सक्तीच्या सुट्यांची कमाल

मित्रांचे अनुभव
सोमवार, 11 मे 2020

जबाबदार सुटी 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चमध्ये  लॉकडाऊन सुरू झालं आणि मुलांसह  पालकांनाही सक्तीच्या सुट्या  मिळाल्या. बघता बघता मे  महिना उजाडला आणि नकळत उन्हाळ्याच्या सुट्याच सुरू झाल्या. पण या सुट्यांमध्ये ना मामाचं  गाव, ना कोणती कौटुंबिक सहल, ना आजीबरोबर बागेत फिरायला जायचं, ना मित्रांबरोबर मैदानात खेळायचं. मग करायचं तरी काय? तुम्ही काय करताय? आपले काही मित्र सांगताहेत, त्यांचे अनुभव...

काही गोष्टींची सवय झाली..  
मी लॉकडाऊनमधल्या वेळेचं काही  नियोजन केलेलं नाही.  पण मला या सुट्यांमध्ये  काही गोष्टींची सवय झाली आहे.  रोज सकाळी उठल्यावर अंघोळ करून लगेचच देवाची पूजा करतो. शाळेला सुटी असल्यानं सगळा  वेळ  मोकळा असतो. त्यामुळं घरातील भाज्या निवडून फ्रिजमध्ये  डब्यात भरून ठेवतो. कधीकधी चटणी, कोशिंबिरी करतो. या सुट्यांमध्ये मी  भातही करायला शिकलो आणि  बटाटा, भेंडी अशा  भाज्याही करायला शिकलो. कधी तरी  आजीआजोबा, आईबाबा यांना कोणाचीही मदत न घेता सँडविच, सूप आणि पिझ्झा करून  देतो. रोज सकाळी घरातला केरपण काढतो आणि मॉपनं  फरशी पुसतो. अधून मधून  शाळेतल्या मित्रमैत्रिणींबरोबर  व्हिडिओ कॉलवर गप्पा मारतो.  संध्याकाळी न चुकता आजीनं शिकवलेली देवाची स्तोत्रं म्हणतो. दिवसभरात अर्धा तास बातम्या आणि  डिस्कव्हरी चॅनेल बघतो. अभ्यास म्हणून रोज थोडं मराठी शुद्धलेखन लिहितो आणि संस्कृतच्या धातूंचं पाठांतर करतो.  रात्री झोपताना अर्धा तास बाबांच्या मोबाइलवर एखादा गेम खेळतो. सध्या बिल्डिंगमधले मित्रही अजिबात भेटत नाहीत, एवढी काळजी आम्ही सगळेच घेतो आहोत. 
- श्रीराम झांबरे  (नववी) 

कोरोना जावो आणि शाळा सुरू होवो!
सगळ्यांना आवडते तशीच मलाही  सुटी खूप  आवडते. म्हणून  मी दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुटीची आतुरतेनं वाट पाहत असतो.  कारण सुटीत मस्त धमाल करता येते ना! अभ्यासपण करायचा नसतो आणि म्हणून आईपण रागवत नाही. पाहिजे तेवढं झोपता येतं, खेळता येतं. मार्चमध्ये कोरोनामुळं अचानक सुटी मिळाली, तेव्हा सुरुवातीला मजा वाटली. मी आणि दीदीनं खूप प्लॅन केले पण सगळे फसले. घराच्या बाहेर जायचं नाही म्हटल्यावर सुटीची मजाच गेली. पण मग आम्ही घरातच वेगवेगळे खेळ खेळू लागलो. मी थोडासा अभ्यासपण करतो आणि घरात आईला कामात मदतही करतो. पण मला कधीकधी शाळेची खूप आठवण येते. कोरोना लवकर जावो  आणि सुट्या संपून शाळा लवकर सुरू होवो, असं मला सारखं वाटतं. 
- समर्थ वने (सहावी)

