बहर उन्हाळ्यातला

राधिका बेहेरे        
गुरुवार, 10 मे 2018

कव्हर स्टोरी
माळरानावरचा बहरलेला गुलमोहर असो, रस्त्याच्या कडेचा पळस किंवा शहराच्या मध्यभागात फुललेला ताम्हण, स्वत:च्या लाल, पिवळ्या, निळ्या, केशरी रंगांनी उन्हाळ्यासारख्या तप्त ऋतूत रंग भरणाऱ्या वृक्षांविषयी...  

वैशाख महिना. उन्हाळ्याचा कहर. तळपता सूर्य, वाढते तापमान, शुष्क गरम हवा आणि पाण्याचे दुर्भिक्ष्य! या प्रतिकूल वातावरणातही काही वृक्ष-वेली फुलल्या आहेत. खोल जमिनीतून मिळालेलं पाणी नेटकेपणाने वापरून काही वृक्ष नखशिखांत बहरले आहेत. काहींनी त्यांचं ‘फुलणं’ चैत्रातच आटोपून, हिरवीगार सावली निर्माण केली आहे. काहींवर फळं पिकतात तर काहींनी जमिनीवर सुक्‍या पानांचे जाजम अंथरले आहे.

ज्या रखरखीत उन्हात आपण जाणं टाळतो त्या उन्हात हे वृक्ष पाय रोवून उभे असतात. एवढंच नाही तर पशू-पक्षी, किडा-मुंगी आणि सूक्ष्म जीवांसाठी ते निवारा आणि अन्न तयार करतात. आपल्या संस्कृतीत वृक्षांचा आदर, पूजा आहे ते काही उगीच नाही. साऱ्या जीवसृष्टीचे हे आधारस्तंभ आहेत. 

बहावा 
लिंबकांती बहावा फुलतो तो आताच. बहावा मूळचा भारतीय वृक्ष आहे. फक्त सुंदरच नाही तर औषधीदेखील आहे. भारतीय भाषांमध्ये याला वेगवेगळी समर्पक नावं आहेत. स्वर्णभूषणा, राजतरू, आरोग्याशिंबी, अमलताश अशी अनेक नावे असलेला इंडियन लॅबर्नम म्हणजेच बहावा खऱ्या पाश्‍चात्त लॅबर्नमपेक्षा अधिक सुंदर तर आहेच पण सुवासिकही आहे.

याचे शास्त्रीय नाव कॅशिया फिस्टुला शंकासूर, टाकळा वगैरेच्या कुलातला हा वृक्ष इतर वेळी अगदी सुमार दिसतो. याची संयुक्त पानं इतर कॅशियांसारखी नाजूक टिकल्यांची नाहीत. फांद्यांची ठेवणही बाकदार आकर्षक नाही. शिवाय लांब नळीसारख्या बंगळूर शेंगा यावर लटकत असतात. पानगळ झालेल्या बहाव्याकडे तर पहावत नाही. पण उन्हाळा जसा वाढतो तसं या कुरूप वेड्याचं राजहंसात रूपांतर होतं. 

मोठे मोठे फुल झेले यावरून झुंबरासारखे झुलू लागतात. फुलकळ्यांचे हे लोंबते घोस पाहात राहावे असे असतात. पोपटी आणि पिवळ्या रंगाची सुंदर रंगसंगती गोल गरगरीत कळ्या आणि गळून पडलेल्या पाकळ्या, केसरांचा सडा, केसर तरी कसे? वेलांटीदार!

दृष्टी निवेल असा शांत हिरवा - पिवळा रंग, आणि नितांत सुंदर लोंबती पुष्परचना, यामुळे बहावा एक अतिशय सुंदर भारतीय वृक्ष ठरला आहे.

बहाव्याची फुलं वन्यजीव खातात. आपणही या फुलांचा गुलकंद करू शकतो. हा औषधी गुलकंद तापनाशक आणि थंडावा देणारा आहे. शेंगा, बिया, पानं, मूळ, खोड अशा सर्व भागांचे औषधी उपयोग आहेत. हा पानगळीचा वृक्ष जंगलातही आढळतो. पण त्याच्या रुपवान बहरामुळे शहरातही त्याची लागवड होते. बियांपासून रोपे करता येतात. रोपवाटिकांमध्ये तयार रोपे मिळतात.

