ऑस्कर... ऑस्कर..

प्रसाद नामजोशी
सोमवार, 14 डिसेंबर 2020

भारतातर्फे यंदा ऑस्कर पुरस्कारांसाठी जलीकट्टू हा मल्याळी सिनेमा पाठवण्यात आला आहे. त्यानिमित्त भारतीय किंवा मराठी चित्रपट ऑस्करपासून दूर का राहतो ही चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली... पण पुरस्कारासाठी चित्रपटाची प्रवेशिका पाठवणे एवढेच पुरेसे असते का? काय असतात पुरस्कारासाठीचे निकष? भारतीय सिनेमा दूर का राहतो? या प्रश्‍नांचा ऊहापोह...

भारत हा सणांचा देश आहे. दर पंधरा दिवसांनी कुठला ना कुठला सण-उत्सव साजरा करणे हा आपला आवडता राष्ट्रीय कार्यक्रम आहे. हे सण किंवा उत्सव दरवेळी धार्मिकच असले पाहिजेत असेही नाही. एवढेच नाही तर ते आनंदाचेच असावेत असाही आग्रह नाही. अनेक सामाजिक प्रश्नांचे उत्सवही आपण वर्षानुवर्ष साजरे करतो, एवढेच नाही तर आपली काही दुःखेही दरवर्षी आपण कुरवाळत बसतो. उदाहरणार्थ, मुलांच्या दप्तराचे ओझे कसे कमी होणार, उसळत्या चेंडूंचा सामना भारतीय फलंदाज कसे करणार आणि मराठी चित्रपटाला ऑस्कर कधी मिळणार, हे तीन प्रश्न आपण जून ते नोव्हेंबर साजरे करतो! नोव्हेंबर महिन्यात दिवाळीची धावपळ संपली, की भारतातर्फे यावर्षी ऑस्करला अमुक एका चित्रपटाची निवड अशी अचानक घोषणा होते.. आणि मग चित्रपट आणि ऑस्कर यांची चर्चा सुरू होते. पुन्हा एकवार ‘मदर इंडिया’, ‘सलाम बॉम्बे’ आणि ‘लगान’ या ऑस्करनामांकित चित्रपटांच्या भूतकाळाची उजळणी होते. ‘श्वास’पूर्वीचा मराठी चित्रपट आणि ‘श्वास’नंतरचा मराठी चित्रपट यावर समीक्षक आगळा (म्हणजे कसा कुणास ठाऊक!) प्रकाश टाकतात. ऑस्करला निवड झालेला चित्रपट काही उत्साही लोक बघतात आणि त्यापेक्षा अमुक अमुक चित्रपट जास्त योग्य कसा आहे अशी प्रतिक्रिया देतात. सालाबादाप्रमाणे तो चित्रपट ऑस्करला जातो आणि पहिल्याच फेरीत बाद होऊन भारतीय चित्रपटांना ऑस्कर का नाही, या नवीन चर्चेच्या राष्ट्रीय सणाला सुरुवात करून देतो. या संपूर्ण भानगडीमध्ये भारतातर्फे ऑस्करची निवड होते म्हणजे काय होते आणि ऑस्करला चित्रपट जातो आणि प्राथमिक फेरीत बाद होतो म्हणजे तरी नेमके काय होते, याची माहिती करून घेण्याचा फारसा उत्साह कुणीही दाखवत नाही. कारण ती माहिती झाली तर भारताला ऑस्करमध्ये फारसे स्थान नाही या सत्याची जाणीव करून घ्यावी लागते आणि मग आपल्या उज्ज्वल परंपरा आणि आपले प्रत्येक बाबतीत असलेले सर्वश्रेष्ठपण यांच्यात घोळलेला चित्रपटाच्या जन्मापासून चिकटलेल्या मराठीपणाच्या अस्मितेचा टिळा कुणालाच लावता येत नाही. त्यापेक्षा मराठीला ऑस्कर का नाही या चर्चेत आणि आपल्यावर होत असलेल्या अन्यायाच्या कल्पना गोंजारण्यात वेळ जास्त बरा जातो. भावनेच्या ऑक्सिजनवर जगणाऱ्या आपल्या समाजाला ऑस्करकडे दुर्लक्षही करता येत नाही आणि मराठी सिनेमा त्यापासून खूप दूर आहे हे सत्यही स्वीकारता येत नाही.