सुटीचा कंटाळा नाही आला... 
मी आत्ता आठवीची  परीक्षा दिली आहे. नववीला जाणार आहे म्हणून या  सुट्यांमध्ये मी  माझ्या बहिणीची  पुस्तकं घेतली आहेत आणि मी  रोज दोन तास अभ्यास करते.  मला चित्रकलेचीही आवड आहे. या  लॉकडाऊनच्या दिवसांत मी  चित्रं काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळं मला या  सुटीचा  अजिबात कंटाळा आला नाहीये.  
- श्रेया  अहिरे, पिंपळे  निलख  (आठवी)

घरी राहून शासन निर्देशांचे पालन! 
कोविड‌ -१९ मुळं देशभरात लॉकडाऊनचं पालन केलं जात आहे. शाळेनंही आम्हाला घरी राहून व्हिडिओ  कॉन्फरन्सिंगद्वारे शिकवायला सुरुवात केली आहे.  मी ठरवल्याप्रमाणं घरी राहून अभ्यास तर करतेच, शिवाय  इतर  गोष्टीही  करते. म्हणजे  घरातच पत्ते खेळणं, लुडो, सापशिडी असे खेळ आईबाबांबरोबर  मनसोक्त  खेळते. जुनी मराठी व हिंदी गाणीसुद्धा ऐकते. दिवसभर आईबाबांबरोबर  अनेक कामंही करते. जसं की, जेवायला वाढून घेणं, कपड्यांच्या  घड्या घालणं, झाडून काढणं, भाजी व फळं चिरणं, रांगोळी काढणं, धान्य निवडणं हे सर्व करते. हे पहिल्यांदा  करताना मला नवीन नवीन अनुभव आले.  या सुटीमध्ये मी आईबाबांना कॉम्प्युटरचे अनेक धडे दिले. कधी तरी  आम्ही जुन्या  अल्बममधील फोटो व माझे बालपणीचे व्हिडिओपण पाहतो. त्यामुळं आमचा वेळ खूप छान जातो. या काळात आम्हीपण घरीच राहून शासन निर्देशांचं पालन करत आहोत.
- यशश्री कुलकर्णी,‌ नाशिक (सातवी) 

पक्ष्यांनाही आकाशात फिरू द्या
दीड महिना झाला, शाळेला सुटी आहे. घरात बसून मला खूप कंटाळा आला होता, पण नंतर आमचे ऑनलाइन प्रॅक्टिकल्स सुरू झाले, म्हणून प्रॅक्टिकलमध्ये थोडा वेळ जाऊ लागला. पण नंतर तेही बंद झालं. मग मी आणि माझी बहीण गौरी घरात बसून स्केचिंग, ड्रॉइंग करू लागलो... आणि टिकटॉकवर व्हिडिओपण तयार करू लागलो. हे व्हिडिओ करताना माझ्या लक्षात आलं, की आपण पक्ष्यांचेपण व्हिडिओ काढू शकतो. मग एकदा आमच्या सोसायटीच्या मागच्या बाजूला जाऊन पक्ष्यांचे व्हिडिओ काढत होतो, तेव्हा मला एक पक्षी दिसला. तो जखमी झाला होता. त्याला उडता येत नव्हतं. मग त्याला आम्ही घरी घेऊन आलो. नंतर त्याची काळजी घेण्यात आमचा दिवस जाऊ लागला. त्याच्यासाठी आम्ही यूट्युबवर बघून एक पिंजरापण तयार केला. नंतर १०-१२ दिवसांनी तो बरा झाला आणि उडायचा प्रयत्न करू लागला. मग आम्ही त्याला पिंजऱ्यातून बाहेर काढून सोडून दिलं. मला सर्वांना सांगायचं आहे, की लॉकडाऊनमध्ये आपण जसं घरात बसून कंटाळलो आहोत, तसंच पक्ष्यांना पिंजऱ्यात डांबून ठेवल्यावर त्यांनापण असंच वाटत असेल ना. त्यामुळं पक्ष्यांना पिंजऱ्यात ठेवू नका, त्यांना मोकळ्या आकाशात फिरू द्या. माझी सुटी त्या पक्ष्याच्या सहवासात छान गेली. उरलेल्या सुटीतपण मी सोसायटीत येणाऱ्या पक्ष्यांचे व्हिडिओ काढणार!
- मानव सदरे, पिंपळे निळख (सहावी)