कॉपर पॉड
वाढत्या उन्हाच्या या रखरखीत दिवसात सोनेरी पिवळ्या फुलांचा कॉपरपॉडही भरभरून फुलतो. बहाव्याच्याच शिंबा कुळातला हा वृक्ष मूळ श्रीलंकेचा म्हणूनच की काय सुवर्णफुलांचा हा वसा त्याला माहेरघरातूनच मिळाला आहे.

निष्पर्ण होऊन फुलणं याला पसंत नाही. आज या वृक्षांवर पानाफुलांची दुहेरी शोभा आहे. शिंबा कुळाची खूण म्हणून नाजूक संयुक्त पानं आणि सोन्याच्या लंकेची खास सुवर्णकांती फुलं. या फुलांचा रंग हळदी पिवळा आहे आणि त्याला ताम्रवर्णाची डूब आहे. पानांचे देठ, फुलांचा तळभाग आणि शेंगा अगदी तांब्याच्या रंगाच्या आहेत, म्हणूनच याचं नाव आहे कॉपरपॉड.

गडद हिरव्या रंगाच्या पानांनी याच्या फांद्या सजल्या आहेत. कडुनिंब, करंज यासारखे नसले तरी विरळ सावलीचे छत्र या पाहुण्या वृक्षानेही उभारले आहे.

फांदीच्या टोका-टोकावर तांबूस पिवळ्या फुलांचे अगणित तुरे आहेत. रोज असंख्य फुले फुलतात आणि दुसऱ्या दिवशी गळून पडतात. वृक्षाखाली या फुलांचे गालिचे अंथरले जातात. या गळत्या फुलांचा पसारा कितीही आवरला तरी पुन्हा पखरण होतच राहते. डाळिंबाच्या पाकळ्या किंवा तामण फुलांच्या पाकळ्यांसारखी नाजूक झालर किंवा चूर्ण या सोनफुलांनाही असते.

फुले गळतात असे आपण म्हणतो. पण ते तितकेसे खरे नाही. गळतात ते फुलांचे अनावश्‍यक भाग. फलधारणा झालेले स्त्रीकेसर वृक्षावरच वाढत असतात. यथावकाश फांदीच्या टोकावर ताम्रवर्णी फळे उभी राहतात. कॉपरपॉडच्या फुलांचे तुरे आणि अगदी आटोपशीर आकाराची फळे दोन्हीही मान उंचावून ताठ उभे असतात, ढाल घेतलेल्या सैनिकासारखे ! कॉपरपॉडचे शास्त्रीय नाव आहे पेल्टोफोरम या ग्रीक शब्दाचा अर्थ आहे शील्ड धारण करणारा. या वृक्षाच्या बिया लवकर रुजतात व रोपे होतात. रस्त्याच्या कडेने असे बरेच वृक्ष आज दिसतात कारण सुंदर फुलांचा हा पाहुणा सावलीही देतो.

प्राइड ऑफ इंडिया
उन्हाळ्याच्या ऐन कहरात वृक्षांचे किती वेगवेगळे आविष्कार दिसतात! काही पूर्ण निष्पर्ण होऊन सोशिकपणे पावसाळ्याची वाट पाहतात. काहींची चैत्र पालवी आता गडद हिरवी होते. पांतस्थांना सावली देण्याचं काम हे जबाबदारीनं करतात. काहींची फळे उकलून बिया उधळण्याचा कार्यक्रम चालतो. काही वृक्ष मात्र आताच बहरतात. स्वतःच्या फुलण्यात दंग झालेल्या अशा वृक्षांना जणू उन्हाळा जाणवतच नाही. ‘प्राइड ऑफ इंडिया’ किंवा ’तामण’ किंवा ‘जारुल’ हा असाच एक देखणा वृक्ष. याचे शास्त्रीय नाव लॅंगरस्ट्रोमिया. शास्त्रज्ञ लिनायसने कामात मदत करणाऱ्या मित्राचे नाव या वृक्षाला दिले आहे. डाळिंब आणि मेंदीच्या लिथ्रॅसी कुलातला हा छोटेखानी वृक्ष आहे.

