सुवर्णमहोत्सवी जॅकल!

प्रसाद नामजोशी
शुक्रवार, 31 डिसेंबर 2021

पुस्तकातून पडद्यावर

ता. २२ ऑगस्ट १९६२. ओर्ली विमानतळाच्या दिशेने फ्रान्सचे अध्यक्ष जनरल गॉल यांच्या गाड्यांचा ताफा निघाला होता आणि त्यांच्यावर जीवघेणा गोळीबार झाला. अध्यक्षांच्या नाकाजवळून एक गोळी गेली. ते वाचले आणि सुखरूप विमानतळावर पोहोचले. गोळीबार करणारा मनुष्य होता फ्रान्सच्या वायुदलातला लेफ्टनंट कर्नल जीन बास्टिन! फ्रान्समधल्या ओएएस या क्रांतिकारी गटाला फ्रान्सने अल्जेरियाला दिलेलं स्वातंत्र्य मान्य नव्हतं. ते देणाऱ्या जनरल गॉलला संपवणं हे त्यांचं ध्येय होतं. जीन बास्टिन पकडला गेला आणि मृत्युदंडाला सामोरा गेला. फ्रान्सच्या फायरिंग स्क्वाडला सामोरी जाणारी शेवटची व्यक्ती म्हणूनही इतिहासानं त्याची नोंद घेतली. त्यानंतर तर कुठल्याही पद्धतीचा मृत्युदंड देणंच त्या देशानं बंद केलं. या गोळीबारानंतर जनरल गॉल यांची प्रतिक्रिया एवढीच होती- ‘त्यांना थेट गोळी घालणं जमत नाही!’ 

या  घटनेचा साक्षीदार होता ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेत काम करणारा एक चोवीस वर्षांचा तरुण. त्याच्या मनात त्या वेळी एका कादंबरीची बीजं रोवली गेली. या तरुणानं पुढे पत्रकारितेचे अनेक अनुभव घेतले, आणि मग १९७० साली जानेवारी महिन्यात लेखन सुरू करून अवघ्या पस्तीस दिवसांत आठ वर्षांपूर्वी सुचलेल्या जनरल गॉलच्या खुनाची सुपारी घेणाऱ्या मारेकऱ्याच्या त्या विषयावर कादंबरी लिहून पूर्ण केली. त्यावेळी गॉल जिवंत होते. बहुतेक सर्व प्रकाशकांनी कादंबरी नाकारली. त्या वर्षाच्या शेवटी गॉल यांचा नैसर्गिक मृत्यू झाला आणि लंडनच्या हचिसन आणि कंपनीनं ही कादंबरी प्रकाशित करायचं धाडस दाखवलं. लाल रंगाच्या मुखपृष्ठावर अक्षरं होती : ‘द डे ऑफ द जॅकल - फ्रेडरिक फोर्सिथ’!

जनरल गॉलच्या खुनाची सुपारी घेणारा कोणी एक जॅकल, ती देणारी ओएएस संघटना आणि जॅकलच्या मागावर असणारा फ्रान्सचा पोलिस कमिशनर लेबेल यांची ही कहाणी. अॅनाटॉमी ऑफ द प्लॉट, अॅनाटॉमी ऑफ अ मॅनहंट, अॅनाटॉमी ऑफ अ किल आणि शेवटी उपसंहार अशी कादंबरीची रचना आहे. पहिल्या पानापासून शेवटच्या कथनापर्यंत खिळवून ठेवणारी. आपण ती वाचताना झपाटून जातो. फोर्सिथची अत्यंत तपशिलात लिहिण्याच्या शैलीची रुजवात या कादंबरीनं केलेली आहे.

जॅकलची तयारी, त्याचे कष्ट आणि शेवटी त्याला आलेलं अपयश आणि मृत्यू हे सगळं अर्थातच काल्पनिक आहे. मात्र त्याला मूळ घडलेल्या घटनेची पार्श्वभूमी आहेच. ही कादंबरी गेली तब्बल पन्नास वर्षं वाचली जातेय. जॅकल नेमका कोण होता इथपासून ते लेखक फोर्सिथ हाच जॅकल होता इथपर्यंत वाचकांच्या पैजा लागताहेत. पिढ्या उलटल्या, सुपारी घेण्यादेण्याच्या पद्धती बदलल्या, जन्माच्याच नाही तर मृत्यूच्याही कल्पना बदलल्या, पण जॅकल आजही चवीनं वाचला जातोय, यातच या कादंबरीचं यश आहे.

