मुलांसाठी सोप्या रेसिपीज
जबाबदार सुटी : फूड विथ मूड
सध्या पालक आणि मुले दोघांनाही सुट्या आहेत. त्यामुळे किचनवर फक्त आईचाच ताबा राहिलेला नाहीये, तर आता मुलेही आई-बाबांना छान छान पदार्थ करून खाऊ घालताना दिसत आहेत. त्यांना आणखी सोपे पर्याय म्हणून आपण काही सोप्या पदार्थांच्या रेसिपीज देत आहोत. आई-बाबांच्या मदतीने किंवा एकट्याने मुले करू शकतील अशा रेसिपीज...
टरबूज लेमोनेड
साहित्य : एक छोटे टरबूज, पाव टीस्पून काळे मीठ, ५-६ पुदिना पाने, एका छोट्या लिंबाचा रस, आइस क्युब.
सजवटीसाठी : टरबुजाचे तुकडे, पुदिना पाने व लिंबू स्लाइस .
कृती : प्रथम टरबुजाचे तुकडे करून घ्यावे. मिक्सरच्या भांड्यात टरबुजाचे तुकडे, काळे मीठ, पुदिना पाने व लिंबूरस घालून ब्लेंड करून घ्यावे.
एका काचेच्या ग्लासमध्ये टरबुजाचा ज्यूस, आइस क्यूब, पुदिना पाने, टरबुजाचे तुकडे घालून सजवून बाजूला एक लेमन स्लाइस लावून थंडगार सर्व्ह करावे.
मॅंगो फ्रुटी
साहित्य : पाऊण कप मॅंगो पल्प, अर्धा टेबलस्पून पिठीसाखर, अर्धा टेबलस्पून लेमन ज्यूस, १ कप पाणी.
सजवटीसाठी : मॅंगो स्लाइस, आइस.
कृती : एका भांड्यात मॅंगो पल्प, पिठीसाखर, लेमन ज्यूस, पाणी घालून चांगले मिक्स करून घ्यावे. मग एका काचेच्या ग्लासमध्ये मॅंगो ज्यूस ओतावा. आता वरून मॅंगोच्या स्लाइस व आइस क्यूब घालून थंड गार सर्व्ह करावी.
फ्रेंच टोस्ट
साहित्य : चार ब्रेड स्लाइस, २ अंडी, २ टेबलस्पून दूध, २ टीस्पून साखर, मीठ चवीनुसार, डालडा तळण्यासाठी.
V एका स्लाइसचे २ तुकडे करावेत. अंडी फेटून त्यामध्ये दूध, साखर व मीठ टाकून मिक्स करावे. छोट्या फ्राइंग पॅनमध्ये अर्धा टेबलस्पून डालडा टाकून, एक-एक ब्रेड स्लाइस घेऊन अंड्याच्या मिश्रणामध्ये बुडवून फ्राइंग पॅनमध्ये दोन्ही बाजूंनी शॅलो फ्राय करावे. टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करावे.
चॉकलेट किट-कँट फ्रूट अँड नट कुकीज
साहित्य : चारशे ग्रॅम मिल्क चॉकलेट बेस, ८ वेफर बिस्किटे, चॉकलेट तयार करण्यासाठी मोल्ड.
कृती : चॉकलेट बेस घेऊन डबल बॉयलिंग पद्धतीने विरघळवून घ्यावा. मग एका चमच्याने हलवून घेऊन ५ मिनिटे थंड करायला ठेवावा. मोल्ड घेऊन त्यामध्ये चमच्याने अगोदर थोडा चॉकलेट बेस घालून त्यावर मोल्डच्या आकाराचे वेफर बिस्कीट ठेवून परत तयार चॉकलेट बेस घालून मग मोल्ड सेट करण्यासाठी फ्रिजमध्ये ५ मिनिटे ठेवावा. ५ मिनिटे झाल्यावर मोल्ड फ्रिजमधून काढून त्यातील चॉकलेट बटर पेपरवर काढून ठेवावीत. मगच ती पेपरमध्ये गुंडाळून घ्यावीत.
चॉकलेट मस्तानी
साहित्य : तीन कप क्रीमचे दूध, २ टेबल स्पून साखर, २ टेबल स्पून कोको पावडर, २ टेबल स्पून ड्रिंकिंग चॉकलेट पावडर, ३ स्कूप चॉकलेट आइस्क्रीम, २ टेबल स्पून चॉकलेट सॉस, सजावटीसाठी ड्रायफ्रूट्स.
