निरीक्षणातील गंमत

मकरंद केतकर
सोमवार, 11 मे 2020

जबाबदार सुटी : मैत्री भोवतालाशी
घरबसल्या खूप काही करण्यासारखं असतं. नुसत्या निरीक्षणामधून तुम्ही स्वतःची करमणूक करू शकता... कशी? तुमच्या घरामधल्या, बागेमधल्या जीवसृष्टीच्या निरीक्षणातून! ते कसं करायचं...? तेच तर या सदरामधून जाणून घ्यायचं आहे.

काय मग बच्चे लोग? कसा चाललाय लॉकडाऊनमधला वेळ? मला माहिती आहे तुमच्या हक्काच्या सुटीत तुम्हाला नाईलाजानं घरी बसावं लागतंय, पण आपल्या देशाच्या भल्यासाठी एवढं तर आपण नक्कीच करू शकतो ना? तर मग सगळ्या गूड बॉईज आणि गूड गर्ल्सचा हा प्रश्न असतो, की आम्ही घरबसल्या काय करू शकतो? जंगलात हिंडणारा तुमचा दादा म्हणून मी सांगेन, तुम्ही घरात वाइल्डलाइफ शोधा. रोज दिसतात म्हणून पाल, किडे, पक्षी, प्राणी यांच्याकडं तुम्ही आजवर दुर्लक्ष केलं असेल, तर या संधीचा वापर तुमची निरीक्षणशक्ती वाढवण्यासाठी करा, ज्याचा उपयोग तुम्हाला भविष्यात इतर क्षेत्रात काम करतानाही नक्कीच होईल. 

निरीक्षण म्हणजे ते कधी दिसतात, काय खातात, काय आवाज करतात, कुठं राहतात वगैरे वगैरे... आणि हे शक्यतो वहीत नोंदवत चला. हे जर तुम्ही सातत्यानं केलं, तर त्या प्राण्याबद्दल तुमच्याकडं एक छान माहिती जमा होईल, जी तुम्ही इतरांबरोबरही शेअर करू शकाल आणि त्यांनाही नवीन काहीतरी शिकण्याचा आनंद देऊ शकाल. हे मी का सांगतोय हे प्लीज लक्षात घ्या. ‘हॅ! यात काय बघायचंय?’ असं तुम्ही जेव्हा म्हणता, तेव्हा ज्ञानात भर घालण्याची आणि नवीन काहीतरी शिकण्यातला आनंद मिळवण्याची संधी तुम्ही गमावत असता. आता माझंच बघा ना.. तुमच्यासारखाच मीही घरातच बसलोय. पण इतके दिवस माझ्या बागेतल्या झाडांवर एक छोटी कलाकार येतेय याचा मला पत्ताच नव्हता. अर्थात ती कलाकार आणि तिची कलाकृती माझ्या परिचयाची होती, पण या निमित्तानं मला तिची ओळख आणि माहिती घरातल्या मंडळींनाही करून देता आली. आज तिच्याबद्दल थोडंसं तुम्हालाही सांगतो.

बागेमध्ये फेरी मारत असताना मला एका झाडाची पानं छान अर्धगोलाकार कातरलेली दिसली. पण सुरवंट किंवा कीटक जसं अर्धवट कुरतडून ठेवतात तसं हे काम नव्हतं. यात एक पॅटर्न होता. म्हणजेच काही विशिष्ट कामासाठी केलेलं हे जॉबवर्क होतं. ही कामगिरी केली होती ‘लीफ कटर बी’ नावाच्या माशीनं. मधमाशीसारखी दिसणारी ही माशी समूहानं न राहता एकटीच राहते आणि प्रजोत्पादनासाठी हिला निमुळत्या आणि लांबुडक्या छिद्राची गरज असते. मग ते नैसर्गिकच असलं पाहिजे असं नाही. माझ्या ऑफिसमध्ये ओव्हनच्या पत्र्याला पडलेल्या भोकात तिनं नेस्टिंग सुरू केलं होतं. अशाप्रकारे अर्धचंद्राकृती आकाराची कातरलेली पानं ती निवडलेल्या बोळात घेऊन जाते आणि भेळेच्या कागदाचा कोन असतो तसा आकार करून, जेवढी जागा असेल तेवढे तुकडे आणून ते एकात एक खुपसत जाते. पण एका तुकड्यावर दुसरा खुपसण्याआधी ती प्रत्येक तुकड्यात परागकण आणि मकरंद आणून ठेवते व एक अंड घालते. काही माशा गुलाबासारख्या फुलांच्या पाकळ्या कातरून नेतात. अशाप्रकारे पानांची किंवा पाकळ्यांची नळी तयार झाली, की ती तिकडून निघून जाते. अंड्यातून बाहेर आलेली अळी आईनं पुरवलेलं अन्न फस्त करून कोषात जाते व प्रौढत्व मिळाल्यावर पानं कुरतडून बाहेर येते. प्रौढ माशी परागकण आणि मकरंद यांचं सेवन करते. मधमाशीप्रमाणंच हिच्याही पोटाच्या शेवटी डंख मारणारी नांगी असते, मात्र तो डंख तितकासा वेदनादायी नसतो. निसर्गाच्या चक्रात इतर अनेक कीटकांप्रमाणंच ही माशीसुद्धा परागीभवनाचं अत्यंत महत्त्वाचं कार्य पार पाडत असते. माळ्यांसाठी मात्र ती त्रासदायक असते, कारण त्यांनी मेहनतीनं तयार केलेल्या झाडांच्या कलाकृतीची पानं कातरून ती त्या कलाकृतींना काहीसं विद्रुप करते.

तर मंडळी सांगायचा मुद्दा काय, की हे कोणी केलंय मला माहीत होतं आणि करणारीला प्रत्यक्ष करताना पूर्वी पाहिलंही होतं म्हणून आश्चर्य वाटलं नाही, पण तुम्ही जर असं काही पहिल्यांदा पाहात असाल तर त्याची नोंद घेण्यास विसरू नका. त्यातून डोक्याला खुराक तर मिळेलच, पण रिकामा वेळ सत्कारणी लागल्याचा आनंदही लाभेल.

संबंधित बातम्या