आत्मउमेदीची गुढी!

प्रवीण दवणे
सोमवार, 12 एप्रिल 2021

कव्हर स्टोरी

‘‘मी पंचांगाला चैत्र कधी हे विचारलेच नाही; 

झाडांची पोपटी पालवी मला अधिक विश्वासार्ह वाटली.’’

कविवर्य द. भा. धामणस्कर यांच्या कवितेच्या ओळीही मला या झाडांच्या पोपटी पालवीतूनच दिसू लागतात; तेव्हा चैत्राची चाहूल लागते.

फाल्गुनातील पिवळा, नारिंगी रंगोत्सव उष्ण झळांच्या ओठांनी पिऊन नवं शीतल वरदान द्यावं तसा चैत्र पोपटी पर्णांतून निरांजनीच्या कांचनकळ्या घेऊन मौन बोलीतून चूपचाप येताना मला जाणवतो.

होलिकेची ठिणग्यांची हद्द घालून की काय, गारवा निरोप घेतो न् नंतर येणाऱ्या वैशाखाशी हातमिळवणी करू पाहतो. परंतु यामध्ये अवघ्या मानव्याला दिलासा देत पंचसंवेदनांचा महोत्सव करीत एक भरजरी दालन येते, ते म्हणजे चैत्राचे. चैत्र अशा वेळी केवळ ऋतुचक्रातील मधुमास राहत नाही, तो एक आश्वासक स्पर्श होतो. गोठून गेलेल्या आशेला नवी पालवी देणारा उबदार!

पहाटेनंतरची पहिली लगबग किरणे अनेक वृक्षांच्या लाघवी पर्णांतून आरपार जाताना पाहणं ही एक निव्वळ अनुभूती आहे. चैत्राचा आरंभ हे मूर्तिमंत काव्य घेऊनच होताना मला जाणवतं. अगदी आज अपार शहरीकरणानंतरही चिवटपणे सळसळणारी हिरवाई ध्यानाच्या एकाग्रतेने आणि उत्कटतेच्या समग्रतेने जर पाहिली तर जाणवतं, चैत्राचं अवतरण हे केवळ निसर्गाचं एक मागील पानावरून पुढे चालू असे पान नसून ते फाल्गुनानं खुडलेल्या कोऱ्या फांद्यांना, ‘आपल्याला पुन्हा नव्या आत्मबळानं फुलायचंच बरं,’ असं दिलेलं निमंत्रण असतं.

आज हेच आत्मबळ चैत्र घेऊन आला आहे. आपण वृक्ष होऊन मुळापासून ते घेतलं तर वेगळे चैतन्यरस देण्यासाठी सारा निसर्ग उत्सुक आहे. 

सुदैवानं बालपण आमराई असलेल्या गावात गेलं. वार्षिक परीक्षेचा अभ्यास व्हायचा तो अशा गर्द आमराईत. बरोबर आसन म्हणून पोतं घेऊन आम्ही मित्र जात असू. नि भाजी भाकरीची शिदोरी. अगदी हा असाच मार्च महिना! मार्च कॅलेंडरवर; पण झाडांच्या डहाळीला चैत्र; पिकू पाहत असलेल्या कैऱ्यांनी झुलत असलेला मोहोरांच्या झुंबरांना गंध सावरेनासा झालेला. फांद्यांच्या, पानांच्या जाळीतून तो रानभरी बहरलेला. तशात उन्हाळीलाच पंचम सूर सुचावेत तसं ते कोकीळ कूजन. अज्ञात अभ्यासाचा पसारा समोर. एकाच वेळी पुस्तकाची पाने नि त्याच वेळी पानांची पुस्तके!
चैत्र समजत उमजत गेला तो 
अशा अनेक शाखांनी!