एप्रिलमध्ये याला पाने आणि कळ्यांचे गुच्छ एकदमच येतात. पानं गडद होत जातात आणि कळ्या उमलायला लागतात. अगदी तेजस्वी जांभळ्या रंगाचे हे फुलझेले हिरव्या पानांच्या महिरपीत फार सुंदर दिसतात. फुलांची रचना अगदी डाळिंब फुलासारखी असते. नाजूक देठांच्या विलग पाकळ्यांच्या मध्यात पुष्पकोषाची ठळक चांदणी असते. त्यात बऱ्याच पुंकेसरांच्या मध्यभागी दिसतो स्त्रीकेसराचा शेंडा. पाकळ्या अगदी झिरमिरीत शिफॉन पोताच्या असतात. फुलांनंतर येणारी फळे लहानशा करंड्यासारखी दिसतात. हे करंडे पुढे खूप दिवस वृक्षावर असतात. करंडे उघडतात आणि त्यातून लहान चपट्या पंखाच्या बिया वाऱ्यावर तरंगत जातात. नेत्रसुखद बहर, अनेक औषधी उपयोग आणि टणक टिकाऊ लाकूड देणारा असा हा त्रिगुणी वृक्ष आहे. लॅंगरस्ट्रोमिया हे महाराष्ट्राचे प्रतीक पुष्प आहे. बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाची योजकता पहा; अगदी महाराष्ट्र दिनाच्या सुमारासच याचा बहर पूर्णत्वास जातो.

नीलमोहर-जकारंदा
जकारंदा हा पाहुणा वृक्ष आता इथलाच झाला आहे. तसा तो मूळचा ब्राझीलचा. तिथल्या लोकांनी दिलेले नावच शास्त्रीय नाव म्हणून मान्यता पावले. अनेक रंगारंग फुले असणारे बिगनोनियासी हे याचे कुल. उन्हाळ्यात फुलणाऱ्या या वृक्षांचा बांधा अगदी सडपातळ. याच्या फांद्या सरळ उंच - उंच वाढतात. नाजूक संयुक्त पानांच्या पर्णिका इवल्याशा. त्यामुळे वृक्षाखाली नक्षीदार कवडशांची जाळी असते.

चढत्या उन्हाळ्यात प्रत्येक फांदीच्या शेंड्याला फूट - दोन फूट लांबीचे मोठ्ठाले फुलांचे घोस येतात. फुलांचा रंग जांभळा. पण आपुलकीने याला नीलमोहर असं म्हणतात. निखळ निळा रंग असलेली फुले तशी कमीच असतात. एकतर गुलाबीसर जांभळा किंवा निळसर जांभळा असे रंग असतात. पण चक्क काळ्या रंगालाही मेघश्‍याम, सावळा असं म्हणणारे आपण याला प्रेमाने नीलमोहर म्हणतो.

फुलांच्या झेल्यात असंख्य पेलेदार फुलं असतात. शेंड्याला आणखी कळ्याही असतात. परागीभवनानंतर फुलांचे पेले गळून पडतात आणि या शेलाट्या वृक्षाखाली त्यांची रांगोळी उमटते.

बत्ताशाच्या आकाराची पण लाकडी पोताची तुरळक फळे याला येतात. ही फुगीर तबकडीसारखी फुले वाळल्यावर उकलतात आणि आतून पातळ पंख असलेल्या बिया वाऱ्यावर तरंगत प्रवासाला निघतात.

जकारंदाची रोपे बिया रुजवूनही करता येतात पण फांदी रोवून वृक्ष वाढविणे अधिक सोयीचे. यांच्या रंगीत फुलांना गंध नाही. पण याचे लाकूड काहीसे सुगंधी असते व त्यावर फिकट जांभळ्या रेषाही असतात. हा सुंदर वृक्ष सावली देत नाही. पण मोठ्या रस्त्यांच्यामध्ये डिव्हायडरवर लावला तर वाहतुकीला अडथळा येणार नाही. दिवसभर आग ओकणारा सूर्य मवाळ होऊन क्षितिजापाशी पोहोचला असावा. पक्षी उत्साहाने किलबिल करून दिवसाची सांगता करत असावेत. ऊन नाही पण उजेड आहे असा हा संधिकाल. रंगीत फुले हळुवार मिटत असताना आणि शुभ्र सुगंधी फुलांच्या पाकळ्या उमलत असताना दिसावा जकारंदाचा फुलोरा! जणू नितळ जलाशयाचा, निरभ्र आकाशाचा रंग या फुलांत सामावला आहे, असं वाटतं आणि आपले डोळे निवतात.