कोरोना जाऊदे म्हणून प्रार्थना...
आपल्याला सगळ्यांना कोरोनामुळं सुट्या मिळाल्या आणि घरात बसावं लागलं. सुरुवातीला खूप चिडचिड झाली. पण नंतर ऑनलाइन ट्युशन्स सुरू झाल्या, शाळेतून होमवर्क मिळू लागला, म्हणून माझा अर्धा दिवस अभ्यासात जाऊ लागला. उरलेल्या अर्ध्या दिवसात मी आईला तिच्या कामात मदत करते. रोज सकाळी अंघोळ, नाश्ता झाला,  की मी आईला घर आवरायला मदत करते. छोट्या कपड्यांच्या घड्या घालते. नंतर यूट्युबवर बघून ड्रॉइंग काढते, रांगोळी काढायला शिकते. थोडा वेळ टीव्ही बघते आणि आईनं सांगितलेली छोटी छोटी कामं करते. रोज सायंकाळी देवासमोर दिवा  लावून कोरोना लवकर जाऊदे म्हणून  आईबरोबर प्रार्थना म्हणते!
- मिताली पवार, मॉरिशस (चौथी)

देवा, संपव रे लॉकडाऊन!
ही पहिलीच वेळ आहे, की मला सुटीचा कंटाळा आलाय. खरं तर मी सुरुवातीला खूप उत्सुक होते, आनंदी होते, सुट्या लागल्या म्हणून. तेव्हा बरंच काही करायचं ठरवलं होतं. आई, बाबा, ताई सगळे घरीच ना! लॉकडाऊनची सुटी सुरू झाली आणि धुलीवंदनाच्यावेळी खूप धम्माल करायची असं ठरवलं. पण बाबा ओरडला, ‘रंगात किंवा पाण्यात जायचं नाही!’ जेवताना माझे डोळे खूप भरून आले. हे पहिलंच धुलीवंदन होतं जेव्हा पाण्यात जायचं नाही, असं कडक बजावून ठेवलं होतं बाबानं. ही सुटी आम्हाला थोडी वेगळी वाटली, कारण रस्त्यावर कुत्र्यांच्या भुंकण्याशिवाय वेगळा आवाज नाही, वाहनांचा, माणसांचा आवाज नाही. माझा बॅडमिंटनचा क्लास नाही, टीव्हीवर जुन्या सिरियलशिवाय काहीही नाही, कोणालाही घराबाहेर पडण्याची घाई नाही. असो. पण मला हीच सुटी जास्त आवडते कारण या वेळी वार्षिक परीक्षा नाहीत, वह्या अपूर्ण म्हणून आईचा, बाईंचा ओरडाही नाही आणि महत्त्वाचं म्हणजे अभ्यास नाही. त्यामुळं जरा जास्तच छान वाटतंय. 
या सुटीमध्ये मी बरंच काही शिकले. कागदाच्या वस्तू तयार करणं यांसारखे उद्योग सुरू झाले. उदाहरणार्थ - कागदाचं बदक, उडता पक्षी, पट्टीवर मॅग्नेट लावून उड्या मारणारा बेडूक. मला खूप आधी आत्यानं शंख वाजवायला शिकवला होता, आता तोपण रोज वाजवते. मोदी आजोबांच्या आवाहनाच्या दिवशी म्हणजेच जनता कर्फ्यूच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता सगळे टाळ्या वाजवत होते आणि माझ्या शंखानं मात्र अख्खी गल्ली दुमदुमली होती. या सुटीत रोपांची