आता तसा चैत्र मोहरत नाही. झाडांची मुळं उन्मळून आपण दगडविटांच्या बिया रुजवल्या. सिमेंटचं खत पाणी घातलं, इमारती नि टॉवर्सचे वृक्षवल्ली फोफावले. सुखवस्तू पाय पुढे आला, नि रानाने आपला पाय काढता घेतला. त्याचे विपरीत परिणामही सुरू झाले. मुजोर ‘माणूस हे सगळं घडतंय ते आपल्या हव्यासापोटी’ हे मानायला तयार झाला नाही. पण आपत्तीच्या असह्य चेहऱ्यांमागे, मानवी बेफिकिरीचा आजार होता.

पण मुलाचे सारे अपराध पोटात घेऊन ‘बाळ जेवलास का रे?’ असं विचारणाऱ्या आईप्रमाणे निसर्ग, चैत्रस्पर्शाने मोहरतच राहिला. फळाफुलांचे पाझर या दिमाखात देतच राहिला.

आजही पुन्हा नव्या आत्मउमेदीची 

गुढी उभारत चैत्र पालवला आहे. मांगल्याच्या आम्रमंजिरीने. यंदाच्या गुढीला अगदी वेगळे संदर्भ आहेत, परंपरेहूनही निराळे; परंपरेला निराळे परिमाण देणारे. आजारी व्यक्तीने रंगभूषा केल्याप्रमाणे उत्सव केवळ प्रथा म्हणून साजरे होत नाहीत. त्या सणाला शुभतेच्या, मंगलतेच्या क्षणाचीही सोबत लागते. डहाळीवर चैत्र कालची शुष्कता दूर करून जरी पालवला असला तरी यंदाच्या गुढीपाडव्याच्या गोडव्यामागे आरोग्याच्या प्रतिकूल पर्यावरणाचे करडे संदर्भ आहेत.

पहाटे उठून चैत्र स्वागताच्या यात्रा निघणे, नववर्षाच्या संमेलनाच्या रंगावलीने पथशोभायात्रा काढणे हे अर्थातच यंदा नाही. उत्तम  पेहरावाने सुगंधित झालेली हर्षोल्हासित तरुणाई बघण्याची, गॅलरीतून डोकावणाऱ्या गुढीलाही सवय झाली होती. तिलाही यंदा चुकल्या चुकल्यासारखे होणार आहे. गेंदेदार झेंडूच्या गुच्छेदार हळदी ढिगांनी आणि आम्रपर्णाच्या तोरणांनी सजलेल्या माळांची दुकाने दिसतील, पण तीही आधीच्या रुबाबात नाहीत. चेहऱ्यावर सणासुदीचा आनंद सहज दिसण्याला आता ‘मास्क’चा आडपडदा असणार आहे. हे सगळं खरंच, पण सकारात्मक ऊर्जेचे बळच विघ्नाच्या छाताडावर पाय रोवून जिंकते- हे एकमेकांना सांगणाऱ्या मनांचे प्रतीक म्हणून यंदाचा गुढीपाडवा आहे.

प्रार्थनेत एक सुमंगल बळ असतं, आणि सर्वांनी मिळून मागितलेलं आरोग्याचं पसायदान गुढीच्या रूपानं जर व्यक्त झालं, तर मनात दाटून आलेल्या एका तिमिरतळाला प्रकाशाचं निश्चित आश्वासन मिळणार आहे, ते या गुढीच्या प्रतीकामधून. म्हणून यंदाची गुढी उभारताना परंपरेनं सांगितलेलं आणि दरवर्षी करतात म्हणून करूया- असं हे कर्मकांड नाही. वर्तमानाचा सूर पकडून उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थनेचे रूप असलेली ही निश्‍चयात्मक भावनेची ‘उत्तमच घडणार’ या प्रेरणेची ही गुढी आहे. मला तर वाटतं, या गुढीपाडव्याला गुढीचं प्रतीक विजयाचं असण्यापेक्षा निश्चयात्मक दृष्टीचं असेल. येणाऱ्या आरोग्यसमयाच्या स्वागताचं असेल.

