सोशल मीडियाचा प्रभावी वापर

गौरीश देशपांडे 
सोमवार, 11 मे 2020

जबाबदार सुटी : सोशल लर्निंग
लहान वयातच  मुलांच्या कलागुणांना वाव मिळाला, तर  पुढील आयुष्यात त्यांना नक्कीच त्याचा जास्त फायदा होतो.  सध्या मुलांना वेळही भरपूर आहे आणि हातात माध्यमंही बरीच उपलब्ध आहेत. यातील प्रभावी माध्यम म्हणजे सोशल मीडिया. या  सोशल मीडियावर  मुलांसाठी उपयुक्त  असणाऱ्या  वेबसाइट्स  आणि ॲप्सची थोडक्यात  माहिती...  

काही मुलांना लिहिण्याची आवड असते, तर काहींना गाण्याची आवड असते. काही मुलांची चित्रकला अप्रतिम असते, तर  काही मुलांना भाषेचं उत्तम ज्ञान असतं. त्यामुळं मुलांना त्यांच्या आवडत्या विषयाची आणखी माहिती करून घ्यायला किंवा शिकायला जास्त आवडतं. अशा मुलांसाठी सोशल मीडिया फायदेशीर ठरतो.  या लेखात आपण सोशल मीडियाचा प्रभावी वापर कसा करायचा याविषयी चर्चा करणार आहोत. 

...तर मित्रांनो, सोशल मीडिया म्हणजे नक्की काय? बऱ्याच जणांच्या  मनात उत्तर येईल फेसबुक, व्हॉट्‌सॲप, इन्स्टाग्राम वगैरे. बरोबर आहे, या  आहेत  सोशल नेटवर्किंग  साइट्स. पण  यांचा  वापर करून आपल्याला काही नवीन शिकता येत नाही. पण इंटरनेटचा वापर करून आपण बऱ्याच नवीन  गोष्टी शिकू शकतो. सोशल मीडियावर लाखो वेबसाइट्सवर वेगवेगळ्या प्रकारचं  शिक्षण, प्रशिक्षण  दिलं  जातं. त्यातीलच काही तुम्हाला उपयोगी पडतील अशा  वेबसाइट्स आणि ॲप्स बघूयात..   

ब्लॉग 
काही वेळा होतं काय,  की घरातली मोठी माणसं  बोलत असतात आणि त्यावर आपल्याला चांगलं काहीतरी सुचवायचं असतं, म्हणून त्यांच्या मधेच आपण बोलतो.  तेव्हा घरच्यांकडून ऐकायला मिळतं, 'मोठी माणसं बोलत असताना लहानांनी  मधे  बोलू नये.' मग इच्छा असूनसुद्धा आपल्याला आपलं मत मांडता येत नाही. मित्रांनो, ब्लॉग हे असं माध्यम आहे, जिथं  तुम्ही व्यक्त होऊ शकता. आज जगभरात कोट्यवधी माणसं  ब्लॉग वाचतात, लिहितात. त्यामध्ये  अगदी खाद्य पदार्थांपासून राजकीय गोष्टींपर्यंत सगळ्या विषयांवर लिहिलं जातं.  ब्लॉगचा फायदा असा की तुम्ही तुमचे विचार जगभरातील लोकांपर्यंत  पोचवू  शकता,  निर्भीडपणे मांडू शकता आणि त्यावर चर्चा घडवून आणू शकता.  जर तुमच्या ब्लॉगला मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळत असतील,  तर तुम्ही ब्लॉगच्या माध्यमातून पैसेसुद्धा मिळवू शकता. हा  विषय फार नंतरचा आहे. पण  आता व्यक्त होणं महत्त्वाचं आहे.  पण  जर तुम्हाला लिहायची इच्छा नसेल, मात्र वेगवेगळ्या विषयावर वाचायला आवडत असेल किंवा एखाद्या विषयावर जास्त माहिती हवी असेल, तर तो विषय गुगलवर सर्च करून तुम्ही इतरांनी लिहिलेले ब्लॉग नक्कीच वाचू शकता. यामध्ये साहित्याबरोबरच, ट्रॅव्हल, फूड अशा अनेक विषयांवर ब्लॉग असतात.

ज्यांना ज्यांना लिहायचं आहे, त्यांना  आता प्रश्न पडला असेल की ब्लॉग कसा काढायचा?  तर सर्वात प्रथम ब्लॉगर/वर्डप्रेस (Blogger.com / WordPress.com)  या वेबसाइटवर जायच. तिथं नवीन अकाउंट सुरू करण्याचा पर्याय असतो. त्यावर क्लिक केल्यावर येणाऱ्या रकान्यात आपली माहिती भरायची आणि आपला ब्लॉग सुरू करायचा. नंतर  ब्लॉगला  साजेसं, आपल्या आवडीचं  नाव द्या. झाला तुमचा ब्लॉग तयार!

