अनुभवा समुद्राखालील जग

प्रशांत हिंदळेकर 
बुधवार, 28 मार्च 2018

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विश्‍वात मोठी क्रांती घडली आहे. अंडरवॉटर टुरिझममुळे शंभर कोटी उलाढालीची नवी इंडस्ट्री येथे उभी राहिली आहे. ती आता १५०० कोटींपर्यंत वाढविण्यावर भर दिला जातोय. जिल्ह्यातील संपूर्ण किनारपट्टीवर याची व्याप्ती पसरत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विश्‍वात मोठी क्रांती घडली आहे. अंडरवॉटर टुरिझममुळे शंभर कोटी उलाढालीची नवी इंडस्ट्री येथे उभी राहिली आहे. ती आता १५०० कोटींपर्यंत वाढविण्यावर भर दिला जातोय. जिल्ह्यातील संपूर्ण किनारपट्टीवर याची व्याप्ती पसरत आहे.

अंडरवॉटर टुरिझमकडे देश-विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत. समुद्राखालील अद्‌भुत जीवसृष्टी पर्यटकांसाठी आकर्षण ठरली आहे. इथला समुद्र जैवविविधतेने नटलेला आहे. स्कूबा, स्नॉर्कलिंगचे सागरी विश्‍व आता मालवणपाठोपाठ देवगड, वेंगुर्ले तालुक्‍यातही विस्तारत आहे. सिंधुदुर्गातील नयनरम्य किनारे पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरत होते. यात बारा वर्षांपूर्वी स्नॉर्कलिंग, स्कूबा डायव्हिंगची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यामुळे समुद्राखालील अनोखे विश्‍व देश-विदेशातील पर्यटकांना खुले झाले. त्यामुळे गेल्या नऊ-दहा वर्षामध्ये समुद्री पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांचा लोंढा वाढताना दिसतो आहे. स्नॉर्कलिंग, स्कूबा डायव्हिंगच्या सुविधेमुळे पर्यटकांना समुद्राच्या पाण्याखालील जीवसृष्टी, समुद्री प्रवाळ पाहण्याचा मनमुराद आनंद पर्यटकांना लुटता येत आहे. 

 पर्यटन जिल्हा घोषित झाल्यानंतर मालवण तालुक्‍यातील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यासह परिसरातील तारकर्ली, देवबाग येथेच पर्यटक वास्तव्यासाठी जात असायचे. सुरवातीच्या काळात ठराविकच पर्यटनस्थळांना पर्यटकांकडून भेटी दिल्या जात होत्या. या काळात पर्यटकांना डॉल्फिनचे दर्शन होऊ लागले. दरम्यान सागरी जीव संशोधक डॉ. सारंग कुलकर्णी यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या परिसरात समुद्राखालील अनोख्या विश्‍वाचा अभ्यास सुरू केला. रंगीबेरंगी मासे, आकर्षक प्रवाळ यांसारखे जीवसृष्टीचे दर्शन जर पर्यटकांना घडविले तर ती वेगळीच पर्वणी ठरेल, या दृष्टिकोनातून स्नॉर्कलिंग आणि स्कूबा डायव्हिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. एरवी समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना समुद्राखाली एवढे काही दडलेले आहे, याची कल्पनाही नव्हती. मात्र, समुद्राखालील अनोखे विश्‍व पाहून तेही आकर्षित झाले. मच्छीमार समाजातील अनेक मुले बेरोजगार असल्याने त्यांनी या क्षेत्रात उतरण्याचे धाडस दाखविले. त्यामुळे स्थानिक मच्छीमारांच्या मुलांना स्नॉर्कलिंगचे प्रशिक्षण देत उत्कृष्ट स्नॉर्कलिंग गाइड तयार करण्यात आले.स्नॉर्कलिंग हे कमी व स्वच्छ पाण्यात केले जाते. यात समुद्राच्या तळाशी असलेल्या प्रवाळांचे तसेच रंगीबेरंगी माशांचे दर्शन घेता येते. स्नॉर्कलिंगसाठी प्लोटिंग रिंग, लाइफ जॅकेट, लाइफ बोया, मास्क, स्नॉर्कल या साहित्याचा वापर करावा लागतो. तर स्कूबा डायव्हिंग हे सर्वसाधारणपणे तीन ते चार वाव खोल समुद्रात केले जाते. स्कूबा डायव्हिंगसाठी रेग्युलेटर, ऑक्‍सिजन टॅंक, सीन, वेटबेल्ट, ब्युटीज, मास्क या साहित्याचा वापर करावा लागतो. अंडरवॉटर टुरिझमचा वाढता विस्तार पाहता पर्यटकांना विविध ठिकाणी समुद्राखालील अनोख्या विश्‍वाचे दर्शन घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे, आता मच्छीमारांची दुसरी पिढी या व्यवसायातून आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याचे पाहावयास मिळत आहे.

