, तर या दौऱ्याचे महत्त्व स्पष्टपणे दिसते. तसेच भारतीय संघराज्य (लडाख-भारत), भारतीय सार्वभौमत्व-लष्कर, भारत-चीन संबंध, जागतिक दृष्टिकोन, भारतीय दृष्टिकोन, चिकित्सक विश्लेषण करणाऱ्या संरक्षण यंत्रणा अशा विविध संदर्भामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लेह-लडाख दौऱ्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तसेच लष्कर, हवाई दल, इंडो-तिबेट सीमा सुरक्षा पोलिसांच्या समोरील भाषण यांचे महत्त्व सकारात्मक  संकल्पना, डावपेच, रणनीती आणि लष्कराला दिलेली प्रेरणा या संदर्भात महत्त्वाचे आहे. विशेषतः या दौऱ्यात चार सूत्रे स्पष्टपणे आणि पाचवे सूत्र समतोलाचे मांडले गेले. या पाच सूत्रांचा गलवान खोऱ्यात आणि जन्स्कार पर्वतरांगांमध्ये आवाज घुमला. तो जगभर सर्वत्र पसरला. त्यांची ही चित्तवेधक कथा आहे. 

विस्तारवादी मनोवृत्तीला विरोध
या दौऱ्यातून पुढे आलेले पहिले सूत्र म्हणजे विस्तारवादी मनोवृत्तीला भारतीय पंतप्रधानांनी स्पष्टपणे विरोध केला. भारत आणि चीन यांच्यामध्ये १९६२ नंतर फार मोठे ताणतणाव उभे राहिले नाहीत. परंतु, क्षी जिनपिंग यांच्या काळात भारत आणि चीन यांचे संबंध संघर्षशील झाले. ही वस्तुस्थिती दशकभराची दिसते. अशी परंपरा चीनने अनेक वेळा निर्माण केली. याचे कारण विसाव्या शतकातील पन्नाशीच्या दशकापासून माओ-त्से तुंग हा सुरुवातीचा टप्पा होता. दुसरा टप्पा डेंग यांचा होता. त्यानंतर आत्ता हा तिसरा टप्पा सुरू झालेला आहे. या तिसऱ्या टप्प्यात माओ त्से तुंग व डेंग यांच्या काळातील विस्तारवाद आणि साम्राज्यवादी मनोवृत्तीचे पुनरुज्जीवन करण्याची भूमिका चीनने स्वीकारलेली दिसते. नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणात विस्तारवाद विरोध स्पष्टपणे नोंदविला. चीनचे तत्त्वज्ञान विस्तारवाद या स्वरूपाचे आहे. विस्तारवाद या तत्त्वज्ञानाची निर्मिती चिंग व मिंग राजवटीत झाली होती. चिंग व मिंग राजवटीतील विस्तारवादाचा विलक्षण प्रभाव माओ त्से तुंग व चाउ एन लाय यांच्यावर होता. तसाच प्रभाव क्षी जिनपिंग यांच्यावर आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी या दौऱ्यात थेटपणे चीनचे नाव न घेता विस्तारवाद विरोधी भूमिका स्पष्ट केली. हा मुद्दा नरेंद्र मोदींच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठा मुद्दा आहे. तसेच भारतीय राजकारणातदेखील महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण चिनने कन्फ्युशिअस यांच्या मानवतावाद आणि मूल्याधिष्ठित राजकारण या गोष्टी बाजूला ठेवल्या. त्यांनी सह अस्तित्वाचा मुद्दाही बाजूला ठेवला. चिनी राजकीय वर्चस्वाची संकल्पना पुढे आली. यामुळे चिनी राजकीय वर्चस्वाला हा विरोध स्पष्टपणे नोंदविला गेला. चीनची ही परंपरा खूप जुनी आहे. ही परंपरा चिंग व  मिंग राजवटीपासून चालत आलेली आहे. तिचे पुनरुज्जीवन तुंग, डेंग आणि जिनपिंग या राजवटींनी केले. थोडक्यात भारतीय सार्वभौमत्वाची विस्तारवाद विरोधाची भूमिका ही केवळ जिनपिंगपर्यंत थांबत नाही, तर ती चीनच्या चिंग व मिंग राजवटीपर्यंत जाते. तसेच चीनच्या सत्ताकांक्षी, अर्थकांक्षी, विस्तारकांक्षी मनोवृत्तीला विरोध करते. कारण चीनची ही मनोवृत्ती भारतीय सार्वभौमत्वासाठी सातत्याने एक उपद्रवमूल्य ठरलेले आहे. ही मनोवृत्ती माओ त्से तुंग आणि चाउ एन राय यांच्या राजवटीतदेखील उपद्रवमूल्य ठरली होती. त्या मनोवृत्तीच्या विरोधात निश्चित भूमिकेची गरज होती. ती भूमिका या दौऱ्यात घेतली गेली. हे या दौऱ्याचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. 