लागवड करायला शिकले. आम्ही ठरवलं होतं, आमच्या समोरच्या वडाची रोपं तयार करून तळजाईवर नेऊन लावायची. आम्ही ती फांदी कापून त्याला मध लावून ती पाण्यात ठेवली होती. ३१ मार्चला खूप झाडं लावायची असं ठरवलं होतं, कारण तो दिवस जागतिक वनदिन म्हणून ओळखला जातो. तळजाईवरच्या प्राण्यांना उन्हाळ्यात खायला मिळावं म्हणून उन्हाळ्यात फळं येणारी झाडं लावायची होती. असं कुठंतरी वाचलं होतं, की फणसाचे गरे खाऊन त्याची बी लगेच लावली म्हणजे त्याचं झाड येऊ शकतं. असं ठरवलं होतं खरं, पण काय करणार! कोरोनामुळं फणस महाराज आमच्या घरी आलेच नाहीत.
याशिवाय आम्ही काही नवीन गोष्टी केल्या. उदाहरणार्थ - कॅरम, चंपोल खेळलो, ऑनलाइन स्पर्धांमध्ये भाग घेतला. कोरोनामुळं कुठल्याच दुकानात चॉकलेट मिळत नाहीये आणि चॉकलेट म्हणजे माझा जीव की प्राण! म्हणूनच आईकडं हट्ट करून करून मी चॉकलेट तयार करायला शिकले. वेगवेगळी स्तोत्र शिकले. त्यातलंच एक म्हणजे - विष्णुसहस्त्रनाम. आता ते मला पाठ झालं आहे आणि आम्ही ते रोज म्हणतो. मी लहान असतानाचा पण आता खराब झालेला डीव्हीडी प्लेयर आम्ही उघडला. त्यातल्या थोड्याफार वस्तूंची माहिती होती. बाकीच्या गोष्टींची गुगल लेन्स ॲप वापरून त्यावरून माहिती घेतली. असंच आम्ही त्या चांगल्या सोनीच्या वॉकमनलापण उघडलं आणि त्याची विल्हेवाट लावली. हे सगळं करून झालं. आता मात्र सगळ्याचा कंटाळा येतो. टीव्ही, मोबाइल, गेम, पुस्तकं, घरातली खेळणी या सगळ्यांपेक्षा आता माणसं हवीशी वाटतात. मैत्रिणींशी मनसोक्त खेळावंस वाटतं. शाळेमध्ये, बागेमध्ये आता फुलपाखरासारखं बागडावसं वाटतंय. त्यामुळं शेवटी, पण पहिल्यांदाच म्हणेन, ‘देवा आता संपव रे लॉकडाऊन!’
- तन्वी सप्तर्षि, (सातवी) 

घरात छान वेळ जातो!
मी काव्या.  मला सुटीत खूप गोष्टी करायला आणि शिकायला  आवडतात.  मी आईला घरातील कामात मदतही  करते. म्हणजे  भाजी निवडणं, लसूण सोलून देणं, देवपूजा करणं.  मला माझ्या लहान भावाबरोबर  खेळायलाही  आवडतं.  
मी छान छान चित्रं  काढते.  मला भातुकलीचा खेळ खेळायला आवडतो.  खेळाबरोबर  मी रोज थोडासा अभ्यास करते. पाढे पाठ करते. शुद्धलेखन लिहिते.  रोज सकाळी  योगासनं करते.  तसंच मला टीव्ही  पाहायलापण आवडतो, म्हणून माझा  घरात छान वेळ जातो.
- काव्या सोळंके, रहाटणी (तिसरी) 