परंपरेतील कथांचं सार घेऊन येणाऱ्या प्रतीकांना वर्तमानाचा ताजा संदर्भ मिळाला की ती अधिक अर्थवाही होतात. श्रीरामाच्या अयोध्या आगमनाचं निलंका विजयोत्सवाचं प्रतीक मानलेली रम्य गुढी यंदा एकात्मिक शिस्तीचं, सामाजिक ऐक्याचं आणि दडपणाऱ्या या युद्धजन्य काळातही आम्ही निर्धाराने विजयी होणारच या निश्चयभावनेनं प्रतीक होऊ शकेल. तरच या सुमंगल चिन्हाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बौद्धिक होऊ शकेल.

परमपूज्य साने गुरुजींचे या प्रतीकाबाबतचे विचार किती सुस्पष्ट होते हे ओघाने आठवलं. ते म्हणतात, ‘‘प्रत्येक संस्कृती काही प्रतीके निर्माण करते. फळात जसा सर्व वृक्षाचा विस्तार साठवलेला असतो, त्याचप्रमाणे प्रतीकात अनंत अर्थ साठवलेला असतो. प्रतीके म्हणजे संस्कृतीची सूत्रे होत.’’ हे चिंतन व्यक्त झाल्यावर पुढे परमपूज्य साने गुरुजी जे म्हणतात, ते मला आजच्या संदर्भात खूप महत्त्वाचे वाटते. ते म्हणतात, ‘‘मनच शेकडो कृतींतून प्रकट होते. आधी मन लवते, मग शिर लवते. आधी हृदय गहिवरते मग डोळे भरून येतात. मनाला फुटलेले कोंब म्हणजे क्रिया.’’
या वर्षीचा मनाचा हा कोंब विलक्षण सकारात्मक आत्मविश्वासाचाच हवा. तो विश्वास दुसऱ्यांमध्ये संक्रांत करण्याच्या जाणिवेचेही हवा. यंदाची वर्षप्रतिपदा ही त्या

माणूसपणाच्या करुणामय विस्ताराची सुरुवात असायला हवी.

गुढीपाडवा नि विजया दशमीला पाटीपूजन होत असे. अंकांची सरस्वती स्वच्छ पाटीवर अधिष्ठित होत असे. पुढे आपण कितीही शिकलो, ज्ञानात्मक विस्तारलो तरी मुळाक्षरे हीच त्या प्रवासाची अक्षरमुळे! मागच्या गुढीपाडव्याची एक गंमत आज सहज आठवली नि त्यातील नव्या पिढीची समज मनाला अंतर्मुख करून गेली.

पाटीपूजनाच्या बरोबरीने मोबाइलची पूजा दहा वर्षांच्या भाच्याने केलेली कळली. आधी हसू आलं, ते येतंच. पण इतकंही हसून चालणार नव्हतं, समजून घ्यायला हवं होतं. विचारल्यावर भाचा म्हणाला, ‘मीच नाही, आमच्या सोसायटीतील सर्वांनी मोबाइल देव्हाऱ्यात ठेवून पूजा केली. माझ्याकडे तरी आईच्या बालपणीची पाटी आहे. माझ्या मित्रांकडे तर तीही नाही.. आणि आता बघ मामा, ‘ऑनलाइन’ शाळेत मोबाइलच्या पाटीवर तर आम्ही लिहितो ना? हीच आमची पाटी नि लॅपटॉप- मोबाईल हीच शाळा ना? मग पूजा त्याच मोबाइलचीच करायची ना?

अवाक झालो! प्रतीक बदललं असेल पण हा कृतज्ञतेचा भाव महत्त्वाचा वाटतो.

प्रतीके बदलत तरी जातात, किंवा आपल्यातील सहृदय वैचारिक बळावर त्यांना नवा अर्थ द्यावा लागतो. नव्या पिढीचं नवं सांगणं, ‘हॅ! म्हणून दूर ठेवण्याचा कर्मठपणा करण्यापेक्षा तो समजून घेतला तर परंपरा ही केवळ परंपरा म्हणूनच जिवंत न राहता ती नवे प्रवाह घेऊन नदीप्रमाणे सखोल व समृद्ध होत अनंताकडे निघेल.’

