संगणक संहितेतून पुनर्वेध

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 11 मे 2020

जबाबदार सुटी : गुगलवारी
शिवाजी महाराजांनी आपल्या लढायांमध्ये सह्याद्रीतील गड-किल्ले, दऱ्याखोऱ्यांचा कुशल वापर केला. या लढाया झाल्या ती ठिकाणे नेमकी कशी होती? आता घरबसल्या त्या ठिकाणांना भेट देणे शक्य आहे, ‘गुगल अर्थ’च्या माध्यमातून. ‘गुगल अर्थ’च्या मदतीने ही ठिकाणे नेमकी कुठे होती हेही जाणून घेता येईल आणि त्यांचा भूगोलही समजावून घेता येईल!

छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या कठीण, दुर्गम आणि खडतर अशा भौगोलिक परिस्थितीचा आपल्या युद्धतंत्रात नेहमीच अतिशय कौशल्याने वापर करून घेतल्याचे दिसून येते. ते ज्या ज्या ठिकाणी अशा लढाया लढले, ते सगळे प्रदेश आणि तिथे असलेली भूरचना व भूप्रदेश आज आपल्याला गुगल अर्थ (Google Earth)सारख्या उपग्रह प्रतिमांवरून पाहता येतात आणि शिवाजी राजांना आजूबाजूच्या भौगोलिक परिस्थितीची किती उत्तम जाण होती ते त्यावरून लक्षात येते. 

आज आपल्याला ‘गुगल अर्थ’ किंवा ‘गुगल अर्थ प्रो’ ही संहिता (Software) माहितीजाळीवर (Internet) इंटरनेटवर सहजगत्या उपलब्ध होते. याच्या साहाय्याने महाराष्ट्रातील सगळे गड, किल्ले आणि त्यांच्या आजुबाजूचा भूप्रदेश आपण अगदी सहजपणे पाहू शकतो. त्यावरून त्या प्रदेशाची दुर्गमता आणि तिथे असलेले डोंगर, नद्या, दऱ्याखोरी या सर्व गोष्टी स्पष्टपणे दिसून येतात. या सगळ्या गोष्टींमुळे त्या प्रदेशाचे भूसामरिक किंवा रणनीतीच्या संदर्भात असलेले स्थानमाहात्म्यही लक्षात येते. 

शिवाजी महाराजांनी मिळविलेल्या, डागडुजी करून वापरात आणलेल्या आणि बांधलेल्या अशा सर्वच गड किल्ल्यांचे आणि त्यांनी जिथे लढाया केल्या त्या प्रदेशांविषयी आपल्याला नेहमीच आकर्षण वाटत असते. ‘गुगल अर्थ’चा वापर करून आपण सगळा भूमिप्रदेश त्रिमिती स्वरूपातही (Three Dimensional) पाहू शकतो. महाराजांनी लढलेल्या लढायांची वर्णने वाचताना त्या किल्याच्या आणि आजुबाजूच्या भूगोलाचे चित्र पाहून त्याचा अधिक आनंद घेता येतो. 

मुलांनो, तुमचा हा आनंद वाढविण्यासाठी तुम्हीही या संगणक संहितेचा तुमच्या वैयक्तिक संगणकावर (PC), अंकतल संगणकावर (Laptop) किंवा उच्च संस्करण भ्रमणध्वनी (High version mobile) यावर वापर करू शकता. यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला ‘गुगल अर्थ’ किंवा ‘गुगल अर्थ प्रो’ ही सहजपणे download करता येऊ शकणारी संहिता तुमच्या संगणकावर उतरवून घ्यावी लागेल म्हणजे download करून घ्यावी लागेल. ती download झाल्यावर संगणकाच्या पडद्यावर (Screen) डाव्या बाजूला वरती दिसणाऱ्या Search म्हणजे शोधा या चौकटीत (Window) तुम्हाला हव्या असलेल्या प्रदेशाचे किंवा गड किल्ल्याचे नाव टाइप केल्यावर आणि search या अक्षरांवर मूषक दर्शकावरील (Mouse) सरकचक्राच्या (Scroll Wheel) डाव्या बाजूला असलेली कळ (Button) दाबून त्याची नोंद करता (Enter) येईल. नोंद झाल्यावर लगेचच पडद्यावर तुम्हाला नेमकी जागा दाखविणारे स्थल चिन्ह (Placemark) दिसेल. तुम्हाला त्या भागाचे चित्र (image) दिसेल. 