संस्मरणीय वाढदिवस 
अरे बाबा... रविवारीपण ऑफिसला जायला पाहिजे का? घरी थांब ना! 
हे माझं बाबांना उद्देशून म्हटलेलं नेहमीचं वाक्य. पण सध्या या कोरोनाच्या साथीमुळं माझे बाबा घरीच थांबतात आणि घरून काम करतात. पूर्वी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी फायनली घडू लागल्या आहेत! 
या कोरोनामुळं उद्‍भवलेल्या अनपेक्षित परिस्थितीमुळं माझ्या संमिश्र भावना आहेत, राग, उदासिनता, आशा आणि अर्थातच वाढीव सुटीची उत्सुकता. या साथीच्या रोगानं आणि लॉकडाऊडनं आपलं आयुष्य ३६० अंशांनी बदलून टाकलं आहे. लॉकडाऊन लागू होण्याआधी माझं रुटीन सेमच असायचं, लवकर उठणं, शाळेला जाणं, घरी येणं, काही तरी खाणं, क्लासला जाणं, गृहपाठ करणं, बाहेर खेळायला जाणं, जेवणं आणि शेवटी झोपणं. पण आता ऑनलाइन स्कूल ही रेग्युलर अक्टिव्हिटी आहे, घराबाहेर पडता येत नाहीये आणि घरामध्ये बसून बोर व्हायला लागलं आहे. 
मला एक अनुभव शेअर करावासा वाटतो. १६ एप्रिलला माझा वाढदिवस होता. लॉकडाऊन असूनही मी तो सेलिब्रेट केला. मला हा वाढदिवस नेहमीच लक्षात राहणार आहे. कारण या दिवशी होममेड केक होता, माझ्या आवडीचा गाजराचा हलवा होता. त्या दिवशी आम्ही वर्च्युअल पार्टी केली, माझे आजी-आजोबा, भावंडं आणि इतर नातेवाईक व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून या पार्टीत सहभागी झाले. असा वाढदिवस साजरा करेन, असं कधीच वाटलं नव्हतं. 
या परिस्थिनीनं स्वतःला घडवण्याची आणि आपले छंद जोपासण्याची नामी संधी दिली आहे आणि मी तेच करत आहे! 
- अनन्या जगताप, लाओस, नायजेरिया (आठवी)

महत्त्वाचं वर्ष.. आणि हे लॉकडाऊन 
हे लॉकडाऊन मी सुरुवातीला खूप एंजॉय केलं... उशिरा उठणं, काहीही न करणं. पण मग नंतर मला खूप बोर व्हायला लागलं, म्हणून आम्ही एक रुटीन वर्कआऊट केलं. संस्कृत स्तोत्र शिकायला सुरुवात केली. मी आणि माझी बहीण श्‍वेता स्वयंपाकघरामध्ये आणि घरकामात आईला थोडी थोडी मदत करायला लागलो. मग ऑनलाइन स्कूल सुरू झालं आणि मी दहावीला गेले असल्यामुळं क्लासेसही सुरू झाले. मी, माझी बहीण आणि आई, बाबा असे सगळेच ऑनलाइन काम करतात (आई-बाबा काम करतात, आम्ही स्कूल अटेंड करतो). मजा वाटते. मोकळ्या वेळेमध्ये मी चित्र काढते, गाणी वाजवते आणि ऑफकोर्स मोबाइलही बघते. कॅबसेनं पॉर्शन कमी केलाय हे बरं वाटतंय. सुटी सगळ्यांनाच आवडते, पण महत्त्वाचं वर्ष असताना हे सगळं वेगळंच होतंय, याचा स्ट्रेसपण येतो आहे. 
-शर्वरी गोडबोले (दहावी)