मराठी चित्रपट ऑस्करपासून दूर आहे याचा अर्थ त्याची गुणवत्ता ऑस्करच्या योग्यतेची नाही असा अजिबात होत नाही. कुठल्याही पुरस्कारांसाठी काही एक तांत्रिक निकष पूर्ण करावे लागतात. ते निकष काही वेळेला पुरे होतात, काही वेळेला होत नाहीत. याचा अर्थ ती संस्था, व्यक्ती किंवा चित्रपट पुरस्कारासाठी योग्य नव्हता असे म्हणण्याचे कारण नाही. गांधीजींना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला नाही परंतु बराक ओबामांना तो मिळाला याचा अर्थ गांधीजींपेक्षा ओबामा श्रेष्ठ होत नाहीत. योगायोगाने किंवा दुर्दैवाने गांधीजी नोबेलच्या तांत्रिक निकषात बसले नाहीत हे सत्य स्वीकारावे लागेल. ऑस्करचेही तसेच आहे.

ॲकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस ही संस्था दरवर्षी इंग्रजी भाषेत निर्माण झालेल्या आणि अमेरिकेत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना वार्षिक पुरस्कार देते. ते म्हणजे ऑस्कर. १९२९ सालापासून गेली ९२ वर्षे हे पुरस्कार दिले जातात. आता इंग्रजी भाषेत निर्माण झालेल्या आणि अमेरिकेत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना जे पुरस्कार मिळतात त्यात मराठी चित्रपट कसा आणि कुठे आणि का बसेल? महाराष्ट्र सरकारचा मराठी चित्रपटांसाठी दिला जाणारा राज्य पुरस्कार जसा एखाद्या अमेरिकी चित्रपटाला मिळणार नाही तसेच हे आहे. आता प्रश्न उरतो की मग तरीसुद्धा भारतातर्फे चित्रपट ऑस्करला का पाठवला जातो? त्याचे कारण म्हणजे ॲकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स जे एकूण चोवीस पुरस्कार देते त्यात कलाकार, तंत्रज्ञ  आणि चित्रपटांसाठीच्या पुरस्कारांबरोबरच ‘परकीय भाषेतला सर्वोत्कृष्ट चित्रपट’ हासुद्धा एक पुरस्कार आहे. १९२९पासून सुरुवातीची पंधरा-वीस वर्षे इंग्रजीव्यतिरिक्त कुणाला काही पुरस्कार द्यावेत असे ॲकॅडमीला काही वाटले नाही. मग १९४७ ते १९५५ परकीय भाषेतल्या एका चित्रपटाला एक मानद पुरस्कार द्यायला सुरुवात झाली. १९५६ मध्ये सर्वोत्कृष्ट परकीय भाषा विभाग निर्माण करून तो स्पर्धात्मक करण्यात आला. विशेष म्हणजे पहिल्याच वर्षी भारताने मेहबूब खान दिग्दर्शित ‘मदर इंडिया’ चित्रपट पाठवला. त्याला पहिल्या पाचमध्ये नामांकनही मिळाले. मात्र ऑस्कर मिळाले फेडेरिको फेलिनीच्या ‘नाईट्स ऑफ कॅबिरिया’ला. विशेष म्हणजे या चित्रपटाला ‘मदर इंडिया’पेक्षा केवळ एक मत जास्त मिळाले होते! यानंतर या विभागात दर वर्षी भारताने प्रवेशिका पाठवल्या. १९८८ मध्ये मीरा नायरच्या ‘सलाम बॉम्बे’ने आणि २००१ मध्ये आशुतोष गोवारीकरच्या ‘लगान’ने नामांकने मिळवली. या तीन चित्रपटांत गेल्या ६३ वर्षांचा ऑस्करसंबंधातला आपला इतिहास संपतो. सत्यजित राय यांना मिळालेले मानद ऑस्कर सोडले, तर आजवर भारतीयांना ज्या चित्रपटांसाठी ऑस्कर मिळाले ते सर्व परदेशी चित्रपट होते.   

