प्राप्तिकर विवरण पत्र भरताना...

रेखा धामणकर
सोमवार, 18 जुलै 2022

पगारदार करदाते आणि लेखा परीक्षण लागू नसलेले करदाते यांच्यासाठी प्राप्तिकर विवरण पत्र भरण्याची अंतिम मुदत, ३१ जुलै, जवळ येऊन ठेपली आहे. अशावेळी आपले विवरण पत्र भरताना काय काळजी घ्यायला हवी याबद्दल...

  योग्य विवरण पत्र नमुना (फॉर्म) निवडणे ः  आपल्या उत्पन्नाच्या स्रोताप्रमाणे योग्य तो फॉर्म निवडणे गरजेचे आहे. खालील तक्ता यात आपली मदत करू शकेल. 

उत्पन्नाचा स्रोत                                               फॉर्म क्र.

पगार, एक घर आणि व्याज/ लाभांश इ.        १ (सहज)

पगार, एकापेक्षा जास्त घरे, धंदा किंवा व्यवसाय करणारे करदाते, भांडवली नफा/ तोटा, इतर उत्पन्न                                                                     २

पगार, एकापेक्षा जास्त घरे, धंदा किंवा व्यवसाय करणारे करदाते, भागीदार, भांडवली नफा/तोटा, इतर उत्पन्न 

धंदा किंवा व्यवसायातून गृहीत उत्पन्न (क. ४४एडी/ एडीए) किंवा भागीदार असाल           

                                                                         ३

पगार, एक घर, धंदा किंवा व्यवसायातून गृहीत उत्पन्न (क. ४४एडी/ एडीए) आणि व्याज/ लाभांश इ.      ४      

आपण खालीलपैकी कुठलीही अट पूर्ण करत असाल, तर आपल्याला फॉर्म क्र. १/४ वापरता येणार नाही. 

 •     आपण जर भारतात स्थायिक (रेसिडेंट) नसाल
 •     आपण एखाद्या कंपनीमध्ये संचालक असाल
 •     आपले उत्पन्न ५० लाखांपेक्षा जास्त असेल

    कुठल्याही स्रोतामध्ये तोटा जाहीर करून तो पुढील वर्षात नेणार असाल किंवा मागील वर्षाचा तोटा यावर्षी पुढे आणला असेल
याव्यतिरिक्त अजूनही काही अटी फॉर्म निवडण्यासाठी लागू होतात. त्यांची पूर्तता करून फॉर्म निवडावा. योग्य फॉर्म निवडला नाही तर आपण सर्व उत्पन्न जाहीर करू शकणार नाही आणि फॉर्म अर्धवट भरून झाल्यावर बदलणे आवश्यक झाल्यास आपली फॉर्म भरण्याची मेहनत वाया जाईल.

 • कर पत्रक (फॉर्म २६एएस) आणि वार्षिक माहिती पत्रक (एआयएस) ः विवरण पत्र भरण्यापूर्वी प्राप्तिकर संकेत स्थळावरून (पोर्टल) आपले कर पत्रक आणि माहिती पत्रक डाऊनलोड करून घ्यावे आणि त्यातील माहिती आपण गोळा केलेल्या माहितीबरोबर तपासून बघावी. कर पत्रकात आपल्या उत्पन्नातून वजावट झालेला कर, आपण भरलेला कर आणि काही विशिष्ट आर्थिक व्यवहारांची माहिती मिळते. एआयएसमध्ये या माहितीबरोबरच ज्या उत्पन्नातून कर वजावट झाली नाही, अशा काही उत्पन्नांबाबत आणि आणखी काही विशिष्ट आर्थिक व्यवहारांची माहिती मिळते. या दोन्ही पत्रकांमध्ये असलेली माहिती जर बरोबर असेल, तर हे सर्व उत्पन्न आपल्या विवरण पत्रात जाहीर करणे आवश्यक आहे. याच बरोबर या दोन्ही पत्रकांत नसलेले, पण करपात्र उत्पन्न जाहीर करणे हीसुद्धा आपली जबाबदारी आहे.

कर पत्रक आणि माहिती पत्रक यामधील उत्पन्न आपण विवरण पत्रामध्ये जाहीर न केल्यास आपणास प्राप्तिकर विभागाकडून नोटीस येऊ शकते आणि जाहीर न करण्याची कारणे द्यावी लागतील. इथे हे लक्षात घेतले पाहिजे, की या दोन्ही पत्रकांमधील माहिती बदलू शकते, म्हणजेच आज या पत्रकामध्ये नसलेली माहिती कालांतराने यात समाविष्ट केली जाऊ शकते आणि आपल्या विवरण पत्रात जर ते उत्पन्न जाहीर केलेले नसेल, तरी आपल्याला स्पष्टीकरण द्यावे लागेल. त्यामुळे जरी पत्रकांमध्ये नसले, तरी ज्ञात उत्पन्न जाहीर करावे. इथे मी असेही सुचवेन, की ३१ डिसेंबर २०२२पूर्वी (सुधारित विवरण पत्र भरण्याची शेवटची तारीख) पुन्हा एकदा दोन्ही पत्रके डाऊनलोड करून तपासून बघावी आणि आवश्यक असल्यास सुधारित विवरण  पत्र दाखल करावे. यानंतर आपणास सुधारणा करायची असल्यास आधी जाहीर न केलेल्या उत्पन्नावरील कराच्या २५ टक्के जास्त कर भरावा लागेल. 
वार्षिक माहिती पत्रकामध्ये जर काही चुकीची माहिती आली असेल, तर आपण ते उत्पन्न नाकारू शकता. 

