मुलांसाठी सर्वकाही! 

पालक
सोमवार, 11 मे 2020

जबाबदार सुटी
मुलांना आणि पालकांना एकत्रित मिळालेली ही  पहिलीच मोठी सुटी असावी. ज्यामध्ये अजिबात घराबाहेर पडायचं  नाहीये. अशावेळी मोठी माणसं समजून घेतील, पण  मुलांचं काय? त्यांना असं  डांबून  ठेवल्यासारखं  होणार.  तरी मुलांना घरात कंटाळा येऊ नये. त्यांनी घराबाहेर जाण्यासाठी हट्ट धरू  नये, यासाठी पालक काय काय करत आहेत, ऐकूयात त्यांच्याचकडून...  

घरकामात मदत करतात
इतर वेळी मुलं काही ना काही हट्ट करत असतात, हे पाहिजे ते पाहिजे. पण सध्या परिस्थितीचं गांभीर्य त्यांनाही कळलं आहे, त्यामुळं अजिबात हट्ट करत नाहीत. सध्या कामाच्या बायका येत नसल्यामुळं घरचं सगळं मीच करते, त्यात मुलं मला मदत करतात. मॉपनं लादी पुसणं, वॉशिंग मशीन लावणं, व्हॅक्युम क्लीनरनं साफसफाई करणं अशा कामांत मदत करतात. मुलगा इशान स्वयंपाक घरातही मदत करतो. भाजी चिरतो. त्याच्या आवडीच्या भाजीला फोडणीसुद्धा देतो. माझी मुलगी गौतमी विकलांग आहे. पण तीही तिला जमेल ते करत असते. टीपॉय पुसणं, जमिनीवर काही पसारा असेल तर तो आवरणं, मी बाहेरून आले की पिशव्या आत घेणं अशा गोष्टी ती करते. मी दोघांनाही यूडेमीसाठी रजिस्टर केलं आहे. तिथं त्यांच्या आवडीचे कोर्स त्यांना निवडून दिले आहेत. त्यातही त्यांचा वेळ मजेत जातो. इशान त्याचे कोर्स मजेत पूर्ण करतो आहे, पण गौतमीला थोडा वेळ लागतो. इशान तिला त्यासाठी मदत करतो.
- गौरी टोपकर

नातवंडं स्वयंपाकात मदत करतात
माझी नातवंडं साडेतीन वर्षांची आहेत आणि जुळी आहेत. एरवी उठून आवरून शाळेत जातात, पण सध्या घरीच आहेत. आमच्याकडं भगवान महावीरांचं देऊळ आहे. शाळेत जाण्याआधी दोघं नमस्कार करून जातात, पण आता घरीच असल्यामुळं पूजेला मदत करतात. आवरून झालं, पूजा झाली की आम्ही छोटे छोटे गेम्स खेळतो, त्यात तास-दीड तास सहज जातो. नंतर दोघंही बंगल्याच्या आवारत सायकल चालवतात, जेणेकरून थोडी दमणूक व्हावी. मला आवर्जून सांगावंसं वाटतं ते हे, की आम्ही आत्तापर्यंत चार-पाच वेळा लोखंडी शेगडीमध्ये कोळसे घालून स्वयंपाक केला. त्यासाठी दोघांनीही मदत केली. डबे आणून देणं, पाणी आणणं, ताटं आणणं, अशी त्यांना जमेल ती सगळी मदत त्यांनी केली. नंतर तिथं झाडाच्या सावलीत बसून दोघं जेवले. नंतर आम्ही चूल मांडून, लाकडं घालूनही स्वयंपाक केला. त्यातही दोघांनी मदत केली. बाकी इतर लहान मुलांप्रमाणं त्यांचे खेळ सुरू असतात, जसं की आई-बाबांबरोबर सापशिडी खेळणं!
- अरविंद परमार, कोल्हापूर