इंग्रजी व्यतिरिक्त इतर सर्व भाषांसाठी मिळून ऑस्करमध्ये एकच पुरस्कार आहे. त्यामुळे या पुरस्कारासाठी सगळ्या जगाची एकमेकांशी स्पर्धा असते असे म्हणायला पाहिजे. अर्थातच सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपट पुरस्कार मिळालेला चित्रपट हा जगातला सर्वश्रेष्ठ चित्रपट म्हटला पाहिजे. पण तसे होत नाही. कारण हॉलिवूडच्या चकाचक चित्रपटांचा या विभागाला स्पर्श नसतो. त्यातही हॉलिवूडचा फारसा दोष नाही. ही इंडस्ट्रीच ग्लॅमरमध्ये प्रचंड खोलवर बुडालेली आहे. आपल्याकडेसुद्धा फिल्मफेअर पुरस्कारांच्या चमचमाटात दिसणारे तेच ते चेहरे आणि एखादा बाजूला पडलेला अतिशय दर्जेदार चित्रपट हे दृश्य दिसतेच. तीच गत प्रादेशिक चित्रपटांचीही आहे. प्रादेशिक भाषेतल्या चित्रपटांचे पुरस्कारही चमचमणाऱ्या आणि सतत चर्चेत असणाऱ्या तारे तारकांनी व्यापून टाकलेले असतात हे आपण बघतोच. अशावेळी आपल्या राष्ट्रीय पुरस्कारांकडे खरे म्हणजे आशेने बघायला हवे. दुर्दैवाने गेल्या काही वर्षांमध्ये राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा आशयसंपन्न चित्रपटांपेक्षा ग्लॅमरसंपन्न चित्रपटांनी व्यापून टाकलेले आहेत हे लक्षात येईल. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर ऑस्करमध्ये फक्त एका विभागासाठी असलेल्या पुरस्कारांच्या शर्यतीमध्ये भारतातून पाठवलेली एक प्रवेशिका जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी जी मेहनत करावी लागते त्याकडे कोणाचेही विशेष लक्ष जात नाही.

भारत ऑस्करसाठी प्रवेशिका पाठवतो, तसेच जगातले बहुतेक सर्वच देश आपापल्या देशातला सर्वोत्कृष्ट चित्रपट निवडून ऑस्करसाठी पाठवतात. देशातला सर्वोत्कृष्ट चित्रपट निवडण्याची प्रक्रिया भारत सरकारची कुठलीतरी कमिटी करत असते. त्या कमिटीमध्ये कोण लोक असतात, त्यांचा जागतिक चित्रपटांचा किती अभ्यास असतो, निवडीसाठी आलेले चित्रपट कुठले असतात आणि त्यांची निवड नेमक्या कुठल्या निकषांच्या आधारे केली जाते, हे साधे प्रश्न विचारण्याची सोयही आपल्याकडे नाही. किंबहुना एखाद्या वेळी एखादा प्रश्न विचारला की प्रश्न विचारणाऱ्याचीच लायकी आधी काढायची अशी एक अत्यंत सोयीची भूमिका घेतली जाते आणि मूळ प्रश्न बाजूला पडतो.