सीतेचा अशोक
हा एक प्राचीन सदाहरित भारतीय वृक्ष आहे. शास्त्रीय नाव आहे ‘सराका इंडिका’ आणि ‘कुलआहे शिंबा’ म्हणजेच ‘फॅबॅसी’. बहावा, शंकासूर, चिंच, गुलमोहर हे सगळे याच कुलातले वृक्ष. मध्यम आकाराचा हा वृक्ष आपल्या घनदाट पालवीने वर्षभर छाया देतो. याची संयुक्त पाने चांगली फूटभर लांबीची असतात व त्यात पर्णिकांच्या चार-सहा जोड्या असतात. अशोकाची कोवळी पालवी फार सुंदर असते. ही ताम्रवर्णी पालवी लोंबती असते. जणू रेशमाची लड उलगडावी तशी ही पालवी हिरव्यागार पर्णराजीवर ठिकठिकाणी झुलत असते. त्यामुळे या वृक्षाला ताम्रपणी असेही नाव आहे.

सीतेच्या अशोकाला वर्षभर तुरळक फुले येतात पण मोठा बहर येतो तो उन्हाळ्यातच ! लाल-केशरी फुलांचे याचे सुगंधी गुच्छ काहीसे इक्‍झोराच्या फुलांसारखे दिसतात. पण अशोकाच्या फुलांचा विशेष म्हणजे यांना पाकळ्याच नसतात. पाकळ्यांचे काम करण्यासाठी फुलाचा पुष्पकोश सिद्ध होतो. चार दलांचा हा पुष्पकोश रंगीत होतो आणि परागीभवनास मदत करतो. तंतूसारखे रंगीत पुंकेसर फुलातून बाहेर झेपावतात. फुले सुरवातीला केशरी व नंतर गडद लाल होतात. अशोकाच्या शेंगाही आधी लालसर असतात. जाड सालीच्या शेंगेत चार-सहा बिया असतात. बिया पडून वृक्षाच्या पायाशीच नवीन रोपे उगवून दाटी होताना दिसते. निसर्गात असेच आपोआप अशोक-वन होत असणार!

सीतेच्या अशोकाचे विशेषतः सालीचे व फुलांचे औषधी उपयोग आहेत. पण त्यापेक्षाही या वृक्षाच्या कथा व आख्यायिका खूप आहेत. हा वृक्ष आदरणीय, पूजनीय आहे. चैत्रात याची पूजा करावी असा संकेत आहे. लंकेत रावणाच्या बंदिवासात सीतेला आश्रय देणारा; म्हणून हा सीतेचा अशोक! त्यामुळेच बहुधा हा पावित्र्य राखणारा वृक्ष मानला जातो. गौतमबुद्धाचा जन्म या वृक्षाखाली झाला असंही काही ग्रंथामध्ये नमूद केलं आहे. संस्कृत काव्यात याला एक अतिशय संवेदनशील वृक्ष मानतात. सुंदर युवतीच्या स्पर्शाने (लत्ता प्रहासने) हा वृक्ष बहरतो असेही उल्लेख आहेत. हा सुंदर, सुगंधी अनोखा वृक्ष सध्या फुलला आहे.

करंज 
कडू करंज हा मूळचा इथलाच रहिवासी. आशिया खंडातील बऱ्याच देशांत हा आपोआप रुजतो व वाढतो. याचे शास्त्रीय नाव मिल्लोशिया पिन्नाटा किंवा पोंगॅमिया असं आहे. मटार, घेवडा, पळस, हादगा यांच्या कुळातला हा वृक्ष अतिशय गुणी आहे. करंजाच्या फांद्या सर्व दिशांनी पसरतात आणि गच्च, हिरव्यागार सावलीची छत्रीच तयार करतात. ग्रीष्म ऋतूत उष्मा शिगेला पोहोचला असताना या वृक्षाची सावली फार मोलाची असते. करंजाची पाने गडद हिरवी आणि संयुक्त असतात. मोठ्या पर्णिकांच्या आडून लहान लहान फुलांचे घोस डोकावताना दिसतात. वृक्षाखाली या फुलांची बरसात होतच असते. या फुलांचा सुगंधदेखील काही वेगळाच ! हा गंध किंचित कडू, थोडा औषधी आणि तरीही हवासा वाटणारा असा आहे. पोंगमियाची फुले अगदी लहान. पांढरा गुलाबी आणि किंचित जांभळा छटा यावर असते. पुष्पकोषाची चिमुकली कुपी आणि त्यावर इवलेसे पाकळ्यांचे फुलपाखरू. कळीसारखी बंद असणारी ही फुलं गळतात तेव्हा मोतीच टपटपत आहेत, असं वाटतं. शिंबा कुलातल्या करंजाची शेंगही अगदी लहान, भातुकलीतल्या करंजीसारखी असते. त्यात एकच ठसठशीत बी असते.