मुलांना मनसोक्त मोकळीक देतो...
मुलं सध्या मुक्त खेळ ही संकल्पनाच विसरलेली आहेत, कदाचित आपणच ती त्यांना विसरायला भाग पाडलं आहे. ती जरा शांत बसली, की आपण काही ना काही त्यांच्या हातात देतोच. मग हा लॉकडाऊन तरी त्याला अपवाद असेल काय? आणि त्यात मुलांसाठी म्हणत भारंभार कल्पना, कृती, गोष्टी आणि हे करा-ते करा असं सांगत बाह्या सरसावून सज्ज असलेल्या कृतिशील सोशल मीडियाची सोबत असेल तर आणखी काय हवं!  पण या सगळ्या गोष्टींकडं  कानाडोळा करत मुलांना मनसोक्त मोकळीक आणि मागितल्यास मदत हे नेहमीचंच धोरण आम्ही सुरू  ठेवलं आणि सध्या उपलब्ध असलेल्या मोजक्याच साधनांमधून मग विविध खेळ जन्म घेऊ लागले, रोज मुक्त खेळ सुरू झाले.  बोलावणं आलं की आपलं पात्र रंगवायला जायचं एवढाच काय तो  आमचा  सहभाग. शाळा-शाळा, घर-घर  सुरू झालं. दुकान दुकान खेळताना सगळी कपाटंच बाहेर आली. हँगर्स, हूक्स वापरून कपड्यांचं  दुकान लागलं, कागदाच्या वेगवेगळ्या वस्तू करून  कलादालन भरलं, सगळी भाजी-फळं टोपलीत घेऊन भाजीवाली-फळवालाही दारावर आले, तर रंगकामाच्या ट्यूब्जच्या टूथपेस्ट आणि क्रिम्स औषधांच्या दुकानात जाऊन बसल्या. भातुकलीचा रोज नवा खेळ सुरू आहे.  त्यात ओढण्यांची दोरी बांधून कधी झोपडी,  तर कधी कौलारू  घर तर कधी चक्क मधमाशांचं  पोळं. मग घरात राहायला चिंध्यांची बाहुली झाली, बाहुलीसाठी चिंध्या गुंडाळून कपडे झाले आणि आजीच्या सुईदोऱ्याच्या  डब्यातले रीळ  बाहुलीचे  मित्र-मैत्रिणी होऊन घरीही आले.  लपाछपी, खजिन्याचा शोध, पत्ते, सांगा-सांगा, नागाफूफं असे खेळ खेळताना घरातल्या सगळ्यांचा सहभाग असावा हा मुलांचा आग्रह मात्र आम्ही जपला. रंगीत पणत्यांबरोबर प्रकाशाचा खेळ खेळताना, त्यांचे विविध रंगीत आकर्षक आकार भिंतीवर उमटवताना, स्वयंपाक घरातील साधनं वापरून  केलेला बॅंड ऐकताना आम्ही प्रेक्षक, श्रोतेच नाही तर चाहतेही झालो. खरं तर मुलांना आपण त्यांचा स्वतःचा वेळ आणि स्वातंत्र्य दिलं,  तर आपला वेळ कधी, केव्हा, कसा, कुठं हवा आहे हे तेच सुचवतील, योग्य तो प्रतिसाद द्यायची तयारी मात्र हवी. मला नाही वाटत या  सुट्यांमध्ये  त्यांच्यासाठी याहून वेगळं काही करायची गरज असेल..! 
- मृदुला भाले   

कामंही होतात आणि कंटाळाही येत नाही!
सध्या सर्वांनाच सुट्या आहेत. बाहेर जसे  पोलीस आपल्या सुरक्षेसाठी आहेत, तशीच मी घरच्यांची रक्षक म्हणून काम करत आहे. त्यांना अजिबात बाहेर जाऊ देत नाहीये. या लॉकडाऊनच्या सुट्यांमुळं  वैतागलेल्या मुलांना मी  घरातल्या कामात मदत करायला घेते, त्यात त्यांचा थोडा वेळ जातो. नंतर त्यांच्याकडून लिखाणाचा सराव करून घेते, त्यांचा शाळेतून आलेला होमवर्क करून घेते. त्यांच्याबरोबर  बैठे खेळ खेळते. उदा. सापशिडी, पत्ते, कॅरम, नाव-गाव-फळ-फुल, गाण्याच्या भेंड्या इत्यादी. शिवाय उन्हाळी वाळवणं, घराची आवराआवर यातही मुलांना मदतीला घेते, त्यामुळं  त्यांना सुटीचा कंटाळा येत नाही आणि आपलीही कामं  होतात.  
- स्मिता राव, पिंपळे निळख