कृती : सर्व प्रथम दूध गरम करून गार करून घ्यावे. मग मिक्सरच्या भांड्यात दूध, साखर, कोको पावडर, ड्रिंकिंग चॉकलेट पावडर घालून ब्लेंड करून घ्यावे. डेकोरेटिव्ह काचेचे ग्लास घेऊन प्रथम चॉकलेट मिल्कशेक घालून वरून चॉकलेट आइस्क्रीम व चॉकलेट सॉस घालावा. वरून ड्रायफ्रूट्स व चॉकलेटचे तुकडे घालून थंडगार सर्व्ह करावे.
टीप : चॉकलेटच्याऐवजी स्ट्रॉबेरी पल्प किंवा रोझ सीरप वापरू शकतो.
टूटीफ्रूटी
साहित्य : एक मध्यम आकाराचे कलिंगड आणि टरबूज, १ कप साखर, २-३ थेंब हिरवा, पिवळा व लाल खायचा रंग, २-३ थेंब व्हॅनिला इसेन्स व ५-६ केशर काड्या.
कृती : कलिंगड आणि टरबुजाचे साल टाकून न देता त्यापासून टूटीफ्रूटी करावी. त्यासाठी कलिंगडावरचा हिरवा भाग आणि टरबूजाचा पिवळा भाग काढून टाकावा व आतील पांढऱ्या भागाचे बारीक बारीक तुकडे करावेत. एका मोठ्या आकाराच्या भांड्यात सर्व तुकडे घेऊन त्यामध्ये फोडी बुडून वर थोडे पाणी राहील एवढे पाणी घ्यावे. भांडे मध्यम आचेवर ठेवून ५-७ मिनिटे फोडी शिजवून घ्याव्या. फोडी पारदर्शक झाल्या पाहिजेत. मग चाळणीवर फोडी काढून घ्याव्यात. पाणी पूर्ण निथळू द्यावे. मग त्याचे एकसारखे तीन भाग करावे. दुसर्या भांड्यात १ कप साखर घेऊन दीड कप पाणी घ्यावे व त्याचा पाक करायला ठेवावा. पाक करताना एकतारी पाक करावा. पाक थोडा चिकट झाला पाहिजे. साखरेचा पाक करून झाल्यावर त्याचे एकसारखे तीन भाग करावे. एका भागात लाल रंग, दुसर्या भागात हिरवा रंग व तिसर्या भागात पिवळा रंग घालून मिक्स करावे. प्रत्येक रंगामध्ये शिजवलेल्या फोडी घालून हलवून परत आचेवर ५ मिनिटे गरम करून घ्यावे. आच बंद करून तिन्ही भांडी १२ तास तशीच झाकून ठेवावीत. प्रत्येकात २ थेंब इसेन्स टाकावा. १२ तास झाल्यावर सर्व फोडी एका कापडावर पसराव्यात. त्या फोडी २४ तास तशाच वाळवाव्यात. वाळल्यावर डब्यात भराव्यात. पाहिजे तेव्हा मुलांना खायला देता येतील किंवा केक, बिस्किटे, आइस्क्रीममध्ये वापरता येतील. वर्षभर छान टिकतात.
क्रिमी स्ट्रॉबेरी आइस्क्रीम
साहित्य : एक कप क्रीम (१२५ ग्रॅम), २ टेबलस्पून पिठीसाखर , १ टेबलस्पून मिल्क पावडर, २ टेबलस्पून स्ट्रॉबेरी पल्प, पाव कप दूध.
कृती : मिक्सरच्या ज्यूसरच्या भांड्यात क्रीम, पिठीसाखर, मिल्क पावडर, स्ट्रॉबेरी पल्प व दूध घालून २ मिनिटे ब्लेंड करून घ्यावे. ब्लेंड केलेले मिश्रण प्लॅस्टिकच्या डब्यात काढून घेऊन डब्याचे झाकण लावावे व फ्रिजरमध्ये दीड तास सेट करायला ठेवावे. दीड तासानंतर आइस्क्रीम बाहेर काढून परत १ मिनिट ब्लेंड करून प्लॅस्टिकच्या डब्यात ओतून त्यावर प्लॅस्टिक पेपर लावून ३-४ तास फ्रिजरमध्ये सेट करायला ठेवावे. आइस्क्रीम मस्त सेट झाल्यावर सर्व्ह करावे.