या कादंबरीवर चित्रपट निघाला नसता तरच नवल होतं. फ्रेड झिनेमन या दिग्दर्शकानं १९७३ साली याच नावाचा चित्रपट या कादंबरीवर केला. एडवर्ड फॉक्सनं जॅकलची आणि मायकेल लोन्स्डेलनं कमिशनर लेबेलची भूमिका केली. हा चित्रपट कादंबरीत वर्णन केल्याप्रमाणे ब्रिटन, फ्रान्स, इटली आणि ऑस्ट्रिया इथं चित्रित केला गेला. फ्रान्सच्या पोलिस परेडचं खरंखुरं चित्रण चित्रपटात केलं गेलं, एवढंच नाही तर चक्क फ्रान्सच्या मंत्रालयातही चित्रीकरणासाठी त्यांनी परवानगी मिळवली होती. कादंबरीत वर्णन केल्याप्रमाणे जॅकल ब्रिटिश म्युझियमच्या ग्रंथालयात फ्रान्सचं ‘ल फिगारो’ हे वृत्तपत्र वाचतो याचं चित्रण प्रत्यक्ष ब्रिटिश म्युझियममध्ये केलं होतं. चित्रपट भरपूर चालला, संकलनासाठी ऑस्कर नामांकन आणि बाफ्टाचा पुरस्कार मिळाला. इतर अनेक नामांकनं चित्रपटाला मिळाली.

कादंबरीचा जेव्हा चित्रपट होतो, तेव्हा चित्रपटासाठी म्हणून वेगळी हाताळणी करावी लागते. दोन्ही स्वतंत्र माध्यमं असल्यामुळे हे अपरिहार्य आहेच. कादंबरीचा आत्मा चित्रपट दिग्दर्शकाला गवसला आहे का? याचं उत्तर जास्त महत्त्वाचं आणि या चित्रपटापुरतं तरी ते सकारात्मक आहे. अर्थात ‘जॅकल’चे वाचक कादंबरीत आहे तशा तपशीलातल्या मांडणीची चित्रपटाकडून अपेक्षा करत असतील तर त्यांची निराशा होईल.   

कादंबरीच्या पूर्वार्धातलं जॅकलचं सविस्तर प्लॅनिंग, जॅकलव्यतिरिक्त कथेतल्या इतर पात्रांची पार्श्वभूमी, एखाद्यानं ओएएस किंवा फ्रेंच सिक्रेट सर्व्हिसची घेतलेली बाजू आणि त्यामागची कारणं या सर्व गोष्टी कादंबरीत विस्तारानं मांडलेली आहेत. चित्रपटात हे तपशील विस्तारानं अर्थातच नाहीत. चित्रपट आणि कादंबरीमध्ये काही तफावतीही आहेत. उदाहरणार्थ, कादंबरीच्या मध्यापर्यंत कुठंही उल्लेख न आलेला लेबेल  

चित्रपटात मात्र फार आधीच प्रेक्षकांसमोर येतो; किंवा कादंबरीत उल्लेख केल्यानुसार एक्सप्लोझीव बुलेट्सची चाचणी म्हणून जॅकल एका कलिंगडावर तब्बल वीस गोळ्या चालवतो, चित्रपटात मात्र तो तीनच गोळ्या झाडताना आपल्याला दिसतो. कादंबरीत ‘जोरू का गुलाम’ असणाऱ्या लेबेलला चित्रपटात मात्र अत्यंत सुंदर आणि काळजी घेणारी बायको लाभली आहे; वगैरे वगैरे. पण अशा तपशिलांवर तुम्ही अडकून राहणार असाल, तर चित्रपटाचा आनंद तुम्हाला घेता येणार नाही. कादंबरीत लेखकाला पानांची मर्यादा नसते. वाचकही एकेकटा वाचत असल्याने कंटाळा आला तर पान उलटण्याची त्याला मुभा असते. चित्रपटात सर्व प्रेक्षक एकाच वेळी चित्रपट बघत असल्यामुळे असे विषय पाल्हाळपणे मांडता येत नाहीत. चित्रपट माध्यमाच्या या मर्यादा आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. असं असूनही या चित्रपटानं कादंबरीला पुरेसा न्याय दिलेला आहे असं म्हणता येईल. 

