ऑनलाइन पुस्तकांच्या हमरस्त्यावर

डॉ. पृथ्वीराज तौर
सोमवार, 11 मे 2020

जबाबदार सुटी : वाचता वाचता
इंग्रजी-हिंदी साहित्याबरोबरच मराठी साहित्यातही लक्षणीय बदल झाले  आहेत. मोठ्यांसह लहान मुलांसाठीही वाचनाचे ऑनलाइन अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत, मात्र त्यातही मुलांनी 
काय वाचावे? योग्य साहित्य आणि साहित्यिकांपर्यंत कसे पोचावे? याविषयी मार्गदर्शन... 

पुस्तकांचे वाचन ही एक चांगली सवय आहे आणि इतर अनेक चांगल्या सवयीप्रमाणे वाचनाची सवय जाणीवपूर्वक आणि प्रयत्नाने अंगवळणी पडते. चांगल्या सवयी या आपल्याला अधिक सुंदर आणि सुदृढ करत असतात. वाचनामुळे आपण संपन्न तर होतोच; शिवाय आपल्यामध्ये विचार करण्याची, सारासार विवेकाने निर्णय घेण्याची, परिस्थितीचे मुल्यांकन करण्याची शक्ती निर्माण होते.  ‘वाचाल तर वाचाल’, ‘वाचनामुळे जग घडते’ अशी विधाने आपण ऐकली असतील, या विचारांमधूनच वाचनसंस्कृती विकसित झाली आहे.
वाचनाचा आणि पुस्तकांचा संबंध आहे. तथापि पुस्तक छपाईचा इतिहास मात्र चार पाच शतकांचाच आहे. त्यापूर्वी हस्तलिखितांचे जग होते. पुस्तकेच्या पुस्तके हाताने लिहून काढली जात आणि जतन केली जात. पुस्तकांचे जतन करणे ही बाब त्याकाळात किती महत्त्वाची आणि खडतरसुद्धा असेल. तरीही आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षांपासून पुस्तके जपली. त्यांची संग्रहालये उभारली. त्यात आपले अनुभव, विचार, ज्ञान संग्रहित केले आणि ते पुढील पिढीच्या हाती दिले. 

वाचनालयात मुले      
पुस्तकांची छपाई होऊ लागली आणि नव्याने जागोजागी हळूहळू ग्रंथालये आकाराला आली. सुरुवातीच्या काळात म्हणजे अगदी एकोणीसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत मुलांना सार्वजनिक ग्रंथालयात प्रवेश दिला जात नसे. मुले पुस्तके खराब करतील, फाडतील किंवा घाण करतील असा एक विचार ग्रंथाचे जतन करणाऱ्या आणि व्यवस्थेतील मंडळींना वाटत असे. असा विचार जेथे असेल अशा ठिकाणी मुलांसाठी असणारी पुस्तके ठेवली जात नसणार हे उघड आहे. मग मुलांसाठी स्वतंत्र ग्रंथकक्ष असावा हा विचार कुणी करणेही त्याकाळात अशक्य होते. एनी कॅरोल मूर यांनी मुलांसाठी स्वतंत्र वाचनालये असावीत, ग्रंथालयाच्या मुक्तद्वारातून मुलांनाही प्रवेश मिळावा आणि मुलांसाठी स्वतंत्र आरामदायी व त्यांच्या सोयीचा वाचनकक्ष असावा यासाठी केलेले प्रयत्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. मिनार्वा सॅडर्स, लुटी स्टीअर्नस, मेरी राईट पल्मनर, कॅरलाईन हँवीस, क्लारा हंट अशा इतर ग्रंथ प्रेमींचे मुलांच्या ग्रंथालयाच्या उभारणीत महत्त्वाचे योगदान आहे. मुलांच्या हाती समृद्ध ज्ञानखजिना येण्यास त्यामुळे मोठी मदत झाली.