मिनी बोरबॉन चोको लावा केक
साहित्य : लावा करण्यासाठी : ५० ग्रॅम चॉकलेट डार्क कंपाऊंड (किसून), २ टेबलस्पून दूध (अगदी गरम).
केक करण्यासाठी : बारा बोरबॉन बिस्किटे, अर्धी वाटी दूध (नॉर्मल), १ टेबलस्पून तेल (आप्पे पात्राला लावण्यासाठी).
कृती : प्रथम एका छोट्या बोलमध्ये किसलेले किंवा बारीक तुकडे करून चॉकलेट डार्क कंपाऊंड घ्यावे. त्यामध्ये अगदी गरम दूध हळूहळू घालून चांगले मिक्स करावे. मिश्रण पातळ झाले, की मग फ्रिजरमध्ये १० मिनिटे ठेवावे. नंतर बोरबॉन बिस्किटांचे तुकडे करून घ्यावे. मग मिक्सरमध्ये ग्राइंड करून पावडर करून घ्यावी. एका बोलमध्ये पावडर काढून घेऊन त्यामध्ये थोडे थोडे दूध घालून मिश्रण चांगले एकत्र करून घ्यावे. ते असे फेटून घ्यावे की आपण वरून खाली ओतताना ते रिबीनसारखे पडले पाहिजे. आता आप्पे पात्राला तेल लावून घ्यावे. मग एक एक टेबलस्पून मिश्रण आप्पे पात्रामध्ये घालून वरून एक टीस्पून लावा मधोमध घालावा. त्यावर परत १ टेबलस्पून मिश्रण घालून घ्यावे. अशा प्रकारे आप्पे पात्रात मिश्रण घालून घ्यावे. आता मंद आचेवर आप्पे पात्र ठेवून त्यावर झाकण ठेवावे व अगोदर ७ मिनिटे बेक करून घ्यावे. झाकण काढून तपासून बघावे, पाहिजे तर अजून २-३ मिनिटे बेक करून घ्यावे. मिनी बोरबॉन चोको लावा केक एका प्लेटमध्ये काढून घेऊन सर्व्ह करावा.
क्रिस्पी पोटॅटो स्माइली
साहित्य : चार मोठे बटाटे, २ ब्रेड स्लाइस, ४ टेबलस्पून कॉर्न फ्लोअर किंवा तांदळाचे पीठ, पाव टीस्पून मिरची पावडर, मीठ चवीनुसार, तळण्यासाठी तेल.
कृती : प्रथम बटाटे स्वच्छ धुऊन उकडून सोलून घ्यावेत. ब्रेडचे स्लाइस मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावेत. मग बटाटे किसून एका बोलमध्ये घ्यावे. त्या किसलेल्या बटाट्यांमध्ये ब्रेडचा चुरा, कॉर्न फ्लोअर, मिरची पावडर आणि मीठ घालून चांगले मळून घ्यावे. वरून तेलाचा हात लावून परत मळून घ्यावे. हा मळलेला गोळा झाकून फ्रिजमध्ये २५-३० मिनिटे ठेवावा. नंतर मळलेल्या गोळ्याचे तीन भाग करून घ्यावे. एक भाग थोडा जाडसर थापून घेऊन गोल झाकणाने कट करून घ्यावा. एकसारखे सगळे कापून झाल्यावर एक स्ट्रॉ घेऊन त्या गोल कापलेल्या चकतीवर दोन भोके पाडावीत. म्हणजे ते दोन डोळे होतील व एक चमचा घेऊन तोंडाचा आकार करावा. अशा प्रकारे सर्व स्माइली करून घ्याव्यात. कढईमध्ये तेल गरम करून घ्यावे. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये स्माइली तळून घ्याव्यात. प्रथम आच मोठी ठेवावी व स्माइली तेलात घालून मग मध्यम आचेवर तळून घ्याव्या. गरमागरम स्माइली टोमॅटो सॉस किंवा चटणीबरोबर सर्व्ह कराव्या.
एगलेस मिनी डोरा केक
साहित्य : एक कप गव्हाचे पीठ, अर्धा कप पिठीसाखर, ४ टेबल स्पून मिल्क पावडर, २ टीस्पून बेकिंग सोडा, १ टेबल स्पून मध, पाव टी स्पून व्हॅनिला इसेन्स, १ कप दूध, तेल.