 क्षी जिनपिंग यांची राजवट सरळ सरळ भारतविरोधी आहे. कारण जिनपिंग यांची जडणघडण विस्तारवादी मनोवृत्तीतून झाली आहे. समकालीन दशकामध्ये जिंनपिंग लष्कर प्रमुख व पक्षाचे प्रमुख झाले (२०१२). तेव्हापासून चीनमध्ये विस्तारवादी मनोवृत्तीचे तिसरे पर्व सुरू झाले. जिनपिंग यांनी चीनच्या एकत्रीकरणाचे स्वप्न चिनी जनतेला दाखवले. त्यामुळे चीनचा हेतू भारताच्या संदर्भातला बदललेला आहे. भारत आणि चीन यांच्या दरम्यानच्या सीमारेषा निश्चित नाहीत. परंतु, चीनला भारतीय हद्दीत प्रवेश करून त्या सीमारेषा निश्चित करावयाच्या आहेत. यातूनच चीनने लडाख व अरुणाचल प्रदेश संदर्भात विस्तारवादी धोरण स्वीकारलेले दिसते. यामध्ये चीनची विस्तारवादी व साम्राज्यवादी मनोवृत्ती दिसते. २०२१ पर्यंत चीनला सीमेवरील भूभाग एकत्र करावयाचा आहे. तसेच चीनला  एकविसाव्या शतकातील पन्नाशीच्या दशकाच्या अगोदर जागतिक राजकारणातील वर्चस्वशाली देश म्हणून मान्यता मिळवायची आहे. यामुळे चीनने विस्तारवादी धोरणाप्रमाणे ''गलवान खोरे'' व ''पॅंगोग'' सरोवर येथे हस्तक्षेपाची भूमिका घेतली. तेथे लष्कराची जमवाजमव केली. यामुळे गलवान खोरे, पॅंगोग सरोवर, दौलत बेग ओल्डी, सियाचिन, देपसांगपर्यंत चीनच्या विस्तारवादी धोरणाची मनोवृत्ती दिसू लागली. त्यास भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट विरोध केला. हा संदेश चीनला आणि जगाला दिला गेला. हे या भेटीचे विशेष महत्त्व आहे. 