वाचनसंस्कृतीचे बदलते रूप       
विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकात इंटरनेट आपल्या परिचयाचे झाले. एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात त्याचा वेगाने विकास झाला आणि दुसऱ्या  दशकाच्या अखेरपर्यंत इंटरनेट सामान्यांच्या अंगवळणी पडले आहे. प्रत्येक हातात स्मार्ट फोन आहेत आणि नेट सर्फिंग ही बहुतेकांसाठी आवश्यक बाब झाली आहे. इंटरनेट आणि त्याला जोडलेल्या मोबाइलने वर्तन आणि व्यवहार यात मोठा बदल झालेला आहे. अनेक नव्या व्यवसायांचा उदय झाला आहे. नव्या संधीची दारे उघडली झाली आहेत. माहितीचा स्फोट झाला आहे. ज्ञानक्षेत्राचे सगळे दरवाजे सर्वांसाठी खुले झाले आहेत.  इंटरनेटवरून जगभरातील बहुतेक मोठ्या ग्रंथालयात सहज आणि मोफत प्रवेश मिळू लागला आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठातील ग्रंथालयातील पुस्तके  वाचण्यासाठी त्याठिकाणी जाणे गरजेचे राहिले नाही. अमेरिकेतील न्यूयॉर्क सार्वजनिक वाचनालयातील पुस्तक  जालना जिल्ह्यातील शिवण गावसारख्या आडवळणाच्या गावात बसूनही वाचता येते. इंटरनेटमुळे हातात प्रत्यक्ष पुस्तक नसतानाही वाचन करणे शक्य झाले आहे. वाचनात रमणाऱ्यांचे जग हळूहळू बदलत होते, कोरोनामुळे मिळालेल्या बंदिवासाने याची जाणीव करून दिली,  की यापुढील काळात ते झपाट्याने बदलत जाणार आहे.

बालकुमार साहित्यातील प्रयोगशीलता
अलीकडे मराठी बालसाहित्यात विविध प्रयोग होत आहेत. माधुरी पुरंदरे, राजीव तांबे, ल. म. कडू, बाबा भांड, सूर्यकांत सराफ अशी जुन्या पिढीतील आणि आबा महाजन, विद्या सुर्वे, फारूक काझी, एकनाथ आव्हाड, बबन शिंदे ही नव्या पिढीतील लेखक मंडळी सतत नवे आणि प्रयोगशील लिहीत  असतात. आपल्याकडे साने गुरुजींचे  ‘श्यामची आई’ आहे, ताम्हनकरांचा ‘गोट्या’ आहे, भा. रा. भागवतांचा ‘फास्टर फेणे' आहे’, प्रभावळकरांचा ‘बोक्या’ आहे आणि भारत सासणे यांचा ‘समशेर कुलुपघरे’ आहे.  विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, कुसुमाग्रज यांची श्रेष्ठ बालकविता, विजय तेंडुलकर, सई परांजपे, रत्नाकर मतकरी यांची अफलातून बालनाट्ये, जयंत नारळीकर, मारुती चितमपल्ली ते अभय बंग यांच्या अनुभवकथा आणि ‘किशोर’, ‘वयम’, ‘पासवर्ड’, ‘छात्रप्रबोधन’, ‘शिक्षण विवेक’, ‘झंप्या’, ‘माऊस’ अशी नियतकालिके आहेत. 

अभिवाचन आणि  प्रकटवाचन
बालकुमारांच्या पुस्तकांना जर नाट्याची, प्रकट वाचनाची अथवा सादरीकरणाची जोड मिळाली, तर ते अधिक परिणामकारक होते. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून असे प्रयोग अनेक विविध गटांवर सुरू असतात. ठाणे येथील थिएटर कॉलेज या नाट्य समूहातील आश्लेषा गाडे, श्रेयस राजे आणि इतर किंवा अहमदनगर येथील ऋचा कुलकर्णी आणि त्यांच्या मित्रांचा 'ऑनलाइन शब्दसमूह' हा गट असे ऑनलाइन व लाइव्ह प्रयोग करत असतात. बालवाचकांच्या तोंडून गोष्टी ऐकताना मिळणारा आनंद हा काही औरच असतो. याशिवाय सुधीर कुलकर्णी, अर्चना कुडतरकर, नीलिमा देशपांडे, विलास काळे, गणेश भंडारी यांच्या फेसबुक भिंतीवर लहान मुलांच्या गोष्टींचे प्रकट वाचन ऐकता येईल. पुस्तक वाचणे यापेक्षा मुले ऑडिओबुकला अधिक पसंती देतात, तर त्यापुढे जाऊन दृकश्राव्य माध्यमांचा उपयोग होतो. बालकुमारांच्या विश्वात अशी हालचाल नव्या पिढीकडून मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे.