‘द डे ऑफ द जॅकल’ या कादंबरीवरचा हा एकमेव चित्रपट नाही. मायकेल कॅटन जोन्स या दिग्दर्शकानं १९९७मध्ये ‘द जॅकल’ याच नावाचा एक चित्रपट केला होता. मूळ चित्रपटाचा हा रिमेक होता. यात अमेरिकेच्या अध्यक्षांच्या पत्नीला मारण्याची सुपारी रशियन माफिया एका अनामिक मारेकऱ्याला देतं अशी मांडणी आहे. फोर्सिथच्या कादंबरीचं नाव चित्रपटाला मुद्दाम दिलं नाही. कदाचित कॉपिराईटसारख्या गोष्टी टाळण्यासाठी हे केलं असावं. यात जॅकलची भूमिका ब्रूस विल्सनं केलीये.

भारतीय चित्रपटही जॅकलचं कथानक मांडण्यात मागं नाहीत. १९८८ साली ‘ऑगस्ट १’ नावाचा मल्याळी भाषेतला चित्रपट हा साधारण जॅकलवरच बेतलेला होता. एका मुख्यमंत्र्यांना मारण्यासाठी एका व्यावसायिक मारेकऱ्याला सुपारी दिली जाते असा तो चित्रपट होता. याचं दिग्दर्शन केलं होतं सिबी मलायीलनं. मुख्यमंत्र्याच्या भूमिकेत सुकुमारन, तर पोलिस कमिशनरची भूमिका केली होती मामुटीनं. कॅप्टन राजूनं जॅकलची भूमिका केली होती. हा चित्रपट गाजला आणि म्हणून १९९०मध्ये त्याचा तेलुगू रिमेक करण्यात आला. ‘राजकीय चंदरंगम’ हे त्याचं नाव. चरणराजनं जॅकलची भूमिका त्यात केली होती आणि मामुटीनं केलेली कमिशनरची भूमिका कृष्णानं केली होती. अक्किनेनी नागेश्वर राव होते मुख्यमंत्री! हे दोन्ही चित्रपट फोर्सिथच्या कादंबरीवर बेतलेले असले, तरी त्यात जॅकलपेक्षा कमिशनर किंवा मुख्यमंत्री यांच्या भूमिकेला जास्त महत्त्व दिलं होतं. व्यावसायिक मारेकऱ्याची भूमिका मध्यवर्ती ठेवण्याचं धाडस तमीळ आणि तेलुगू चित्रपटकर्त्यांना बहुधा झालं नसावं! पुढे २०११मध्ये ‘ऑगस्ट १५’ या नावाचा चित्रपटही प्रदर्शित झाला. हा ‘ऑगस्ट १’चा सिक्वेल होता.

‘द डे ऑफ द जॅकल’ या कादंबरीचं पुराण इथंच संपत नाही. या कादंबरीत जॅकल खोट्या नावानं ब्रिटिश पासपोर्ट काढतो त्याचं वर्णन आहे. तेव्हापासून ब्रिटनमध्ये खोट्या नावानं पासपोर्ट काढण्याच्या प्रकरणांना ‘डे ऑफ द जॅकल फ्रॉड’ म्हटलं जाऊ लागलं. न्यूझीलंडचे एक संसद सदस्य डेव्हिड गॅरट यांनी चक्क ‘द डे ऑफ द जॅकल’नं प्रेरित होऊन आपण तरुणवयात खोट्या नावानं पासपोर्ट काढल्याची कबुली दिली. त्यांच्या राजीनाम्यानं हे प्रकरण संपलं! ही कादंबरी आली १९७१ साली, १९७५मध्ये व्हेनेझुएलाच्या कार्लोस नावाच्या एका दहशतवाद्याला ‘द गार्डियन’ या वृत्तपत्राने ‘द जॅकल’ असं नाव दिलं. कारण तो पळून गेल्यावर त्याच्या सामानात ही कादंबरी पाहिल्याचं वृत्त त्यांच्या बातमीदारानं दिलं होतं! 

चाणाक्ष वाचकांना गेली पन्नास वर्षं पुरून उरलेली पुन्हा पुन्हा वाचावी अशी कादंबरी लाभली आणि रसिक प्रेक्षकांना पुन्हा एकदा बघावा असा चित्रपट मिळाला हे जास्त महत्त्वाचं.

(या लेखाबरोबरच ‘पुस्तकातून पडद्यावर’ हे सदर समाप्त होत आहे.)
 

संबंधित बातम्या