सुटीतही राहा कृतिशील

ज्योती केमकर
सोमवार, 11 मे 2020

जबाबदार सुटी : लर्न विथ फन
यंदा शाळेला चांगली मोठी सुटी मिळाली असली, तरी घराबाहेर मात्र पडता येत नाहीये. अशा वेळी घरी बसून करायचे काय? उपलब्ध साहित्यात काही वेगळे प्रयोग करून स्वतःचे मनोरंजनही करता येईल आणि ज्ञानातही भर पडेल...!

दरवर्षी मे महिन्याच्या सुटीची आतुरतेने वाट पाहिली जाते. या वर्षी ही सुटी जरा आधीच सुरू झाली. परीक्षेशिवायच! सुटीचे कारण वेगळे असले, तरी योग्य काळजी घेऊन आपण लवकरच यातून बाहेर पडू हे नक्की. तोपर्यंत घरबसल्या ही सुटी आपण नक्कीच सत्कारणी लावू शकतो. सत्कारणी अशासाठी, की इतका शांत, निवांत वेळ आपल्याला क्वचित मिळतो. रोजच्या धावपळीच्या रुटीनमधे खूप गोष्टी करायच्या राहून जातात. त्या आता करता येतील.
शालेय विद्यार्थ्यांचा दिनक्रम तर फारच धावपळीचा असतो. शाळा, अभ्यासाचा आणि असलाच तर एखाद्या छंदाचा क्लास, ग्राऊंड, घर यातली अंतरे आणि प्रवास, शाळा, क्लास दोन्ही ठिकाणचा गृहपाठ, शाळेतले प्रकल्प, परीक्षेची तयारी, एक परीक्षा संपली की दुसऱ्या परीक्षेची तयारी सुरू... प्रत्येक गोष्ट अभ्यास, परीक्षा, मार्क याच्याशी जोडली जाते. शाळेचे शिक्षण महत्त्वाचे आहे, कारण माणसाला माणूस म्हणून समज आल्यापासून त्याने इतक्या वेगवेगळ्या गोष्टींचे ज्ञान मिळवले आहे, की त्यातल्या रोजच्या व्यवहारात आवश्यक असलेल्या काही गोष्टी टप्प्याटप्प्याने, सुसंगतपणे आणि पद्धतशीर शिकणे गरजेचे आहे. ते आपण शाळेत शिकतो. त्याबरोबर स्वावलंबी जगण्यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टी, शाळेत मिळवलेले ज्ञान प्रत्यक्ष उपयोगात आणण्यासाठी लागणारी कौशल्ये शिकणे गरजेचे असते, त्या शिकायचे राहून जाते. 
या लेखात आपण हसत खेळत मुलांच्या क्षमता, कौशल्ये वाढवणाऱ्या काही उपक्रमांची/प्रकल्पांची माहिती घेऊ.  

उपक्रम १ : वस्तू एक विचार अनेक
आपले मन कधीच एका सरळ दिशेने विचार करत नाही. आपल्याला एखादी वस्तू/व्यक्ती/फोटो/चित्र दिसले, एखादा शब्द कानावर पडला की आपल्या पूर्व अनुभवानुसार त्या गोष्टीचे अनेक पैलू आपल्या मनात येतात. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या अशा काही वस्तूंची नावे इथे देत आहे. त्यांच्याबद्दल आणखी माहिती मिळवता येईल, काही नवा विचार करता येईल असे मुद्दे देत आहे.
१) वस्तूचे नाव, वस्तूचे भाग  २) प्रकार  ३) उपयोग  ४) कशापासून तयार झाली आहे?  ५) त्या वस्तूचा शोध कोणी लावला/कसा लागला? - थोडक्यात त्या वस्तूचा इतिहास.  ६) त्या वस्तूचे आत्मवृत्त लिहिणे.  ७) चित्र काढणे.  ८) प्रतिकृती तयार करणे.
९) काम/उपयोग कोणत्या वैज्ञानिक तत्त्वावर आधारित आहे?
वस्तू/विषय - घड्याळ, पंखा, घर, रंग, वाद्ये, कात्री..
तुमच्या मनाने तुम्हाला आणखीही अनेक वस्तू/विषय नक्कीच निवडता येतील... करा विचार.