करंजाची मुळे जमिनीत सर्वत्र जाऊन मिळेल तेथून पाणी शोषून घेतात. त्यामुळे कमी पावसाच्या दुष्काळी भागातही करंज वाढू शकतो. ही मुळे साधी नाहीत तर गाठीची मुळे आहेत. त्यामुळे जमिनीतील नत्र वाढते, कस वाढतो. ही मुळे माती घट्ट धरून ठेवतात. जमिनीची धूप होऊ देत नाहीत. विशेष म्हणजे दुष्काळातही यशस्वी असणारा करंज, पाण्यात बुडाला (काही महिने) तरीही वेळ निभावून नेतो आणि पाणी ओसरले की पुन्हा याचे सावली देण्याचे आणि फुलण्याचे कार्य सुरू होते. करंजाचे तेल औषधी असते. यात जंतुनाशक गुण असतात. अनेक त्वचारोगांवर हे तेल गुणकारी आहे. जैवइंधन म्हणूनही या तेलाचा उपयोग होतो. आयुर्वेदात करंजाचे औषधी उपयोग दिले आहेत. करंजामध्ये इतके गुण सामावले आहेत की हा निसर्गाचा एक चमत्कारच वाटतो. पु. ल. देशपांडेंच्या ‘नारायण’सारखे करंज अंगावर पडेल ते काम करतो. माती - जमीन धरून ठेवायची आहे? करंजाला सांगा. जमिनीची सुपीकता वाढवायची आहे? करंज वाढवेल. दिवलीसाठी तेल हवंय? करंजाकडे आहे. उपद्रवी कीटकांचा बंदोबस्त, करंज करेल. काही काळ पाणी साठून राहातंय? करंजाला चालेल. औषध हवंय? करंज देईल. रखरखीत उन्हाळ्यात आसरा हवाय का माणसांना, जनावरांना, पक्ष्यांना हिरवागार सुगंधी मांडव घालत सावली देण्यासाठी करंज सज्ज आहे.

फ्लॅमबॉयन्ट गुलमोहर 
वृक्ष परिसराचे नेपथ्य करतात. त्यांना स्वतःचे एक व्यक्तिमत्त्व असते. पानगळती. वाऱ्याबरोबर होणारा गळत्या पानांचा शिडकावा. निष्पर्ण, स्तब्ध, ध्यानस्थ वृक्ष. कळ्यांनी डंवरलेले हसरे वृक्ष. नवी पालवी धारण केलेल्या वृक्षाची कोवळीक. फुलणाऱ्या वृक्षांचा उन्मेष. टपटपणाऱ्या फुलांचा प्रसन्न गालिचा. फळभारानं लवलेल्या वृक्षांची समृद्धी. एखाद्या परिसराची शांतता, गांभीर्य, सुखसमृद्धी, वैराग्य हे सगळं जाणवतं ते सभोवतालच्या वृक्षांमुळेच. गुलमोहर जेव्हा फुलतो तेव्हा सारा परिसर श्रीमंत होऊन जातो. फुलतो तरी कधी तर उन्हाळ्याच्या शेवटी शेवटी आणि अशा दिमाखात फुलतो की त्यापुढे सारे वृक्ष फुकट-पुसट होऊन जातात. 

गुल म्हणजे फूल. मयुरासारख्या लवचिक बाकदार फांद्यांचा पिसारा असणारा म्हणून हा गुलमोर - गुलमोहर. पिकॉक फ्लॉवर, मयूरम अशी सार्थ नावं असणारा गुलमोहर मूळ बहुधा मादागास्करचा. पण तिथेही आता निसर्गात, जंगलात गुलमोहर सापडत नाही म्हणे. याचे शास्त्रीय नाव डेलोनिक्‍स रेजिया आहे.

