आंबा, नारळीची लज्जत न्यारी 

प्रा. मीनल अनंत ओक
बुधवार, 28 मार्च 2018

कोकण कृषिप्रधान प्रांत आहे. येथील अनेकांचे शेती हे उदरनिर्वाहाचे व उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. कोकणचा जर सर्वांगीण विकास घडवून आणायचा असेल तर कृषी व निसर्गनिर्मित साधनसंपत्तीचा मेळ घातला पाहिजे. यासाठी कृषी पर्यटन संकल्पना शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अमलात आणली पाहिजे. आवश्‍यक त्या सुविधा वा पायाभूत घटक शेतीतूनच मिळू शकतात.

कोकणाला ७२० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. भगवान परशुरामांच्या अपरान्त भूमीमध्ये ४२ उत्तम प्रकारचे किनारे आहेत.  प्रत्येक किनाऱ्याचे सौंदर्य विविधतेने नटलेले आहे. सोनेरी, रुपेरी मऊशार वाळूचे समुद्र किनारे, लोभस पुळण, नद्या, खाडी, बंदरे, सुबक मंदिरे, पुरातन देवळे, मठ, स्मारक, समाधी स्थळ, गड, किल्ले, जलदुर्ग, गुहा, लेणी, पुरातन शिल्पकृती, गरम पाण्याची कुंडे, धबधबे, नारळी-पोफळीच्या बागा, ग्रामीण कला, अशा सर्व प्रकारची समृद्धी, जैवविविधता व नैसर्गिक संपत्ती कोकणात आहे. तरीही अपुऱ्या सोयीसुविधांमुळे पर्यटकांचा ओढा कमी आहे. पर्यटनाच्या बाबतीत कोकण खूपच दुर्लक्षित व असंघटित आहे. योग्य मार्गदर्शनाअभावी शेती अप्रगत आहे. त्याला कृषीपर्यटनाची जोड हा समृद्धीचा मार्ग ठरू शकतो. 

कृषी व पर्यटन या दोन व्यापक क्षेत्रांचा मेळ घालणे म्हणजे कृषी पर्यटन होय. कृषी पर्यटनामध्ये वेगळेपण आढळते. कृषी निवास, कृषी उद्योग, कृषी उत्पादन, प्रक्रिया अशा अनेक गोष्टींचा पर्यटन अनुभव व अनुभूतींशी संगम साधण्यात येतो. कृषी पर्यटन केंद्रामध्ये तेथील भौगोलिक परिस्थिती व निसर्ग समृद्धतेनुसार वैविध्य असू शकते. 

शाश्‍वत कृषी पर्यटनामध्ये प्रामुख्याने तीन गोष्टी समाविष्ट असाव्यात. 
पाहण्यासारखे काही असावे - यात ग्रामीण जीवनाचे, ग्रामीण संस्कृतीचे कलेच्या माध्यमातून सादरीकरण करणे, ग्रामीण लोककला, लोकगीत, लोकसंगीत, लोकनृत्य, लोकपरंपरा यांचे सादरीकरण करणे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मोहक फुलबाग, फळबाग, आमराई, हरितगृहे, मचाण, प्रक्रिया उद्योग तसेच आपल्या केंद्राचे सुशोभीकरण अशा अनेक गोष्टींचा समावेश करता येईल.  

पर्यटकांना आकर्षित करणारे काहीतरी असावे - कृषी निसर्गरम्य वातावरणात, शेतात पर्यटकांना राहण्यासाठी उत्तम सोयीसुविधा निर्माण करणे, पर्यटन केंद्राच्या आसपास नदी, खाडी,समुद्र अथवा धबधबा असेल तर वॉटर स्पोर्टस, वर्षा सहल, समुद्र सफारी, घोडा रपेट, घोडागाडी, स्कुबा डायव्हिंग इत्यादी. तसेच डोंगर, दरी, उंच कडे असतील तर साहसी व जंगल पर्यटन, पक्षी निरीक्षण यासारखे उपक्रम, त्याचबरोबर निसर्गोपचार केंद्राचाही समावेश करता येऊ शकतो. ग्रामीण पर्यटनामध्ये लहानपणी न खेळलेले किंवा खेळलेले पुन्हा खेळावेसे वाटणारे, तसेच गोट्या, विटीदांडू, लगोरी, आट्यापाट्या, सूरपारंब्या, पतंग उडवणे, ओढ्यावरची अंघोळ, तलावातील डुबक्‍या इत्यादी गोष्टींचा आनंद पर्यटकाला लुटता येऊ शकतो. अनेकविध नावीन्याची निर्मिती कृषी पर्यटनाच्या माध्यमातून होऊ शकते. शहरामध्ये सहज न मिळणाऱ्या गोष्टी आपण कृषी पर्यटन माध्यमातून देऊ शकतो. 

खरेदी करण्यासाठी काही असावे - स्थानिक खाद्यवस्तू, स्थानिक वैशिष्ट्य असलेल्या विविध वस्तू, जसे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाकडी खेळणी, ठाणे - पालघर जिल्ह्यांतील वारली पेंटिंग प्रसिद्ध आहेत. त्याप्रमाणे विविध खाद्यपदार्थ, ग्रामीण लोकांनी हातांनी बनवलेल्या वस्तू, पेंटिंग इत्यादी गोष्टी यामध्ये समाविष्ट करता येऊ शकतात. 