उपक्रम २ : नातेवाईकांची ओळख करून घ्या
१) नातेवाईकांची नावे लिहून काढा. 
२) त्यांच्याबरोबर काय नाते आहे? ते काय काम करतात? घरी कोणकोण असते? फोन नंबर काय आहेत? या प्रश्‍नांची उत्तरे शोधा. 
३) वाढदिवस कधी असतात? त्याप्रमाणे त्यांना भेट देण्यासाठी काही भेटवस्तू किंवा भेटकार्ड तयार करू शकता.

उपक्रम ३ : लाँग फॉर्म शोधा
दैनंदिन व्यवहारात आपण अनेक इंग्लिश शब्दांचे शॉर्टफॉर्म (लघुरूपे) वापरत असतो. त्यांचे लाँग फॉर्म (मूळ विस्तारित रूप) शोधा. तुम्हाला असे कोणकोणते शॉर्टफॉर्म माहीत आहेत?
उदाहरणार्थ -
LBW, GST, IT, IIT, IPS, UPSC, MLA, SSC...
आणखी डोके चालवा बरे.. तुम्हालाही खूप सापडतील, शॉर्टफॉर्म आणि त्यांचे लाँग फॉर्मही.

उपक्रम ४ : सारखे काय वेगळे काय
कोणताही निर्णय घेताना आपण आपले पूर्वानुभव आणि सध्याची परिस्थिती यांची तुलना करून निर्णय घेतो. तुलना करण्यासाठी साम्य आणि फरक यांचा विचार केला जातो. निरीक्षण करून साम्य, फरक शोधायची सवय मुलांना लहानपणापासून असेल, तर पुढे लहान मोठे निर्णय घेताना त्याचा नक्कीच उपयोग होतो. तुमच्या आजूबाजूच्या कोणत्याही दोन वस्तू निवडा आणि त्यातील साम्य आणि फरक शोधा.
उदा : प्रेशर कुकर आणि गॅसची शेगडी
साम्य : दोन्ही मानवनिर्मित आहेत. दोन्ही स्वयंपाकघरात असतात. दोन्हीचा उपयोग स्वयंपाकासाठी होतो.
फरक : गॅसशेगडीचा उपयोग होण्यासाठी इंधनाची - एलपीजीची गरज असते. प्रेशर कुकरच्या उपयोगासाठी रिंग आणि शिट्टीची गरज असते.
अन्न कुकर‘मध्ये’ ठेवतो. अन्न गॅसशेगडी‘वर’ ठेवतो. कुकर गोल असतो. गॅसशेगडी आयताकृती असते. विचार केलात तर असे किती तरी साम्य - फरक तुम्हाला नक्की सापडतील. उदाहरणार्थ काही वस्तूंच्या जोड्या सुचवत आहे. - फोटोफ्रेम आणि घड्याळ, टीव्ही आणि फ्रिज, स्कुटर आणि कार

उपक्रम ५ : काय व कसा उपयोग होतो
तुम्ही राहता, त्या परिसरात काही झाडे, वनस्पती नक्कीच असतील. तुम्हाला त्यांची नावे माहीत आहेत? नसतील तर माहीत करून घ्या. प्रत्येक झाडाचा सवली देणे आणि ऑक्सिजन देणे याशिवाय काही ना काही उपयोग नक्कीच असतो. असे वेगवेगळ्या झाडांचे, वनस्पतींचे उपयोग आपल्याला माहीत असतील, तर आपल्या पर्यावरणाचे रक्षण करताना तुम्हाला त्याचा जरूर उपयोग होईल. झाडांची माहिती घेताना हे मुद्दे उपयोगी पडतील.
१) झाडाचे नाव  २) प्रकार - वृक्ष/ झाड/ झुडूप  ३) अंदाजे किती उंच वाढते?   ४) पाने कशी आहेत? साधी/संयुक्त  ५) पानांचा रंग  
६) फुले/फळे येतात का?  ७) येत असतील तर त्यांचा रंग आणि आकार  ८) चित्र काढून तशाच रंगाच्या शेडमध्ये रंगवायचा प्रयत्न करता येईल.  ९) काय उपयोग होतो?   १०) नवीन झाड कसे येते? बी/फांदी/मुळे?