समजा असे गृहीत धरू, की भारतातर्फे निवड झालेल्या चित्रपटाची अत्यंत पारदर्शक पद्धतीने निवड होते आणि तो भारतातला त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट असतो. (सहज वाचकांचे कुतूहल शमवण्यासाठी म्हणून भारतातर्फे २०१० ते २०२० या गेल्या दहा वर्षांत ऑस्करसाठी पाठवलेल्या चित्रपटांची नावे देतोय, जाणकारांनी आपले मत यावरून ठरवावे: पीपली लाइव (हिंदी), अदामिन्ते मकान अबू (मल्याळी), बर्फी (हिंदी), द गुड रोड (गुजराती), लायर्स डाइस (हिंदी), कोर्ट (मराठी), विसरानयी (तमिळ), न्यूटन (हिंदी), व्हिलेज रॉकस्टार (आसामी), गली बॉय (हिंदी), जलीकट्टू (मल्याळी)) आता हा चित्रपट समजा भारतातला त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे. तो ऑस्करला जातो म्हणजे तिकडे कुणीही पायघड्या घालून आपल्या चित्रपटाची वाट बघत बसलेले नसते. तर निर्मात्याला तो रीतसर अमेरिकेमध्ये प्रदर्शित करावा लागतो. त्याला मुख्य स्पर्धेमध्ये नामांकन मिळण्यासाठीचे मतांचे काही निकष पार करावे लागतात. ऑस्कर स्पर्धेच्या नामांकनाला पात्र होण्यासाठी ऑस्करच्या ज्यूरींची मते मिळवावी लागतात. या जगभरातल्या ऑस्करच्या ज्यूरींची संख्या साडेसहा हजारांच्या घरात आहे. जगभरातले हे अभिनेते, कलावंत, तंत्रज्ञ असे ज्यूरी ऑस्करसाठी मतदान करत असतात. त्यासाठी या ज्यूरींनी चित्रपट बघावा लागतो. शेवटी तीही माणसेच असतात. जगभरातून आलेले शेकडो चित्रपट प्रत्येकजण बघू शकत नाही. म्हणून मग आपला चित्रपट ज्यूरींनी बघावा यासाठी तो विविध ठिकाणी प्रदर्शित करावा लागतो. त्याची जाहिरात करावी लागते. चित्रपटाचे नाव, त्याची वैशिष्ट्ये या सगळ्या गोष्टी ज्यूरींच्या कानापर्यंत पोहोचतील याची व्यवस्था करावी लागते. थोडक्यात हे एक प्रकारचे नियमाला अनुसरून केलेले मार्केटिंगच असते. अमुक एक चित्रपट ऑस्करच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे तो आपण बघावा असे ज्यूरींना वाटावे लागते. म्हणजे मग तो चित्रपट बघून त्या विषयीचे मत ज्यूरी नोंदवतात आणि त्यांच्या मतानुसार झालाच तर चित्रपट नामांकनासाठी पात्र होतो. लगान जेव्हा अलीकडल्या काळात (याला फक्त अलीकडल्या म्हणायचे, या गोष्टीला आता दोन दशकांचा काळ लोटलेला आहे) भारतातर्फे स्पर्धेसाठी पाठवला होता तेव्हा निर्माता अमीर खान आणि दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर ही मंडळी तिकडे जाऊन दोन महिने ठाण मांडून बसली होती. त्यांनी सगळी प्रक्रिया समजावून घेतली आणि त्याप्रमाणे चित्रपट प्रदर्शित केला म्हणून चित्रपटाला नामांकन तरी मिळाले. ऑस्कर मिळाले नाहीच. 

या सगळ्या पार्श्वभूमीवर आज मराठी चित्रपटांची खरी परिस्थिती काय आहे? एखादा मराठी चित्रपट निर्माण होता होताच निर्मात्याचे पैसे संपलेले असतात. मराठी चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या कुठल्याही माणसाला विचारा, त्याच्या चित्रपटासाठीच्या मानधनाचा शेवटचा चेक त्याला अजूनही मिळायचाच असतो. जिथे चित्रपटाची निर्मिती होता होताच निर्मात्याचे पैसे संपतात तिथे तो प्रदर्शित करायला लागणारी पुंजी तो कुठून आणणार? मराठीवर प्रेम करणाऱ्या आणि ऑस्करला मराठी चित्रपट का नाही अशी ओरड करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला गेल्या वर्षीच्या दहा मराठी चित्रपटांची नावे विचारा त्याला सांगता येणार नाही. दरवर्षी मराठीत २५०पेक्षा जास्त चित्रपटांची निर्मिती होते. त्यातले प्रदर्शित किती होतात, झाले तर थिएटरवर किती दिवस टिकतात, चित्रपट निर्माण झाला की तो प्रदर्शित करताना निर्मात्याला संपूर्ण गाळात घालण्याचे उद्योग कोणकोण कशा कशा पद्धतीने करतो, या सगळ्या रंजक कहाण्या गावोगावचे दादासाहेब फाळके तुम्हाला नक्कीच सांगतील. थोडक्यात मराठी चित्रपट निर्माण करून तो महाराष्ट्रातच प्रदर्शित करता करता जिथे निर्मात्यांच्या नाकी नऊ येतात तिथे त्याची झाली भारतातर्फे ऑस्करला निवड तरी तो लॉस एंजेलिसमध्ये प्रदर्शित करणार कसा, त्याची जाहिरात होणार कशी आणि ज्यूरींपर्यंत तो पोचवायचा कसा आणि त्यासाठी लागणारा पैसा डॉलर्समध्ये आणायचा कुठून, या प्रश्नांची उत्तरे अवघड आहेत. 