चीनविरोधी शक्तीचे केंद्र 
जागतिक व्यवस्थेची पुनर्रचना होत आहे. या पुनर्रचनेत चीनविरोधी शक्तीचे एक केंद्र भारत असेल, अशा आशयाचे दुसरे सूत्र पंतप्रधानांनी या दौऱ्यात मांडले. भारत आणि चीन यांच्या संदर्भात एकूण जगभर नव्याने चर्चा सुरू झाली होती. ही चर्चा सामरिक शास्त्रातील तज्ज्ञ करत होते, तसेच रणनितीकारदेखील करत होते. अमेरिका, युरोप येथील देश आणि चीन यांना भारताची नेमकी भूमिका काय हे समजून घ्यायचे होते. २ जुलैपर्यंत भारताची भूमिका नरम होती. तसेच भारतीय सार्वभौमत्वाच्या भूमिकेचा अर्थ चीन आणि जगातील वेगवेगळे देश वेगवेगळ्या पद्धतीने लावत होते. दिल्लीतील पत्रकारदेखील भारताचे सार्वभौमत्व विषयक भूमिका दुबळी असल्याचे मत मांडत होते. परंतु, भारत हा सार्वभौमत्वाचे रक्षण करेल असा संदेश चीन आणि जगातील सर्व देशांना दिला. हा मुद्दा पंतप्रधान यांनी श्रीकृष्णाचे उदाहरण देऊन पटवून दिला. त्यांनी सुदर्शन चक्राचे महत्त्व त्यांच्या भाषणामध्ये पटवून दिले. तसेच त्यांनी शस्त्रबळ या गोष्टीवरती भर दिला. विशेष म्हणजे त्यांनी शौर्याचे आणि वीर प्रवृत्तीचे वर्णन करून लष्कराला एक तत्त्वज्ञान सांगितले. ते तत्त्वज्ञान म्हणजे भारतीय सार्वभौमत्वाचे संरक्षण करण्यासाठी भारतीय लष्कर पूर्णपणे सक्षम आहे. हा लष्करावरील आणि शस्त्रावरील विश्वास त्यांनी अमेरिकेला, युरोपला आणि चीनलादेखील सांगितला. थोडक्यात ही भूमिका वि. दा. सावरकर यांच्या भूमिकेशी सुसंगत असणारी आहे. ही भूमिका भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडल्यामुळे चीनच्या विरोधातील शक्तींचे एकत्रीकरण घडण्याची प्रक्रिया सुरू झाली. या प्रक्रियेला पंतप्रधानांनी गती दिली. म्हणजेच थोडक्यात अमेरिका, भारत, जपान यांची एक स्वतंत्र ताकद आहे. यांचा एक समझोता घडू शकतो. हे एक त्यांच्या या दौऱ्यातील आणि भाषणातील मुख्य आशयसूत्र आहे. हे सूत्र अमेरिका आणि जपानला समजले, तसेच ते चीनलादेखील समजले. हा गर्भित आणि दोन वाक्यांमधील महत्त्वाचा अर्थ आहे. शिवाय चीनला सरळ सरळ आव्हान दिले गेले. यामुळे भारत अमेरिका जपान या गटातील सत्तांच्या बाजूला झुकल्याचा कलही स्पष्ट झाला. 

नव मध्यमवर्गाची मर्मदृष्टी
या दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव मध्यमवर्गाची मर्मदृष्टी स्पष्ट केली. हे त्यांच्या दौऱ्यातील तिसरे महत्त्वाचे सूत्र होते. नव मध्यमवर्ग भारतीय जनता पक्षाचा एक मुख्य आधार आहे. त्यामुळे या नव मध्यमवर्गाच्या संस्कृतिक परिभाषेत पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्यामध्ये बोलले. भारतीय जनता पक्षाची आणि सरकारची वैचारिक पकड मजबूत आहे, हा संदेश त्यांनी या दौऱ्यामध्ये आणि भाषणांमध्ये दिला. त्यांनी भारत माता आणि वीर माता या दोन मातांची संकल्पना मांडली, त्यांचे वर्णन केले. माता ही संकल्पना भाजपच्या हिंदुत्व संकल्पनेशी मिळतीजुळती आहे. त्यामुळे पक्षाचे समर्थक या गोष्टीकडे आशावादी दृष्टीने पाहतील असा दृष्टिकोन त्यांनी तयार केला. त्यांनी हा दृष्टिकोन पक्षाला आणि एकूण भारतातील हिंदू समाजाला दिला. यामुळे भाजप समर्थकवर्गामध्ये त्यांनी  विचारप्रणालीशी संबंधित नवचैतन्य निर्माण केले. या दौऱ्यामध्ये त्यांनी विशेष म्हणजे रामधारी सिंह दिनकर यांची कविता आपल्या भाषणात वापरली. राष्ट्रकवी दिनकर यांनी