कलागुण  विकसित करण्याचा प्रयत्न  
सध्या लॉकडाऊनमुळं सगळं बंद आहे. या  सुट्यांना मी संधी समजून  माझा मुलगा स्वरूपमधील  कलागुण  विकसित करण्यासाठी  प्रयत्न सुरू केले आहेत.  मुलांना या गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहित करणं  जास्त गरजेचं  आहे. त्याचं  आरोग्य चांगलं राहण्यासाठी काही व्यायामाचे प्रकार मी त्याला शिकवते. त्याचं  वाचन कौशल्य विकसित होण्यासाठी त्याला वेगवेगळी पुस्तकं  वाचायला देते. आम्ही आमच्या लहानपणी रामायण, महाभारत यांसारखे पौराणिक कार्यक्रम दूरदर्शनला बघायचो, आता ते पुन्हा सुरू  झाले आहेत,  ते आम्ही एकत्र बसून बघतो. तसंच मी  स्वरूपच्या आवडीचे पदार्थ करते आणि त्यात त्याला मदतीला घेते.  या गोष्टींमध्ये वेळही  जातो आणि स्वरूप खूशही  होतो.  
- संपदा मोरे, पिंपळे गुरव

न चुकता काही गोष्टी एकत्र करतो..
लॉकडाऊन जाहीर झाला आणि सुरुवातीचे एक-दोन दिवस आराम करण्यात गेले. पण मग विचार केला, की हा संपूर्ण कुटुंबाला एकत्र मिळालेला वेळ पॉसिटिव्हली कसा वापरता येईल ते पाहूया. जे खरं तर रोज करायला हवंय, पण एरवी जमत नाही ते करायचं. काही नवीन गोष्टी शिकायच्या, ज्यांचा उपयोग मुलींना पुढं आयुष्यभर होईल आणि हा लॉकडाऊनचा काळ संपायलापण मदत होईल. मग आम्ही चौघांनी बसून चर्चा केली आणि एक रुटीन ठरवलं.
यूट्युबवर बघून का होईना पण रोज सकाळी अर्धा तास व्यायाम करायचा. स्वच्छता आणि आरोग्याची एक सवय म्हणून रोज एकीनं संपूर्ण घराचा केर काढायचा. रोज एखादी स्वयंपाकघराशी संबंधित गोष्ट मुलींनी करायची - यात मग एखादी सोपी भाजी चिरायची, शेवटची पोळी करायची, आपला डोसा आपण घालून घ्यायचा, या गोष्टी मुली शिकल्या. स्वतःला शिस्त म्हणून काही स्तोत्र पाठ करायची, ज्याचा कॉन्सन्ट्रेशनसाठीही छान उपयोग होतोय. त्यात सकाळी अंघोळ झाल्यावर अथर्वशीर्ष, रात्री रामरक्षा आणि मारुतीस्तोत्र न चुकता रोज म्हटल्यामुळं आता ही स्तोत्रं जवळपास पाठ झाली आहेत. दर वीकएन्डला सगळ्यांनी एकत्र बसून दोन सिनेमे बघायचे. एक दिवस मुलींनी सुचवलेला आणि एक दिवस आम्ही सुचवलेला. यातही मजा येतेय. मुलींची आवडपण छान आहे हे लक्षात आलंय. मुलींच्या आवडीचे इंग्लिश सिनेमे जसे की कोको, पॅडिंग्टन, बेडटाइम स्टोरीज हे बघताना मजा आली आणि शोले, कभी खुशी कभी गम, डिअर जिंदगी असे वेगवेगळे सिनेमे मुलींनीही आमच्यासाठी बघितले आणि विशेष म्हणजे त्यांनाही आवडले. 
दिवसभरात एकदा एकत्र बसून न्यूज बघतो, त्यामुळं बाहेर संपूर्ण जगात जी भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्याच्याशी वेगवेगळ्या स्तरातील लोक कसा लढा देत आहेत त्याची जाणीव मुलींना होते आहे. 
सकाळी १० पासून शाळा, क्लास आणि ऑफिस, त्यामुळं सगळेच ऑनलाइन असतो आणि आपापल्या व्यापात असतो. पण दिवसभरात या गोष्टी न चुकता एकत्र करतोय आणि आता जवळ जवळ ४० दिवस होत आले, त्यामुळं या सगळ्या गोष्टी मुलींना छान जमायला लागल्या आहेत. त्यांचा उपयोग पुढच्या आयुष्यात जगाच्या पाठीवर त्यांना कुठंही एकटं जावं लागलं, राहावं लागलं तरी नक्कीच होणार आहे. 
- शिल्पा गोडबोले

