ग्रामसंस्कृतीचे केंद्र 

राजकुमार चौगुले
बुधवार, 28 मार्च 2018

कोल्हापूरपासून बारा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कणेरी गावातील सिद्धगिरी मठ हा ग्रामसंस्कृतीचे केंद्र बनला आहे. ही संस्कृती जपण्यासाठी अत्यंत प्रभावीपणे काम करून मठाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. ग्रामसंस्कृतीबरोबर सेंद्रिय शेतीचे वैविध्य पाहायचे झाले, तर या मठाला भेट द्यायलाच हवी. 

ग्रामजीवनाचा अस्सल आनंद आणि लोप पावत चाललेल्या कला यांचे माहेरघर म्हणून कणेरी (ता. करवीर) या गावातील सिद्धगिरी मठाकडे पाहिले जाते. दोनशेहून अधिक एकर क्षेत्रावर हा मठ विस्तारला आहे. मठ म्हटले, की आपल्या डोळ्यापुढे येतात ते धार्मिक विधी, पूजा-अर्चा आदी प्रकार. पण कणेरी मठ हा मठाच्या प्रचलित व्याख्येपासून खूपच वेगळा आहे. विविध प्रकारच्या ग्रामजीवनाची झलक तर इथे पाहावयास मिळतेच; पण सेंद्रिय शेतीबाबत अनोख्या पद्‌धतींचे संशोधन येथे केले जाते. बऱ्याचदा अनेक मठांची शेती असते; पण तिथे प्रयोग होत नाहीत; मात्र कणेरी मठ ही सेंद्रिय शेतीची राष्ट्रीय प्रयोगशाळाच म्हणावी लागेल. सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून सुखी जीवन जगण्याचा मंत्र येथे मिळतो. अगदी छोट्या पिकातूनही कसा आनंद मिळवावा, कोणत्याही रासायनिक अंशाशिवाय कशी शेती करावी हे पाहायचे असेल तर पश्‍चिम महाराष्ट्रात तरी कणेरी मठासारखे दुसरे ठिकाण नसेल. राष्ट्रीय कृषी संशोधन संस्थेचे अनेक शास्त्रज्ञ कणेरी मठाची शेती पाहावयास येतात. मठाच्या माध्यमातून होणारे वेगवेगळे प्रयोग देशाला मार्गदर्शक ठरत असल्याचे केंद्रीय मंत्र्यांबरोबरच अधिकाऱ्यांनीही मान्य केले आहे. श्री काडसिद्धेश्‍वर महाराज या उच्च्चशिक्षित मठाधिपतींकडे या मठाचे नेतृत्व आहे. मठातील सर्व कामे त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखालीच चालतात. मठामध्ये काय काय राबविता येईल यासाठी श्री काडसिद्धेश्‍वर देशभराचा दौरा करुन सेंद्रिय शेतीबाबत ज्या ज्या नावीन्यपूर्ण बाबी आहेत त्यांचा अभ्यास करतात. 

काय पाहाल
सिद्धगिरी म्युझियम
बारा बलुतेदार ही समाजव्यवस्था आजही अनेक खेड्यांमध्ये पाहायला मिळते. या व्यवस्थेनुसार आज फारसे काम चालत नसले; तरी ही बलुतेदारी म्हणजे काय ? तसेच त्यावर चालणारा उदरनिर्वाह याची ओळख करून देणारी शिल्पे इथे पाहायला मिळतात. प्रत्येक शिल्प जिवंत वाटावे, इतकी जबरदस्त कारागिरी शिल्पकारांनी केलेली आहे. हे म्युझियम पाहताना जणू आपण जिवंत कारागिरांच्या घरीच जाऊन पाहतोय, असा भास होतो. चांभार, लोहार, न्हावी, कोष्टी, कुंभार, शिंपी, सोनार यांसह वासुदेव, पिंगळा यांची शिल्पेही त्या त्या जीवनशैलीचे दर्शन घडवितात. ग्रामीण भागात असणाऱ्या विविध घरांचे सुंदर नमुनेही इथे पाहायला मिळतात. वतनदाराचा वाडा, पाटलाचा वाडा, शिंप्याचे घर यांच्या हुबेहूब प्रतिकृती इथे तयार करण्यात आल्या आहेत. याशिवाय शेतातील घराच्या प्रतिकृतीही विलोभनीय आहेत. म्युझियम पाहण्याच्या सुमारे एक तासाच्या या कालावधीत आपण जणू जुन्या काळातच गेल्याचा आभास होतो. 

‘लखपती’ शेतीतून स्वयंपूर्णता
कणेरी मठ हा जसा ग्रामसंस्कृती जपण्यासाठी प्रसिद्ध आहे. किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त तो शेतीच्या प्रयोगासाठी प्रसिद्ध आहे. एका एकरात दीडशे पिके घेऊन स्वयंपूर्णतेचा संदेश देणारी लखपती शेती, ही मठाचे आणखीन एक आकर्षण आहे. एका एकरात विविध प्रकारची सुमारे दीडशे पिके निरंतर घेऊन मठाने शेतकऱ्यांना एक नवा संदेश दिला आहे. शेतीच्या प्रत्येक भागाचे पद्धतशीर नियोजन करून त्यामध्ये नगदी पिके, मसाला पिके, कडधान्ये, तृणधान्ये, भाजीपाला आदींसह विविध प्रकारच्या फुलांची नावीन्यपूर्ण लागवड केली आहे. विशेष म्हणजे याचे सर्व व्यवस्थापन हे सेंद्रिय पद्धतीने केले जाते. गेल्या तीन वर्षांपासून मठांच्या सेवेकऱ्यांमार्फत या शेतीची जोपासना केली जाते आहे. 

देशी गायींचा गोठा
मठाचे व्यवस्थापन हे सेंद्रिय शेतीला प्राधान्य देऊन केले जाते. मठाने देशभरात आढळणाऱ्या दुर्मिळ देशी गायींचा संग्रह म्हणून सुमारे दोनशे देशी गायींचा गोठा उभारला आहे. देशभरातील दुर्मिळ असणाऱ्या, मानवी आरोग्यासाठी हितकारक ठरणाऱ्या अनेक प्रजातींच्या गायींची जोपासना मठाच्या वतीने करण्यात आली आहे. या गायींच्या माध्यमातून उपपदार्थ तयार करून या पदार्थांची सर्वदूर विक्री केली जाते. विशेष म्हणजे कणेरी मठात तयार होणाऱ्या पदार्थांना वर्षभर मागणी असते.

बारा बलुतेदारांचे विद्यापीठ 
मठाच्या वतीने एक किंवा दोन वर्षांनंतर ग्रामसंस्कृती महोत्सव घेण्यात येतात. यामध्ये ग्रामीण कलागुणांना वाव दिला जातो. आज यांत्रिकीकरणाच्या युगात बारा बलुतेदारी कला संपुष्टात येत आहे. ती जोपासण्याचे काम मठाने नुकतेच सुुरू केले आहे. देशभरातील बारा बलुतेदारांची कला येथे शिकविण्यात येत आहे. अगदी नाममात्र शुल्क आकारून ही कला शिकविली जात आहे. या कलांची कारागिरी शिकविणाऱ्या प्रशिक्षकांचे देशभरातून पाचारण करण्यात येते. मनुष्याच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मठाच्या पुढाकाराने सुरू होणारे हे बारा बलुतेदारांचे विद्यापीठ आहे.

फोटो फीचर

संबंधित बातम्या