उपक्रम ६ : निरीक्षणे
१) घरात असताना कोणकोणत्या वस्तूंचा वापर जास्तीतजास्त केला गेला?  २) कोणत्या वस्तूंचा वापर अजिबात झाला नाही?  ३) कोणत्या वस्तू गरज होती पण मिळाल्या नाहीत?  ४) घरात सर्व कारणांसाठी मिळून दररोज एकूण किती पाणी वापरले जाते? म्हणजे माणशी किती पाणी लागते?

उपक्रम ७ : चला स्वयंपाक करू
‘स्वयं’पाक म्हणजे स्वतःसाठी स्वतः शिजवलेले अन्न. आपल्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या अनेक परंपरांपैकी एक म्हणजे पाककलेची परंपरा. भारतात सर्व प्रांतांमध्ये पाककलेची अतिशय समृद्ध परंपरा आहे. आत्ता भरपूर आणि सलग वेळ मिळतो आहे. त्याचा फायदा घेऊन काही पारंपरिक पदार्थ नक्की शिकता येतील. मोठेपणी शिक्षण, कामासाठी इतर ठिकाणी जाऊन राहायची वेळ आली, तर स्वतःचे आरोग्य सांभाळण्यासाठी, विशेष प्रसंग छान साजरे करण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या परंपरा जपण्यासाठी पाककलेचा नक्कीच उपयोग होईल. मोठेपणी जरी या कामासाठी मदतनीस मिळण्याची शक्यता असली, तरी आपल्याला स्वयंपाक येत असेल तर आपण आपल्या चवीप्रमाणे त्यांच्याकडून करून घेऊ शकतो. पाककला शिकण्यासाठी तुमचे कुटुंबीय, इतर नातेवाईक यांची नक्की मदत होईल. ज्याचा जो पदार्थ चांगला होतो, त्याच्याकडून तो शिकता येईल. तुमच्यासाठी विशेष आठवणी निर्माण होतील. इंटरनेटवर तर मार्गदर्शक साहित्य भरपूर उपलब्ध आहे. शिकताना खलील मुद्द्यांचा विचार करता येईल.
१) पदार्थाचे नाव  २) लागणारे साहित्य  ३) किती माणसांसाठी किती प्रमाण  ४) कोणती भांडी लागतात?  ५) तयारीसाठी आणि प्रत्यक्ष करण्यासाठी किती वेळ लागतो?  ६) कोणत्या विशेष प्रसंगी करतात?  ७) पदार्थ तयार करण्यासाठी चांगल्या दर्जाचे, ताजे साहित्य कसे निवडायचे? कुठून आणायचे?  ८) पदार्थ किती टिकतो?  ९) किती खर्च आला?  १०) हाच पदार्थ याच प्रमाणात विकत आणला तर किती खर्च येईल?  ११) पदार्थातील पोषक मूल्ये कोणती?

उपक्रम ८ : इंधन वाचवूयात
सध्या सौरऊर्जेचा वापर करून कोणकोणती कामे करता येतील? त्यामुळे इंधनाची बचत कशी होईल? - यावर विचार करूया.
हे सर्व उपक्रम घरात असलेल्या वस्तू/साहित्य वापरून मुलांना करता येण्यासारखे आहेत. मदत करायला पालक आणि इंटरनेट आहेतच. आणखीही नवीन कल्पना सुचत राहतील, त्या जरूर करून पाहा.
अशा उपक्रमातून मुलांची निरीक्षणशक्ती, स्वतः एखादी गोष्ट करून बघण्याची धडपड, चुकले तरी प्रयत्न न सोडता पुन्हा करून बघणे, चिकाटी, स्वावलंबन, प्रयोगशीलता यासारख्या क्षमता नक्कीच वाढत असतात..
सुटीत कृतिशील राहण्यासाठी सर्वांना शुभेच्छा!

संबंधित बातम्या