गणेश भंडारी हे  व्हॉट्सॲपवरती 'Audio Book' नावाचा समूह चालवतात. तो सर्वांसाठी खुला आहे. समूहाची भूमिका मांडताना ते म्हणाले, पुस्तकांचे ऑडिओ रेकॉर्डिंग करताना माझ्या डोळ्यांपुढे काही लक्ष्यगट आहेत :

  1. अंधत्व व इतर शारीरिक कारणांमुळे ज्यांच्यासाठी वाचन शक्य नाही किंवा अतिशय कठीण आहे. 
  2. ज्यांना वाचनाची आवड आहे, पण पुस्तके विकत घेणे वा ग्रंथालयाची वर्गणी भरणे शक्य नाही. 
  3. ज्यांना वाचनाची आवड आहे, पुस्तके विकत घेणेही शक्य आहे, पण ती उपलब्ध होत नाहीत. उदा. खेड्यातील, दूरस्थ भागातील लोक.
  4. ज्यांना वाचनाची आवड आहे, पुस्तके उपलब्ध आहेत, पण वेळेअभावी किंवा इतर कारणांनी वाचन शक्य होत नाही. उदा. नोकरदार, गृहिणी इ.

या गटांतील व्यक्तींना या ऑडिओ स्वरूपांतील पुस्तकांचा, लेखांचा नक्कीच फायदा होईल असे वाटते. अशा प्रकारे काही भूमिका घेऊन विविध मंडळी या क्षेत्रात पदार्पण करत आहेत. याचा बालकुमारांना नक्कीच लाभ होईल. अशाच काही फेसबुकच्या उपयुक्त लिंक्स पुढे देत आहे. 

फेसबुक आणि व्हॉट्सॲपप्रमाणे यूट्युबवरही  मराठी, हिंदी आणि इंग्रजी ऑडिओ व्हिडिओ बुक्सचा सुकाळ आहे. स्टोरीलाइन ऑनलाइन, स्टोरीनोरी, स्टोरीप्लेस, फ्री किड्स बुक, मॅजिकब्लॉक्स या संकेतस्थळांवर कितीतरी पुस्तके उपलब्ध आहेत. याशिवाय लायब्ररी ऑफ कॉंग्रेस, ऑक्सफर्ड ओऊल, इंटरनॅशनल चिल्ड्रन्स लायब्ररी, मॅजिक लायब्ररी ही मुलांमध्ये वाचनप्रिय असणारी संकेतस्थळे आहेत.

फेसबुकच्या भिंतीवर     
राजीव तांबे, फारूक काझी, एकनाथ आव्हाड, विद्या सुर्वे, किशोर पाठक, उत्तम कोळगावकर, सुरेश सावंत हे असे मराठी लेखक आहेत ज्यांचे मराठी बालसाहित्य नि:शुल्क ऑनलाइन उपलब्ध आहे. फक्त त्यासाठी त्यांच्या फेसबुक भिंतीला भेट द्यावी लागते. फेसबुक आणि तत्सम समाज माध्यमांचा अत्यंत नेटका वापर या मराठी लेखकांनी करून घेतला आहे. विविध गटांवर या लेखकांनी लिहिलेल्या कथा, कविता, नाटुकली वाचता येतील. विद्या सुर्वे या बालसाहित्याच्या समीक्षक आहेत. त्यांनी फेसबुकवर मुलांसाठी लिहिलेल्या साहित्य समीक्षेतून त्यांचे ‘बालसाहित्य : आकलन आणि समीक्षा’ हे पुस्तक आकाराला आले. या पुस्तकाचे नाव जरी अवघड असले, तरी हे मुलांसाठी लिहिले गेलेले एक अप्रतिम पुस्तक आहे. मराठीमध्ये मुलांनी वाचावे असे काय आहे? त्याचे वेगळेपण काय आहे? विशिष्ट लेखकाचे योगदान काय आहे? अशा अनेक प्रश्नांची चर्चा विद्या सुर्वे यांनी तीसपेक्षा अधिक पुस्तकांच्या निमित्ताने केली आहे. राजीव तांबे यांचे ‘४० दिवस ५६ गोष्टी’ हे सदर किंवा फारूक काझी यांचे ‘परीकथा’ हे सदर फेसबुकवरती लिहिले जात आहे. आबा महाजन यांनी अहिराणी बोलीभाषेत लिहिलेले बालसाहित्यही फेसबुकच्या भिंतीवर वाचता येईल. त्यातील काही लिंक्स  इथे दिल्या आहेत. 