अनेकदा असे वाटते की आपल्याला परदेशातून कौतुक मिळवून आणल्याशिवाय चैन पडत नाही. सारासार विचार केला, विवेकबुद्धी ठेवून चित्रपट माध्यमाचा अभ्यास केला आणि त्यानंतर पुन्हा चित्रपट बघितले तर असेही लक्षात येऊ शकते की कित्येक ऑस्करविजेत्या चित्रपटांपेक्षा भारतीय भाषांमधले अनेक चित्रपट सरस आहेत. केवळ भारतीयच कशाला जगभरातल्या अनेक भाषांमधले चित्रपट अमेरिकन चित्रपटांपेक्षा अधिक उजवे वाटतात हे अनेक चित्रपट जाणकार अगदी सहज सांगतील.. आणि यापैकी अनेक चित्रपटांना ऑस्कर मिळालेले नसते. तरीसुद्धा हे चित्रपट जगभरातल्या रसिकांना माहिती असतातच. जगभरात अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रपट महोत्सव होतात. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जगभरातले चित्रपट येत असतात. त्या त्या शहरातले चित्रपट रसिक आवर्जून हे वेगवेगळ्या भाषांमधले चित्रपट बघतात आणि त्याविषयी चर्चा करतात. आज-काल हे सगळे चित्रपट इंटरनेटवरही बघता येतात. त्यात अर्थातच मराठी चित्रपटांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचलेला आहेच. कान, व्हेनिस, टोरांटो यांसारख्या अनेक महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपट पोचलेला आहे. प्रभातच्या दामले-फत्तेलाल, व्ही. शांताराम यांच्यापासून सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर आणि अलीकडच्या काळात उमेश कुलकर्णी, चैतन्य ताम्हाणे ही नावे त्यांच्या मराठी चित्रपटांसाठी वेगवेगळ्या महोत्सवात नावाजलेली आहेत. अशा वेळी केवळ मराठीला ऑस्कर मिळत नाही म्हणून रडण्यात काय अर्थ आहे? हे म्हणजे माझी अॅडमिशन नागपूरच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये झालेली आहे, पण मला पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्याचा पुरस्कार मिळालेला नाही म्हणून रडण्यासारखे आहे. जी स्पर्धाच माझ्यासाठी नाही, तिचे बक्षीस मला कसे मिळेल? कदाचित उद्या एखादा मराठी चित्रपट ऑस्करचे निकष पूर्ण करेल आणि मिळवेलही ऑस्कर. पण त्याचा अट्टाहास कशासाठी?

चित्रपट ही एक कला आहे. कुठल्याही कलाकृतीचे मोठेपण ती किती काळ लोकांच्या मनात जिवंत राहते यावरून ठरत असते. मराठी चित्रपटांना ऑस्कर मिळाले की नाही यावरून मराठी चित्रपट मोठा ठरणार नाही. जगभरातल्या चित्रपट रसिकांच्या मनात मराठी चित्रपट किती काळ रेंगाळत राहील त्यावरूनच त्याचे मोठेपण ठरवता येईल.

संबंधित बातम्या