आरामदायी राइडचा ‘मानस’

रोहित हरीप
बुधवार, 21 मार्च 2018

भटकायला कोणाला आवडत नाही? भटकण्याच्या पद्धती वेगळ्या असू शकतात, भटकायचे मार्ग वेगळे असू शकतात, साधने आणि वाहने वेगळी असू शकतात; पण भटकायला आवडत नाही असा माणूस सापडणे कठीण आहे. पुण्या-मुंबईसारख्या शहरात शनिवार-रविवार पहाटे लवकर बाहेर पडलात तर बाइकर्सचे जथ्थेच्या जथ्थे हमखास नजरेला पडतात. गाडीला बांधलेले सामान, चमकणारे एलइडी लाईट्‌स, हेल्मेट्‌स, जर्किन्स, हॅण्डगोल्व्हज असा लवाजमा करून हे बाइकर्स भल्या पहाटेच घाईघाईने शहराबाहेर जाताना दिसतात. त्यांचा रुबाब, त्यांच्या बाइकचे गुरगुरणे, शिस्तीत एका ओळीत, एकाच गतीने, भरधाव जाणारे हे रायडर्स तुमचे लक्ष हमखास वेधून घेतात.

भटकायला कोणाला आवडत नाही? भटकण्याच्या पद्धती वेगळ्या असू शकतात, भटकायचे मार्ग वेगळे असू शकतात, साधने आणि वाहने वेगळी असू शकतात; पण भटकायला आवडत नाही असा माणूस सापडणे कठीण आहे. पुण्या-मुंबईसारख्या शहरात शनिवार-रविवार पहाटे लवकर बाहेर पडलात तर बाइकर्सचे जथ्थेच्या जथ्थे हमखास नजरेला पडतात. गाडीला बांधलेले सामान, चमकणारे एलइडी लाईट्‌स, हेल्मेट्‌स, जर्किन्स, हॅण्डगोल्व्हज असा लवाजमा करून हे बाइकर्स भल्या पहाटेच घाईघाईने शहराबाहेर जाताना दिसतात. त्यांचा रुबाब, त्यांच्या बाइकचे गुरगुरणे, शिस्तीत एका ओळीत, एकाच गतीने, भरधाव जाणारे हे रायडर्स तुमचे लक्ष हमखास वेधून घेतात.

गेल्या काही वर्षात लेह-लडाख, हंपी, कच्छचे रण यासारखी ठिकाणे पर्यटनाच्या नकाशावर ठळक झाली ती याच बाइकर्समुळे... फिरण्याची असंख्य साधने आणि वाहने असली तरी बाइकवरुन भटकंती करण्याला आजही एक वलय आहे. चारचाकीमधला कम्फर्ट बाइकवर नाही, बाइकवर फिरताना ऊन पावसाशी थेट सामना करावा लागतो, त्याशिवाय हायवेवरुन प्रवास करतानाचे धोके वेगळेच असतात. कारला सामान ठेवायला असणारी डिक्कीही बाइकला नसते, गाडी पंक्‍चर झाली तर स्टेफनीही नसते, तरीही आपले सामान लादून जगभर प्रवास करणाऱ्या या राइडर्सविषयी आजही अप्रूप कायम आहे.

मागच्या वर्षी बजाज कंपनीने त्यांची ‘डॉमीनॉर’ ही सुपर बाइक बाजारात आणल्यानंतर या बाइकचे प्रमोशन करण्यासाठी चक्क मध्य आशियात सुमारे २० हजार किलोमीटरचा दौरा काढला. जगातल्या अत्यंत खडतर रस्त्यावरच्या या प्रवासाचा संपूर्ण व्हिडिओ युट्युबवर आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बाइकर्सच्या प्रवासातल्या अडचणींची कल्पना येऊ शकते.  

बाइकवर फिरायला जाताना जास्त सामान नेता येत नाही ही एक मुख्य अडचण बऱ्याच जणांना आजही सतावत असते. बाइकवरच्या मर्यादित जागेमुळे, सगळे सामान सॅकमध्ये कोंबून लांबवरचा प्रवास करणे  नेहमीच त्रासदायक ठरते. बाइकर्सही ही अडचण ओळखली पुण्याच्या सौरभ साठे या तरुणाने! या अडचणींवर मात करण्यासाठी बाइकवर जास्तीचे सामान वाहून नेता येईल अशा पूरक ॲक्‍सेसरीज बनवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. सौरभला स्वतःला बाइक राइडिंगची आवड असल्याने, बाइकर्सना राइडला गेल्यावर नक्की कुठल्या अडचणींना तोंड द्यावे लागते याची पुरेपूर माहिती आहे. बाइकर्सच्या सामान वाहून नेण्याच्या मर्यादा ओळखत, त्या दूर करण्यासाठी सौरभने ‘मानस ॲडव्हेंचर गिअर्स’ हा स्टार्ट अप सुरू केला. पुण्यातला ‘साठे गादी कारखाना’ हा ८३ वर्षे जुना आहे. या व्यवसायातील चौथ्या पिढीचा प्रतिनिधी असलेल्या सौरभला बाइकिंगची आवड आहे. या आवडीतूनच घरच्या व्यवसायाला पूरक असा काही तरी व्यवसाय करावा या उद्देशाने हा स्टार्ट अप सौरभने सुरू केला.