शैक्षणिक ॲप्स व यूट्युब चॅनेल्स
सध्या सर्व शाळा कॉलेजेस  बंद आहेत. झूम, गुगल क्लासरूम इत्यादी प्लॅटफॉर्म वापरून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विविध शिकवण्या  घेतल्या जात आहेत. त्याचबरोबर काही शैक्षणिक अॅप्स आहेत, जे  आपल्याला या कामी उपयोगी पडतील. कधीकधी होतं असं  की एखादा टॉपिक आपल्याला शाळेत शिकवताना कळलेला नसतो.  मग आपण यूट्युबवर त्यासंबंधी  व्हिडिओ पाहतो,  पण तरीसुद्धा आपल्याला समजत नाही. अशा वेळी बायजु, अन ॲकेडमी यांसारखे शैक्षणिक ॲप्स  आपण वापरू शकतो. त्यात शालेय अभ्यासक्रमाला धरून तयार केलेले  व्हिडिओज  असतात.  जे नक्कीच उपयोगी पडतात. युडेमी, युडासिटी यांसारख्या साइट्सवर मोठ्या प्रमाणावर सर्टिफाईड कोर्सेस उपलब्ध आहेत. तुम्ही तुम्हाला हव्या त्या विषयातील कोर्स तिथं करू शकता. त्या कोर्सचा कालावधी संपला,  की त्याची परीक्षा असते.  ती उत्तीर्ण झालं की आपल्याला सर्टिफिकेट दिलं जातं. ऑनलाइन  कोर्सची वाढती मागणी पाहता भारत सरकारनं  स्वतःचा असा 'स्वयम' नावाचा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. त्यावर विविध क्षेत्रातील शेकडो कोर्स उपलब्ध आहेत. केवळ सरकारीच  नाही,  तर  कॉर्पोरेट  क्षेत्रातील अनेक खासगी कंपन्यासुद्धा विविध कोर्स उपलब्ध करून देत आहेत. टाटा स्टील ही कंपनी ऑनलाइन कोर्स नाममात्र म्हणजे एक  रुपया फी आकारून पुरवत आहे. खान अॅकॅडमी नावाचं एक यूट्युब चॅनेल आहे. त्यावर शैक्षणिक विषयावर  सर्व प्रकारचे व्हिडिओज पाहता येतील. अनेक वेळा आपल्या काही प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित राहतात. 'कोरा' ही अशी वेबसाइट आहे, त्यावर तुम्ही तुमचे प्रश्न अगदी न लाजता विचारू शकता.  कोरावर जगभरातील लाखो माणसं जोडली गेली आहेत. त्यामुळं तिथं तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणारे अनेक जण असतात.

हे झालं सर्व शैक्षणिक अभ्यासक्रमाविषयी,  पण जर तुम्हाला तुमच्या कलाविषयक आवडी जोपासायच्या असतील,  तर ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर करून तुम्ही एखादं वाद्य शिकू शकता किंवा गाणी म्हणू शकता. 'संगीत विद्यालय' नावाची एक वेबसाइट आहे.  या  वेबसाइटच्या  माध्यमातून तुम्हाला  बासरी, तबला, गिटार, पियानो इत्यादी वाद्यांचे ऑनलाइन धडे गिरवता येतील. एखाद्याला शास्त्रीय संगीताविषयी कुतूहल असतं, आवड असते,  पण काही कारणास्तव ते शिकता येत नाही.  पण आता तेही सहज शक्य आहे. त्यासाठी  'रियाझ' नावाचं एक ॲप्लिकेशन आहे. त्यावर तुम्हाला अगदी बेसिक्स पासून सर्व गोष्टी शिकवतात. जर तुम्हाला चित्रकलेची आवड असेल आणि अजून चांगल्या पद्धतीनं  चित्रं काढायची असतील,  तर 'थॉटको'  (thoughtco.com), 'क्लीनक्रिएटिव्ह' यांसारख्या वेबसाइट तुमच्या उपयोगी पडतील. आपण शाळेत टाकाऊपासून टिकाऊ गोष्टी करायचा प्रोजेक्ट करतो. अगदी तसंच 'फाईव्ह मिनिट्स क्राफ्ट' नावाच्या यूट्युब चॅनेलवर घरातील उपलब्ध वस्तूंमधून  आपण घरी वापरण्यासाठी शोभेच्या वस्तू तयार करू शकतो. आपल्याला सगळ्यांनाच 'अॅमेझॉन' माहिती आहे, ती एक ई-कॉमर्स वेबसाइट आहे. त्यावर हव्या त्या गोष्टी आपल्याला मिळू शकतात.  तसं तिथं आपल्याला 'किंडल रीडर'सुद्धा मिळतो.  त्यावर विशिष्ट रक्कम भरून आपण ई-बुक्स वाचू शकतो. त्याचबरोबर इंटरनेटवर अनेक ई-बुक्स मोफतसुद्धा मिळतात.  जी आपण आपल्या मोबाइल मधील रीडरमध्ये वाचू शकतो. आपल्याला अनेक जण नेहमी म्हणतात,  'अरे किती तो मोबाइल वापरतोस, त्यापेक्षा जरा पुस्तकं वाच'. असं म्हणणाऱ्या लोकांना आपण मोबाइलमध्ये वाचत असलेलं पुस्तक नक्कीच दाखवू शकतो.