संगणकाच्या पडद्यावर सगळ्यात खाली दिसणाऱ्या आडव्या पट्टीवर त्या ठिकाणाचे अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय स्थान (Lat Long location), समुद्रसपाटीपासून उंची (Elevation) आणि तुम्हाला दिसणारी प्रतिमा केव्हा घेतलेली आहे त्याची तारीखही दिसेल. ‘गुगल अर्थ’ प्रतिमेच्या screen च्या उजव्या कोपऱ्यातील दिशादर्शक चिन्हावरील (Direction icon) उत्तर दिशा (N) दाखविणारा बिंदू वायव्य (Northwest), पश्चिम (West), नैऋत्य (Southwest) आणि दक्षिण (South) अशा विविध दिशांनी फिरवून तुम्हाला त्या प्रदेशाचे त्रिमिती (3D) चित्र मिळेल. दिशादर्शक चिन्हाच्या खाली असलेल्या दुसऱ्या लहान चक्रावरील बाणाचे चिन्ह वापरून चित्र उजवीकडे, डावीकडे, वर आणि खाली फिरवता येईल. या प्रतिमांच्या आधारे त्या प्रदेशाची उंची, तिथे असलेल्या नद्या, उंचवटे याची संपूर्ण कल्पना येईल.

शिवाजी महाराजांनी प्रतापगड, विशाळगड, उंबरखिंड, कांचनबारी अशा अनेक मोहिमा ज्या प्रदेशात केल्या, तो प्रदेश किती दुर्गम आणि कठीण होता हे अशा प्रतिमांवरून आपल्याला समजते. 

हा लेख ‘उंबरखिंड’च्या मोहिमेसंबंधी असून यात या मोहिमेचे भूसामरिक (Geostrategic ) महत्त्व आणि तिथल्या भूप्रदेशाची माहिती दिली आहे. लेखाबरोबर दिलेल्या उंबरखिंड या नावावरून किंवा अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय स्थानावरून ‘गुगल अर्थ’च्या साहाय्याने तुम्हीही त्या प्रदेशाचे चित्र मिळवा. ते वर सांगितल्याप्रमाणे त्रिमिती (3D) करा आणि शिवाजी राजांनी लढलेल्या उंबरखिंडीतील अप्रतिम युद्धतंत्राचा पुनर्वेध घ्या. 

छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या कठीण, दुर्गम आणि खडतर अशा भौगोलिक परिस्थितीचा आपल्या युद्धतंत्रात अतिशय कौशल्याने वापर करून घेतल्याचे त्यांच्या अचंबित करून सोडणाऱ्या अनेक मोहिमांतून स्पष्टपणे दिसून येते. भूरचनेचा आणि भौगोलिक परिस्थितीचा युद्धात समर्थपणे उपयोग करून घेणारे शिवाजी राजांसारखे दुसरे एकही उदाहरण इतरत्र आढळत नाही! 

भूप्रदेशाची नेमकी आणि अचूक माहिती आणि आकलन गनिमी लढ्यात किती उत्तम प्रकारे वापरता येते, ते राजांच्या युद्धतंत्रातून लक्षात येते. याचा उत्कृष्ट नमूना म्हणजे भूरचनेचा नेमका उपयोग करून राजांनी शत्रूची केलेली कोंडी, त्याला दिलेला चकवा आणि अखेरीस मारलेली बाजी! सह्याद्रीच्या दुर्गम भागांत दूर दूर पसरलेल्या, विखुरलेल्या, लहान लहान वस्त्या, घनदाट जंगल, नदी नाल्यांची खोल पात्रे, सर्वत्र पसरलेल्या डोंगरांच्या तीव्र उतारांच्या रांगा यामुळे सह्याद्रीतील युद्धात गतिमानता राखणे नेहमीच कठीण. नेमक्या याच गोष्टीचा शत्रू सैन्याला नामोहरम करण्यासाठी आणि त्याला गाफील ठेवण्यासाठी राजांनी परिणामकारकपणे उपयोग करून घेतला. 

सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील उंच भागात त्यांनी अनेक गड बांधले. काही जुन्या किल्यांची बांधकामे नव्याने करून ते मजबूत केले. भूप्रदेशाला महत्त्व देऊन तयार केलेल्या राजांच्या या युद्धतंत्रात गड किल्यांना नेहमीच मोठे महत्त्व राहिलेले आहे. संपूर्ण भारतात किल्ल्यांचा युद्धात सक्षमपणे उपयोग इतर कोणत्याही राजाने केल्याचे आढळून येत नाही. शिवाजी राजे ज्या ज्या ठिकाणी अशा लढाया लढले, ते सगळे प्रदेश आणि तिथे असलेली भूरचना व भूप्रदेश आज आपल्याला ‘गुगल अर्थ’सारख्या उपग्रह प्रतिमांवरून पाहता येतात आणि राजांना त्या भौगोलिक परिस्थितीची किती उत्तम जाण होती ते लक्षात येते. प्रदेशाची दुर्गमता, युद्धभूमीचे नेमके ठिकाण, डोगर-दऱ्यांची उंची आणि खोली, त्यांचे सौम्य आणि तीव्र उतार, दृश्यमानता, शत्रूच्या लक्षात येणार नाहीत अशा आपल्या सैन्यातील मावळ्यांच्या लपून मारा करण्याच्या जागा, शत्रूला हुसकावून लावण्याचे मार्ग आणि शत्रूला शह देऊन किंवा हुलकावणी देऊन स्वतःच्या सैन्याला माघार घेता येईल अशा वाटा ठरविणे हे त्याकाळी तसे कठीणच काम. पण राजांनी अशा योजना अचूकपणे राबवल्या. राजांच्या असामान्य आकलनशक्तीचे महत्त्व अशाच गोष्टीतून समजते. 

उंबरखिंडीची लढाई हा अशा तऱ्हेच्या युद्धतंत्राचा अप्रतिम आविष्कार होता. राजांनी निसर्गाच्या दुर्गमतेचा फायदा घेऊन केवळ हजारभर मावळ्यांच्या साहाय्याने मोगलांच्या वीस हजारांपेक्षा जास्त फौजेचा पाडाव कमीतकमी वेळात केला. जागरूक आणि कार्यक्षम हेरखात्याचा मदतीने शत्रूच्या हालचालींची आधीच माहिती काढून त्याची संपूर्ण कोंडी करण्याचे त्यांचे कसब या लढाईत प्रकर्षाने लक्षात येते. 

शाहिस्तेखानाच्या सैन्यात कारतलबखान हा एक मोठा सरदार होता. मोगली मोहिमेत नेहमी सहभागी असलेल्या रायबागनला बरोबर घेऊन शिवाजी राजांचा उत्तर कोकणातील मुलुख काबीज करण्याचे काम त्याच्यावर सोपविण्यात आले होते. खानाने त्यासाठी आधी लोणावळा, खंडाळा, बोरघाट, खोपोली आणि तिथून पुढे पाली, नागोठणे असा मार्ग ठरविला होता. पण त्याने शिवाजी राजांच्या सैन्याला चकवा देण्यासाठी अचानकपणे लोणावळ्याहून नैऋत्येकडील कुरवंडे घाटातून कोकणातील उंबरे आणि तिथून पेण असा मार्ग ठरविला. राजांच्या खबऱ्यांकडून राजांना त्याचा हा डाव आधीच कळला होता. कुरवंडे घाटातून खाली कोकणात उतरणे आणि उंबरे गावाजवळच्या खिंडीतून पुढे जाणे किती कठीण आहे याची त्यांना कल्पना होतीच. त्यामुळे शत्रूची खिंडीतच कोंडी करण्याचा घाट त्यांनी घातला. 

राजांनी आपल्या सैन्याची जमवाजमव पेणजवळ सुरू केल्याची बातमी कारतलबखानापर्यंत पोचेल याची काळजी घेतली. खान कुरवंडेला संध्याकाळपर्यंत पोचला. हे ठिकाण सह्याद्रीत लोणावळ्याच्या नैऋत्येला ६६५ मीटर उंचीवर आहे. घाटमाथ्याच्या या ठिकाणाहून पश्चिमेकडचा मोठा परिसर दृष्टिपथात येत होता. खानाच्या सैन्याने तिथे मुक्काम केला, पण सगळे सैन्य कोकणातून येणाऱ्या थंड वाऱ्यांनी आणि थंडीने पुरते बेजार होऊन गेले.  