 • जर आपण फॉर्म क्र. २मध्ये विवरण पत्र भरत असाल, तर आपल्या पगाराची संपूर्ण माहिती (ब्रेक अप) देणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास आपल्या विवरण पत्रातील माहिती आणि कर कपातीच्या विवरण पत्रातील माहितीमध्ये तफावत येईल आणि याबद्दल आपल्याला स्पष्टीकरण द्यावे लागू शकते.
 • शेअर किंवा म्युच्युअल फंड व्यवहार - या व्यवहारांची माहिती देताना खालील बाबी लक्षात ठेवा... 

    व्यवहारातून आपल्याला भांडवली नफा किंवा तोटा झाला असेल, तर प्रत्येक व्यवहाराची माहिती स्वतंत्ररित्या देणे आवश्यक आहे. कारण प्रत्येक व्यवहारामध्ये खरेदी-विक्रीच्या तारखा वेगवेगळ्या असतात. एका शेअर किंवा म्युच्युअल फंडातील किंवा एकाच तारखेला झालेल्या व्यवहारांची एकत्रित माहिती देणे योग्य नाही.
  

 एकाच दिवशी खरेदी आणि विक्री व्यवहार केले असतील, तर ते भांडवली नफा या स्रोताखाली जाहीर करता येणार नाहीत. ते ‘धंदा/व्यवसाय’ याखाली जाहीर करावे लागतील. फ्युचर्स आणि ऑप्शन व्यवहारसुद्धा धंदा/ व्यवसाय याखाली जाहीर करावे लागतील.

५.  जुनी आणि नवीन कर आकारणी पद्धत निवडणे :  मागील आर्थिक वर्षापासून सर्व करदात्यांना कर आकारणी पद्धत निवडण्याची संधी मिळाली आहे. पगार आणि इतर उत्पन्न मिळणाऱ्‍या व्यक्ती दर वर्षी हा पर्याय निवडू शकतात. मात्र धंदा/व्यवसायातून उत्पन्न मिळवणाऱ्‍या व्यक्तींना ही संधी फक्त एकदाच मिळते. अशा व्यक्तींनी जर मागील वर्षी नवीन कर आकारणी पद्धत निवडली असेल, तर या वर्षी पुन्हा जुनी कर प्रणाली निवडण्यासाठी आपल्याला फॉर्म १० आयई भरणे क्रमप्राप्त आहे आणि आपण यानंतर पुन्हा नवीन कर प्रणाली निवडू शकणार नाही. तसेच या वर्षी प्रथमच नवीन कर प्रणाली निवडत असाल तर फॉर्म १० आयई भरायला विसरू नका.

६. विवरण पत्राचे ई-व्हेरिफिकेशन : संगणकावर भरलेले विवरण पत्र आपण ई-व्हेरिफाय करू शकता किंवा सही करून प्राप्तिकर विभागाच्या बंगळूर येथील कार्यालयामध्ये पाठवू शकता. ई-व्हेरिफाय करणे हा उत्तम पर्याय आहे. ज्यांनी याआधी सही करून विवरण पत्र पाठवले असेल ते या बाबतीत सहमत असतील. तसेच हेही लक्षात घेणे आवश्यक आहे, की ई-व्हेरिफिकेशन आपण विवरण पत्र भरण्याच्या तारखेपासून १२० दिवसांत करू शकता. आता ई-व्हेरिफाय करण्यासाठी खालील पर्याय उपलब्ध आहेत. 

 • आधार ओटीपीद्वारे व्हेरिफाय करणे : हा सर्वात सोपा आणि सर्वात जास्त वापरला जाणारा पर्याय आहे. आपल्या आधार क्रमांकाला जर मोबाईल क्रमांक जोडून घेऊन हा पर्याय वापरू शकता. 
 • आपल्या पूर्व प्रमाणित बँक खात्याच्या आधारे ः यामध्ये आपल्या बँक खात्यांशी संलग्न मोबाईल क्रमांकावर ओटीपी पाठवला जाईल. 
 • आपल्या पूर्व प्रमाणित डी-मॅट खात्याच्या आधारे ः यामध्ये आपल्या डी-मॅट खात्यांशी संलग्न मोबाईल क्रमांकावर ओटीपी पाठवला जाईल. 
 • एटीएम मशीनद्वारे : ज्या बँकांच्या एटीएम मशीनवर असा पर्याय उपलब्ध आहे, त्या बँकांचे ग्राहक असाल तर आपण हा पर्याय वापरू शकता. 
 • नेट बँकिंग प्रणालीमधून : आपण जर नेट बँकिंग सुविधा वापरत असाल, तर त्यामार्फतही आपण ई-व्हेरिफाय करू शकता. 

व्हेरिफिकेशन न केल्यास आपण सुधारित विवरण पत्र भरू शकणार नाही आणि जर आपल्याला परतावा (रिफंड) अपेक्षित असेल तर तो मिळायला उशीर होऊ शकेल, हे लक्षात ठेवायला हवे. 

(लेखिका चार्टर्ड अकाउंटंट, सीए, आहेत.)

 

संबंधित बातम्या