पिसासारखी सुंदर, नाजूक टिकल्यांची संयुक्त पानं आणि विरळ लवचिक फांद्यांची पसरट छत्री असते गुलमोहराची. बुंध्याच्या तळात जास्तीचा आधार देण्यासाठी खास पाखे असतात. मुळांची वाढ ही जमिनीत पसरच असते. ही मुळे फार खोल जात नाहीत.

वसंतात जेव्हा पळस, पांगारा फुलतात आणि शेवटी लाल टपोरी फुल लेवून पक्ष्यांसाठी अन्नछत्र उघडते तेव्हा गुलमोहर निष्पर्ण असतो. बेढब काळपट शेंगा याच्या किडकिडीत फांद्यांवर लोंबत असतात. पण सगळ्या लाल केशरी वृक्षांचं बहरणं ओसरल्यावर मे महिन्यात ऐन ग्रीष्मात, चटकदार लाल रंगाच्या फुलांनी गुलमोहर असा बहरतो की या सम हाच. 

तबकात फुलं लावावीत तसा पसरता गुच्छ असतो गुलमोहराचा. त्यात लहान हिरव्या कळ्या, टपोरलेल्या, आता फुलणारच अशा कळ्या आणि पूर्ण उमललेल्या फुलांची ऐसपैस मांडणी असते. आतून लाल आणि बाहेरून हिरवा असा पुष्पकोश, लांब देठाच्या पाच पाकल्या. त्यातही एक पांढऱ्या - पिवळ्या ठिपक्‍यांची दळदार राजा पाकळी. लालेलाल रंगाचे फुलातून उसळी घेणारे केसर आणि मध्यभागी सूक्ष्म शेंगेसारखा स्त्रीकेसर. अगदी खास शिंबा (फॅगॅसी) कुलातल्या फुलाचीच रचना.

तसा हा मुलांचा आवडता वृक्ष. चिंच फुलांसारख्या याच्याही पाकळ्या लांबट चवीच्या असतात. शिवाय याच्या मोठ्या शेंगा लुटूपुटूच्या लढाईत वापरता येतात. बुंध्याच्या पारंब्यांना छान टेकून बसता येतं. मुलं रमतात गुलमोहराखाली. मोठ्यांना तर याच्या रूपाची भूलच पडते. अंगणात एखादा गुलमोहर लावून शिवाय घरालाही याचंच नाव देतात. असे कितीतरी गुलमोहर (नावाची घरं, इमारती) प्रत्येक शहरात सापडतात. या पाहुण्या वृक्षाला सुवास नाही. म्हणावी अशी सावलीही नाही. याच्या खाली जमिनीत इतर काही वाढत नाही. हे सगळं मान्य करूनही हा एक सुंदर वृक्ष आहे.

नुकता फुलू लागलेला निष्पर्ण वृक्ष, पूर्ण बहरातील दिमाखदार वृक्ष, प्रखर उन्हात झळाळणारा आणि ढगाआड हवेत दिसणारं याचं मोहक रूप. सारंच सुंदर असतं.

पावसाच्या आगमनानं याची फुलं विझत जातात आणि वृक्ष पोपटी हिरव्या पानांनी भरून जातो. उन्हाळ्यातील बहरांची ही आरास आणखी कितीतरी वृक्ष वेलींवर आहे. सोनचाफा फुललाय. उत्सवी सुगंधाचा दरवळ वृक्षाला वेढून आहे. सुवासिक पाकळ्यांच्या सड्यामुळे अंगण सुशोभित झालं आहे. कैलाशपतीच्या दणकट खोडावर लाल पिवळ्या फुलांचे गेंद आहेत. तीव्र सुवासाचे निःश्‍वास त्यातून निसटत आहेत. लहान - लहान बकुळ फुलांचा वर्षाव सुरू आहे. दीर्घकाळ टिकणाऱ्या या सुगंधाने आसमंत भरला आहे. लाल-पांढरा-जांभळ्या रंगांचा साज लेवून साधी बोगनवेलही नखशिखांत नटली आहे. फुलांचे गालिचे, सुगंधाची पाखरण, रंगांची आतषबाजी कितीही पाहिले आणि वर्णन केले तरी कमीच आहे. 

फोटो फीचर

संबंधित बातम्या