कधी चित्रकला, तर कधी भातुकलीचा खेल मांडला
सुट्यांसाठी माझी नात आमच्याकडं राहायला आली आणि दोनच दिवसांनी सरकारने लाॅकडाऊन जाहीर केलं. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. पाच वर्षांची चिमुरडी आईशिवाय इतके दिवस कशी राहणार? मग तिला व्यग्र ठेवण्यासाठी आमचे वेगवेगळे प्रयोग सुरू झाले. दिवसाची सुरुवात रामायणसारख्या कार्यक्रमानं केली. मग ते चिमुरडे हात देवाच्या पूजेसाठी मदत करू लागले. तिच्याबरोबर वेळ कसा जाऊ लागला तेच कळत नव्हतं. कधी ओरिगामी, चित्रकला; तर कधी आम्ही भातुकलीचा खेळ मांडला. उशीचं घर, लोडची घसरगुंडी, साडीचा झोका... नाना शकला काढून झाल्या. मधला कावळा, पकडा पकडी, लपंडाव अशा खेळानं दुपार सरू लागली आणि आमच्या चिमुरडीबरोबर आम्ही रमू लागलो. पण, कितीही केलं तरी आईची उणीव भासणारच. मग ती उणीव ही आजकालची मुलं दिवसभर पडीक असतात, त्या व्हॉट्सॲपनं भरून काढली ना! आमची नातदेखील रमू लागली... रोज एकाच आशेनं.. हा कोरोना कधी संपणार आणि मी कधी घरी जाऊन आईला बिलगणार!
- संगीता बोडके, पिरंगूट

मुलांबरोबर खेळ खेळण्यात वेळ जातो.. 
शाळेच्या सुट्या  असल्यावर मुलांना बाहेर जाऊन खेळता तरी येतं.  पण सध्या कोरोनासारख्या आजारामुळं  मुलांना बाहेर जाता येत नाही. त्यामुळं  घरातच त्यांना व्यग्र ठेवणं  हे पालकांसमोर मोठं  आव्हान आहे. आमच्या घरात  रोजच्या कामातून वेळ काढून आम्ही सर्वजण एकत्र बसून गप्पा मारतो. मुलांना त्यांच्या आवडीचे पदार्थ करून देतो. त्यासाठी त्यांना मदतही करायला लावतो. शिवाय  मुलांना एखादा विषय देऊन त्या विषयावर बोलायला सांगतो, जेणेकरून त्यांची विचारशक्ती  वाढायला मदत होईल. मुलांच्या आवडीनुसार त्यांच्याबरोबर  डॉक्टर, पोलीस  यांसारखे  'रोल-प्ले'चे खेळ खेळतो. त्यामुळं  मुलांमध्ये स्टेज डेरिंग  वाढतं. सध्या मोबाइलमध्ये वेगवेगळे ॲप  उपलब्ध  आहेत, त्या ॲप द्वारे  मुलांबरोबर  वेगवेगळे व्हिडिओ तयार करतो, त्यात  मुलं  अधिकच खूश होतात आणि दिवस कसा संपून जातो हे कळतच नाही.
- समृद्धी मते, औंध  

क्राफ्टच्या वस्तू शिकवण्यात जातो वेळ
मी मुलांना दिवसभर व्यस्त ठेवण्यासाठी घरातील कामांमध्ये मदत करायला सांगते. मुलांना बागेत काम करायला आवडतं,  म्हणून त्यांना बागेतील झाडांना पाणी घालणं, फुलांचा हार तयार करणं  अशी कामं  करायला सांगून त्यांना गुंतवून ठेवते. सकाळी थोडा वेळ व्यायाम करून घेतल्यानं मुलांचा आळसही जातो. नंतर त्यांच्या आवडीचे टी.व्ही. शोज, कार्टून  बघू देते,  त्यामध्ये ते  रमतात. शिवाय सर्वजण मिळून घरात सापशिडी, लुडो,  कॅरम असे  बोर्ड गेम्स खेळतो. शिवाय क्राफ्टची  आवड असल्यामुळं  मुलांना कागदापासून विमान, होडी, पंखा अशा वस्तू तयार करायला शिकवते,  त्यामुळं  मुलं  खूश होतात आणि व्यग्र राहतात.
- संध्या दारविटकर, औंध

संबंधित बातम्या