इंटरनेट अर्काइव्ह आणि कोट्यावधी पुस्तके
https://archive.org हे संकेतस्थळ म्हणजे पुस्तकांचा महासागर आहे. यावर जगभरातील कोट्यावधी पुस्तके उपलब्ध आहेत. भारतीय भाषेतील लाखो पुस्तके आणि मराठीतील हजारो पुस्तके या संकेतस्थळाच्या माध्यमातून वाचता येतात. केवळ पुस्तकेच नव्हे, तर हजारो चित्रपट, संकेतस्थळे, सॉफ्टवेअर, संगीतध्वनीफिती यांचा संग्रह इथे आहे. हे संकेतस्थळ म्हणजे अनेक संकेतस्थळांचे एकत्रीकरण आहे. जगभरातील सर्व महत्त्वाची  ग्रंथालये याच्याशी जोडलेली आहेत. बालकुमार साहित्याचीदेखील  लाखो पुस्तके या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
 या संकेतस्थळाचे वैशिष्ट्य म्हणजे बालकुमार साहित्याचे देशनिहाय, भाषानिहाय, बालकांच्या वयोगटाप्रमाणे, वाङ्‌मयप्रकारनिहाय त्याचप्रमाणे विषयनिहाय  वर्गीकरण करण्यात आले आहे. उदा.  कुणाला जर फक्त मांजरीची गोष्ट वाचायची असेल, तर जगभरातील हजारो मांजरीच्या गोष्टी एका क्लिकवर समोर येतात.  https://www.gutenberg.org हेही असेच महत्त्वाचे  संकेतस्थळ असून यावरही हजारो पुस्तके आहेत. https://www.scribd.com/books/Fiction/Children-s-YA वरती जगभरातील उत्तमोत्तम इंग्रजी पुस्तके वाचता येतील. सुरुवातीच्या ३० दिवसांसाठी ही सुविधा मोफत उपलब्ध आहे, त्यानंतर मात्र या सेवेसाठी पैसे मोजावे लागतात. ‘रीड विदाउट लिमिट्‌स’ हे जणू या संकेतस्थळाचे घोषवाक्य आहे. अधिक माहिती जाणून घेण्याची उत्सुकता असणाऱ्या  कुमार वाचकांनी https://ndl.iitkgp.ac.in या नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडियाला भेट देण्यास हरकत नाही.

ऑनलाइन मराठी पुस्तके
मराठी पुस्तके विकत घ्यायची असतील, ऑनलाइन वाचायची असतील अथवा नि:शुल्क मिळवायची असतील, तर अशी अनेक संकेतस्थळे उपलब्ध आहेत. १९७१ पासूनचे मासिक किशोरचे सर्व खंड कार्यकारी संपादक किरण केंद्रे यांच्या प्रयत्नातून ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले आहेत.  किशोरचा नियमित अंकही ऑनलाइन उपलब्ध असतो. किशोर हे महाराष्ट्र शासनाचे कुमारांसाठीचे नियतकालिक असून ‘बालभारती’च्या वतीने प्रकाशित केले जात असते. याशिवाय बालभारतीच्या वतीने प्रकाशित करण्यात येणारी सर्व शैक्षणिक पाठ्यपुस्तके संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. http://ebalbharati.in/main/publicHome.aspx हे बालभारतीचे संकेतस्थळ यासाठी महत्त्वाचे  आहे.

राज्य मराठी विकास संस्था ही शासनाची अत्यंत महत्त्वाची  संस्था असून मराठी भाषा विकासात या संस्थेचे भरीव योगदान आहे. एकोणीसाव्या शतकापासूनची अत्यंत दुर्मीळ व महत्त्वाची  पुस्तके संस्थेच्या https://rmvs.marathi.gov.in/books या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. बालकुमारांसाठी फारशी उपयुक्त नसली, तरी राज्य मराठी विकास संस्थेने प्रकाशित केलेली पुस्तकेही या संकेतस्थळावर वाचता येतात. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या https://sahitya.marathi.gov.in/objectives या संकेतस्थळावरही असंख्य मराठी पुस्तके उपलब्ध आहेत. यातील चरित्रवाङ्‌मय बालकुमारांसाठी उपयुक्त ठरू शकेल.