कृती : एका बोलमध्ये गव्हाचे पीठ, पिठीसाखर, मिल्क पावडर व बेकिंग सोडा घेऊन चांगले मिक्स करावे. नंतर त्यामध्ये मध, व्हॅनिला इसेन्स व दूध घालून चांगले मिक्स करून घ्यावे. मिश्रण असे फेटायचे आहे की ते वरून ओतले तर रिबीनसारखे पडले पाहिजे. आता पॅन गरम करायला ठेवावा. गरम झाल्यावर त्यावर थोडेसे तेल लावावे व एक डाव मिश्रण घेऊन पॅनवर वरून ओतावे. ते हळूहळू पसरेल. डावाने पसरायचे नाही. मग फक्त ४० सेकंद बेक करून डोरा केक उलटा करावा व २० सेकंद बेक करावा. बेक झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून घ्यावा. अशा प्रकारे सर्व डोरा केक करून घ्यावेत. गरमागरम केक सर्व्ह करावा.
पनीर-कॉर्न फुसिली (पास्ता)
साहित्य : पाव कप स्वीट कॉर्नचे दाणे, २ टीस्पून अमूल बटर, पाव कप लाल-पिवळ्या शिमला मिरचीचे तुकडे, पाव कप ब्रोकोलीचे तुकडे, पाव कप पनीरचे तुकडे, अर्धा कप कांद्याच्या पाकळ्या, २ टीस्पून हिरवी मिरची (वाटून), १ टीस्पून काळी मिरी पावडर, अर्धा टेबल स्पून लिंबू रस, ३ टेबल स्पून चीज (किसून), १ कप कोथिंबीर (चिरून), मीठ चवीनुसार, ३ कप फुसिली (शिजवून) पास्ता, २ टेबल स्पून तेल.
कृती : एका कढईमध्ये तेल व बटर गरम करून त्यामध्ये कांदा, शिमला मिरची घालून २-३ मिनिटे फ्राय करून घ्यावे. त्यामध्ये मिरची, ब्रोकोलीचे तुकडे, कॉर्न, मीठ, शिजवलेले फुसिली घालून मिक्स करावे. नंतर त्यामध्ये लिंबूरस, चीज, कोथिंबीर, मिरी पावडर घालून मिक्स करावे व २ मिनिटे फ्राय करून घ्यावे.
मटर पुलाव
साहित्य : दोन कप बासमती तांदूळ, दीड कप हिरवे ताजे मटार, १५-२० किसमिस, ८-१० काजू तुकडे, मीठ चवीनुसार.
पुलावसाठी मसाला : चार लवंगा, २ हिरवे वेलदोडे, अर्धा इंच दालचिनीचा तुकडा, १ टीस्पून खसखस.
फोडणीसाठी : एक टेबल स्पून तूप, १ टीस्पून शहाजिरे, ६-७ मिरे, २ तमल पत्र, १ मध्यम कांदा (चिरून).
कृती : तांदूळ धुऊन एक तास बाजूला ठेवावे. मिरे, वेलदोडे, दालचिनी बारीक वाटून घ्यावे. कुकरमध्ये तूप गरम करून त्यामध्ये शहाजिरे, मिरे, दालचिनी, तमालपत्र, कांदा, मटार घालून १ मिनिट परतून घ्यावे. नंतर त्यामध्ये तांदूळ घालून २-३ मिनिटे परतून घ्यावे. तांदूळ परतून झाल्यावर त्यामध्ये बारीक केलेला गरम मसाला, खसखस, धने-जिरे पावडर, मीठ घालून मिक्स करून ४ कप गरम पाणी घालून पुन्हा मिक्स करून कुकरचे झाकण लावून दोन शिट्या होऊ द्याव्यात. कुकर थंड झाल्यावर झाकण काढून गरमागरम मटर पुलाव सर्व्ह करावा. मटर पुलाव सर्व्ह करतांना वरतून खोबरे व कोथिंबीर घालावी.
रव्याचा झटपट नाश्ता
साहित्य : दोन मध्यम आकाराचे बटाटे, २ टेबल स्पून दही, १ मोठी मिरची, १ कप बारीक रवा, पाव कप पाणी, १ टीस्पून तेल, १ टीस्पून मीठ, १ टीस्पून साखर, १ टीस्पून लिंबूरस, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा.
फोडणीसाठी : दोन टेबलस्पून तेल, २ टीस्पून मोहरी, ८-१० कढीपत्ता पाने, २ टेबलस्पून तेल.