राज्यसभेत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या चीन विषयक धोरणाला विरोध केला होता. दिनकर यांनी राज्यसभेत नेहरूंच्या धोरणाला विरोध करणारी कविता म्हटली होती. पंडित नेहरूंचे नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहरूंपेक्षा नरेंद्र मोदींचे चीन विषयक धोरण भक्कम आहे, अशी भूमिका दौऱ्यात मांडली. त्यासाठी त्यांनी दिनकर यांची कविताही निवडली. दुसऱ्या शब्दांत या दौऱ्यात त्यांनी हा भारत साठीच्या दशकातील नाही, तर एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकातील आहे. नव भारताची त्यांनी वेगळ्या पद्धतीने जाणीव करून दिली. म्हणजेच थोडक्यात पक्षीय सत्ता स्पर्धेचे सूत्र त्यांनी स्पष्टपणे मांडले. तसेच त्यांनी वीर व्यक्ती शांतता निर्माण करू शकतो हाही मुद्दा मांडला. शूर, वीर, शौर्य या गोष्टी त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या भाषणामध्ये पेरलेल्या होत्या. किंबहुना त्यांनी वीर माता आणि महिला फौजी यांचाही उल्लेख केला. म्हणजेच भारत हा शस्त्रपूजन व  वीरता पूजक आहे. भारतातील स्त्रियादेखील शस्त्र पूजक आणि वीरता पूजक आहेत, हा संदेश त्यांनी स्पष्टपणे भारतातील जनतेला, चीनमधील जनतेला, चीनच्या लष्कराला, चीनी राज्यकर्त्यांना दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या विवेचनामध्ये नव मध्यमवर्गाच्या आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब उमटलेले दिसते. हे सूत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांस्कृतिक परिभाषेत दमदारपणे दौऱ्यात मांडले. 

सरकार आणि लष्करी यंत्रणांमध्ये समन्वय
 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दौऱ्यात सरकार व लष्कर यांच्यातील समन्वयाचे सूत्र प्रभावीपणे पुढे आणले. सरकार आणि लष्कर यांच्या संबंधात तणाव होता. चीनने भारतात हस्तक्षेप केला नाही, अशी पंतप्रधानांची भूमिका होती. असा बोलबाला मीडियामध्ये झाला होता. तसेच ही गोष्ट लष्करी अधिकाऱ्यांनादेखील मान्य नव्हती, असाही बोलबाला मीडियामध्ये झाला होता. या पार्श्वभूमीवर सरकार आणि लष्करी यंत्रणा यांच्यामध्ये नव्याने समन्वय प्रस्थापित करणे गरजेचे होते. हे सूत्र या दौऱ्यामुळे साध्य झाले. विशेष म्हणजे या दौऱ्यात संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत व लष्कर प्रमुख जनरल नरवणे हेही त्यांच्याबरोबर होते. यातून त्यांनी भारतातील राजकीय ताकद आणि लष्करी ताकद ही एकत्रितपणे काम करत आहे. लष्कराच्या पाठीशी राज्यसंस्था उभी आहे. त्यांनी हा संदेश या  दौऱ्यामध्ये जागतिक स्तरावर पोचवला. यामुळे भारतातील लष्कराचे मनोधैर्य वाढले. लष्करी अधिकाऱ्यांची राज्यसंस्थेच्या विरोधातील नाराजी दूर केली. या दौऱ्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कराबद्दल राष्ट्रवादी भूमिका घेतली. तसेच सरकार लष्कराबरोबर आहे अशीही भूमिका घेतली. सरकारचे धोरण विस्तारवादाचे नाही, तर विकासवादाचे आहे. विकासवादासाठी लष्कर काम करत आहे. अशी त्यांनी विकासवाद आणि राष्ट्रवाद यांची सांगड घातली. विकासवादाचे संदर्भ देत त्यांनी राष्ट्रवादाचा गौरव केला. त्यांच्या भाषणामध्ये या गोष्टीचे प्रतिबिंब उमटलेले दिसते. उदा. लडाख हे देशाचे शीर आहे. १३० कोटी देशवासीयांच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे. देशासाठी त्याग करणाऱ्या लोकांची