प्रथम, भारत ज्ञान विज्ञान समुदाय, राष्ट्रीय पुस्तक न्यास, चिल्ड्रन बुक ट्रस्ट, मासिक ऋग्वेद, चिल्ड्रन रिलीफ फंड यांची पुस्तके अत्यल्प किमतीत उपलब्ध असतात. ‘प्रथम’चे स्वत:चे संकेतस्थळ असून https://prathambooks.org येथे त्यांची सर्व भाषेतील सर्व पुस्तके वाचता येतात. राष्ट्रीय पुस्तक न्यासच्या मराठी विभागाच्या उपसंपादक निवेदिता मदाने यांच्या प्रयत्नातून एनबीटीने प्रकाशित केलेली पुस्तके ऑडिओ व्हिडिओ स्वरूपात उपलब्ध होत आहेत.   

अॅमॅझॉन, फ्लिपकार्ट, बुकगंगा, अक्षरधारा, रसिक या संकेतस्थळांवर  पुस्तके विकत घेण्याची सोय आहे. गुड्‌रीड्सवरती आपण आपला इमेल नोंदवला, तर उपलब्ध असणाऱ्या  पुस्तकांची  पीडीएफ पाठवली जाते. https://www.goodreads.com/shelf/show/marathi या त्यांच्या संकेतस्थळावर अन्य भाषेतील पुस्तकेही उपलब्ध आहेत.

‘साहित्यचिंतन’ हे असेच एक महत्त्वाचे  संकेतस्थळ आहे. पुस्तक वाचणे, शेअर करणे आणि डाऊनलोड करणे अशा विविध सोई इथे आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील पुस्तके वाङ्‌मय प्रकार निहाय या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. http://sahityachintan.com/browse-books.php?language=1 या पानावर आपल्याला मराठी पुस्तके शोधता येतील.

ऑनलाइन पुस्तकांचे भविष्य लक्षात घेऊन श्रीनिवास बाळकृष्ण आणि कीर्तिकुमार  शिंदे यांनी मुलांसाठी ऑनलाइन मासिक सुरू  करायचे ठरवले आहे. श्रीनिवास यांनी यामागची भूमिका सांगताना म्हटले, ‘आपल्या पालनकर्त्यांच्या मृत्यूची भीती लहान मुलांना खूप असते. दंगल, युद्ध आणि आता कोरोनासारखे रोग मोठे मानसिक परिणाम घडवतात. ते दीर्घकाळ व्यक्तिमत्त्वामध्ये फरक घडवून आणतात. आपल्या शिक्षण व्यवस्थेत मनातले खरे भय व्यक्त करण्याच्या जागा व संधी कमी आहेत. त्यासाठी अभ्यासेतर साहित्याची गरज आहे. या वयोगटासाठी इंटरॅक्टिव्ह, अभिव्यक्त होण्यासाठी एक मासिक/द्वैमासिक असावे  असे  वाटते. जे पूर्ण रंगीत, आकर्षक चित्र, त्यांच्यासाठी जागा असणारे व्हावे  असे  आम्हाला वाटते. यासाठी वानरसेना हे मासिक आम्ही सुरू  करत आहोत.’

अरविंद गुप्ता यांचे संकेतस्थळ
अरविंद गुप्ता हे मुलांसाठी कार्य करणारे, मुलांत रमणारे आणि मुलांसाठी लेखन करणारे वैज्ञानिक आहेत. http://www.arvindguptatoys.com हे त्यांचे संकेतस्थळ आहे. हे संकेतस्थळ म्हणजे अरविंद गुप्ता यांनी बालकुमारांना दिलेली अपूर्व भेट आहे. या संकेतस्थळावर मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील हजारो पुस्तके आहेत. यातील बहुतेक पुस्तके अरविंद गुप्ता यांनी हिंदीत अनुवादित केलेली आहेत. अरविंद गुप्ता यांचे स्वत:चे वाचन या संग्रहातून जाणवत रहाते. गुप्ता यांच्या जवळपाससुद्धा इतर साहित्यिक पोचत नाहीत, एवढी त्यांची उंची आणि कार्य मोठे आहे. मुलांची पुस्तके कशी असावीत, त्यांचे विषय काय असावे, याचे भान अरविंद गुप्तांऐवढे खचितच इतर दुसऱ्या  भारतीय बालसाहित्यिकाला असेल. हे जग समजून घेण्याची ज्यांची इच्छा आहे, त्या बालकुमारांनीच नव्हे तर त्यांच्या पालकांनीसुद्धा या संकेतस्थळाला भेट दिली पाहिजे.

संबंधित बातम्या