दुसऱ्या दिवशी सकाळी खानाचे सैन्य कुरवंडे गावाच्या पश्चिमेकडील सह्याद्रीचे तीव्र उताराचे डोंगराचे टप्पे उतरत कसेबसे चावणी (छावणी) या समुद्रसपाटीपासून १८० मीटर उंचीवरच्या गावात पोचले. या गावाच्या आजूबाजूला तीव्र उताराचा डोंगराळ भाग आहे. गावाच्या उजवीकडून येणारी अंबा नदी चावणीच्या समोरच एक वळण घेऊन एका अरुंद दरीतून वाहते. जेमतेम दीडशे मीटर रुंदीची ही दरी अतिशय अरुंद. इथून पुढे सरकणे महाकठीण काम. दरीची लांबी दीड किमी. खिंडीच्या उत्तरेला ३८५ मीटर उंच आणि दक्षिणेला ३५२ मीटर उंच तीव्र उताराचे डोंगरकडे. खिंडीच्या टोकाशी आंबा नदी एकदम वळण घेऊन दक्षिणेकडे वळते. इथेच तिला उत्तरेकडून येणारी एक उपनदी मिळते. समोर एक वाट उंबरे या ९० मीटर उंचीवरच्या गावाकडे जाते. या गावावरूनच समोरच्या या खिंडीला उंबरखिंड हे नाव पडले. नदी दक्षिणेकडे वळल्यावर तिथे अजून एक ५० मीटर उंचीवर टेकाड आहे. या टेकाडावरून नजर ठेवून नदीतील अरुंद मार्ग अडवणे सोपे.  

पावसाळ्यात अंबा नदी दुथडी भरून वाहत असते, मात्र जानेवारी फेब्रुवारीत तिचे पात्र पूर्णपणे कोरडे असते. ते लहान मोठ्या दगड धोंड्यांनी भरून गेलेले असते. त्यातून शत्रूचे अवाढव्य सैन्य सहजपणे पुढे जाऊच शकणार नाही याची राजांना खात्री होतीच. शिवाजी राजे राजगडावरून पुढे येऊन वाघजई घाटाने सह्याद्री उतरले आणि जांभुळपाडा मार्गे उंबरखिंडीच्या खालच्या बाजूला पोचले. त्यांनी आपले सर्व सैन्य उंबरे, उंबरखिंड, आंबा नदीपात्र आणि कुरवंडे घाटात पेरून ठेवले होते. 

कुरवंडे घाटापासून उंबरखिंडीपर्यंतचा सगळा प्रदेश इतका कठीण आणि दुर्गम, की कारतलबखानाचे सैन्य त्यामुळेच हैराण झाले होते. हवेतला दमटपणा, भाजून काढणारे ऊन, अरुंद खिंड, दगड धोंडे यांच्याशी झगडत पुढे सरकणाऱ्या त्याच्या सैन्यावर खिंडीच्या आजूबाजूने अचानक दगड, धोंडे, बाण, बंदुका यांचा जोरदार मारा सुरू झाला. हल्ला कुठून होतोय तेच कळत नव्हते. शत्रू अदृश्य होता! या हल्ल्यात खानाच्या सैन्याची पुरती कोंडी झाली होती. ते कुरवंडे घाटाच्या दिशेने मागे सरकू शकत नव्हते. ती वाट राजांच्या मावळ्यांनी अडवली होती. त्या दिशेने सह्याद्रीचा कडा पार करणे महाकठीण होते आणि खाडीतून पुढची वाटही अडवली गेली होती. राजांनी निसर्गाच्या या दुर्गमतेचा अतिशय कुशलतेने वापर करून कारतलबखानाच्या सैन्याला जायबंदी करून टाकले होते. त्याच्या सैन्याकडे असलेली सगळी शस्त्रास्त्रे, नगद पैसा, घोडे, गाडे, तंबू, धान्य तिथेच सोडून राजांनी त्याच्या सैन्याला परत जायला परवानगी दिली. धास्तावलेला कारतलबखान पूर्णपणे शरणागती पत्करून आल्या पावली माघारी फिरला! सोबत जोडलेल्या गुगल अर्थ प्रतिमेवरून या सगळ्या प्रदेशाच्या दुर्गमतेची कल्पना येऊ शकेल. 

संबंधित बातम्या