ही भूमी आहे. लडाखला तोडण्याचा प्रत्येक प्रयत्न इथल्या राष्ट्रवादी जनतेने हाणून पाडला आहे. अशा आशयाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेरणी केली. कारण ३७० वे कलम रद्द करण्यास चीनचा विरोध होता. परंतु, लडाखचा मात्र पाठिंबा होता. यामुळे चीनविरोधातील राष्ट्रवाद लडाखमध्ये निर्माण करण्यात त्यांना यश आले. बालाकोट हवाई हल्ला केला होता. बालाकोटपासून ३० किलोमीटर अंतरावर पाकिस्तान-चीन आर्थिक सहयोग मार्गिका प्रकल्प सुरू आहे. त्यामुळे चीनला बालाकोटवरील हवाई हल्ला हा खूप मोठा धोका वाटला होता. यामुळे चीन सातत्याने अस्वस्थ होता. त्यांनी ही अस्वस्थता गलवान खोरे व पॅंगॉंग सरोवर येथे व्यक्त केली. ''लाइन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोल'' या संकल्पनेला अर्थही नाही. परंतु, तीच संकल्पना भारतासाठी महत्त्वाची आहे. त्या लाइन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोलला चीनने प्रमाण मानावे अशी भूमिका या दौऱ्यामधून पुढे आली. हा एक महत्त्वाचा आशय व्यक्त झाला. पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट भागात रस्ते तयार करण्यास भारताचा विरोध होता. तरीही चीनने तेथे गुंतवणूक केली. अक्साई चीनपासून गिलगिट, बाल्टिस्तान या भागात हेलिपॅड, बोगदे, टनेल अशा स्वरूपाची कामे करण्यासाठी चीनने गुंतवणूक केली होती. या संदर्भातदेखील पंतप्रधान मोदींच्या भाषणांमध्ये अप्रत्यक्षपणे उल्लेख येत होते, कारण येथे तीनपट खर्च वाढवला आहे. बॉर्डरचा विकास केला आहे. रस्ते, पूल या स्वरूपाचा विकास सुरू आहे, असे उल्लेख त्यांनी केले. म्हणजे थोडक्यात ''जशास तसे'' अशी भूमिका सार्वभौमत्व म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली. एकूण त्यांनी शस्त्र, अस्त्र, तंत्रज्ञान, जल, स्थल, अवकाश इत्यादी प्रत्येक शक्तीचा उल्लेख स्पष्टपणे केला. म्हणजेच त्यांनी शस्त्राच्या भाषेतील मांडणी दौऱ्यात केली. 
 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दौऱ्यात अजूनही चर्चेला वाव असल्याचे काही संदर्भ व्यक्त केले. सर्वोच्च पातळीवर चर्चा होऊ शकते. हे पाचवे सूत्र त्यांनी या दौऱ्यात अस्पष्ट आणि अप्रत्यक्षपणे व्यक्त केले. म्हणजेच शस्त्र अस्त्र संदर्भातील मांडणी करताना या दौऱ्यात नरेंद्र मोदी यांनी चर्चा, वाटाघाटी आणि संयम या गोष्टींबद्दलचा आशावाददेखील व्यक्त केला. कारण त्यांनी गौतम बुद्धांचे उदाहरण देऊन सत्य, करुणा, दया या गोष्टी अधोरेखित केल्या. तसेच संतांचे उदाहरण देऊन शौर्याबरोबर विश्वसनीयता या मूल्याचाही उल्लेख केला.  त्यांनी मानवतावाद या गोष्टीवर भाष्य केले. शांततेची पूर्वअट शौर्य आणि वीरता आहे, हेही त्यांनी कौशल्याने पटवून सांगितले. यामुळे एकूण लेह-लडाखचा दौरा हा सरळ सरळ संघर्षाची बाजू घेणारा होता. तसाच तो चर्चा, संवाद, वाटाघाटी यांच्यासाठीचा एक संवाद व्यक्त करणारा होता. हा आवाज जन्स्कार पर्वतरांगांमध्ये या दौऱ्यामुळे घुमला. या दौऱ्यामध्ये गरजेप्रमाणे अर्थ लावण्याची परिभाषा वापरली गेली. आंतरराष्ट्रीय पातळीवर ही परिभाषा जास्त उपयुक्त ठरणार आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनला सरळ सरळ शस्त्रास्त्रांच्या भाषेत आव्हान दिले आहे. परंतु, त्या जोडीला त्यांनी सलोख्याची, मानवतेची आणि शांततेची परिभाषा वापरली आहे.

संबंधित बातम्या