या स्टार्ट अप प्रोजेक्‍ट अंतर्गत आज सॅडल बॅग, टॅंक बॅग, थाय पाऊच, टॅक्‍टीकल जॅकेट्‌स, वेस्ट पाऊच अशा विविध ॲक्‍सेसरीजचा उत्पादन मानस तर्फे केले जाते. या सर्व ॲक्‍सेसरीजचे उत्पादन पुण्यातच होते. या उत्पादन कारखान्यातून सुमारे पंधरा कारागिरांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध झाला आहे. हा स्टार्ट अप सुरू करताना सौरभला म्हणावे असे मार्गदर्शन कोणाचेच नव्हते. सुरवातीची सर्व माहिती त्याने इंटरनेटच्या माध्यमातून त्याने मिळवली. तसेच बाजारात उपलब्ध असणाऱ्या ॲक्‍सेसरीज त्याने पाहिल्या होत्या, स्वतः  या ॲक्‍सेसरीज वापरल्याने त्यातल्या त्रुटी त्याला नेमक्या माहिती होत्या. 

या त्रुटी टाळून त्याने स्वतःच्या उत्पादनांसाठी मार्केट निर्माण केले. आज मानस या ब्रँण्डखाली ज्या बॅग आणि ॲक्‍सेसरीज तयार होतात त्याचे सर्व डिझाईन सौरभ स्वतः करतो. या ॲक्‍सेसरीज तयार करताना जो कच्चा माल लागतो तो मुंबई आणि चीनवरुन थेट मागविला जातो. तयार केलेल्या बॅग्ज व इतर ॲक्‍सेसरीज तो बाइक रायडिंग क्षेत्रातले तज्ज्ञांकडून तपासून घेतो. या तज्ज्ञांनी हिरवा कंदील दिला की मगच त्या बाजारात येतात. स्वतःच्या ॲक्सेसरीजचा मार्केटिंग सौरभ स्वतःच करतो. बाइकर्सनी स्वतः ही उत्पादने वापरून दिलेली मान्यता ही त्या उत्पादनाच्या क्वालिटीला आणि उपयुक्ततेला दिलेली पावती असते. पुण्यातल्या ‘बाइकर्णी’ ग्रुपच्या उर्वशी पाटोळे, बजाज कंपनीचा अधिकृत बाइक टेस्टर वरद मोरे यासारख्या दिग्गजांनी ‘मानस ॲडव्हेंचर गिअर्स’च्या उत्पादनांना पसंतीची पावती दिली आहे. त्यांच्या निकषांच्या कसोटीवर ही सर्व उत्पादने उतरली आहेत. 

‘मानस ॲडव्हेंचर गिअर्स’चे वैशिष्ट म्हणजे हा प्रोजेक्‍ट पूर्णतः भारतीय आहे. बाइक ॲक्‍सेसरीज बनवणाऱ्या अनेक कंपन्या आज जगभरात आहेत. भारतात आणि त्यापेक्षा पुण्यात यातल्या मोजक्‍याच कंपन्यांची उत्पादने उपलब्ध होतात. ही उत्पादने मोजक्‍याच शोरूममध्ये आणि दुकानात उपलब्ध असतात. याशिवाय यातल्या एकाही कंपनीचा थेट आऊटलेट पुण्यात नाही. त्यामुळे विक्रीपश्‍चातच्या सेवेतही बऱ्याच वेळेला अडचणी येतात. या सर्व परदेशी कंपन्यांशी स्पर्धा तीव्र असताना ‘मानस ॲडव्हेंचर गिअर्स’ हळूहळू या क्षेत्रात पाय रोवताना दिसत आहे. रायडर्स आणि बाइकिंग ग्रुपमध्ये रॉयल एन्फिल्ड कंपनीला एक मानाचे स्थान आहे गेल्या कित्येक वर्षापासून आहे. कुठलीही लांब पल्ल्याची राइड म्हटले की त्यासाठी बुलेटच हवी असा एक समज वर्षानुवर्षे रायडर्स मध्ये होता. पण गेल्या काही वर्षांत सुझुकी, बजाज, हिरो या मध्यमवर्गीयांच्या लाडक्‍या कंपन्यांनी सर्वसामान्यांना परवडतील अशी अनेक दुचाकींची मॉडेल्स बाजारात आणल्यामुळे बाइकवरुन फिरण्याची हौस ही सर्वांच्याच आवाक्‍यात आली.