शाळा आणि अभ्यास प्रिय वाटू लागले.. 
आमची परीक्षा सुरू असताना एक दिवस अचानक शाळेला पाच दिवसांची सुटी दिल्याचं सांगितलं. आमचे राहिलेले पेपर पुढं ढकलले. नंतर मात्र पंतप्रधान मोदींनी लॉकडाऊन वाढवला. शाळेला सुटी म्हणून सुरुवातीला मजा वाटली. पण नंतर बोअर होऊ लागलं. कारण घराबाहेर जायचं नाही, खाली खेळायला जायचं नाही. मग घरातली सगळी गोष्टीची पुस्तकं बाहेर काढली आणि वाचन सुरू केलं. आईला घराच्या कामात मदत करायला लागले. आई-बाबांबरोबर घरातच खेळ खेळू लागले. नंतर ऑनलाइन क्लासेस सुरू होणार असल्याचा मेसेज आला आणि मला खूप आनंद झाला. सुटीत शाळा आणि अभ्यास दोन्ही गोष्टी खूप प्रिय वाटू लागल्या. आता ऑनलाइन क्लास संपल्यानंतर दिलेला अभ्यास करण्यात, आई-बाबांबरोबर गप्पा मारण्यात आणि आईला संस्कृत शिकवण्यात माझा छान वेळ जातो!
- अन्वी केसारे, पिंपळे निळख (सहावी)

वेळेचा सदुपयोग करायला हवा 
न भूतो न भविष्यती अशी सुटी पूर्ण विश्वाला आज अनुभवयाला मिळत आहे आणि त्याचं कारण म्हणजे अगदी चिमुकला डोळ्यांना न दिसणारा विषाणू ‘कोरोना’. या चिमुकल्याची मूर्ती लहान असली, तरी प्रताप फारच महान आहेत. त्याच्यामुळं शाळा बंद! खेळ बंद! क्लास बंद! सर्वत्र कंटाळवाणं वातावरण पसरलं आहे. मीसुद्धा मैत्रिणींबरोबर गप्पा मारल्या, तर ‘बोअर होतंय’ या शब्दांचा उल्लेख जवळपास दहा-पंधरा वेळा होतो. पण मला कधी कंटाळवाणं झालं नाही, कारण मी माझी दिनचर्या आखली आहे. ही दिनचर्याच माझ्यासाठी विरंगुळ्याचं साधन झाली आहे. 
मी दररोज सकाळी लवकर उठून छान वातावरणात जवळपास दीड तास व्यायाम करते. या राक्षसी कोरोनाचं जे वातावरण पसरलं आहे, त्यात प्रतिकारशक्ती वाढण्याची गरज आहे. संगीत माझी आवड आहे. मागच्या काही वर्षांपासून मी शास्त्रीय संगीत शिकते. शाळा व क्लासच्या गडबडीत मनासारखा रियाज होत नाही, म्हणून आता मिळालेला वेळ मी सत्कारणी लावण्याचा प्रयत्न करते. या सुटीच्या कालावधीत मुलांनी वेळेचा सदुपयोग करावा, म्हणून आमच्या ड्रॉइंग क्लासच्या काकूंनी ऑनलाइन ड्रॉइंग क्लास सुरू केला आहे. त्यामुळं आम्हा मुलांची करमणूकही होते. आमची शाळासुद्धा दर तीन-चार दिवसांनी शाळेत झालेल्या अभ्यासाचा गृहपाठ शाळेच्या ॲपवर पाठवते. वार्षिक परीक्षा झाली नाही, तरी मुलांचा त्या वर्षीचा अभ्यास पूर्ण होऊदे व उजळणी व्हावी, हा त्यामागचा उद्देश. 
मी, ताई आणि आईबाबा या सर्वांनी घरातली कामं वाटून घेतली आहेत. केर काढणं, फरशी पुसणं, कपडे वाळत घालणं अशी कामं मी करते. कधीकधी आईला स्वयंपाकातही मदत करते. दररोज काम करणाऱ्या मावशींना किती काम करायला लागतं याची मला जाणीव झाली आहे. तसंच, घर सांभाळायला आईला किती कष्ट घ्यायला लागतात हे माझ्या लक्षात आलं आहे. 
महाभारत व रामायण या दोन पौराणिक मालिका मी न चुकता पाहते. या दोन्ही गोष्टींमुळं मला खूप काही शिकायला मिळालं आहे. वाचनाचीसुद्धा मला खूप आवड आहे. मी इंग्रजी व मराठी पुस्तकं वाचते. पुस्तक वाचल्यानं केवळ मनोरंजनच नव्हे, तर आपली शब्दसंपदा व भाषाही सुधारते. 
छोटे-छोटे उपक्रमही करते. जसं छोट्या कापडापासून मास्क तयार करणं, टिशू पेपरची फुलं करणं, केक करणं इत्यादी. कधीकधी तर मला असं वाटतं, की नेहमीपेक्षा आत्ताची माझी दिनचर्या मला जास्त व्यग्र ठेवते. तरीही मला माझ्या मित्र-मैत्रिणींची, नातेवाइकांची व आमच्या सोसायटीतील मांजरींची खूप आठवण येते. 
कोरोनामुळं आपण माणुसकी, सहनशीलता व कुटुंबवत्सलता शिकलो आहोत. वेळ खूप मौल्यवान गोष्ट आहे. ती गोष्ट एकदा गेली की परत येत नाही. म्हणून सदैव तिचा सदुपयोग करणं गरजेचं आहे. मी माझ्या दिनचर्येच्या माध्यमातून वेळ सत्कारणी लावण्याचा प्रयत्न करते.  
- ईशा हर्षे (आठवी) 

