न पाहिलेली रत्नागिरी

राजेश शेळके
बुधवार, 28 मार्च 2018

प्राचीन संस्कृतीच्या पाऊलखुणा असलेल्या कातळशिल्पांचे संवर्धन, भगवती किल्ल्याजवळ उभारण्यात येणाऱ्या नऊ जलदुर्गांच्या प्रतिकृतींचा देशातील पहिला प्रकल्प, मिऱ्या येथील स्कुबा डायव्हिंग, रत्नदुर्ग येथील गुहेचा थरार आदी नव्या पर्यटन स्थळांचा रत्नागिरी जिल्ह्यात उदय झाला आहे. याविषयी...

कोकण ही निसर्गसौंदर्याची खाण आहे, निसर्गाने कोकणाला भरभरून सृष्टिसौंदर्य दिले आहे, असे शब्द आता गुळगुळीत झाले आहेत. वर्षा ऋतूमध्ये हिरवा शालू पांघरलेले डोंगर, दरी-कपाऱ्यांमधून वाटा काढत खळाळणारे धबधबे, वेड्यावाकड्या नद्या, विस्तीर्ण समुद्रकिनारे, सुपारी-नारळाची डौलदार झाडे, त्यामधील टुमदार घरे, ऐतिहासिक किल्ले, मंदिरे, पर्यटनस्थळे, आंबा, काजूच्या बागा, पोखरलेल्या डोंगरातून धावणारी रेल्वे, वळणदार रस्ते आदींमुळे कोकणचे निसर्गसौंदर्य पर्यटकांना साद घालणे स्वाभाविक आहे. निसर्गाच्या आविष्काराचे पर्यटन विकासामध्ये परिवर्तन करण्यात मात्र शासकीय आणि खासगी यंत्रणांना अजून यश आलेले नाही. गोवा किंवा केरळप्रमाणे विस्तीर्ण आणि स्वच्छ समुद्रकिनारे रत्नागिरी जिल्ह्यात आहेत. मात्र रस्त्यांसह पायाभूत सुविधांची वानवा असल्याने गोव्याप्रमाणे या किनाऱ्यांचा विकासच झालेला नाही. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि मेरीटाईम बोर्ड आदींच्या पुढाकारामुळे किनारे स्वच्छ होऊ लागले आहेत. ग्रामीण पर्यटन विकासाच्या माध्यमातून बीच पर्यटनालाही चालना देण्याचे काम सुरू आहे.

पर्यटनातून जिल्ह्याला आर्थिक सुबत्ता मिळवून देण्याची ताकद नव्याने उदयास येणाऱ्या काही पर्यटन स्थळांमध्ये आहे. माचाळ, कातळशिल्प, किल्ल्यांच्या प्रतिकृती, स्कुबा डायव्हिंग, गुहा आदींचा यामध्ये समावेश आहे. लांजा तालुक्‍यातील माचाळ हे हिलस्टेशन म्हणून उदयास येण्यास तयार आहे. मिनी महाबळेश्‍वर म्हणून त्याकडे पाहिले जाते. राज्याच्या अर्थसंकल्पात माचाळच्या पर्यटन विकासासाठी आर्थिक तरतूद केली आहे. काही भागापर्यंतच रस्ता झाला आहे. नाहीतर इतके दिवस पर्यटकांना अरुंद पायवाटेनेच जावे लागते. माचाळचा सर्वांगीण विकास झाल्यास हिलस्टेशन म्हणून ते नक्कीच नावारूपाला येईल. जिल्ह्यात दहा हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन संस्कृतीच्या खुणा असलेली कातळशिल्पे आढळून आली आहेत. शासनाने त्यासाठी २४ कोटींची आर्थिक तरतूद केली आहे. कातळशिल्पांचे योग्य संवर्धन झाल्यास अनेक देश, विदेशी पर्यटक आकर्षित होण्यास मदत होणार आहे.    

गोवा किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पर्यटकांचे मुख्य आकर्षण हे स्कुबा डायव्हिंग आहे. समुद्र जीवसृष्टी जवळून न्याहाळण्याचा आनंद पर्यटकांना समुद्रतळाशी जाऊन घेता येतो. रत्नागिरीतील मिऱ्या-पाटीलवाडी येथील स्थानिक तरुणांनी खासगी तत्त्वावर स्कुबा डायव्हिंग प्रकल्प राबविला आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक पर्यटक रत्नागिरीत येऊन समुद्र जीवसृष्टीचा मनमुराद आनंद लुटत आहे. रत्नागिरी पालिकेने सलग दुसऱ्या वर्षी पर्यटन महोत्सवाचे नियोजन केले आहे. पर्यटन महोत्सवाने कुर्लीतील बॅकवॉटर सफर, भगवती किल्ल्यावरील गुहेचा थरार आदी नवीन पर्यटन स्थळांची ओळख झाली. न पाहिलेली रत्नागिरी यावेळी पाहता आली. सुधीर रिसबूड आणि पालिका यांच्यातील समन्वयाने आता नवा प्रकल्प साकारण्यात येणार आहे. देशातील हा पहिला प्रकल्प आहे. भगवती किल्ल्याजवळील पालिकेचे उद्यान आहे. तेथे शिवरायांच्या नऊ जलदुर्ग किल्ल्यांची हुबेहूब प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. त्या किल्ल्यांमधील सर्व बारकावे काही देखावे पर्यटकांना पाहायला मिळणार आहेत. सुमारे साडेचार कोटींचा हा प्रकल्प असून त्याला जिल्हा प्रशासनाने हिरवा कंदील दाखवला आहे. जिल्ह्यात नव्याने उदयास येणाऱ्या पर्यटन स्थळांचा लवकर विकास झाला तर रत्नागिरी जिल्हा पर्यटन क्षेत्रात स्वतःचे असे स्थान निर्माण करील.

संबंधित बातम्या