टेड टॉक्स  
अनेक जण मोटिव्हेशनल व्हिडिओ पाहात असतील.  टेड-जोश इत्यादी टॉक्स ऐकत असतील. टेड टॉक्सच्या  (www.ted.com) वेबसाइटवर तुम्हाला विविध विषयांवर हजारो वक्त्यांनी दिलेली त्यांची व्याख्याने ऐकायला मिळतील. त्याचबरोबर टेडच्या वेबसाइटवर 'टेड एड' (https://www.ted.com/about/programs-initiatives/ted-ed) नावाचा टॅब दिसेल. हे टेड एड म्हणजेच टेडचा एज्युकेशन क्लब आहे. या  टेड एडच्या माध्यमातून तुम्ही तुमचा क्लब तयार करू शकता. हा क्लब पूर्णपणे ऑनलाइन स्वरूपाचा असतो. या  क्लबवर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना  अॅड करू शकता. नवीन नवीन संकल्पना समजून घेऊ शकता.  जगभरातील मुलांशी वैचारिक देवाणघेवाण करू शकता. तुम्ही तुमची आयडिया इतरांसमोर मांडू शकता त्यावर इतरांचं मत पाहू शकता. ही एक शैक्षणिक चळवळ आहे व याला  जगभरातून सुमारे अडीच लाख सदस्य जोडले गेलेले आहेत. एखाद्या विषयाला अनुसरून जगभरातील मुलांना जोडले जाण्याची संधी तुम्हाला इथं  मिळू शकते.  दररोज काही लाख शिक्षक व विद्यार्थी या वेबसाइटला भेट देतात. आता विद्यार्थ्यांना वेळ उपलब्ध आहे, तर  याचा  फायदा नक्कीच ते घेऊ शकतात.

 मी शाळेत असताना आमच्या वर्गात एक  दिल्लीचा मुलगा होता.  त्याचं इंग्लिश आणि हिंदी अतिशय उच्च दर्जाचं होतं. शिवाय इथं  राहून तो मराठीदेखील उत्तम शिकला होता. सहाजिकच आम्हा सगळ्यांना त्याच्याबद्दल कुतूहल वाटायचं व त्याच्यासारख्या वेगवेगळ्या भाषा बोलता याव्यात असं वाटायचं. आम्हालाच काय प्रत्येकालाच वेगवेगळ्या भाषेबद्दल कुतूहल असतं. सध्या विविध शहरांत जर्मन,  जापनीज, स्पॅनिश, फ्रेंच इत्यादी भाषा शिकवण्याचे क्लासेस आहेत. त्याचबरोबर शाळांमधूनही या  भाषा शिकवल्या जातात. घरी राहून तुम्हीही  ऑनलाइन माध्यमातून अशा वेगवेगळ्या भाषा शिकू शकता.  काही पैसे आकारून भाषा शिकवणाऱ्या अनेक वेबसाइट आहेत.  तसेच काही फ्री वेबसाइट्ससुद्धा आहेत. त्यावर तुम्ही जगभरातील कोणतीही भाषा शिकू शकता. यूट्युबवर अनेक चॅनेल्स आहेत,  जी तुम्हाला जर्मन, फ्रेंच शिकवतील. सध्या घरात आहात तर नवनवीन भाषा शिकायचा प्रयत्न करा, म्हणजे वेळही जाईल, त्याचबरोबर नवीन भाषा येत असल्यामुळं मित्रांमध्ये थोडी शायनिंगही मारता येईल. ऑनलाइन भाषा शिकवणाऱ्या साइट्स ड्यूलिंगो (www.duolingo.com), फ्युचरलर्न (www.futurelearn.com)  या आहेत. ड्यूलिंगोवर तुम्हाला जर्मन भाषा शिकता येईल. त्याचे ॲपसुद्धा प्ले-स्टोअरवर उपलब्ध आहे.    इंटरनेटवर तुम्ही जशा विविध भाषा शिकू शकता, अगदी त्याच पद्धतीनं  वेगवेगळ्या  लिपीसुद्धा शिकू शकता. पूर्वी आपल्याकडं  मोडी लिपी वापरली जात असे. ऐतिहासिक कागदपत्रे मोडी, फारसी इत्यादी लिपीमध्ये असतात. आजकाल मोडी/फारसी लिपीचे ऑनलाइन वर्ग सर्रास घेतले जातात. ज्या विद्यार्थ्यांना इतिहासात रुची आहे, त्यांनी नक्की ते क्लास करावेत.

 मित्रांनो,  या सुटीचा सदुपयोग करून आपण आपली कला कौशल्ये विकसित करण्याचा प्रयत्न केला तर  भविष्यात याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल.  खरा विद्यार्थी तोच असतो,  जो सतत शिकत असतो. आपल्या सुदैवानं आपल्याकडं  इंटरनेट सारखं  माध्यम उपलब्ध आहे.  हे  असं  माध्यम आहे,  ज्यावर अगणित असं  ज्ञान उपलब्ध आहे. त्यामुळे आपण सर्वच जण  जेवढं जमेल, तेवढं शिकण्याचा प्रयत्न करूया..

संबंधित बातम्या