लॉकडाऊनचा त्रास वाटत नाही 
आमची परीक्षा व्हायच्या आधीच शाळा बंद झाली व परीक्षाही कॅन्सल झाल्या, तेव्हा थोडी गंमत वाटली होती. पण आता मित्रांना भेटता येत नाही, बाहेर खेळायला जाता येत नाही याचं वाईट वाटतं. परीक्षा झाल्यावर मेमध्ये मी कुटुंबाबरोबर नैनितालला जाणार होतो, पण त्याचं बुकिंगसुद्धा कॅन्सल करावं लागलं. 
सध्या मी घरच्या अंगणात, तर कधी गच्चीत खेळतो. कधीकधी चित्रं काढतो. आमच्या शाळेनं सर्व पालकांचा आणि शिक्षकांचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला आहे. तिथं आमच्यासाठी रोज अक्टिव्हिटीज दिल्या जातात. त्या पूर्ण करण्यात बराचसा वेळ निघून जातो. या ॲक्टिव्हिटीज म्हणजे चित्रकला, विज्ञान, कॉम्प्युटर यांच्या प्रश्नपत्रिका असतात. गोष्टी वाचून त्यांची समरी लिहिणं, हेदेखील असतं. 
लॉकडाऊनच्या काळात मी चहा आणि सरबत तयार करायला शिकलो. मधूनमधून सर्वांसाठी दुपारचा चहा मी करतो. जेवताना पाटपाणी घेणं व नंतर उचलून ठेवणं, झाडांना पाणी घालणं इ. कामं मी करतो. दूरदर्शनवरील रामायण मालिकेबद्दल आई-बाबांकडून पूर्वी ऐकलं होतं. ती मालिका मला ल़ॉकडाऊनमध्ये बघायला मिळाली. 
माझ्या वडिलांचा सॉफ्टवेअर व वेबडिझाइनिंगचा व्यवसाय आहे. सध्या ते त्यांची सर्व कामं ऑनलाइन करतात. माझी आई बँकेमध्ये नोकरी करते. बँक ही अतिआवश्यक सेवेत येते. त्यामुळं आईला रोटेशन पद्धतीनं कामावर जावं लागतं. पण सध्या लवकर येते. त्यामुळं बराच वेळ मला आई-वडिलांबरोबर राहता येतं. 
उन्हाळी सुटीतली खाण्या-पिण्याची मजा करता येत नाही. पण तरी हे लॉकडाऊन आपल्याला कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी आहे, त्यामुळं त्याचा त्रास वाटत नाही. 
-पार्थ लपालीकर, तळेगाव दाभाडे (सातवी)

संबंधित बातम्या