समुद्राखालील अद्‌भुत विश्‍वाचे दर्शन घेण्यासाठी गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात येथे पर्यटक दाखल होऊ लागले आहेत. सद्यःस्थितीत शहरातील बंदर जेटी परिसर, तारकर्ली, देवबाग, वायरी भुतनाथ, सर्जेकोट, तळाशील, राजकोट, चिवला वेळा या भागात पर्यटकांसाठी स्नॉर्कलिंग, स्कूबा डायव्हिंगची सुविधा उपलब्ध आहे. सप्टेंबर ते मे या महिन्यांत ही सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध आहे. स्नॉर्कलिंगसाठी बंदर जेटी येथून होडीतून पर्यटकांना सिंधुदुर्ग किल्ल्याच्या परिसरात नेऊन सागरी जीवसृष्टी तसेच प्रवाळांचे दर्शन घडविले जाते. स्नॉर्कलिंग, स्कूबा डायव्हिंगबरोबर अन्य साहसी जलक्रीडांचा आनंद लुटण्यासाठी १५०० ते १८०० रुपयांपर्यंतचे पॅकेज दिले जाते. यात आपण स्नॉर्कलिंग, स्कूबा डायव्हिंग कसे केले याचे व्हिडिओ शूटिंगही पर्यटकांना मोफत उपलब्ध करून दिले जाते. तारकर्ली, देवबाग, वायरी भुतनाथ, दांडी, राजकोट, चिवला वेळा, सर्जेकोट, तळाशील येथे खाडी, समुद्री सफर घडविताना पर्यटकांना वॉटरस्पोर्टस्‌च्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यात बनाना रायडिंग, पॅरासेलिंग, जेटस्की यासह अन्य सुविधा पर्यटकांसाठी आहेत. दांडी येथे नव्याने चिमुकल्यांसाठी वॉटरपार्कचीही सुविधा काही महिन्यांपूर्वी उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

तारकर्ली, देवबाग, बंदर जेटी, राजकोट, चिवला वेळा, सर्जेकोट, तळाशीलपुरतेच मर्यादित असलेले स्कूबा, स्नॉर्कलिंग आता देवगडातही सुरू झाले आहे. यात येत्या काळात वेंगुर्ले येथील समुद्रात भारतातील पहिली पर्यटन पाणबुडी दाखल होणार असल्याने आबालवृद्धांसह पर्यटकांना न भिजता समुद्राखालील अनोख्या विश्‍वाचे दर्शन घेता येईल. समुद्री पर्यटनाच्या या विस्तारामुळे येत्या काळात या इंडस्ट्रीतून मोठ्या प्रमाणात रोजगार तर उपलब्ध होणारच आहे. अंडरवॉटर टुरिझमकडे देश-विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात आकर्षित होत असून, ही इंडस्ट्री येत्या काळात १०० कोटींवरून १५०० कोटींपर्यंत वाढविण्यावर भर दिला जात आहे.

फोटो फीचर

संबंधित बातम्या