कृषी पर्यटनाला समन्वयित पाठिंबा हा आरोग्य पर्यटन, ग्रामीण पर्यटन, साहस पर्यटन, जंगल पर्यटन, निसर्ग भटकंती यांद्वारे मिळू शकतो. तसेच कोकणातील सण, उत्सव, महोत्सव, जत्रा या माध्यमातून ग्रामीण जीवनपद्धती, लोककला, संस्कृती याला पुनरुज्जीवन मिळेल; परंतु यासाठी सजग सादरीकरणाची, जाहिरातबाजीची आवश्‍यकता आहे. कृषिपूरक अशा अनेक गोष्टींचा यात समावेश होऊ शकतो. जेणेकरून पर्यटक त्या ठिकाणी जाऊन कृषी व ग्रामीण जीवनाचा अनुभव घेऊ शकतील, आनंद लुटू शकतील; परंतु हे सारे करत असताना अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे पर्यावरणीय समतोल सांभाळणे. जेणेकरून शाश्‍वत विकासाला गती मिळेल. कारण कृषी ही आपली संस्कृती आहे, पर्यटन आणि कलेच्या माध्यमातून तिचे दर्शन घडवताना तिचे संगोपन व जतनही झाले पाहिजे. 

कृषी पर्यटन या संकल्पनेला अद्याप शासनाचा अधिकृत दर्जा नाही. तसेच कृषी पर्यटन कसे असावे याबाबत शासनाची काहीही मार्गदर्शिका वा नियमावली नाही; तरीही कृषी पर्यटनाकडे सुशिक्षित व तरुण पिढी आकर्षित झाली तर आधुनिक ज्ञानाच्या आधारे पारंपरिक शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणे शक्‍य होईल. ज्यामुळे पर्यटकांमध्ये वाढ होऊन उत्पन्नही वाढेल. कोकणातील कृषी पर्यटन केंद्रांपुढील संधींचा आढावा घेतला तर केंद्रात समावेश करण्यासाठी खालील विविध व्यापक शाश्‍वत कृषी पर्यटनाच्या संधी आढळतात. 

कृषिपूरक पर्यटन मूल्याधिष्ठित सुविधा - फळबागा, फुलबागा, जैविक नर्सरी, भाजीपाला, धान्यशेती, मत्स्यशेती, खेकडा शेती, औषधी  वनस्पती लागवड, बांबू लागवड, जैवविविधता संवर्धन प्रकल्प, फळप्रक्रिया उद्योग, शेतीपूरक उद्योग, नारळाच्या झावळीपासून वस्तू, मधमाशी पालन, शेततळे, शेतबांध, शेती कचरा प्रकल्प, आधुनिक जलसिंचन सुविधा प्रकल्प, कुक्कुटपालन, गोशाळा, निरुपयोगी पाणी प्रकल्प, सेंद्रिय खत- शेती, गांडूळखत. 

विविध प्रकारच्या निवासी सोयी - तंबू, झोपड्या, मचाण, ट्री हाउस, हाऊसबोट इत्यादी पक्षीनिरीक्षण सोयी, पाळीव प्राणी, झोपाळे, घसरगुंडी, स्थानिक वस्तू, पेंटिंग, हस्तकला वस्तू विक्री केंद्र, ताजी भाजी फळविक्री, कोकणी खाद्यपदार्थ, लोककला, लोकगीत, लोकसंगीत, लोकनृत्य, लोकपरंपरा, संस्कृती, प्राचीन वस्तू, वास्तू यांचे प्रदर्शन आणि सादरीकरण, मनोरंजन-करमणुकीच्या गोष्टी, मोंगा पार्टी, बैलगाडी सफारी, घोडा रपेट, डॉल्फिन, क्रोकोडाईल सफारी, कासव महोत्सव, चिकू महोत्सव, आंबा महोत्सव, सण, जत्रा, प्रशिक्षण, सेमिनार, समुद्र किनाऱ्यावरील व इतर विविध खेळ, पोहण्याची सुविधा इत्यादी. अशा तऱ्हेने कृषी पर्यटन विकसित झाली तर शेतकऱ्याचा आर्थिक व सांस्कृतिक स्तर उंचावेल. त्याला सन्मान व प्रतिष्ठा मिळेल. 

कृषी पर्यटन केंद्र 
पर्यटनाच्या माध्यमातून मुख्यत्वे कृषी पर्यटनाचे विकासात्मक कार्य कोकण भूमी कृषी पर्यटन सहकारी संस्था, कोकण प्रांत करत आहेत. संस्था २००९ पासून काम करीत आहे. ७८ सदस्यांपैकी ४६ सदस्यांची कृषी पर्यटन केंद्रे सुरू आहेत. फलोद्यान, फळप्रक्रिया, वनौषधी, औद्योगिक प्रकल्प उभारणीसाठी आवश्‍यक माहिती, साधनांची उपलब्धता, प्रशिक्षण व मार्गदर्शन या संस्थेमार्फत केले जाते.

फोटो फीचर

संबंधित बातम्या