म्हणूनच यंदाचा गुढीपाडवा प्रत्यक्ष गाठीभेटीचा नसेल पण गुढीला गुंफलेली गाठी- उद्याच्या गोड भेटीची नांदी ठरू शकेल. सण म्हणजेच एक सामाजिक समुपदेशनच. शब्दांशिवाय केलेलं! कहाण्या, रूपक यातून रुजलेलं, प्रतीकातून जिवंत राहिलेलं- पण समाजाला नव्या संदर्भाची नवी दृष्टी देणारं. माध्यमांनी या रूढीला नवा अन्वय देण्याची गरज आहे. मग हा केवळ ‘रुढी’पाडवा न राहता वसंतागमाचा ‘गुढीपाडवा’ होऊ शकेल.

गुढीपाडवा! नववर्षाचा मधुमासारंभ! ज्याला संत ज्ञानेश्वर महाराजांनी ऋतुपतीचे द्वार असे म्हटले नि पुढे केवळ या द्वारातच न थांबता लावण्याच्या फळभाराने लावलेली त्याची लाघवी रसमयताही व्यक्त केली.

जैसे ऋतुपतीचे द्वार। वनश्री निरंतर।
वोळगे फळभार। लावण्येसी।।
अशी प्रज्ञावंतांची प्रतिभा पल्लवित 
व्हावी असा हा चैत्रारंभ! ‘हे सामोरी समोर आम्ही नव्या जिण्याचा स्पर्श!’ असं बोरकरांच्या शब्दात व्यक्त होणारा हा चैत्रोत्सव!

वय कुठलेही असो आपापल्या 

उमेदीने क्षणाचा सण करण्याची प्रत्येकाची तऱ्हा निराळी. ‘हृदयच जेव्हा होते 

कोकीळ, जरठ वनांतहि फुले वसंत!’ 

अशी ऊर्जा चैत्रोत्सवात आहे. जीवनमरणाच्या नि संभ्रमाच्या आंदोल काळात एकमेकावरील प्रगाढ विश्वासाचा, मैत्रीचा, सुसंवादरूप सोबतीचा दिलासा हेच खरं तर नववर्षाचा हा पहिला दिन साजरा करणं आहे.

प्रतिकारक्षमतेची देह सुसज्ज करणारी एक लस बाहेरून आत दिली जात आहे, ते गरजेचेच, पण सजग निर्भरतेची, परस्परांवरील निरपेक्ष प्रेमाची जीवनसत्त्वे ‘ये हृदयीचे- ते हृदयी’च मिळणार आहे. ते एकमेकांना द्या. हे सांगणारा यंदाचा गुढीपाडवा प्रत्येक मनात संपन्न व्हायला हवा. काळ सर्वच स्तरांवर आव्हानाचा आहे. प्रलय काळ हा ‘मी मी, तू तू’ करण्याचा नसतो. ते करणारा एक चिमूटभर वर्ग असणारच. त्यांना जीवनाचे मोल नसते, म्हणून मरणाचे भयही नसते. ते वाद, श्रेय- अपश्रेय, संवाद- विसंवाद त्यांना करू द्यावे. परंतु समाजातला प्रचंड मोठा वर्ग, पुढची प्रकाशवाट रेखाटणार आहे.

बाहेर निसर्ग- आपल्या वृत्तीनुसार पल्लवीत होतोच आहे. कोकिळाने आपले कूजन, आंब्याने आपला मोहोर फुलवणे थांबवलेले नाही. वास्तवाचा सहज स्वीकार करतो तो निसर्ग! त्या निसर्गाकडूनच आत्मबळ घेऊन हा चैत्रोत्सव जागृतीचा मैत्रोत्सव करायचा आहे. ती एक सामाजिक साधना आहे. चैतन्याची ज्योत चैतन्यानेच तेवती ठेवणं, हेच सांगत यंदाची गुढी उभारली जाणार आहे. नात्यांच्या मैत्रोत्सवातून तोच दिलासा एकमेकांना द्यायचा आहे.

संबंधित बातम्या