मात्र वर्षानुवर्षे ऑफ रोड किंवा लाँग राइडसाठी केवळ बुलेटचाच पर्याय उपलब्ध होता त्यामुळे आजही बाइक ॲक्‍सेसरीज मधल्या अनेक बॅग्ज व साहित्य हे बुलेटला सोयीचे ठरेल असा अंदाज घेऊनच बनवले जाते. त्यामुळे बुलेट व्यतिरिक्त  इतर गाड्यांच्या ॲक्‍सेसरीज फारशा दिसून येत नाहीत. तसेच बहुतांश कंपन्या या बाइक ॲक्‍सेसरीज तयार करताना रॉयल एन्फिल्ड ही एकच कंपनी डोळ्यासमोर ठेवून ॲक्‍सेसरीज तयार करतात, त्यामुळे ज्यांच्याकडे रॉयल एन्फिल्ड शिवाय बाकीच्या गाड्या असतात त्यांना त्याचा उपयोग होत नाही. 

‘मानस ॲडव्हेंचर गिअर्स’ चे वैशिष्ट्य असे आहे की त्यांनी ही त्रुटी पहिल्यापासून ओळखून त्यांच्या ॲक्‍सेसरीज आणि बॅग्ज या कुठल्याही कंपनीच्या कुठल्याही मॉडेलला अनुरूप असतील अशा प्रकारे बनवल्यामुळे बुलेटशिवाय, इतर बाइक्‍स घेऊन जे फिरायला जातात त्यांची सोय यामुळे झाली आहे. आत्तापर्यंत डॉमिनॉर, पल्सर, ॲव्हेंजर, फेझर यासारख्या गाड्यांना या ॲक्‍सेसरीज लावून, वापरून झाल्या आहेत.

सौरभ या आजच्या पिढीचा प्रतिनिधी असल्यामुळे तंत्रज्ञानाचा कुशलतेने वापर करण्यात अत्यंत तरबेज आहे. स्वतःच्या उत्पादनांचे मार्केटिंग आणि प्रसार करण्यासाठी तो सोशल मिडीयाचा अत्यंत प्रभावीपणे वापर करतो. फेसबुकसारख्या माध्यमातून जाहिरात केल्यामुळे त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो. लवकरच ‘मानस ॲडव्हेंचर गिअर्स’ ची वेबसाइटही सादर केली जाणार आहे. ज्या माध्यमातून ‘मानस ॲडव्हेंचर गिअर्स’च्या प्रॉडक्‍सची खरेदी ऑनलाइन करता येणे शक्‍य होणार आहे.

पुण्यात बाइकर्स क्‍लबची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आज किमान शंभर एक नोंदणीकृत बाइकर्स क्‍लब पुण्यात आहेत. या क्‍लबपैकी ’बजाज ॲव्हेंजर क्‍लब’शी ‘मानस ॲडव्हेंचर गिअर्स’ने नुकताच करार केला आहे. 

मॉर्केटिंगचा एक अभिनव प्रयोग म्हणून सौरभने त्यांची स्वतःची बाइक कस्टमाईज करून घेतली आहे. स्वतःच्या कंपनीच्या सर्व ॲक्‍सेसरीज आणि बॅग्ज स्वतःच्या गाडीला जोडल्या आहेत. त्यामुळे तो जिथे जातो तिथे त्याची बाइक हमखास लक्ष वेधून घेते. 

ज्यांना बाइक रायडिंगची हौस आहे. त्यांनी ‘मानस ॲडव्हेंचर गिअर्स’ला नक्की भेट द्यायला हवी. 

मी स्वतः ‘नॉन-बुलेट’वाला रायडर असल्याने, बुलेटशिवाय बाकीच्या गाड्यांच्या ॲक्‍सेसरीज बाजारात उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे सुरवातीच्या काळात लांब पल्ल्याच्या ट्रीपला जाताना बाइकवर सामान न्यायचे कसे हा प्रश्‍न असायचा. ही अडचणच एका प्रकारे मार्गदर्शक ठरली आणि ही कमतरता दूर करण्यासाठी आपणच या ॲक्‍सेसरीज तयार कराव्यात असे ठरवले. त्याच काळात ‘मेक इन इंडिया’ या योजनेची घोषणा सरकारकडून करण्यात आली. त्यातून प्रेरणा घेत ‘मानस ॲडव्हेंचर गिअर्स’ या स्टार्ट अपची सुरवात केली.
- सौरभ साठे
 

फोटो फीचर

संबंधित बातम्या