कृती : बटाटा धुऊन सोलून चिरून घ्यावा. मिक्सरच्या भांड्यात चिरलेला बटाटा, मिरची व दही बारीक वाटून घ्यावे. एका बोलमध्ये बारीक रवा, पाणी, मीठ, तेल व वाटलेला बटाटा घालून मिक्स करून घेऊन १० मिनिटे झाकून ठेवावे. एका स्टीलच्या ट्रेला तेल लावून घ्यावे. मोठ्या भांड्यात २ कप पाणी गरम करायला ठेवून त्यामध्ये एक स्टँड ठेवावा. मग त्यामध्ये साखर, लिंबूरस, बेकिंग सोडा घालून चांगले मिक्स करून घ्यावे. हे मिश्रण तेल लावलेल्या ट्रेमध्ये ओतून घ्यावे व ट्रे गरम पाणी केलेल्या भांड्यात ठेवावा. वरती झाकण ठेवून २० मिनिटे वाफवून घ्यावे. २० मिनिटे झाल्यावर ट्रे बाहेर काढून थंड करायला ठेवावा. थंड झाल्यावर त्याच्या उभ्या स्ट्रिप्स कापून घ्याव्या. पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवावे. तेल गरम झाले, की त्यामध्ये मोहरी व कढीपत्ता घालून कापलेल्या स्ट्रिप्स पॅनमध्ये लावून घेऊन एका बाजूने थोडे तेल सोडून छान खरपूस भाजून घ्यावे. मग उलट करून परत त्या बाजूला थोडे तेल सोडून छान खरपूस भाजून घ्यावे. गरम गरम नाश्ता टोमॅटो सॉसबरोबर किंवा चटणीबरोबर सर्व्ह करावा.
पास्ता विथ मशरू म इन क्रिमी टोमॅटो सॉस
साहित्य : तीनशे पन्नास ग्रॅम पास्ता, २५० ग्रॅम मशरूम, १ कप घट्ट क्रीम, अर्धा कप टोमॅटो सॉस, ३ टेबलस्पून बटर, १ टेबलस्पून लसूण (बारीक चिरून), २ टेबलस्पून लिंबूरस, मीठ व मिरपूड चवीनुसार, २ चीज क्यूब.
कृती : पास्ता शिजवून घेऊन जास्तीचे पाणी काढून घ्यावे. मशरूमचे पातळ स्लाइस कापून घ्यावे. क्रीम चांगले फेटून घ्यावे. टोमॅटो चिरून घ्यावे. चीज किसून घ्यावे. एका खोलगट कढईमध्ये बटर गरम करून त्यामध्ये चिरलेले मशरूम व लसूण घालून २-३ मिनिटे फ्राय करून घ्यावे. नंतर त्यामध्ये क्रीम घालून २-३ मिनिटे शिजवून घ्यावे. त्यामध्ये चिरलेले टोमॅटो, लिंबूरस, मीठ, मिरपूड घालून मिक्स करून मग त्यामध्ये शिजवलेला पास्ता घालून मिक्स करावे. शेवटी किसलेले चीज घालून मिक्स करून घ्यावे. गरमागरम सर्व्ह करावा.
खारी बाईट
साहित्य : दहा खारी, १ टीस्पून तेल.
आवरणासाठी : एक कप पांढरा सॉस, अर्धा टेबल स्पून बटर, पाव कप बारीक चिरलेला कांदा, १ टीस्पून बारीक चिरलेला लसूण, १ टीस्पून बारीक चिरलेली मिरची , १ कप चिरलेली लाल-हिरवी-पिवळी शिमला मिरची, १ चीज क्यूब (किसून), १ टेबल स्पून बीटरूट (थोडे उकडून व किसून), टोमाटो सॉस व मिरी पावडर सजावटीसाठी.
कृती : एका कढईमध्ये बटर गरम करून कांदा, लसूण, मिरची २ मिनिटे फ्राय करून मग त्यामध्ये शिमला मिरची मिक्स करून २-३ मिनिटे फ्राय करून घ्यावे. नंतर त्यामध्ये पांढरा सॉस मिक्स करून बीटरूट मिक्स करावे. प्रत्येक खारीवर एक-एक टेबलस्पून मिश्रण ठेवून त्यावर थोडेथोडे किसलेले चीज पसरून मिरी पावडर टाकावी. नॉनस्टिक तवा गरम करायला ठेवावा. त्यावर तेल लावून ख्रारी ठेवावी. वरून झाकण ठेवावे व २ मिनिटे मंद आचेवर भाजून घ्यावी. सॉसबरोबर सर्व्ह करावी.